लखीमपूर खिरी : योगी आदित्यनाथ डॅमेज कंट्रोलमध्ये यशस्वी झालेत की नाही?

    • Author, प्रदीप कुमार
    • Role, बीबीसी हिंदी

गेल्या सोमवारपासून या सोमवारपर्यंत उत्तर प्रदेशात ज्या दोन घटना घडल्या, त्यामुळे तेथील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. आगामी दिवसात उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलेलं असेल, याचा अंदाजही यावरून येतो.

या सर्व राजकीय हालचालींचं केंद्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आहेत.

गेल्या सोमवारी (27 सप्टेंबर) गोरखपूरमधील एका हॉटेलात कानपूरमधील व्यावसायिकाचा पोलिसांच्या कथित मारहाणीत मृत्यू झाला. रामगढताल पोलीस ठाण्याचे प्रभारी, गोरखपूरचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्या भूमिका या घटनेत संशयास्पद मानल्या गेल्या.

यानंतर योगी आदित्यनाथ गोरखपूरमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले. व्यावसायिकाच्या मृत्यूची घटना त्यांनी सांभाळून घेतली. व्यावसायिकाच्या पत्नीला सरकारी नोकरी आणि 40 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आणि विरोधकांना राजकारण करू दिलं नाही.

जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्यावरही कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, तसं काही झालं नाही.

त्यानंतर रविवारी (3 ऑक्टोबर) गोरखपूरच्या खानिमपूरमध्ये जेव्हा योगी आदित्यनाथ यांनी स्थानिक लोकांसाठी पीएनजी गॅस कनेक्शन देण्यास सुरुवात केली, तेव्हा ते काहीसे निवांत दिसून आले.

या कार्यक्रमात त्यांनी स्थानिक खासदार रवी किशन शुक्ला यांच्याबाबत काही विनोदही केले. आनंदी वातावरणात कार्यक्रम सुरू असतानाच संध्याकाळी 5.49 वाजता योगी आदित्यनाथ यांना एक फोन आला आणि त्यानंतर ते काहीसे चिंतित दिसले.

शक्यता अशी आहे की, योगी आदित्यनथ यांना लखीमपूर खिरीमधील घटनेबाबत संपूर्ण माहिती मिळाली असावी.

जेव्हा योगी आदित्यनाथ यांना माहिती मिळाली...

खरंतर लखीमपूर खिरीमधील घटनेबाबत योगी आदित्यनाथ यांना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मिळाली असावी. त्यावेळी योगी आदित्यनाथ डुमरियागंजमधील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.

डुमरियागंजमधील त्यांच्या कार्यक्रमाचा व्हीडिओ योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटर हँडलवरून एक वाजून 55 मिनिटांपासून सुरू झालेला दिसतो. या व्हीडिओत योगी आदित्यनाथ यांचं व्यासपीठावर स्वागत होतं आणि त्यानंतर जवळपास अर्धा तास ते भाषण करताना दिसतात. हा व्हीडिओ 40 मिनिटांचा आहे.

त्यामुळे लखीमपूर खिरीमधील घटनेची माहिती योगींना तीन वाजण्याच्या सुमारास कळली असावी.

योगी आदित्यनाथ यांच्या टीममधील महत्त्वाच्या सदस्याच्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ डुमरियागंजमध्ये होते, तेव्हाच त्यांना माहिती मिळाली होती. त्यांनी या प्रकरणावर लक्ष ठेवण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते.

गोरखपूरच्या खानिपूरमध्ये पीएनजी गॅस कनेक्शनच्या कार्यक्रमादरम्यान आलेला फोन त्यांना घटनेचं गांभीर्य सांगणारा होता. या कार्यक्रमानंतर त्यांना गीता वाटिकामध्ये हनुमान प्रसाद पोद्दार जयंती कार्यक्रमात भाग घ्यायचा होता. योगी आदित्यनाथ तिथं पोहोचले आणि जवळपास 18 मिनिटांपर्यंत 'कल्याण' मासिकाचे संपादक राहिलेले पोद्दार यांच्यावर ते बोलले.

