You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार UPA चेअध्यक्ष होतील का?
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
गेल्या काही काळापासून ही चर्चा सुरु आहे की 'यूपीए'चं अध्यक्षपद कोणाकडे जायला हवं? शरद पवार यांचं नाव त्यासाठी सतत घेतलं जात आहे.
संजय राऊत, जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांनी तर यापूर्वीच तसं जाहीर म्हटलं आहे, पण सोमवारी दिल्लीत त्याबद्दल 'राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस'च्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत शरद पवारांच्या उपस्थितीतच त्यांना 'यूपीए' अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव संमत झाला, म्हणून पुन्हा मुंबई ते दिल्लीत यावरुन जोरदार चर्चा आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर भाजपासमोर आव्हान उभं करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून खलबतं सुरु झाली आहेत. कॉंग्रेसची अंतर्गत चर्चा सुरु आहे आणि असमाधानी असलेला ज्येष्ठ नेत्यांचा जी-23 गट सोनियांना सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा आग्रह करतो आहे.
दुसरीकडे ममता बॅनर्जींनी पण विरोधी पक्षाच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एकत्र मोट बांधण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्याच वेळेस पुन्हा एकदा 'यूपीए'ची चर्चा सुरु झाली आहे आणि पवारांचं नाव पुढे आलं आहे.
2004 आणि 2009 च्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर 'यूपीए' भक्कम राहिली, पण त्यानंतर 2014 मध्ये मोदींच्या उदयासोबत आणि कॉंग्रेसच्या सातत्यानं होणाऱ्या पराभवासोबत हा समूह विखुरला.
सोनिया गांधी अद्यापही 'यूपीए'च्या अध्यक्षा आहे, पण राष्ट्रीय स्तरावर विरोधकांच्या एकत्र येण्याची गरज सगळ्या पक्षांकडून वारंवार व्यक्त केली जाते आहे. आता झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये भाजपाविरोधी पक्ष हे युती न करता वेगवेगळे लढले आणि त्याचा फायदा भाजपाला झाला असं म्हटलं गेलं.
शरद पवार यांचा अनुभव, सगळ्या राजकीय पक्षांसोबत त्यांचे असलेले संबंध आणि त्यांचा अधिकार पाहता त्यांनी 'यूपीए'चं नेतृत्व आपल्या हातात घ्यावं असं त्यांच्या समर्थकांकडून वारंवार जाहीरपणे बोललं जातं. आता परत तेच झालं आहे.
'राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस'चा ठराव
दिल्लीमध्ये सोमवारी 'राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस'ची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला शरद पवार स्वत: उपस्थित होते. त्यात कॉंग्रेससहित देशातल्या सगळ्या प्रादेशिक पक्षांचं राष्ट्रीय स्तरावर म्हणजेच 'यूपीए'चं नेतृत्व शरद पवारांनी करावं असा प्रस्ताव मांडला गेला. तो संमतही झाला. जरी यापूर्वी हा विषय अनेकदा चर्चेला आला असला तरीही पहिल्यांदाच पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावर ठराव संमत केला गेला.
'राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस'चे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आणि प्रवक्ते रविकांत वर्पे यांनी म्हटलं की, "देशातल्या सध्या कठीण राजकीय काळात पवार साहेबांनी कॉंग्रेस आणि अन्य प्रादेशिक पक्षांचं नेतृत्व करावं. शरद पवार हे देशातल्या सर्वांत अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी देशाचे संरक्षण आणि कृषी मंत्री म्हणून उल्लेखनीय कार्य केलं आहे. विरोधी पक्षाचे नेते म्हणूनही काम केलं आहे. देशातल्या सगळ्या भाजपाविरोधी पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी ते निभावू शकतात आणि देशाला एक निर्णायक राजकीय दिशाही देऊ शकतात."
यापूर्वी विविध विचारांच्या व्यक्तींची आणि विविध पक्षांच्या काही नेत्यांची एक बैठक दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी झाली होती. त्यानंतरही ही 'यूपीए'सारख्या व्यासपीठाची तयारी आहे असं म्हटलं गेलं होतं. पवारांनी स्वत:च ते नाकारलं होतं.
त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचीही वक्तव्यं आली होती. इतर प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनीही वेळोवेळी शरद पवारांची भेट घेतली होती.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी मुंबईत आल्यावर पवारांची भेट घेतली होती. राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनीही मधल्या काळात पवारांची भेट घेतली. या प्रत्येक वेळेस 'यूपीए'ची आणि पवारांनी त्याचं नेतृत्व करण्याची चर्चा झाली. पण आता पक्षाच्या व्यासपीठावर ठरावच संमत झाला.
