You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार यांनी पार्थ पवार यांचे कान उपटून कुणाला इशारा दिला आहे?
शदर पवार यांनी मात्र पार्थ पवार यांच्या मताला कवडीची किंमत नाही, ते अपरिपक्व आहेत, असं विधान करत पार्थ यांच्या वक्तव्यांपासून स्वतःला दूर ठेवलं आहे. पार्थ यांनी सुशांतसिंह प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर पत्रकारांनी शरद पवार यांना विचारलं असता शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.
"माझ्या नातवाच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही ते इनमॅच्युअर आहेत," असं शरद पवार म्हणाले आहेत.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासावरून राजकारण सुरू असतानाच पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आणि सुशांत सिंहच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करणारं निवेदन त्यांना दिलं होतं.
पण प्रत्यक्षात मात्र आघाडी सरकारचा सीबीआय चौकशीला विरोध आहे.
"मुंबई पोलीस सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी करत असून ते सत्य शोधण्यास सक्षम आहेत आणि अतिशय बारकाईने तपास करत आहेत. तरीदेखील राजकीय फायद्यासाठी या गुन्ह्याचा तपास CBI ला द्यावा अशी मागणी होतेय. त्याचा मी तीव्र निषेध करतो," असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत म्हटलं होतं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला आहे.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "तो त्यांच्या घरचा प्रश्न आहे, आजोबांनी नातवाला किंमत द्यायची की नाही हे आजोबांनी ठरवायचं आहे किंवा नातवांनी आजोबांना आवडेल असं वागायचं की नाही हे नातवांनी ठरवायचं आहे. त्या संदर्भात मी अधिक बोलणं योग्य नाही. त्यांनी एक म्हटलंय की सीबीआय चौकशीसाठी त्यांची हरकत नाही, मला वाटतं की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे."
शरद पवार यांचं हे वक्तव्य पार्थ पवार यांचं मनोधैर्य खच्ची करणारं आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.
तर पार्थ हे लंबी रेस का घोडा आहेत, असं ट्वीट भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलं आहे.
अजित पवार बैठकीत लवकर गेले
एकिकडे शरद पवार यांनी हे वक्तव्य केलंय तर दुसरीकडे राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीतून अजित पवार लवकर निघून गेल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवार यांना पुण्याला जायचं होतं म्हणून ते लवकर गेले, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.
अजित पवारांच्या मनातील बोलत आहेत पार्थ?
पार्थ यांच्या या वागण्याचा थेट संबंध अजित पवार यांच्या नाराजीशी असल्याचं राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांना वाटतं.
बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "पार्थ पवार यांच्या भूमिका म्हणजे जे अजित पवारांना जाहीरपणे बोलता येत नाही ते पार्थ बोलत आहेत. अजित पवार यांच्या मनात काहीतरी वेगळं सुरू असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 2004 मध्येही राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपद सोडलं होतं त्यावेळीही ते नाराज होते. गेल्या वर्षभरातही त्यांनी नाराजीचे संकेत अनेकदा दिलेत."
"पार्थ पवार यांनी राम मंदिर सारख्या राष्ट्रीय विषयावरही पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली. आताही सुशांत सिंहच्या प्रकरणातही ते महाविकासआघाडीच्या विपरित मागणी करत आहेत. पक्षातल्या इतर कुणी कार्यकर्त्याने किंवा पदाधिकाऱ्याने अशी भूमिका घेतली असती तर त्याच्यावर निश्चित कारवाई झाली असती. पण पार्थवर अद्याप एकदाही कारवाई झालेली नाही. त्याचं काय कारण आहे?"
राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व टीकवण्यासाठी सत्तेची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक गट भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही असण्याचीही शक्यता आहे. "भाजपसोबत जाण्यावरून पवार कुटुंबातच मतभेद असू शकतात," असंही प्रधान यांना वाटतं.
शरद पवारांची हतबलता?
महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास करणारे कोल्हापूरमधले प्राध्यापक पकाश पवार यांना मात्र शरद पवार यांच्या या वक्तव्यात हतबलता दिसते.
प्राध्यापक प्रकाश पवार यांच्यानुसार, "पार्थ पवार अपरिपक्व असले तरी राजकारणात कुणीच परिपक्व किंवा अपरिपक्व नसतं. पार्थ हे त्यांचे वडील अजित पवार यांच्याशी न बोलता असं बोलले असतील का? हा प्रश्न आहेच. त्यामुळे शरद पवार अप्रत्यक्षरित्या अजित पवारांनाच पार्थची समजूत काढण्यास सांगत असावेत."
"आपण महाराष्ट्राचे राजकारण समजून घेतलं पाहीजे. महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य असलेले दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात हिंदुत्ववादाचा ट्रेंड आलाय असं म्हणायला हरकत नसावी. सुरुवातीला विजयसिंह मोहीते-पाटील आणि त्यांचा मुलगा रणजितसिंह-मोहीते पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील आणि साताऱ्यातून शिवेंद्रराजे या सगळ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला."
"पार्थ पवार यांनी राम मंदिराविषयी पत्रक काढून 'जय श्री राम'चा नारा दिला यावर आक्षेप घेतला जात असला तरी आपण हे विसरता कामा नये की शरद पवारांनीही शिवसेनेसोबत सत्तास्थापन केली आहे. त्यांनीही कुठेतरी हिंदुत्ववादी पक्षासोबत तडजोड केली आहे. इथे त्यांची हतबलता दिसून येते."
पार्थ यांच्या लोकसभा उमेदवारीवरून संघर्ष
लोकसभा निवडणुकीवेळी पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली. मात्र पार्थ यांची उमेदवारी घोषित करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली होती.
त्याआधी शरद पवार माढ्यामधून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. 'पण एकाच कुटुंबातून तिघांनी निवडणूक लढवू नये, म्हणून मीच न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पिढीला संधी देण्यासाठी हा निर्णय घेतला,' असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.
पण त्यावरून पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे पवारांच्या घरात राजकीय सत्तासंघर्ष सुरू होणार का, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला. त्याबद्दलची सविस्तर बातमी इथे वाचू शकता.
पार्थ पवार यांच्या रुपानं पवार घराण्यातली तिसरी पीढी राजकारणात आली. वाणिज्य शाखेतील पदवी घेतल्यानंतर त्यांनी लंडनमधून बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी दीड वर्षांपासून ते अजित पवार यांच्या सोशल मीडियाचं काम पाहत होते.
पार्थ पवार यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर सध्या तरी पक्षात त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी सोपविण्यात आली नाहीये.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)