You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तर प्रदेशातल्या त्या वस्त्या जिथे पुरुष नाहीतच, तुम्हाला भेटतील फक्त बायका
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी, जौनपूरहून
उत्तर प्रदेशमधल्या मुस्तफाबादला जायचा रस्ता धुळीने भरलेला होता. मुख्य हायवेवर जोरात रस्त्याचं काम सुरु आहे, पण तो सोडून बाहेर पडलं की धुळीने भरलेले लहान लहान रस्ते लागतात. त्यातच गावांचे बाजार भरलेले असतात.
हिंदी हार्टलँड ज्याला म्हणतात त्या उत्तर प्रदेशच्या पूर्वांचलमधून आम्ही प्रवास करत होतो. इथले जौनपूर, प्रतापगड, भदोई, चंदोली, सुलतानपूर, मिर्झापूर (तेच ते वेबसीरिजवालं) जिल्हे एका गोष्टीची निर्यात करतात. माणसांची.
इथूनच सर्वाधिक कामगार, मजूर मुंबई, महाराष्ट्रात काम करायला येतात.
मुंबईत परप्रांतीय कामगारांचा मुद्दा कायम चर्चेत असतो, त्यावरून राजकारण होतं, क्वचित हाणामारी होते. तरीही दरदिवशी पूर्वांचलमधून येणाऱ्या ट्रेनमधून हजारो यूपी-बिहारचे स्थलांतरित कामगार मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशनवर उतरत असतात.
असेच 8 वर्षांपूर्वी आले होते तौसिफ आणि हसन. ते आम्हाला मुंबईतल्या धारावीत भेटले. अनेक वर्षं लहानमोठी काम केल्यानंतर ते आता धारावीत शिलाईचं काम करतात.
मुंबई सोडून घरी जायचा अनेकदा प्रयत्न केला पण दारिद्र्य, रोजगाराच्या संधी नसणं, स्वतःची शेती नसणं अशा अनेक कारणांमुळे त्यांना ना मुंबई सोडता आली ना, आपल्या भागात पोट भरण्यासारखं काम मिळालं. मुंबईतही समस्या त्यांची पाठ सोडत नाहीत.
त्यांना राहायला जागा नाही. जिथे काम करायचं तिथेच राहायचं. काम करत असताना समोर पडलेल्या कपड्यांच्या ढिगाकडे हात करून तौसिफ म्हणतात, "हे बाजूला करायचे आणि इथेच झोपायचं."
"ढेकणं चावत असतात. इथे बाथरूम-संडासची काही सोय नाही. तसेच जगतो आणि दिवसाकाठी पाचशे रूपये कमवतो. त्यातले दोन-तीनशे रूपये जेवणाखाण्यात खर्च होतात. फार वाईट परिस्थितीत जगतो आम्ही."
तरीही हे लोक का मुंबईची वाट धरतात? हे शोधायला आम्ही उलटा प्रवास करायचं ठरवलं. महाराष्ट्रातून गाठलं थेट यूपीचं पूर्वांचल. मुंबईत दिवसरात्र काम करणाऱ्या मजुरांची बायका मुलं गावाकडे कशी जगतात हे पाहायला.
जौनपूरच्या मछलीनगर तालुक्यातलं मुस्तफाबाद हे गाव. तिथे गट ग्रामपंचायत आहे. त्यातलं गट क्रमांक 12 चं गाव म्हणजे चिरखान.
तिथल्या एका घरात, घर कसलं, एका कुंपणाच्या आत वरती प्लास्टिकचा कागद टाकलेल्या तीन झोपड्या होत्या... तिथेच आम्हाला भेटल्या बद्रुन्निसा अली. या तौसिफच्या आई.
काय कसं काय विचारल्यावर म्हणाल्या, "काय सांगू पोरी, इतका त्रास होतोय की माझं मलाच माहिती."
तौसिफला पाच भाऊ आहेत, त्यातले चार मुंबईतच काम करतात. ते राहातात त्या मुस्तफाबादच्या चिरखान वस्तीतले सगळेच पुरुष मुंबईत किंवा बाहेर कामाला आहेत. आम्ही गेलो तेव्हा आम्हाला वस्तीत दिसल्या त्या फक्त बायका, मुलं आणि वृद्ध मंडळी.
इथेही संडास-बाथरूम नाहीत, बायकांना बाहेर जावं लागतं. पाणीही बाहेरूनच भरून आणावं लागतं. तौसिफच्या आई बद्रुनिसांचे आता सांधे प्रचंड दुखतात, पण त्यांच्याकडे औषधपाण्यालाही पैसे नाहीयेत.
"माझं मलाच माहितेय की किती त्रास होतो. पण काय करणार, रडून रडून गप्प बसते मी. नाईलाज आहे. बेटा खरंच खूप त्रासात आहे मी," बद्रुन्निसा म्हणतात.
शेजारच्या झोपडीत तौसिफची पत्नी साजिदा झाडलोट करत असते. अंगणात त्यांची भावजयी मुलांवर ओरडत असते.
