लखीमपूर हिंसाचार प्रकरणात आशिष मिश्रांना समन्स, दोन जण ताब्यात

लखीमपूर हिंसाचार प्रकरणात आशिष मिश्रांना समन्स बजावण्यात आले आहे.

आज सुप्रीम कोर्टात तिकोनिया हिंसाचार प्रकरणावर सुनावणी झाली. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.

लखनौ क्षेत्राच्या आईजी लक्ष्मी सिंह यांनी सांगितलं की दोन जणांना ताब्यात घेतले आहे तर केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्र यांना समन्स बजावण्यात आले आहेत.

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि त्यांच्या समर्थकांना आज उत्तरप्रदेश-हरयाणा सीमेवर अडवण्यात आले आणि ताब्यात घेतले गेले.

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमधील हिंसाचारात 4 शेतकऱ्यांसह 8 जणांच्या मृत्यूची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांचे खंडपीठ आज (7 ऑक्टोबर) या प्रकरणाची सुनावणी झाली.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली हे या खंडपीठाचे सदस्य आहेत.

उत्तर प्रदेश सरकारनेही या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय चौकशी आयोग नेमला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचारानंतर बुधवारी (7 ऑक्टोबर) काँग्रेस नेते राहुल गांधी घटनास्थळी रवाना झाले. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी सध्या सीतापूर या ठिकाणी आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे चार नेते पोहोचले.

प्रियंका गांधी यांना देखील लखीमपूरला जायचे होते पण पोलिसांनी त्यांना सीतापूर येथेच अडवले आहे.

राहुल गांधी, प्रियांका गांधींसह तीन इतर जणांना लखीमपूर खिरीमध्ये जायची परवानगी देण्यात आल्याचं उत्तर प्रदेश सरकारच्या गृह मंत्रालयाने म्हटल्यानंतर राहुल गांधी लखनौला विमानाने पोहोचले पण त्यांना विमानतळावरच रोखण्यात आलं होतं.

त्यानंतर राहुल गांधी म्हणाले, "ही कसल्या प्रकारची परवानगी आहे? मला तर विमानतळावरच रोखण्यात आले आहे."

उत्तर प्रदेश सरकार आधी परवानगी देतं मग आम्हाला ताब्यात घेतं, नेमकं हेच राहुल गांधी यांच्यासोबत झालं आहे.

राहुल गांधींनी या गोष्टीला विरोध केल्यानंतर आता त्यांना लखीमपूरकडे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

लखीमपूर खिरीमध्ये 3 ऑक्टोबरला झालेल्या हिंसाचारामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलं आहे. राहुल गांधी इथे जाण्यासाठी रवाना झाले आहेत.

सरकारला शेतकऱ्यांच्या ताकदीचा अंदाज नसल्याचं राहुल गांधींनी लखीमपूरला जाण्याआधी म्हटलंय.

दरम्यान उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरी जिल्ह्यात गृह राज्यमंत्र्याच्या मुलानं शेतकऱ्यांवर जीप चढवल्या प्रकरणी तिकोनिया पोलिस ठाण्यात, मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रासह 15-20 अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा हत्या, गुन्हेगारी कट आणि इतर गंभीर कलमांतर्गत दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या नावाचाही समावेश होता. मात्र एफआयआरमध्ये त्यांचं नाव नाही.

पोलिसांनी 147,148,149,279,338,304 A,302,आणि 120 B या कलमांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. शेतकऱ्यांच्या वतीनं जगजित सिंह यांनी तक्रार दाखल केली. दरम्यान, लखीमपूर खिरी जिल्हा आणि जवळच्या पिलीभीत, बहराइच, सीतापूर आणि शाहजहाँपूर याठिकाणच्या इंटरनेट सेवा सरकारच्या आदेशावरून बंद करण्यात आल्या आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा आणि त्यांचा मुलगा आशिष बुधवारी रात्री बनवीरपूर या मूळ गावी परतले आहेत.

आशिष पोलिसांना शरण जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहेत. मात्र मंत्री किंवा पोलिसांनी याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

लखीमपूरला जायला निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींना ताब्यात घेण्यात आलं होतं.

