शरद पवार हे पार्थ पवार आणि रोहित पवारमध्ये फरक करतात का?

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत. आम्ही त्यांच्या मता कवडीचीही किंमत देत नाही," शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत केलेलं हे वक्तव्य. या वक्तव्यामुळे पवार घराण्यातले मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले होते. पवार घराण्यातल्या वादावर पुन्हा चर्चा होऊ लागलीये. लागली होती.

याला कारण होतं, पार्थ पवार यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची केलेली मागणी आणि राम मंदीराच्या भूमिपूजनावरून हा ऐतिहासिक क्षण म्हणतं 'जय श्रीराम'चा दिलेला नारा.

या दोन्ही प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पार्थ पवार यांच्या भूमिका परस्पर विरुद्ध होत्या. पार्थ पवार राजकारणात येण्याआधीपासून शरद पवारांनी त्यांचं उघडपणे कौतुक केलेलं कधीही दिसलं नाही. याउलट पार्थ यांच्या राजकारणातल्या प्रवेशाच्या आधीपासून शरद पवारांनी कायम तटस्थ भूमिका घेतलेली दिसली. यामागे काय कारणं असावीत याचा ऑगस्ट महिन्यात घेतलेला हा रिपोर्ट

राजकीय सुरवातच वादाच्या भोवऱ्यात?

2019 च्या लोकसभा निवडणूका जवळ येत होत्या. पार्थ पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफीसमध्ये येणंजाणं दिसत होतं. पार्थ लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली होती. पार्थ काही मोजक्या पत्रकारांच्या संपर्कात होते.

मावळ लोकसभा मतदारसंघातून तयारी करत असल्याचं त्यांच्या बोलण्यातून समोर येत होतं. त्याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही मुद्यांवर पत्रकार परिषद घेतली.

त्यावेळी पार्थ पवार हे लोकसभा निवडणूकीची तयारी करतायेत, ते निवडणूक लढविणार का? या प्रश्नावर शरद पवार यांनी सगळी तिकीटं कुटुंबातच दिली तर कार्यकर्त्यांनी काय करायचं? असं उत्तर दिलं.

त्याचवेळी पार्थ पवारांचा राजकीय प्रवेश शरद पवारांना मान्य नसल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे पार्थ राजकारणात प्रवेश करण्याआधीच पहीली ठिणगी पडली होती. पार्थ पवारांच्या उमेदवारीवरून कौटुंबिक मतभेद झाल्याचं बोललं गेलं. 

निवडणूक हरणारा पहिला पवार

लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. त्यात पार्थ पवार यांचं नाव नव्हतं. त्यामुळे पुन्हा कौटुंबिक वादाच्या चर्चा सुरू झाल्या. याआधी लोकसभा निवडणुकीत शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती.

पण ऐनवेळी शरद पवारांनी या निवडणुकीतून माघार घेतली. त्यावेळी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले होते, "मी माढामधून निवडणूक लढवावी असा सगळ्यांचा आग्रह आहे. आम्ही सर्वांनी कुटुंबात बसून चर्चा केली. एकाच कुटुंबात कितीजण निवडणूक लढविणार म्हणून मी स्वतः निवडणूकीला उभं न राहता नव्या पिढीला संधी द्यायचं ठरवलं आहे."

यावेळी शरद पवार यांनी पार्थ पवारांमुळे निवडणूकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेला. यावर त्याक्षणी पार्थ यांनी भाष्य करणं टाळलं, पण रोहीत पवार यांनी शरद पवार यांनी निर्णयाचा पुर्नविचार करावा अशी फेसबुक पोस्ट लिहिली.

त्यानंतर पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी जाहीर झाली. निवडणूकीत त्यांचा पराभव झाला. निवडणुकीत पराभूत झालेले पवार कुटुंबातले ते पहीले सदस्य ठरले. हेच शरद पवारांच्या जिव्हारी लागल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.