यावर 'राष्ट्रवादी कॉंग्रेस'चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मात्र आज संयत प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले की, "हा सर्वांनी एकत्र मिळून घेण्याचा निर्णय आहे. युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी असून त्या काम करत आहेत. देशातील सर्व पक्षांचा विचार करुन त्यावेळी सोनिया गांधींना अध्यक्ष केलं होतं. एकत्रित सगळे बसल्यानंतर यावर चर्चा झाल्यानंतरच बोलणं योग्य ठरेल. काँग्रेसचं अस्तित्व देशातील राज्यांमध्ये होतं, बऱ्याच राज्यांमध्ये आजही आहे. पण असे निर्णय कोणी वक्तव्यं करून होत नाहीत. काँग्रेस पक्ष हा देशातील एक प्रमुख पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्यासहित सर्वांना एकत्रित बसून चर्चा करत युपीएची पुढील वाटचाल ठरवण्याची आवश्यकता आहे."
ही चर्चा कॉंग्रेस वगळून 'यूपीए' अशीही याअगोदर झाली आहे. पण शरद पवारांनी स्वत:च त्याला कायम हरकत घेतली आहे. ममता बॅनर्जींनी वारंवार कॉंग्रेस वगळून राजकीय आघाडीची गरज बोलून दाखवली आहे. पण त्यांच्यासमोरच शरद पवारांना त्याबद्दल जेव्हा मुंबईत विचारलं गेलं होतं तेव्हा त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की कॉंग्रेसला वगळून देशात विरोधकांची राष्ट्रीय मोट बांधता येणार नाही.
ममता बॅनर्जींचं विरोधी पक्षाच्या नेत्यांना पत्र
शरद पवारांच्या नावाचा ह प्रस्ताव येण्याच्या एकच दिवस अगोदर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि 'तृणमूल कॉंग्रेस'च्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना भाजपाविरुद्ध एकत्र येण्याचं आवाहन एक पत्र लिहून केलं. भाजपा या देशाच्या संघीय पद्धतीवर हल्ला केला आहे आणि त्यासाठी सगळ्या विरोधकांना एकत्र यावं लागेल असं त्यांनी म्हटलं.
देशातल्या सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्या म्हणतात, "या देशातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना दाबून टाकण्याच्या उद्देशानं भाजपा करत असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या अन्याय्य वापराला आपण सगळ्यांनी एकत्र विरोध करायला पाहिजे. जेव्हा निवडणुका येतात, या केंद्रीय यंत्रणा कामाला जुंपल्या जातात. हे स्पष्ट आहे की भाजपाशासित राज्यांतल्या कामांचं पोकळ चित्र उभारण्यासाठी त्यांना या केंद्रीय यंत्रणांचा त्रास दिला जात नाही."
ममतांच्या या पत्रप्रपंचाकडे त्यांचा स्वत:चा पुढे येऊन विरोधकांची मोट बांधण्याचा अजून एक प्रयत्न म्हणून बघितलं जातं आहे. त्यांनी यापूर्वीही असं अनेकदा म्हटलं आहे. बंगालची निवडणूक भाजपाला हरवून जिंकल्यानंतर त्यांच्या राष्ट्रीय महत्वाकांक्षा पंतप्रधानपदाकडे नजर लावून आहेत, असंही म्हटलं जातं.
पण ममतांना स्वत:ला 'यूपीए'चं अध्यक्ष व्हायचं होतं असंही म्हटलं गेलं, पण गेल्या काही काळापासून त्यांनी कॉंग्रेसवर टीकेची भूमिका घेतली आहे. त्यांनी गोव्यात कॉंग्रेसविरोधात निवडणूक लढवली. राहुल गांधींच्या पूर्णवेळ राजकारणात नसल्यावरही टीका केली. पण शरद पवारांनी मात्र त्यांना कॉंग्रेसशिवाय 'यूपीए' होऊ शकत नाही असं सुनावलं.
कॉंग्रेसमध्ये गोंधळ
तिकडे ज्यांच्याकडे 'यूपीए'चं अध्यक्षपद आहे त्या कॉंग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुनही गोंधळ आहे. 2004 पासून 'यूपीए'चं अध्यक्षपद सोनिया गांधींकडे आहे. राहुल गांधींकडे कॉंग्रेसचं अध्यक्षपद आलं पण 'यूपीए'चं नाही.
