गुढीपाडवा शोभायात्रा : हिंदू मराठी 'व्होट बँक' जिंकण्याची स्पर्धा?

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

"हिंदू सण साजरे करण्यासाठी परवानगी देताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?" असा खरमरीत प्रश्न भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला.

गुढीपाडव्यादिवशी शोभायात्रांना परवानगी देण्यावरून भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधला. यापूर्वीही दही हंडी, गणेशोत्सव अशा हिंदू सणांच्या कार्यक्रमांवरून राजकारण तापलं होतं.

यंदाचा गुढीपाडवा हा दोन कारणांसाठी विशेष आहे. पहिलं म्हणजे कोरोना आरोग्य संकटामुळे दोन वर्षांनंतर नागरिकांना सार्वजनिकरित्या सण साजरा करता येणार आहे आणि दुसरं कारण म्हणजे महापालिका निवडणुका जवळ आल्याने मिरवणुकांसाठी जय्यत तयारी केली जात आहे.

आता तुम्ही म्हणाल की, गुढीपाडवा आणि राजकारणाचा काय संबंध आहे? परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे.

शोभायात्रेच्या निमित्ताने राजकीय स्पर्धा सुरू आहे का? हिंदू सणांचं राजकारण केलं जात आहे का? याचा राजकीय पक्षांना कसा फायदा होतो? मिरवणुकांमध्ये प्रचाराची संधी साधली जाते का? या आणि अशा काही प्रश्नांची उत्तरं शोधण्यचा प्रयत्न आपण करणार आहोत.

उत्सवात राजकीय संधी?

गुढीपाडव्याला मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने शोभायात्रांचं आयोजन केलं जातं. यात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर राजकीय पक्ष किंवा नेत्यांचा पुढाकार असल्याचं दिसून येतं.

डोंबिवली, गिरगाव, ठाणे, विलेपार्ले, खार, जोगेश्वरी, लालबाग,परळ अशा अनेक ठिकाणी गुढीपाडव्याला भव्य मिरवणुकांचं आयोजन केलं जातं.

यंदाही मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकणी शोभायात्रांची पूर्वतयारी सुरू आहे.

गिरगावमध्ये शिवसेना दक्षिण मुंबई शाखेतर्फे शोभायात्रा भव्य शोभायात्रा काढली जाते. मुंबई महानगरपालिकेने कोव्हिड काळात चांगली कामगिरी केली असा संदेश देणारा चित्ररथ यंदा शोभायात्रेत असणार आहे. तर जोगेश्वरीमध्ये शिवसेनेचे नेते रविंद्र वायकर यांच्यातर्फे बाईक रॅलीचं आयोजन केलं जात आहे.

मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.

'महाराष्ट्र धर्माची सर्वोच्च गुढी उभारुया!' असं सांगत मनसेने राज ठाकरे यांच्या सभेला येण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्यानिमित्त मनसेकडून शक्तीप्रदर्शन केलं जाईल.

मुंबई महानगरपालिकेने मनसेला अटी-शर्थीसह जाहीर सभा घेण्याची परवानगी दिली आहे. संध्याकाळी 5-10 या वेळात ही सभा होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

केवळ गुढीपाडवा नव्हे तर गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सवातही आयोजनात राजकीय नेत्यांचा पुढाकार दिसून येतो. यामागे काय कारणं आहेत? याचा राजकीय फायदा नेत्यांना होत असतो का?

अशा धार्मिक सणांच्या उत्सवाच्या माध्यमातून राजकीय पक्षांना एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जनतेसमोर जाण्याची आणि त्यांच्याशी जोडण्याची संधी मिळते असं राजकीय विश्लेषक सांगतात.

ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणाले, "1992-93 मध्ये दंगलींच्या काळात शिवसेनेने अनेक ठिकाणी महाआरतींचं आयोजन केलं होतं. महाआरतींचे आयोजन ही मूळ शिवसेनेची संकल्पना होती. याच माध्यमातून त्यांनी आपलं शक्ती प्रदर्शनही केलं. यामुळे वातावरण भावनिक आणि जहाल करण्याचा प्रयत्न शिवसेनेने त्याकाळात केला होता."

लोकांपर्यंत पोहचण्यासाठी आणि अशा धार्मिक सणांच्या कार्यक्रमातून मतदारांना खूश करण्यासाठीही राजकीय पक्ष किंवा नेते पुढाकार घेताना दिसतात असंही ते म्हणाले.

