देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत 'पेनड्राइव्ह बॉम्ब' आणि अजित पवारांच्या कपाळावरील आठ्या

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

'महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना' या गोष्टीने 8 मार्चची विधानसभेतली संध्याकाळ हादरवणारी होती. सरकारी वकील प्रशांत पंडित चव्हाण या गोष्टीचं मुख्य पात्र होतं. चाकू प्लांट करण्यापासून ते गळ्याला रक्त लावण्यापर्यंत... तसंच रेड कशी टाकायची, रेडमधल्या वस्तू कशा प्लांट करायच्या आणि कसेही करून ही केस मोक्कामध्ये फीट बसेल असं नियोजन सरकारी वकील करतो. त्यात सत्ताधारी नेते कोणकोणत्या भूमिका बजावतात याची ही गोष्ट होती.

दुपारचे 2 वाजून गेले होते. दिवसभराचं कामकाज सुरळीत सुरू होतं.

"अरे, आज कुठलाही गोंधळ न करता कामकाज सुरू झालं? म्हणजे काय आता अर्थसंकल्पाचा दिवस महत्त्वाचा. पाच राज्यांचे निकाल यामध्ये भाजप नेते व्यग्र होणार, फडणवीसांवर गोव्याची जबाबदारी आहे. ते आज नवाब मलिक, बॉम्बस्फोट वगैरे बोलतील आणि निघतील असं वाटतंय."

विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत ही चर्चा सुरू होती. थोडं कामकाज बाकी होतं. त्यानंतर विरोधी पक्षाचा कायदा सुव्यवस्थेचा प्रस्ताव येणार होता.

आज कायदा सुव्यवस्थेवर फडणवीस नवाब मलिक व्यतिरिक्त काही विशेष बोलणार आहेत का? विरोधी पक्षनेत्यांच्या ऑफिसमधल्या अधिकार्‍यांना विचारलं. ते म्हणाले, 'साहेब आज नेहमीप्रमाणे जबरदस्त भाषण करतील. सकाळपासून आज भाषणासाठी उत्साही वाटत आहेत.'

सभागृहात स्मशान शांतता?

साडेपाच वाजून गेले होते. देवेंद्र फडणवीस आता बोलणार म्हणून पत्रकार गॅलरीतले अनेक बाक भरले. 'हे नवाब मलिकांचा राजीनामा मागणार आणि सरकार इकबाल मिरची प्रकरण काढणार' ही कुजबुज सुरूच होती.

संध्याकाळी 6 वाजल्याच्या सुमारास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रस्तावावर बोलायला उभे राहिले.

सत्ताधारी बाकांवर पहील्या रांगेत उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील बसले होते. अध्यक्षांच्या समोरच्या बाकावर पहील्या रांगेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बसले होते. त्यांच्या समोर फाईल्सचा गठ्ठा होता. दुसर्‍या बाजूला फाईलवर काही कागदं ठेवली होती. दिलीप वळसे पाटील उभे राहून म्हणाले, "विरोधी पक्षाला 3 तास दिले आहेत. भाषण करताना वेळेची मर्यादा पाळावी ही विनंती आहे."

देवेंद्र फडणवीस म्हणाले 'ते ठरवू आपण' आणि पुढे बोलू लागले, "ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे. 25-30 बेवसिरीज तयार होतील इतकं 'पोटेंशियल' या कथेत आहे. भाजप नेते गिरीश महाजन, रामेश्वर नाईक आणि 29 जणांवर जळगाव इथे गुन्हा दाखल करण्यात आला. ही केस कोथरूडमध्ये स्थलांतरीत करण्यात आली. त्यानंतर पुरावे, पंच, साक्षीदार हे सगळं मॅनेज करून मोक्का लावण्याचा हा कट रचल्याचं हा वकील व्हीडिओमध्ये बोलतो आहे.

"हे 125 तासांहून अधिकचं व्हीडिओ रेकॉर्डिंग मी अध्यक्षांकडे पेनड्राईव्हच्यामार्फत सूपूर्त करतो". फडणवीसांनी व्हीडिओमधलं संभाषण वाचायला सुरवात केली. आपली जागा सोडून इतरांशी बोलण्यासाठी दुसरीकडे बसलेले आमदार आपापल्या जागेवर जाऊन भाषण ऐकू लागले. ऐरवी खाली बसून शेरेबाजी करणारे आमदार शांत झाले होते.

आणि सत्ताधारी नेत्यांचे चेहरे पडले...?

उपमुख्यमंत्री अजित पवार फडणवीसांचं भाषण कान देऊन ऐकत होते. मास्क लावला असला तरी व्हीडिओमधलं संभाषण ऐकताना अजित पवारांच्या कपाळावरच्या आठ्या आणि चेहर्‍यावरची चिंता स्पष्ट दिसत होती.

अजित पवारांच्या मागे मंत्री आदित्य ठाकरे आणि बाजूच्या बाकावर अस्लम शेख बसले होते. त्या दोघांमध्ये काहीतरी कुजबूज सुरू होती. फडणवीसांकडे नजर टाकत एकमेकांच्या कानात ते काहीतरी बोलत होते.