"सीतापूरच्या डीएसपी पियुष कुमार सिंग यांनी तोंडी सांगून कलम 151 अंतर्गत मला इथं अटक करून ठेवलीय. 4 ऑक्टोबरच्या सकाळी साडेचार वाजल्यापासून मी अटकेत आहे," असं काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधींनी सांगितलं होतं.

प्रियंका गांधी यांनी पत्रक काढून 4 ऑक्टोबरच्या दिवसभरात काय घडलं, याची माहिती दिली.

"कलम 144 लखीमपूर खिरी इथं लागू करण्यात आलंय. सीतापूरपासून ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. सीतापूरमध्ये कलम 144 लागू नाहीय," असंही प्रियंका गांधी यांनी सांगितलं.

तसंच, पोलीस प्रशासन आपल्याशी आणि आपल्या सहकाऱ्यांशी कसं वागलं, याचा वृत्तांतही प्रियंका गांधी यांनी या पत्रकातून मांडला आहे.

केवळ गाडीनं चिरडलंच नाही, तर गोळीबारही केला गेलाय - टिकैत

शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी बीबीसीचे सहयोगी पत्रकार अनंत झणाणे यांना शेतकऱ्याचं पार्थिव दाखवत म्हटलं, "हे पाहा, गोळी लागलीय.... केवळ गाडीने चिरडलं नाही, तर गोळीबारही केला गेलाय."

सरकारसोबत तडजोडीबाबतच्या प्रश्नावर राकेश टिकैत म्हणाले, "यावर काय तडजोड होणार? यांचं पोस्टमार्टम होईल आणि खटला दाखल होणार. ज्यानं चूक केलीय, त्याला शिक्षा होईल. मंत्री आणि त्यांचा मुलगा, अशा दोघांविरोधात खटला दाखल होईल."

हे सर्व सरकारनं मान्य केलंय का, याबाबत राकेश टिकैत म्हणाले, "जर ते दोषी असतील, तर सरकार का मानणार नाही? मंत्र्यांविरोधात 120 बी आणि त्यांच्या मुलाविरोधात हत्येचा खटला दाखल केला जाईल. मात्र, ज्यांनी गोळी चालवली, त्यांच्याविरोधात हत्येचा खटला दाखल केला जाईल."

गृहमंत्रालयानं पाठवल्या निमलष्करी दलाच्या चार तुकड्या रवाना

लखीमपूर खिरीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स (CAPF) च्या चार तुकड्या पाठवल्या आहेत.

उत्तर प्रदेश सरकारनं केंद्रीय गृहमंत्रालयाला लखीमपूर खिरीमधील सुरक्षेच्या दृष्टीने विनंती केली होती. त्यानंतर सीएपीएफच्या तुकड्या केंद्रीय गृहमंत्रालयानं पाठवल्या. सहा ऑक्टोबरपर्यंत या तुकड्या लखीमपूर खिरीत तैनात राहतील.

लखीमपूर खिरीमधील घटनेवर उत्तर प्रदेशमधील मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं की, "विरोधक या घटनेचा वापर निवडणुकीसाठी करतायेत. राजकीय पर्यटन आणि स्पर्धा म्हणून या घटनेकडे पाहतायेत."

यूपी सरकारनं लखीमपूर खिरीमधील घटनेला गांभिर्यानं घेतलं असून, मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की कट रचणाऱ्यांना शिक्षा दिली जाईल, असं सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले.

तसंच, प्रियंका गांधी या राजकीय पर्यटन करत असतात, असं सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले.

"प्रियंका गांधी यांचा चौकशीत अडथळा आणण्याचा आणि जनतेचं मत बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. हे व्हायला नको होतं. त्यांनी चौकशीचा अहवाल येईपर्यतं वाट पाहायला हवी होती," असं ते म्हणाले.

लखीमपूर खिरीमधील घटनेबाबत सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं?

शेतकरी आंदोलनाबाबत सुप्रीम कोर्टात आज (4 ऑक्टोबर) झालेल्या सुनावणीदरम्यान अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी लखीमपूर खिरीमधील आंदोलनाचा उल्लेख केला.

लखीमपूर खिरीसारख्या घटना दुर्दैवी असून, त्या थांबवल्या पाहिजेत, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. अशा घटना होतात, तेव्हा कुणीही जबाबदारी घेत नाही, असंही कोर्ट म्हणालं.