तर, "अशा आयोजनांमुळे सणांचा गोडवा कमी झाला असून राजकीय शक्ती सणांचा राजकारणासाठी फायदा घेतात," असं मत शाहीर संभाजी भगत यांनी व्यक्त केलं.

"90 च्या दशकापासून गुढीपाडवा किंवा हिंदू सण एखाद्या इव्हेंटप्रमाणे साजरा करण्याचं प्रमाण वाढलं. सांस्कृतिक सणांचा वापर राजकीय शक्ती करू लागल्या. यामुळे धार्मिकीकरणही वाढलं. धर्मांध शक्तींचं प्रदर्शन यामुळे केलं जातं." असं शाहीर संभाजी भगत म्हणाले.

गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रांचं आयोजन पूर्वी काही मोजक्या शहरांमध्ये होत होतं. परंतु आता ते नीमशहरी भागांतही पोहचलं आहे.

ते पुढे म्हणाले, "एखाद्या विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी, समूहशक्ती वाढवण्यासाठी अशा प्रकारचं आयोजन केलं जातं असं मला वाटतं. हे केवळ हिंदू सणांच्याच बाबतीत होतंय असं नाही. तर एकूणच विविध समाज आपल्या कार्यक्रमांना धार्मिक स्वरूप देत असल्याचं पहायला मिळतं."

सर्वच शोभायात्रा राजकीय नाहीत असं 'ठाणे वैभव' वृत्तपत्राचे संपादक मिलिंद बल्लाळ सांगतात.

"पूर्वी हिंदू मतांचं एकत्रीकरण करण्यासाठी शोभायात्रांचं आयोजन केलं जात होतं. पण हल्ली त्याचं स्वरुप बदललं आहे. आता गल्लीबोळातही शोभायात्रा निघते आणि सामान्य लोकही सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतात."

ठाण्यात शोभायात्रेचं आयोजन राजकीय नेते करत नाहीत. राजकीय नेत्यांची उपस्थिती दिसून येते पण कोणताही एक पक्ष त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही असंही ते सांगतात.

हिंदू केंद्रित राजकारण?

देशात केंद्रात हिंदुत्ववादी विचारधारा असलेलं भाजपचं सरकार आहे. हिंदू सण आणि धार्मिक मुद्यांवरून भाजप आक्रमक भूमिका घेताना दिसते. यामुळे देशातलं राजकारणही ढवळून निघालं आहे असं जाणकार सांगतात.

राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणाले, "गुढीपाडव्याला मिरवणुका काढण्याची पद्धत फार पूर्वीपासून आहे. पण आता त्याला राजकीय संदर्भ आहेत आणि आता त्याचा वापर आणखी तीव्र झालाय हे सुद्धा नाकारून चालणार नाही."

"सुरुवातीला डोंबिवली, ठाणे, गिरगाव अशा हिंदू बहुल भागांत या शोभायात्रा अधिक काढल्या जात होत्या. यंदा तर स्थानिक पातळीवर त्यासाठी जय्यत तयारी केली जाईल कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्थानीक पातळीवर मतदारांशी संपर्क होणं गरजेचं असतं."

भाजपने हिंदू सण जाहीरपणे भव्य साजरे करण्यासाठी आग्रह धरणे, लाऊडस्पीकरसाठी मागणी करणे आणि महाराष्ट्रात शिवसेनेवर त्यासाठी टीका करणं यावरून सणांचं राजकारण केलं जातंय हे स्पष्ट आहे.

"आता देशात जे राजकीय आणि धार्मिक वातावरण आहे ते पाहता भविष्यात असे धार्मिक उत्सवांचं प्रमाण आणखी वाढेल. गणेशोत्सव, दहीहंडी, दूर्गा पूजा, गुढीपाडवा अशा हिंदू सणांचं वर्चस्व असल्याचंही दिसून येतं," असंही ते म्हणाले.

ते पुढे सांगतात, "धार्मिक कार्यक्रमांचं प्रकटीकरण जास्त केलं की समाजात भावनिक लाट येते. आपण एकत्र आहोत, आम्ही तुमच्या सोबत आहोत हे दाखवण्याची संधी यानिमित्ताने राजकीय पक्षांना मिळते. हे लोकांना पटलं की धर्माच्या नावावर मतं मागणं सोपं होतं. तसंच अशा सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांशी संपर्क वाढतो, लोकांशी कनेक्ट राहतो.