एकनाथ शिंदे गंभीर चेहर्‍याने फडणवीसांकडे फक्त पाहत होते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फाईलचा गठ्ठा बाजूला सारत पडलेल्या चेहर्‍याने फडणवीसांच्या भाषणाचे 'नोटींग' करून घेत होते.

फडणवीस दहाव्या व्हीडिओ मधलं संभाषण वाचू लागले. हा वकील पुढे सांगतो "किती जणांनी या केससाठी माझे नाव 'रेकमेंट' केलं. दिलीप बोरले, वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, अर्जुन खोतकर, अनिल देशमुख, गुलाबराव पाटील, हसन मुश्रीफ, श्रीनिवास पाटील या सगळ्यांनी माझ्या नावाचं पवार साहेबांना पत्र दिलं. पुढे मी शरद पवारांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला मागच्या दाराने जाऊन भेटलो."

"पवार साहेब कधीच पिक्चरमध्ये येत नाहीत. ते कोणालातरी घरी बोलवून सांगितात. थेट फोन करत नाहीत उगाच स्टेशन डायरीत नोंद नको. शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना 1 लाख टक्के संपवायचे आहे."

विरोधी बाकावरचे आमदार फडणवीसांच्या भाषणाला मध्ये बाक वाजवून दाद देत होते. गिरीश महाजनांच्या चेहर्‍यावर उपहासात्मक हास्य होतं. पण सत्ताधारी आमदार आणि मंत्री शरद पवारांवर आरोप होऊनही सुन्न चेहर्‍याने काहीही न बोलता ऐकून घेत होते.

महाविकास आघाडीचा चेंडू गृहमंत्र्यांच्या कोर्टात...?

नवाब मलिकांच्या राजीनाम्याचा उल्लेख फडणवीसांनी पुन्हा सभागृहात केला. तेव्हा कॉंग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी खाली बसून इकबाल मिरचीचा उल्लेख केला. त्याला लगेच भाजपचे आमदार विखे पाटील यांनी उत्तर दिलं.

"इकबाल मिरची सोडा... बॉम्बस्फोटासाठी पैसे वापरले गेले."

"अहो, विखे पाटील तुम्ही विरोधीपक्ष नेते होतात, खाली बसून बोलायचं नाही इतकं माहिती नाही का तुम्हाला?" त्यावेळी विखे पाटील यांनी पटोलेंसमोर 'मग तुम्ही काय करताय?' असं म्हणत हात जोडले.

फडणवीसांचं भाषण संपलं. पत्रकारांची धावपळ सुरू झाली. फडणवीसांनी उल्लेख केलेल्या व्हीडिओचं फुटेज न्यूज चॅनेलवर ब्रेकींगच्या स्वरूपात दिसू लागलं. मीडिया स्टँडवर एकामागोमाग भाजप नेते बाईट देत होते. सत्ताधारी पक्षाचे नेते, मंत्री आऊट गेटने बाहेर पडत होते.

मंत्री अशोक चव्हाण यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, "हा गृहविभागाचा विषय असल्यामुळे गृहमंत्री याचं उत्तर देतील."

एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, "या व्हीडिओची चौकशी होईल. मुंबई पोलीस याचा तपास करतील. मुंबई पोलीसांवर अविश्वास दाखवणं आणि सीबीआयची मागणी करणं योग्य नाही. गृहमंत्री याला निश्चितपणे सविस्तर उत्तर देतील. "

हे व्हीडिओ कसे मिळवले असतील? वकीलाच्या ऑफीसमधला माणूस फुटला असेल का? का व्हीडिओ बनावट असतील? सत्ताधारी आमदारांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. तर विरोधी पक्षाचे आमदार कौतुकाने पाठ थोपटून घेत होते.

महाविकास आघाडीकडे ठरलेलं उत्तर?

इतक्या सुन्न चेहर्‍यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं भाषण ऐकत असलेले मंत्री या आरोपांना काय उत्तर देणार? याची उत्सुकता वाढली. 9 मार्चचा दिवस गृहमंत्र्यांचं उत्तर काय असेल? या चर्चेने सुरू झाला. आदल्या दिवशी नेत्यांचे दिसत असलेले गंभीर चेहरे आजही कायम होते.

जेष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांना महाविकास आघाडी सरकार बेसावधपणा, विरोधी पक्षाचे गंभीर आरोप आणि गृहमंत्री वळसे पाटील यांच्या उत्तराबाबत विश्लेषण करताना म्हणतात, "महाविकास आघाडी सरकारकडे तांत्रिक उत्तर आहे. हे व्हीडिओ बनावट होते किंवा या व्हीडिओची फॉरेन्सिक लॅबकडे पाठवून तपासणी केली जाईल. हे कोणत्यातरी अॅपमधून सरकारला बदनाम करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत वगैरे वगैरे बालू शकतील.

"पण देवेंद्र फडणवीस यांनी 'सरप्राईज एलिमेंट' आणला आणि थेट सरकारला आव्हान दिलं. त्यामुळे फडणवीस हे सरस ठरले. जर वळसे पाटील यांनी उत्तर देताना हे गंभीर आरोप तोडीसतोड पुरावे सादर करून खोडून काढले तर सरकारने 'करून दाखवलं' म्हणता येईल. पण तांत्रिक उत्तर दिलं तर मात्र विरोधी पक्षच अधिवेशनात सरस ठरेल."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)