न्या. ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेतील खंडपीठानं म्हटलं की, "आम्ही पाहू की, विरोधी निदर्शनांच्या अधिकाराचा मुद्दा वास्तवात मुलभूत अधिकार आहे का?"

किसान महापंचायतने जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाकडे मागितलीय. केके वेणुगोपल यांनी म्हटलं की, सुप्रीम कोर्ट हे प्रकरण ट्रान्सफर करून संपवू शकतं.

सुप्रीम कोर्टानं यावर प्रश्न उपस्थित केला की, जर एखादं प्रकरण कोर्टात प्रलंबित असेल तर त्यावर आंदोलन कसं होऊ शकतं?

केके वेणुगोपाल यांनी म्हटलं की, या प्रकरणी अनेक याचिका दाखल असल्यानं आंदोलनं होऊ नयेत. एक दुर्दैवी घटना काल लखीमपूरमध्ये घडली. आता आंदोलनं होऊ नयेत, जेणेकरून लखीमपूर खिरीसारख्या घटना रोखल्या जाऊ शकतील.

किसान महापंचायतची बाजू मांडणारे वकील अजय चौधरी म्हणाले की, आंदोलनाच्या ठिकाणी रस्त्यांमध्ये अडथळे निर्माण करण्यात शेतकऱ्यांचा हात नाही.

सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, तिन्ही कृषी कायद्यांना स्थगीत केलं असताना शेतकरी का आंदोलन करत आहेत? कोर्टात तुम्ही आव्हान दिलं असताना आंदोलन कसे करू शकता? या आंदोलनांची वैधता काय आहे?

"तुम्ही दोन्ही गोष्टी एकदाच कशा काय करू शकता? तुम्ही कायद्याला आव्हानही देणार आणि नंतर आंदोलनही करणार. एकतर तुम्ही कोर्टात जा, संसदेत जा किंवा रस्त्यावर उतरा," असंही कोर्ट म्हणालं.

लखीमपूर खिरीमध्ये कलम 144 लागू, राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना सरकारी विश्रामगृहात पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं आहे. या विश्रामगृहात प्रियंका गांधी उपोषणाला बसल्याचं सांगितलं जातंय. मात्र, या वृत्ताला अद्याप कुणी दुजोरा दिला नाहीय.

प्रियंका गांधी यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या विश्रामगृहातील एक व्हीडिओ तेलंगणाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांनी व्हीडिओ ट्वीट केला आहे. या व्हीडिओत प्रियंका गांधी विश्रामगृहातील खोलीची साफसफाई करताना दिसतायते.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांच्या पाठीशी असल्याचं सांगत ट्वीट केलंय.

"प्रियंका, मला माहित आहे, तू मागे हटणार नाहीस. तुझ्या हिंमतीसमोर ते घाबरले आहेत. न्यायाच्या अहिंसक लढ्यातून आपण देशातील शेतकऱ्यांना विजयी करू," असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

उत्तर प्रदेशचे एडीजी (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितलंय की, लखीमपूर खिरीमध्ये कलम 144 लागू केल्यानं कुठल्याही राजकीय नेत्यांना तिथं येण्यास परवानगी देण्यात येणार नाही. मात्र, शेतकरी संघटनांच्या सदस्यांना येण्यास परवानगी असेल.

न्यायालयीन चौकशी आणि 45 लाखांच्या मदतीवर शेतकरी आणि सरकारमध्ये सहमती

लखीमपूर खिरीमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यात यूपी प्रशासनाला यश आलं आहे.

घटनेची निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी आणि मृतांच्या नातेवाईकांना 45 लाखांच्या मदतीवर आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये सहमती झाली आहे, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी याची माहिती दिली आहे.

या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुंटुंबीयांना 45 लाख रुपये, तर जखमींना 10 लाख रुपये मदत देण्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.

तर या घटनेत मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

"आमचं कार्यक्रमाचं ठिकाण घटनास्थळापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर होतं. मी किंवा माझा मुलगा घटनास्थळावर असतो तर जिवंत राहिलो नसतो," असं ते म्हणाले.

या घटनेसाठी जबाबदार लोकांना त्वरित अटक करण्याची आणि घटनेची न्यायलयीन चौकशी करण्याला प्रशासनानं संमती दिली आहे.