मात्र, या भाषणाच्या सुरुवातीची 17 सेकंद योगी आदित्यनाथ काहीसे विचलित झालेले दिसून आले. या 17 सेकंदात त्यांनी चारवेळा माईक वर-खाली केला आणि त्यानंतर बोलण्यास सुरुवात केली. 18 मिनिटांच्या भाषणात योगी आदित्यनाथ यांनी धर्म आणि धार्मिक चालीरितींवर भाष्य केलं. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावर क्वचितच हास्य दिसलं. बराच वेळ त्यांच्या चेहऱ्यावर चिंताच दिसली.

या कार्यक्रमानंतर ते विमानतळाच्या दिशेनं रवाना झाले. विमानतळावर स्टेट प्लेन तयारच होतं.

योगी आदित्यनाथच्या टीममधील एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, "लखीमपूरच्या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पुढील कार्यक्रम रद्द केला आणि जवळपास आठ वाजता ते लखनौमध्ये पोहोचले. गोरखपूर विमानतळावर येण्याच्या मार्गातही ते सातत्यानं आदेश देत होते."

रात्री 9 वाजता बैठक सुरू झाली...

योगी आदित्यनाथ हे लखनौमध्ये पोहोचेपर्यंत स्थिती स्पष्ट झाली होती की, लखीमपूर खिरीत आठ लोकांचा जीव गेलाय. यात शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी चार शेतकरी होते आणि भाजप कार्यकर्त्यांसह चार लोकही होते.

दुसरीकडे, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या लखनौमध्ये पोहोचणार होत्या. बसपा आणि सपाचे वरिष्ठ नेतेही लखीमपूर खिरीत पोहोचण्याचे प्रयत्न करत होते.

योगी आदित्यनाथ यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान परिस्थिती नियंत्रणात ठेवणं हे होतं. त्याचसोबत विरोधकांवर नियंत्रण ठेवणंही हेही त्यांच्यासमोरील आव्हान होतं. मुख्य सचिव राकेश तिवारी, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अवनीश अवस्थी, पोलीस महासंचालक मुकेश गोयल, डीजी (गुप्तचर विभाग) डीएस चौहान आणि अतिरिक्त मुख्य सचिव (मुख्यमंत्री) एसपी गोयल हे सर्व मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.

तसंच, अतिरिक्त संचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार, अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी) देवेश चतुर्वेदी, आयजी लक्ष्मी सिंह आणि डायल 112 चे अजय पाल शर्मा हे त्याआधीच लखीमपूर खिरीच्या दिशेनं निघाले होते.

या बैठकीत सहभागी झालेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, "रात्री नऊ वाजता बैठक सुरू झाली आणि त्यात सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. याच बैठकीत ठरलं की, विरोधी पक्षातील कुठल्याही नेत्याला घटनास्थळी पोहोचू द्यायचं नाही. बैठकीदरम्यान मुख्यमंत्री एडीजी (कायदा व सुव्यवस्था) कडून अपडेटही घेत होते."

सकाळी 5 वाजेपर्यंत मिटिंग सुरू होती...

हे ऐकायला, वाचायला सोपं वाटत असेल. मात्र, बैठक सुरू असतानाच घेत असलेल्या निर्णयांवर अंमलबजावणी होत होती.

अखिलेश यादव, प्रियंका गांधी आणि सतीश मिश्रा यांना नजरकैदेत ठेवण्याची तयारी सुरू झाली, इंटरनेटवर नियंत्रणाचा निर्णय घेण्यात आला आणि केवळ शेतकरी नेते राकेश टिकैत यांनाच घटनास्थळापर्यंत जाण्यास परवानगी देण्यात आली.

या प्रकरणातली संवेदनशीलता लक्षात घेताना अनेक जिल्ह्यांमधील पोलिसांना सतर्क करण्यात आलं. एवढंच नव्हे तर पंजाब आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या विमानांना लखनौ विमानतळावर उतरण्यास परवानगी नाकारण्यात आली. या सर्व बैठका सकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होत्या.