"स्थानिक धार्मिक कार्यक्रम असल्यास मतदारांनाही खूश करता येतं. शोभायात्रा, दहिहंडी, गणेशोत्सव या सणांच्या निमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून स्थानिक मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे प्रत्यक्ष विकास कामांच्या प्रश्नांचाही जनतेला विसर पडतो."

हिंदू सणांचं वर्चस्व वाढवण्याचं नरेटिव्ह देशभरात दिसून येतं असं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं. ज्यापद्धतीने भाजपचे पहिल्या फळीतले नेते याला महत्त्व देताना दिसतात त्याचप्रमाणे इतर राजकीय नेत्यांनीही त्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केल्याचं दिसून येतं.

"भाजपने कायम धार्मिक कार्यक्रमांना प्राधान्याने महत्त्व दिलं आणि त्याचं राजकारणही केलं. याचं अनुकरण आता इतर राजकीय पक्ष करतात. हिंदू मतदारांसाठी राजकीय पक्षांनाही त्यांनी हे करण्यास भाग पाडलं असंही आपण म्हणून शकतो. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यंदा नवरात्रउत्सवात दूर्गा पूजेच्या कार्यक्रमांना विशेष महत्त्व दिलं, आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नागरिकत्त्व कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांकडे दिल्लीत फिरकलेही नाहीत. काँग्रेससारखा राजकीय पक्षही पूर्वी अल्पसंख्यांकांसाठी जेवढा आक्रमक होता तसं चित्र आता दिसत नाही या महत्त्वाच्या घडामोडी आहेत."

कुठे आणि कशा होणार शोभायात्रा?

  • डोंबिवली - शोभायात्रा यंदा साधेपणाने साजरी केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. दीपोत्सव असणार आहे. तसंच कोव्हिड काळात चांगलं काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे.

कोरोनामुळे 2020 आणि 2021 अशी सलग 2 वर्षे या स्वागतयात्रेला ब्रेक लागला होता. यंदा मात्र कोवीडची परिस्थिती बऱ्यापैकी निवळली असली तरी निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर ही स्वागतयात्रा साधेपणाने करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष राहुल दामले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यंदा कोणत्याही प्रकारचे देखावे असणारे रथ या नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणार नसून साधेपणाने श्री गणेशाच्या पालखीच्या माध्यमातून काढली जाणार आहे. बागशाळा मैदानाऐवजी डोंबिवली पश्चिमेच्या पंडित दिनदयाळ मार्गावरील मारुती मंदिरापासून ही पालखी निघणार आहे. तसंच 75 कलाकार वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत सुबक अशा 75 रांगोळ्या काढणार आहेत .

  • ठाणे- ठाण्यात गेल्या 21 वर्षांपासून शोभायात्रेचं आयोजन केलं जातं. कोपिनेश्वर ट्रस्टच्यावतीने शहरात शोभायात्रेचं आयोजन केलं जातं. यंदा सकाळी सात वाजता शोभायात्रा सुरू होणार असून पूर्वसंध्येलाही सांस्कृतीक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

मासुंदा तलाव परिसरात हजारो दिव्यांचा दीपोत्सव करण्यात येणार आहे. यंदा यात्रेचे स्वागताध्यक्ष जेष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर आहेत. यावेळी 40 हून अधिक चित्ररथ दाखल होणार आहेत.

  • गिरगाव - गिरगातावील पाच मोठ्या गणेश मंडळांतर्फे यंदा 16 ते 17 चित्ररथ असणार आहे.

तसंच जगदंबा ढोलपथकाचा 100 जणांचा ताफा असणार आहे. 150 बाईक्सवर महिल सवार होणार आहेत. तसंच डबेवाल्यांचीही दिंडी असणार आहे. महिला मगंळागौर, मल्लखांब, मुंबादेवीची 18 फूट उंच प्रतिकृतीही असणार आहे.

  • लालबाग- लालबाग-परळ परिसरात शोभायात्रेत बुलेट पथक, भारतामाता पालखी तसेच लेझीम पथकांचा समावेश असणार आहे.
  • खार - यंदा खार पूर्व परिसरात ५० मोठ्या गुढ्या उभारल्या जाणार आहेत. तसंच भव्य रांगोळ्या काढण्यात येणार आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)