उत्तर प्रदेशचे एडीजी कायदा व सुव्यवस्था आणि भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना नोकरी, 8 दिवसांत आरोपींना अटक आणि मृतांच्या कुटुंबीयांना 45 लाख रुपयांची नुकसान भरपाई, घटनेची न्यायालयीन चौकशी हीसुद्धा घोषणा करण्यात आली आहे. जखमींना 10 लाख रुपये भरपाई देण्यात येणार आहे.

घटनास्थळी उपस्थित बीबीसीचे सहयोगी पत्रकार अनंत झणाणे यांच्यानुसार, या घोषणेनंतर रस्ता मोकळा केला जात आहे आणि मृतदेहांना पोस्टमॉर्मसाठी न्यायची तयारी सुरू आहे.

परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी लखीमपूर खिरीमध्येच आंदोलक शेतकऱ्यांनी आयजी लखनऊ रेंज लक्ष्मी सिंह यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकही उपस्थित होते.

अखिलेश यादव यांचं निदर्शन

लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी लखनऊमध्ये आपल्या घरासमोर निदर्शनास बसलेले उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

या घटनेनंतर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप गोँधळ घातला. त्यानंतर अखिलेश यांनी कार्यकर्त्यांना पोलिसांच्या कामात अडथळ न आणण्याचं आवाहन केलं.

अखिलेश यांच्याशिवाय समाजपवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव आणि 150 ते 200 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सोमवारी सकाळी 9 वाजता अखिलेश यादव लखीमपूर खिरी जाण्यासाठी घरातून निघाले होते. पण, पोलिसांना त्यांना रोखलं, त्यानंतर मात्र ते घराबाहेरच निदर्शनास बसले होते.

या घटनेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

अजय मिश्र टेनी यांच्या मुलाविरोधात एफआयआर दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

तर टेनी यांनी म्हटलंय की, या घटनेत माझा मुलगा सहभागी नव्हता, त्याची कार तेवढी घटनास्थळी होती. या घटनेत आमच्या कार्यकर्त्याचाही मृत्यू झाला आहे.

टेनी यांनी रात्री उशीरा ट्वीट करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.

एका व्हीडिओत त्यांनी असंही म्हटलंय, "आमच्याकडे ही माहिती होती की काही शेतकरी शांतपणे आंदोलन करत आहेत. त्यामुळे प्रशासनानं आमचा मार्ग दुसरीकडे वळवण्यात आला. त्याचवेळी, शेतकऱ्यांमध्ये लपलेल्या काही बेशिस्त घटकांनी भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर लाठ्यांनी हल्ला केला. आमच्याकडे त्याचा एक व्हिडिओ आहे."

दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा रात्री उशीरा लखीमपूर खिरीमध्ये आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघाल्या होत्या.

पण यूपी प्रशासनानं त्यांना तिथं जाण्यापासून रोखल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

"शेतकऱ्यांना नेस्तनाभूत करण्याचं राजकारण हे सरकार करत असल्याचं या घटनेवरून दिसून येत आहे, हा शेतकऱ्यांचा देश आहे भाजपचा नाही. पीडित शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना भेटून मी कुठलाही गुन्हा करत नाहीये. तुम्ही मला का थांबवत आहात, तुमच्याकडे वॉरंट आहे का," असा सवाल प्रियांका गांधी वाड्रा यांनी विचारला आहे.

तर दुसराकडे प्रियांका यांना हरगाव जवळ अटक करण्यात आल्याचं यूथ काँग्रेसचे अध्यक्षचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी ट्वीट करून म्हटलंय.

हा शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा रानटी प्रकार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

या घटनेचा मी निषेध करतो, असंही त्यांनी ट्वीट करून म्हटलंय.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आज लखीमपूर खिरी इथं जाणार आहेत. त्यांच्या घराबाहेर सध्या पोलिसांचा फौजफोटा तैनात करण्यात आला आहे.

लखीमपूर खिरीमध्ये रविवारी काय घडलं होतं?

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी इथे शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचारादरम्यान पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बीबीसीचे प्रतिनिधी समीरात्मज मिश्र यांनी ही माहिती दिली आहे.