त्यानंतर साडेनऊ वाजता सर्व अधिकारी पुन्हा योगी आदित्यनाथ यांच्याकडे पोहोचले होते. मात्र, ठरवल्याप्रमाणे शेतकरी नेत्यांसोबत चर्चा करण्यात प्रशांत कुमार यांची टीम यशस्वी झाली.

प्रशांत कुमार यांनी याबाबत सांगितलं की, "दोषींवर कारवाई केली जाईल, मृतांच्या कुटुंबाला प्रत्येक 45 लाख रुपये मदत देणार, जखमींना 10 लाख रुपये मदत देणार, तसंच मृतांच्या कुटुंबातील एका सदस्याला स्थानिक स्तरावर योग्यतेनुसार नोकरी दिली जाईल."

योगींना परिस्थिती हाताळण्यात यश आलं?

या संपूर्ण घटनाक्रमावरून वाटतं की, योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा अडचणीचा ठरू शकण्याची शक्यता असलेला मुद्दा विरोधकांच्या हातून काढून घेण्यात यश मिळवलं. मात्र, लखीमपूर खिरीतला मुद्दा पूर्णपणे संपेल की आगामी काळात योगी आदित्यनाथ यांच्यासाठी अडचणीचा ठरेल?

याबाबत समाजवादी पार्टीचे नेते आणि माजी मंत्री अभिषेक मिश्रा म्हणतात, "आपला हक्क मागणाऱ्या शेतकऱ्यांवर जो अत्याचार होतेय, त्याचं उत्तर तर योगी आदित्यनाथ सरकारला द्यावंच लागेल. आधी जे आंदोलन पश्चिम उत्तर प्रदेशापुरतं मर्यादित असल्याचं सांगितलं जात होतं, ते आता संपूर्ण राज्याचं आंदोलन बनलंय. लोक या सरकारलं बाहेर फेकून देतील."

उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा अभ्यास असणारे वरिष्ठ पत्रकार शरद गुप्ता यांना वाटतं की, योगी आदित्यनाथ यांच्यासमोरील आव्हानं आगामी काळातही कमी होणार नहीत.

"कानपूरच्या व्यावसायिकाच्या मृत्यूची घटना असो वा लखीमपूर खिरीतली घटना असो, योगी आदित्यनाथ सरकारनं डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला. आर्थिक मदत आणि नोकरी देऊन प्रश्न मिटल्याचं वाटू शकतं, मात्र सरकारच्या प्रतिमेवर जो डाग पडतो, तो इतक्या लवकर पुसला जात नाही," असं शरद गुप्ता म्हणतात.

डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न

उत्तर प्रदेशची निवडणूक तोंडावर नसती, तर योगी आदित्यनाथ सरकारनं डॅमेज कंट्रोलकडे इतकं लक्ष दिलं नसतं, असं म्हणत शरद गुप्ता पुढे सांगतात, "निवडणुकीला मॅनेज करण्यासाठी डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न आहे. एवढी मोठी घटना घडली आणि केंद्रीय नेतृत्त्वाकडून काही म्हटलं गेलं का, हे पाहा. शेतकऱ्यांचं आंदोलन 10 महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, त्यांच्या मागण्यांबाबत आतापर्यंत काय केलं गेलं?"

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत आणि त्यांच्या सोबतच्या शेतकऱ्यांनी स्पष्ट म्हटलं की, यूपी सरकारसोबत जी बोलणी झाली, त्यानुसार आठ दिवसांच्या आत आरोपींना अटक करावी लागेल. याच मुद्द्यावर योगी सरकारची खरी कसोटी असेल.

योगी आदित्यनाथ यांच्यावर त्यांच्याच पक्षाचे केंद्रीय मंत्री असलेले अजय मिश्र टेनी आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्र यांच्यावर कारवाई करण्याचा दबाव आहे.

