You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार लोकसभा निवडणूक 2019मध्ये काय भूमिका बजावतील?
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक 2019 चे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असो वा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाषणात लोकसभा निवडणुकीचा उल्लेख होताना दिसत आहे.
तर राज्यातले स्थानिक नेते देखील लोकसभा निवडणुकीच्या हालचाली करताना दिसत आहेत. महाराष्ट्रात ज्यांचा प्रभाव पडू शकतो अशा नेत्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे एक आहेत असं म्हटलं जातं.
लोकसभा निवडणूक 2019मध्ये शरद पवार नेमकी काय भूमिका बजावतील याबद्दल सामान्य लोकांना उत्सुकता तर आहेच. पण त्याचबरोबर राजकीय विश्लेषक देखील शरद पवारांच्या भूमिकाचा अंदाज लावण्यात व्यग्र दिसत आहेत.
शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस
शरद पवार गेल्या 5 दशकांपासून सक्रिय राजकारणात आहेत. सध्या ते 77 वर्षांचे आहेत. 1967 साली ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते.
तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी अनेक पदं भूषवलं. ते तीन वेळा मुख्यमंत्री झाले, तसंच संरक्षण मंत्री, कृषी मंत्री आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते अशी पदं त्यांनी भूषवली आहेत.
1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रातला एक प्रभावशाली पक्ष म्हणून ओळखला जातो.
काँग्रेसबरोबर तीनदा आघाडी करून राष्ट्रवादीची राज्यात सत्ता आली होती. 2004 आणि 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी केली होती.
केंद्रात दोन्ही वेळी काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर शरद पवार हे कृषिमंत्री बनले होते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेत चार खासदार आहेत तर शरद पवार हे राज्यसभेमध्ये खासदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रात एकूण 41 आमदार आहेत.
काँग्रेसची साथ आणि महाआघाडी
राज्यात अद्याप शिवसेना आणि भाजपची युती झालेली नाही. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहेत ही घोषणा आधीच झाली आहे. राज्यात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत.
केंद्रात कुणाचं सरकार राहील हे ठरवण्यात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते. शरद पवारांकडे असलेला अनुभव ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची जमेची बाजू ठरू शकते, असं जेष्ठ पत्रकार संजय मिस्किन सांगतात.
नुकतंच कोलकात्यामध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात असलेल्या पक्षांची महासभा घेतली. या वेळी शरद पवार हे देखील उपस्थित होते.
शरद पवारांचे सर्व पक्षातील लोकांशी सलोख्याचे संबंध आहेत. मुंबईत झालेल्या संविधान रॅलीचे देखील ते आकर्षण बिंदू होते. या रॅलीत शरद यादव, ओमर अब्दुल्ला हे नेते सहभागी झाले होते.
जर कुणालाच स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर विविध पक्षांच्या नेत्यांना एकत्र घेऊन केंद्रात सरकार स्थापन करण्यात शरद पवार महत्त्वाचा वाटा उचलू शकतात, असं मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी बीबीसी मराठीसाठी लिहिलेल्या लेखात व्यक्त केलं होतं.
पवार महाआघाडीचं नेतृत्व करू शकतील का?
"उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि मायावती एकत्र आले आहेत. 2014 मध्ये भाजपचे उत्तर प्रदेशातून 72 खासदार आहेत. पण नवीन समीकरणं पाहता हा आकडा आता दूर वाटतो. शरद पवार सर्व पक्षातील नेत्यांची मोट बांधू शकतात तसंच पंतप्रधान मोदी देखील त्यांना गुरुस्थानी मानतात त्यामुळे जर कुणालाच स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर त्यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो," असं ज्येष्ठ पत्रकार संजय मिस्कीन सांगतात.
"जर देशात एच. डी. देवेगौडा हे पंतप्रधान होऊ शकतात तर शरद पवार का नाही? पण देवेगौडांचं सरकार हे औटघटकेचं ठरलं होतं, पण शरद पवार मात्र स्थिर सरकार देऊ शकतात," असं मिस्कीन सांगतात.
शरद पवारांपुढील आव्हानं
"शरद पवार दिग्गज नेते असले तरी त्यांच्यासमोर आव्हानं आहेत. संख्याबळ कमी आहे हे तर उघडच आहे. महाराष्ट्रात 1990 नंतर स्वबळावर कुणाचीच सत्ता स्थापन झालेली नाही," असं मिस्कीन सांगतात.
निखिल वागळे सांगतात, "पवारांच्या या मार्गात अडथळेही असंख्य आहेत. सगळ्यांत मोठा अडथळा म्हणजे त्यांची रसातळाला गेलेली विश्वासार्हता. पवारांवर विश्वास नसल्याने प्रकाश आंबेडकर यांनी संविधान रॅलीत सामील व्हायला नकार दिला. केवळ राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही हा 'क्रेडिबिलिटी क्रायसीस' चिंताजनक आहे."
"पवार कधी दगा देतील हे सांगता येत नाही, हे त्यांच्याभोवती जमा झालेले विरोधी नेतेही मान्य करतात. महाराष्ट्रातल्या २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीस सरकारला पहिला टेकू पवारांच्या पक्षाने अप्रत्यक्षपणे दिला होता, ही आठवण ताजी आहे," वागळे सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)