जेष्ठ पत्रकार प्रताप आजबे सांगतात, "शरद पवार हे अनेकदा कार्यकर्त्यांच्या चुका पदरात घालतात. पण वारंवार केलेल्या चुका असाह्य झाल्या की ते टोकाची भूमिका घेतात. पार्थ पवारांच्या बाबतीत तेच घडलं. सुरवातीपासून शरद पवार यांनी पार्थ पवारांच्या राजकीय गोष्टींवर बोलणं टाळलं. ते पार्थ यांच्या प्रचारासाठीही गेले. त्यांचा पराभव पचवला. त्यानंतरही पक्षविरोधी भूमिकेमुळे शरद पवारांना पार्थच्या चुका असाह्य झाल्या असाव्यात म्हणून त्यांनी पार्थ पवार यांच्याबद्दल टोकाची भूमिका घेतली असावी."

शरद पवार रोहित आणि पार्थमध्ये फरक करतात? 

रोहित आणि पार्थ या दोघांमधला जो अधिक कर्तृत्वावान असेल तो पुढे जाईल असं शरद पवार यांनी अनेक मुलाखतीत स्पष्ट केलंय.

रोहित यांनी स्वतःचं शिक्षण बारामती, पुणे आणि मुंबईत पूर्ण केलं. त्यानंतर परदेशी शिक्षणाची संधी असतानाही त्यांनी वडिलांना व्यवसायात मदत करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या २१ व्या वर्षी ते बारामती अॅग्रो लिमिटेडमध्ये सामिल झाले.

त्यानंतर काही वर्षं शेतीमधलं काम आणि मग पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी विक्रमी मतांनी जिंकली. त्यानंतर काही वर्षांनंतर आमदार असा त्यांचा प्रवास आहे. त्यात ते शरद पवार यांच्याबरोबर काही दौर्‍यांमध्येही दिसतात.

याउलट पार्थ पवार यांची पार्श्वभूमी आहे. पार्थ पवारांनी वाणिज्य शाखेतून शिक्षण पूर्ण करून लंडनमधून उच्च शिक्षण घेतलय. राजकारणात येण्याआधी ते अजित पवार यांच्या सोशल मीडियाचं काम बघत होते. पक्षात त्यांच्याकडे कुठलच पद नव्हत. पार्थ यांनी थेट लोकसभा निवडणुक लढवली आणि ते हरले. 

याबाबत राजकीय विश्लेषक आणि पत्रकार रवींद्र आंबेकर सांगतात, "सध्या पवार परिवारात दोन तरुण नेतृत्व आहेत. त्या दोघांचं लाँचींग मागच्या वर्षांत झालं. दोघांनाही माध्यमांमध्ये चांगली प्रसिद्धी मिळतेय, मात्र अद्यापही दोघांपैकी कोणालाही आपलं कर्तृत्व अजून सिद्ध करता आलेलं नाही. पार्थ यांना मावळमध्ये दिलेल्या उमेदवारीनंतर शरद पवार यांनी प्रचारात तिथे फार जोर लावलेला दिसला नाही. अजित पवारांचं वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये पार्थला कमी मतं मिळाली यावरून राजकारणाची खोली लक्षात येते."

"याउलट रोहीतला कर्जत जामखेडमध्ये पाठवून शरद पवारांनी साताऱ्यासारखी वादळी सभा कर्जत जामखेडमध्ये घेतली. याआधी रोहित पवार बारामतीतून लढतील आणि अजित पवारांना मतदार संघ सोडावा लागेल अशी एक मोठी कँपेन होऊन गेली होती. या घटनांवरून रोहित आणि पार्थ यांच्यात असलेलं अंतर अधोरेखित होतं," असं आंबेकर सांगतात.

शरद पवार यांनी पार्थ यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचं विश्लेषण करताना आंबेकर सांगतात,

"शरद पवारांनी पार्थबाबत जे वक्तव्य केलं आहे, ते अपेक्षित होतं. शरद पवारांच्या वक्तव्याच्या एक दिवस आधी पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी तसंच स्टेटमेंट जारी केलं होतं. त्यामुळे पार्थच्या भूमिकेला नाकारायचा निर्णय पक्षपातळीवर झालेलाच होता, ती काही पवारांची उत्स्फूर्त प्रतिक्रीया नव्हती हे अगदी स्पष्ट आहे. पण पार्थ पवार यांना पराभवानंतर कोव्हिड काळात जरा सूर सापडत होता, मात्र शरद पवारांच्या जाहीर शेरेबाजीमुळे त्यांच्या पुढच्या वाटचालीला ब्रेक लागू शकेल असं वाटतं." 

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)