योगी सरकारमधील ‘हे’ एकमेव मुस्लिम मंत्री नेमके कोण आहेत?

    • Author, दिलनवाज पाशा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. योगी आदित्यनाथांसोबत 52 मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यात दोन उपमुख्यमंत्री, 16 कॅबिनेट मंत्री, 14 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 20 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्येच्या जवळपास 20 टक्के मुस्लिम समाज आहे. मात्र, योगींच्या मंत्रिमंडळात केवळ एकच मुस्लिम मंत्र्याचा समावेश करण्यात आलाय.

उत्तर प्रदेशातील बलियात राहणारे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित दानिश आजाद अन्सारी यांना योगींच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय.

योगी सरकारच्या आधीच्या सरकारमध्येही एकच मंत्री होते, त्यांचं नाव मोहसिन रजा.

दानिश आजाद अन्सारी हे 32 वर्षांचे असून, लखनऊ विद्यापीठात ते अभाविपशी संबंधित आहेत.

दानिश आजाद अन्सारी हे मूळचे बलियातील अपायल गावातील रहिवासी आहेत.

लखनऊ विद्यापीठात शिक्षण

दानिश यांचे भाऊ पिंटू खान बीबीसीशी बोलताना म्हणाले की, "आमचे आजोबा मोहम्मद ताहा अन्सारी सुखपुरा गावातील ज्युनियर हायस्कूलमध्ये शिक्षक होते आणि त्यांना आजूबाजूच्या गावात मानसन्मान होता. आजोबांचा प्रभाव दानिश यांच्यावर असून, त्यांनी सुरुवातीपासूनच नाव कमवायला सुरुवात केली."

दानिश यांच्या वडिलांचे नाव समीउल्लाह अन्सारी आहे. ते सुद्धा बलियातच राहातात. दानिश यांनी सुरुवातीचं शिक्षण आपल्या अपायल गावातल्या प्राथमिक शाळेतूनच घेतलं होतं.

बलियामध्ये बारावीपर्यंतच शिक्षण घेतल्यावर ते लखनौ विद्यापीठात बी. कॉमसाठी गेले. तिथेच त्यांनी मास्टर ऑफ क्वालिटी मॅनेजमेंट आणि मास्टर ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण पूर्ण केलं.

दानिश अन्सारी जानेवारी 2011 पासून अभाविपबरोबर काम करू लागले. त्यांनी यावेळेस निवडणूक लढवलेली नाही. ते विधानसभेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत.

दानिश स्वतंत्र विचारांचे असल्यामुळे ते राजकारणात सक्रीय झाल्यानंतर त्यांच्या नावाला आझाद हा शब्दही चिकटला असं त्यांना ओळखणारे लोक सांगतात.

पिंटू खान सांगतात, "अभाविपबरोबर काम करायला सुरुवात केल्यावर दानिश यांनी स्वतःची ओळख बनवायला सुरू केलं. ते मोकळेपणाने बोलत आणि लोकांना प्रभावित करत. तेव्हापासून त्यांचया नावात आझाद शब्दाची भर पडली."

मुसलमान तरुणांमध्ये रा. स्व. संघाचा प्रचार

दानिश यांनी मुसलमान तरुणांमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा प्रसार करणं सुरू केलं.

त्यांमी मुस्लीम युवकांमध्ये संघाचे विचार प्रसारित करण्याचं काम केलं आणि त्यामुळेच त्यांना ओळख मिळत गेली.

त्यांना पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे महामंत्रीही बनवण्यात आलं.

पारंपरिक मुस्लीम परिवार

दानिश त्यांच्या आई-वडिलांचे एकमेव पुत्र आहेत. दानिश विवाहित आहेत. त्यांच्या बहिणीचेही लग्न झालेले आहेत. दानिश 32 वर्षांचे आहेत.

दानिश एक पारंपरिक मुस्लीम कुटुंबातील असून त्यांच्या कुटुंबांची त्या भागामध्ये चांगली ओळख आहे. त्यांचे आई-वडील दोघेही हजला जाऊन आलेले आहेत. ते दोघेही अत्यंत धार्मिक आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)