मात्र, या पिता-पुत्रांनी हे आरोप फेटाळले आहेत, तसंच शेतकरी संघटनांकडूनही कोणताच असा स्पष्ट पुरावा समोर आला नाही, ज्यातून आशिष मिश्र घटनास्थळी होता याला दुजोरा मिळू शकेल. मात्र, हा सर्व चौकशीचा भाग आहे आणि शंका अशी आहे की, गुन्हा दाखल होण्याच्या आठ दिवसानंतरही कारवाई करण्याच्या स्थितीत हे प्रकरण येईल, याची शक्यता कमी आहे.

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनीही ट्वीटद्वारे लखीमपूर खिरीतल्या घटनेवरून यूपी सरकारवर टीका केलीय.

शरद गुप्ता म्हणतात, "चौकशी समितीची स्थापनाच यासाठी केली जाते की, चौकशी समिती चौकशी करेल, नंतर आपला अहवाल देईल आणि त्यानंतर त्याबाबत शिक्षा होईल. हे सर्व होईपर्यंत यूपीतल्या निवडणुकाही होऊन जातील."

तर दुसरीकडे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते आनंद दुबे म्हणतात, "हे संपूर्ण प्रकरण असं आहे की, यात प्राथमिकदृष्ट्या काहीच सांगू सकत नाही. त्यामुळे चौकशी आवश्यक आहे आणि आमचं सरकार पारदर्शक चौकशीचा विश्वास देतं."

भाजपला कटाची शंका

आनंद दुबे असाही दावा करतात की, "लखीमपूर खिरीची घटना एका कटाचा भाग आहे. हे अनेकदा स्पष्ट झालंय की, शेतकऱ्यांचं आंदोलन शेतकऱ्याचं नसून, विरोधकांनी चालवलेलं आंदोलन आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आधार घेत विरोधक राज्य सरकारविरोधात वातावरण तयार करू पाहत आहेत. मात्र, असं होणार नाही."

लखीमपूर खिरी हा काही भाजपचा परंपरागत गड नाही. मात्र, 2017 मध्ये विधानसभा निवडणुकीत इथल्या आठच्या आठ जागा भाजपनं जिंकल्या. याआधी 2007 आणि 2012 मध्ये लखीमपूर खिरीत एक-एक जागाच मिळवली होती. यामुळेच अजय मिश्र टेनी यांना केंद्रीय गृहराज्य मंत्री बनवण्यात आलं.

मात्र, लखीमपूर खिरीतली घटना योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशातील राजकारणात अडचणीच्या ठरणाऱ्या दोन घटनांशीही जोडलीय. एक म्हणजे, लखीमपूरमधील स्थानिक दबंग नेते, ब्राह्मणांचे नेते अजय मिश्र, ज्यांना ब्राह्मण कार्डामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालंय.

शरद गुप्ता म्हणतात की, "जर योगी आदित्यनाथ यांनी अजय मिश्र आणि त्यांच्या मुलावर कारवाई केली, तर योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात पक्षाअंतर्गत नाराजी निर्माण होऊ शकते. ब्राह्मण समूह भाजपसोबत आहे. मात्र, योगी आदित्यनाथ ही त्यांची पहिली पसंती नाही."

तसंच, या आयोजनात सहभागी असणारे दुसरे नेते म्हणजे यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे होते. जाणकारांच्या मते, मौर्य यांचे संबंध योगींशी बरे नाहीत. वेळोवेळी त्यांच्यात खटके उडत असतात. मात्र, केशव प्रसाद मौर्य घटनास्थळापर्यंत पोहोचले नसले, तरी अजय मिश्र यांच्याशी त्यांचे संबंध चांगले आहेत.

"भाजपमध्ये एक गट आहे, ज्याला वाटतं की योगी आदित्यनाथ हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये. त्यात अशा घटनांमुळे योगी आदित्यनाथ यांनाच फटका बसतो, म्हणून ते वेगानं सक्रिय होतात," असं शरद गुप्ता सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)