दोन लोकांचा मृत्यू गाडीने उडवल्यामुळे तर तीन लोकांचा मृत्यू गाडी उलटल्यामुळे झाला असल्याचं लखीमपूरचे जिल्हाधिकारी डॉ. अरविंद चौरसिया यांनी बीबीसीचे प्रतिनिधी समीरात्मज मिश्र यांच्याशी बोलताना सांगितलं.

गेल्या वर्षी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध म्हणून हजारो शेतकरी काळे झेंडे घेऊन तिकुनिया जिल्ह्यातील लखीमपूर खिरी इथे जमले होते.

जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे या भागात आले होते. अजय मिश्रा यांच्या टेनी गावातील कार्यक्रमासाठी त्यांना जायचं होतं.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या गाड्यांचा ताफा आंदोलनस्थळी आला.

ताफ्यातील काही गाड्या आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर घालण्यात आल्याचं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे. यामध्ये एकूण 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत.

गाड्यांचा ताफा सुरळीतपणे मार्गस्थ व्हावा यासाठी शेतकरी आंदोलकांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभं राहण्यास सांगण्यात आलं होतं. किसान मोर्चाने जारी केलेल्या पत्रकानुसार, या घटनेत दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर संघटनेचे नेते ताजिंदर सिंग विर्क गंभीररीत्या दुखापतग्रस्त झाले आहेत.

या घटनेनंतर परिसरात वातावरण तापलं आणि वाहनांना आग लावल्याचे प्रकार झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

तिकोनियात नेमकं काय घडलं?

तिकोनियात भाजप समर्थकाच्या गाडीने काही शेतकरी जखमी झाले. यानंतर भडकलेल्या शेतकरी आंदोलकांनी गाड्यांना आग लावली.

स्थिती तणावपूर्ण झाल्याने उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम थांबवण्यात आला. परिस्थिती लक्षात घेऊन, प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

भारतीय किसान युनियनने आरोप केला आहे की तीन शेतकऱ्यांना गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाच्या गाडीने उडवलं.

शेतकऱ्यांचे नेते डॉ. दर्शनपाल यांनी एक निवेदन जारी केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "तिकोनियात उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरपर्यंत जाण्यापासून रोखण्यासाठी हेलिपॅडला घेराव घालण्यात आला. हा कार्यक्रम संपतच होता, लोक तिथून परतत होते.

त्याचवेळी तीन गाड्या वेगाने आल्या. ज्यामध्ये अजय मिश्रा, त्यांचा मुलगा, भाऊ आणि भावाचे काका बसले होते. त्यांच्या गाड्या शेतकऱ्यांच्या अंगावर गेल्या. एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. एकाचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला".

बीकेयूचे नेता राकेश टिकैत लखीमपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, "कृषी कायद्यांचा शांततापूर्ण निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर केंद्रीय गृहराज्यमंत्राच्या गाड्यांचा ताफा घालणं अमानुष आणि क्रूर आहे. उत्तर प्रदेशातील दांभिक भाजपाचा जुलूम आता सहन केला जाणार नाही. असंच सुरू राहिलं तर उत्तर प्रदेशात भाजप नेते गाडीने फिरू शकणार नाहीत, आणि त्यातून उतरूही शकणार नाहीत".

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही याघटनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

"भाजप देशातील शेतकऱ्यांचा एवढा द्वेष का करतं? त्यांना जगण्याचा हक्क नाहीये का? त्यांनी एखाद्या गोष्टीविरोधात आवाज उठवला तर त्यांना गोळी मारली जाते, गाड्या अंगावर घातल्या जातात. खूप झालं. हा शेतकऱ्यांचा देश आहे. भाजपच्या क्रूर विचारधारेची जहागीर नाही", असं प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे.

"हा अमानवीय नरसंहार पाहूनही जे गप्प आहेत ते आधीच मृत झाले आहेत. पण आम्ही हे बलिदान वाया जाऊ देणार नाही. शेतकरी सत्याग्रह जिंदाबाद", असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे की, "शेतकऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी शांतता पाळावी. विजय शेतकऱ्यांचाच होईल. सरकारला शुद्ध आली नाही तर भाजपच्या एकाही नेत्याला घरातून बाहेर पडू दिलं जाणार नाही".

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)