निवडणुकांतल्या पराभवानंतर राहुल यांनी 2019 मध्ये कॉंग्रेसचं अध्यक्षपद सोडलं, पण तेव्हापासून पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. सोनियांकडेच अद्याप पक्षाचं अंतरिम अध्यक्षपद आहे आणि अध्यक्षपदाची निवडणूक अद्याप झालेली नाही. कॉंग्रेसच्या या अंतर्गत गोंधळाच्या परिस्थितीमुळेच 'यूपीए'चं अध्यक्षपद शरद पवारांसारख्या बाहेरच्या नेत्याकडे देण्यात यावं अशा चर्चा सुरु झाल्या. ममतांच्या इच्छेचं निमित्तंही तेच होतं.
पण कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र सोनियांनी पुढे येऊन देशातल्या सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र करावं अशी मागणी केली आहे. जी-23 असा कॉंग्रेसमधल्याच ज्येष्ठ पण असमाधानी नेत्यांचा गट आहे. त्यांनी नुकतंच सोनिया गांधी यांना पत्र लिहून 'यूपीए' अध्यक्ष म्हणून त्यांनी पुढाकार घ्यावा असं म्हटलं आहे.
पण 'यूपीए' अध्यक्षपद कॉंग्रेस सहजासहजी त्यांच्याकडून जाऊ देणार नाही. "राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रस्तावाचा आम्ही आदर करतो. पण गेली 15 वर्षं सोनियाजींनी समर्थपणे 'यूपीए'च्या नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे. ममताजींनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना लिहिलेल्या पत्रानं हेच अधोरेखित होतं की भाजपाच्या विरोधात सगळ्यांनी एकत्रित लढाई लढायला हवी. त्यात विरोधी पक्षांमध्ये कोणताही विरोधाभास नको. त्यामुळे अशा लढाईत सक्षम आणि प्रगल्भ नेतृत्व सोनियाजीच देऊ शकतील याबद्दल पवारसाहेबांच्या मनातही शंका नसेल," असं महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे.
UPA म्हणजे काय?
संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) ही एक राजकीय पक्षांची आघाडी आहे. 2004 लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेसाठी सोनिया गांधी यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नावाखाली विविध राजकीय पक्षांची मोट बांधली होती. या आघाडीचं नेतृत्व स्वत: सोनिया गांधी यांनीच केलं.
2004 ला काँग्रेसने सत्तेसाठी विविध पक्षांना सोबत घेऊन बनवलेल्या आघाडीने दोनवेळा सलग केंद्रात सत्ता मिळवली. यातील 2004 च्या पहिल्या सरकारला UPA-1, तर 2009 च्या म्हणजे दुसऱ्या सरकारला UPA-2 चं सरकार असं संबोधण्यात येतं.
UPA ची स्थापना झाल्यापासून याचं नेतृत्व काँग्रेसकडेच आहे. आजतागायत सोनिया गांधी याच UPA च्या अध्यक्ष आहेत. आता सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा असल्या तरी त्या वयोमानामुळे आणि तब्येतीमुळे राजकारणात पूर्वीइतक्या सक्रीय राहत नाहीत. काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपदही त्यांनी पर्यायानं स्वीकारल्याचं बोललं जातं. त्यामुळे UPA चं अध्यक्षपद दुसऱ्या व्यक्तीकडे जाण्याची शक्यता आहे.
मात्र, आता विरोधी पक्षांमध्ये आणि विशेषत: UPA-1 आणि UPA-2 मधील सहभागी पक्षांमध्ये राष्ट्रीय राजकारणाचा अनुभव पाहता तुलनेनं वजनदार नेता म्हणून शरद पवार यांचं नाव घेतलं जातं. पण आता प्रश्न उपस्थित होतो की, काँग्रेसच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या आणि सुरुवातीपासूनच काँग्रेसचा वरचष्मा राहिलेल्या UPA ची धुरा शरद पवारांकडे दिली जाऊ शकते का?
पवारांच्या काळातले 'यूपीए'तले आणि विरोधी पक्षांतले अनेक महत्त्वाचे नेते आता राजकारणातून दूर गेले आहेत. लालू प्रसाद यादव 'यूपीए'तले महत्वाचे नेते होते, पण ते आता शिक्षा भोगताहेत. त्यामुळे अनुभव आणि कार्यरत असण्याच्या मुद्द्यावर पवारांचं पारड जड आहे आणि त्यांच्या पक्षाच्या व्यासपीठावर प्रस्ताव संमत झाल्यानं या चर्चेला गांभीर्यही प्राप्त झालं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)