योगी आदित्यनाथ संसदेत ढसाढसा रडले तेव्हा....पाहा 10 फोटोंमध्ये त्यांचा आजवरचा प्रवास

उत्तर प्रदेश निवडणुकांच्या निमित्ताने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कारकीर्दीतील प्रमुख घडामोडींचा घेतलेला आढावा.

1.सोमनाथ चॅटर्जी यांनी धीर दिला...

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेत निवडून जात असत. त्यांच्यावर 2007 साली दंगलीचा आरोप ठेवून त्यांची चौकशी केली जात होती. त्यावेळेस उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यांचे सरकार होते. पोलीस आपल्यावर अन्याय करत असल्याचं ते लोकसभेत सांगत होते. हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. अचानक ते स्फुंदत स्फुंदत रडू लागले. लोकसभेचे सभापती सोमनाथ चॅटर्जी व भाजपाच्या इतर खासदारांनी त्यांना धीर दिला होता.

2. योगी आदित्यनाथांनी गायीला केला होता नमस्कार

मुख्यमंत्री होण्याच्या दहा वर्ष आधी म्हणजे 2007 मध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी योगी आदित्यनाथ यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी ते खासदार होते. मनोज सिंह त्यावेळी काय घडलं ते सांगतात, "ज्यावेळी पोलीस त्यांना अटक करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी आधी योगी यांच्या पाया पडून नमस्कार केला होता.

श्रद्धेचा अंमल इतका की हिंदी भाषीय वृत्तपत्राने याघटनेसंदर्भात वृत्तांकन करताना अटक झाल्यानंतर गोरखनाथ मंदिरातील गोशाळेतील एका गायीच्या रडण्याचं सविस्तर वर्णन केलं होतं".

3. निवडणूक प्रचारादरम्यानचं भोजन

उत्तर प्रदेशचा गड राखण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्य पिंजून काढलं. अनेक महिने सुरू असलेल्या प्रचारात योगी आदित्यनाथ यांनी अनेकदा समाजातल्या अनेक स्तरातल्या लोकांकडे जेवणाचा आनंद लुटला. प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश भाजपचे प्रमुख नेते.

4. योगी आदित्यनाथ शाहनवाझ हुसेन यांच्याबरोबर

योगी आदित्यनाथ बिहारचे उद्योग मंत्री, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे प्रमुख आणि प्रवक्ते शाहनवाझ हुसैन यांच्यासह. 2018 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेत योगी आदित्यनाथ म्हणाले, मी हिंदू आहे त्यामुळे ईद साजरी करत नाही. याचा मला अभिमान आहे.

5.योगी आदित्यनाथ पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांबरोबर

दिल्लीतील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असं राजकीय वर्तुळात म्हटलं जातं. 2024 लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपसाठी उत्तर प्रदेशचा गड महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच राज्यातून निवडून येतात. उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते या राज्यात तळ ठोकून होते. प्रचारादरम्यान योगी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याबरोबर. छायाचित्रात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही दिसत आहेत.

6. योगी आदित्यनाथ मुलायम सिंह यादवांबरोबर

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या साम्राज्याला धक्का देत योगी आदित्यनाथ यांनी सत्ता काबीज केली. उत्तर प्रदेशातल्या या स्थित्यंतराने देशाच्या राजकारणाला नवा आयाम दिला.

7. योगी आदित्यनाथ आणि धर्मकारण

महंत आदित्यनाथ योगी जेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले तेव्हा धार्मिक सत्तेबरोबरच राजकीय सत्तादेखील त्यांच्या हातात आली. ही गोष्ट ठसवण्यासाठी मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी महाराज असं नामानिधान लावलं जातं.

सरकारी दस्तावेजांमध्ये त्यांच्या नावाबरोबर महंत किंवा महाराज ही बिरुदावली लावली जात नाही पण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरही भगवी वस्त्रं परिधान करत असल्याने त्यांची धार्मिक ओळख सुटत नाही. त्यांच्या खुर्चीच्या मागे भगव्या रंगाचं उपरणं ठेवलेलं असतं.

8. बाबा रामदेव यांच्याबरोबर

योग गुरू म्हणून देश आणि विदेशात प्रसिद्ध असे बाबा रामदेव यांच्या शिबिरात योगी आदित्यनाथ व्यायाम करताना.

9. योगी आदित्यनाथ आणि हिंदू युवा वाहिनी

भाजपच्या बरोबरीने योगी आदित्यनाथ यांनी हिंदू युवा वाहिनीची स्थापना केली. हिंदू युवा वाहिनीने खासदार योगी आदित्यनाथ यांना बळकट केलं. नेता म्हणून त्यांची छाप गोरखपूरपल्याडही उमटली.

10. महंत मुख्यमंत्री

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी गोहत्येविरोधातला कायदा अधिक कठोर केला आहे. धर्म परिवर्तनासंदर्भात नवा कायदा त्यांनी लागू केला आहे. गोरखपूरचे खासदार म्हणून योगींनी संसदेत पाच खाजगी विधेयकं मांडली होती.

यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड, अधिकृत पातळीवर इंडिया ऐवजी भारत असं करणं, गोहत्येवर बंदी, धर्म परिवर्तनासंदर्भात कायदा, इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या गोरखपूर खंडपीठाच्या स्थापनेची मागणी अशाचा समावेश होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)