आम्हाला बसवून एका पोराला त्या बिस्कीट आणायला पिटाळतात. इतक्या गरिबीतही त्या महिला घरी आलेल्या पाहुण्याचं स्वागत चहा-बिस्किटाने करायला विसरत नाहीत.
नवऱ्याची आठवण येत नाही का? तुम्हाला नाही जावंस वाटत का मुंबईला? असं विचारल्यावर साजिदा म्हणतात, "ते म्हणतात की शहरात कुठे नेऊ तुला. चार मुलं आहेत, एवढा खर्च कसा करू. गाव खूप लांब पडतं तर मी नेणार नाही."
घरची परिस्थिती अवघड आहे हे दिसत असतंच. तेवढ्यात बद्रुन्निसा म्हणतात, "जेव्हापासून लॉकडाऊन लागलं, तेव्हापासून खूप हाल होत आहेत. माझी मुलं स्वतःच उपाशी मरताहेत तर मला काय देणार? काहीच नाहीये. घरदार नाहीये, थंडी कशी काढायची आम्ही? वरती फक्त प्लास्टिक टाकलंय. जगणं अवघड झालंय."
मग तुम्ही का पाठवलं तुमच्या मुलांना इतक्या लांब असं विचारल्यावर त्या उसळून म्हणतात, "इथे काम आहे का काही? कशी पोटं भरणार या सगळ्यांची."
इथले दुसरे रहिवासी हासीम आम्हाला धारावीत भेटले तेव्हाही असंच काही म्हणाले होते.
"कोण येतं हो आपल्या बायका-मुलांना, आई-वडिलांना इतक्या अडचणीत सोडून? महिनोंमहिने आपल्या मुलांचे चेहरे दिसत नाहीत. पैशासाठीच येतो ना. गावात तर काही रोजगार नाही. सगळ्यांची पोटं भरायची म्हणजे काम करावं लागणार, आणि त्यासाठी मुंबई गाठावीच लागते."
या लोकांचे जेवणाचेच वांधे आहेत, त्यामुळे मुलांची शाळा ही प्राथमिकता नसणार हे कळतंच. तरीही नेटाने विचारलं की तुमच्या या लहान मुलांपैकी कोणी शाळेत जातं का, तर साजिदा, त्यांची जाऊ सुभीना थातूरमातून उत्तर देऊन विषय बदलतात.
उत्तर प्रदेश हे राज्य देशाचा पंतप्रधान ठरवतं असं म्हणतात, पण इथली माणसं मात्र या राज्यात टिकत नाहीत.
पूर्व उत्तर प्रदेशमधून लाखो लोक मुंबई महाराष्ट्राकडे आलेले आहेत. इथे जातीव्यवस्थेचे पाश अजूनही काचणारे आहेत, रोजगार नाही, त्यामुळे हातात पैसा नाही, अनेकांना स्वतःची इंचभर ही जमीन नाही.
2017 मध्ये गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मुलन मंत्रालयाने एक अहवाल सादर केला होता. त्यात देशातल्या 17 जिल्ह्यातून सर्वाधिक पुरुष शहराकडे स्थलांतरित झाले. यातील दहा जिल्हे उत्तर प्रदेशातले आहेत.
मागे राहाणाऱ्या बायकांच्या हातालाही काही काम नाहीये. सुभीना अली तौसिफच्या भाऊजयी आहेत.
त्या म्हणतात, "काहीच काम नाहीये बायकांसाठी. घरचं आवरलं की बायका नुस्त्या बसून राहातात. कोणतं काम शोधणार, काय काम करणार? काहीच नाहीये. काही काम मिळालं तर निदान मुलांचा खर्च भागेल."
साजिदा, सुभीना आता जवळच्या मछलीनगर तालुक्यातून विड्या वळायचं सामान आणतात आणि त्या वळतात. त्यात त्यांना आठवड्याला पाचशे रूपये मिळतात. या भागात काही अशीही कुटुंब आम्हाला भेटली ज्यांच्या तीन पिढ्या मुंबईत काम करतात, पण त्यांना काही सुविधा मिळत नाहीत. ना या भागात रोजगार निर्माण होतात.
ही लोक पिढ्यानपिढ्या मुंबई, महाराष्ट्र किंवा आणखी एखाद्या मोठ्या शहराची वाट धरत राहातात.
"वेगवेगळ्या पक्षांची सरकारं आली, गेली. प्रत्येक सरकारने वचनं दिली की आमचं आयुष्य सुधरवतील, आम्हाला गावात रोजगार देतील पण कधीच काही दिसलं नाही, आमच्यापर्यंत आलं नाही," हासीम म्हणतात.
आम्हाला निरोप देताना ते एकच वाक्य म्हणतात, "मला, माझ्या कुटुंबाला जिवंत राहायचं असेल तर मुंबईची वाट धरण्याखेरीज पर्याय नाही."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)