You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे पवार कुटुंबीयांतल्या राजकीय सत्तासंघर्षाला सुरुवात?
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून लोकसभेसाठी उमेदवारी मिळणार, हे आता स्पष्ट झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवीन पिढीला संधी देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं.
पण शरद पवारांच्या निर्णयानंतर रोहित राजेंद्र पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहित त्यांना निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.
"साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे, पण या आदराच्या पुढे प्रेम असतं. आणि माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचं प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाचं हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा," असं रोहित यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
त्यामुळे आता पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे पवार कुटुंबीयांतल्या राजकीय सत्तासंघर्षाला सुरुवात झाली का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे पवारांच्या घरात राजकीय सत्तासंघर्ष सुरू होणार आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी मांडलं आहे.
'पवारांच्या घरात राजकीय सत्तासंघर्ष सुरू'
विजय चोरमारे यांच्या मते, "आतापर्यंत राजकीय घराण्यांचा गृहकलह आपण वेळोवेळी समोर आलेला पाहिला आहे. ठाकरे, मुंडे, साताऱ्याच्या राजघराण्यातील सत्तासंघर्ष बघितला. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर पवारांच्या कुटुंबात एक वेगळेपणा जाणवत होता. म्हणजे या कुटुंबात राजकीय सत्तासंघर्षासाठी कुणी वेगळा काही प्रयत्न करणार नाही, असं वाटत होतं. पण यानिमित्तानं पहिल्यांदाच पवारांच्या घरात गृहकलह सुरू होणार आहे."
"अजित पवार आतापर्यंत प्रत्येक गोष्ट आज्ञाधारपणे ऐकत आले. म्हणजे जसं ठेवलं तसं राहिले. पण अजित पवारांच्या मुलाच्या इच्छेपुढे शेवटी शरद पवारांना माघार घ्यावी लागली, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी," ते पुढे सांगतात.
पार्थ पवारांच्या उमेदवारीला कौटुंबिक पदर असल्याचं ज्येष्ठ पत्रकार राही भिडे सांगतात.
त्या सांगतात, "पार्थ पवारांच्या उमेदवारीला कौटुंबिक पदर नक्कीच आहे. अजित पवारांना आता मुलाला पुढे करायचं आहे. त्यामुळे त्याची एन्ट्री शरद पवारांच्याच उपस्थितीत झालं पाहिजे, असं घरातलं प्रेशर असावं, असं मला वाटतं. कारण पार्थ महत्त्वाकांक्षी आहे. त्यालाही राजकारणात स्वत:ला सिद्ध करायचं आहे. त्यामुळे त्यानं तो हट्ट धरलेला दिसतोय. कारण गेल्या काही दिवसांपासून त्यानं कार्यकर्त्यांबरोबर संपर्क ठेवलेला आहे."
"पवारांनी घरातल्या प्रेशरमुळेसुद्धा पार्थला पुढे केलेलं दिसंतय. कारण शरद पवारांनीच आधी पार्थला उमेदवारी नाकारली होती. पण शेवटी शरद पवारांना माढ्याची जागा सोडून पार्थला उमेदवारी द्यावी लागली, यातच सगळं आलं ना. म्हणजे घरातून त्यांना किती प्रेशर आहे," त्या पुढे सांगतात.
"याशिवाय अजित दादांचे जे निकटवर्तीय आहेत म्हणजे सुनील तटकरे वगैरे यांनी पार्थची बाजू लावून धरलेली आहे. हा सुद्धा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे की, तटकरे वगैरे कंपनीला म्हणजे स्वत: अजित दादांनाच पार्थला पुढे करायचं आहे," राही भिडे सांगतात.
रोहित आणि पार्थ यांच्यात स्पर्धा?
स्थानिक राजकीय विश्लेषकांच्या मते, "पवारांच्या कुटुंबातील तरुण पिढीत राजकीय आकांक्षा वाढल्या आहेत. आणि त्याला कौटुंबिक पदरही आहेत. त्यामुळेच पार्थनं राजकारणात येऊ नये असं अजित पवारांनी म्हटल्यानंतरही आणि शरद पवारांनी आमच्या कुटुंबातून नवीन कुणी लोकसभा लढणार नाही, असं जाहीर केल्यानंतरही पार्थचं नाव पुढे आलं."
तर मग हा रोहित आणि पार्थ यांच्यातील राजकीय स्पर्धेचा भाग आहे का?
तर या प्रश्नाचं उत्तर स्थानिक पत्रकार 'नाही' असं देतात. ते म्हणतात की, "पवार कुटुंबाचं बाँडिंग चांगलं आहे. आणि पवारांच्या शब्दाबाहेर कुणी जात नाही. त्यामुळे जागा जिंकून येण्याची शक्यता असल्यानेच पवारांनी ही खेळी केली असावी. त्यामुळेच एका कुटुंबातील किती उमेदवार राजकारणात असणार? लोकांमध्ये त्याचं काय इम्प्रेशन जाईल याचा विचार करूनच पवारांनी माढ्यातून माघार घेतली असावी."
"त्यामुळे जरी निवडून येण्याची क्षमता आणि लोकमान्यता याचा दाखला शरद पवार देत असले, तरी लोकसभेत सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि राज्यसभेत शरद पवार असे एकावेळी तीन पवार दिल्लीत असतील. तर बारामतीतून अजित पवार आणि कदाचित हडपसर किंवा जामखेड-कर्जतमधून रोहित पवार विधानसभेत असतील. त्यामुळे नव्या पिढीच्या आकांक्षा आणि त्याला असलेले कौटुंबिक पदर सहजासहजी दुर्लक्षून चालणार नाहीत," असंही स्थानिक पत्रकार सांगतात.
रोहित पवार कोण आहेत?
शरद पवारांचे भाऊ आप्पासाहेब पवार हे पवारांच्या कुटुंबात पितृस्थानी होते. त्यांचे चिरंजीव राजेंद्र पवार यांना राजकारणात रस होता. पण अजित पवार आधीच सक्रीय असल्याने त्यांना ती संधी मिळाली नसल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.
त्यामुळे राजेंद्र पवारांनी बारामती ऍग्रो आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात ठसा उमटवला. पण राजेंद्र यांचे चिरंजीव रोहित यांना राजकारणात रस आहे. ते 31 वर्षांचे आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत.
पुण्याच्या मगरपट्टा सिटीचे सर्वेसर्वा सतीश मगर यांचे ते जावई आहेत. आणि सध्या ते महाराष्ट्रभर फिरून जनसंपर्क वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत.
त्यांना विधानसभा लढवण्यात रस असल्याचं राजकीय पत्रकार सांगतात. आणि त्यामुळेच हडपसर किंवा कर्जत-जामखेडची चाचपणी राष्ट्रवादीकडून सुरू असल्याचं बोललं जातंय.
'निवडणूक जिंकणं सोपं नाही'
पार्थ पवार यांच्या उमेदवारीनं राष्ट्रवादीला मावळ मतदारसंघ जिंकता येईल का, यावर राजकीय विश्लेषक प्रताप आसबे सांगतात, "पार्थ यांना उमेदवारी देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला थोडाफार फायदा होईल. याचं कारण असं की, तिथं त्यांच्याकडे उमेदवारच नव्हता.
इथल्या वरिष्ठ पातळीच्या उमेदवारांनी दोन-तीन वेळेस निवडणूक लढवायचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळोला ते पराभूतच होत होते. वरच्या पट्ट्यात त्यांना मतं मिळाली. पण खाली रायगड जिल्ह्यात त्यांना मतं मिळत नव्हती. रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव आहे. पण यंदा या निवडणुकीत शेकापनं खूपच इंटरेस्ट घेतला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, आम्हाला यावेळेला पार्थच पाहिजे. त्यामुळे या निवडणुकीला हा एक कंगोरा आहे."
"पण असं असलं तरी ही निवडणूक मात्र टफ होईल. म्हणजे एकतर्फी नाही होणार. पूर्वी ही निवडणूक एकतर्फीच होत होती. आता ती टफ होईल. तिथं विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचं नेटवर्क खूप चांगलं आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी मिळाली की, बारणे लगेच पराभूत होतील, असं समजण्याचं कारण नाही. लढाई चांगलीच होईल," ते पुढे सांगतात.
विजय चोरमारे यांच्या मते, "पार्थ यांच्या उमेदवारीमुळे पवार घराण्यातला उमेदवार आहे, नवीन चेहरा आहे, असं एक वातावरण तयार होईल. पवारांच्या घरातलाच उमेदवार असल्यामुळे इतर कुणी बंडखोरी करणार नाही. मावळ लोकसभेचं वातावरण बघितलं तर पवारांची उमेदवारी राष्ट्रवादीला फायदेशीच ठरणार आहे. असं असलं तरी या मतदारसंघात शिवसेनेचं नेटवर्क चांगलं आहे. त्यामुळे अजित पवारांना वैयक्तिक पातळीवर चांगलं काम करावं लागणार आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)