You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुल्ली डील्स-बुल्लीबाई: मुस्लीम महिलांवर शेरेबाजी करणाऱ्यांना 'पहिलाच गुन्हा' असल्यामुळे जामीन
मुस्लीमधर्मीय महिलांवर अश्लील शेरेबाजी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी नीरज बिश्नोई आणि सुल्ली डील्स अॅप बनवणारा ओंकारेश्वर ठाकूर यांना मानवतेच्या आधारावर जामीन मिळाला आहे.
'हा आरोपींचा पहिला गुन्हा आहे. प्रदीर्घ काळ त्यांना तुरुंगात ठेवणं योग्य होणार नाही,' असं मत न्यायालयाने नोंदवलं.
जामीन देताना न्यायालयाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. कोणत्याही साक्षीदाराला धमकावणं आणि कोणत्याही पुराव्याशी छेडछाड करणं शक्य होऊ नये याची खबरदारी बाळगण्यात येणार आहे.
पीडितांशी संपर्क करून चौकशीची दिशा फिरवण्याचा प्रयत्न आरोपींनी करू नये. पुराव्यांशी छेडछाड करता येणार नाही. तपास अधिकाऱ्यांना पत्ता, फोननंबर देणं आरोपींना अनिवार्य करण्यात आलं आहे. आरोपींना स्वत:चा फोन सदैलव सुरू ठेवावा लागेल असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान आरोपी नीरज बिश्नोई यानं त्याला हॅकिंगची, वेबसाईट डिफेन्सिंगची सवय असल्याचं सांगितलं. वयाच्या 15 व्या वर्षापासून हे सर्व शिकायला सुरुवात केली होती, असंही त्यानं सांगितलं.
यापूर्वीही त्यानं विविध शाळा आणि विद्यापीठांच्या वेबसाईट हॅक करत त्यावरचा मजकूर बदलला होता. भारतातील आणि पाकिस्तानातीलही वेबसाईटचा यात समावेश होता.
शाळांच्या वेबसाईट हॅक केल्याच्या त्याच्या दाव्याचा संबंधित विभाग तपास करत आहेत.
आरोपी नीरज बिश्नोई याला जपानमधील अॅनिमेशन गेमिंग कॅरेक्टर GIYU आवडत होतं. त्यानं GIYU नावाने विविध ट्विटर हँडल तयार केलेले होते.
GIYU या शब्दानं त्यानं अकाऊंट तयार केलेलं होतं. त्याद्वारे त्याने कायदे संस्थांना त्याला पकडण्याचं आव्हान दिलेलं होतं.
आरोपी नीरज बिश्नोई हा तपासात सहकार्य करत नसून विलंब करण्याचा प्रयत्न करत असल्याचं तपास संस्थांकडून सांगण्यात आलं आहे.
त्यानं दोन वेळा स्वतःला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि आत्महत्या करण्याची धमकीही देत आहे. त्यामुळं त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येत असून यादिशेनं काळजी घेतली जात आहे. त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे.
काय आहे याचं स्वरुप?
इंटरनेटवर फ्री अॅप सुरू करून त्यावर प्रथितयश मुस्लीम महिलांबद्दल अश्लील मजकूर छापणे आणि त्यांना ट्रोल करणं असं या गुन्ह्याचं स्वरुप आहे.
तुमचा सोशल मीडियावरचा फोटो काढून कुणी भलत्याच अॅपवर लावला आणि तुम्ही विक्रीसाठी उपलब्ध आहात असं परस्पर सांगून तुमच्यावर बोली लावली तर? काही भारतीय मुस्लीम महिलांच्या बाबतीत असं अलीकडच्याच काळात दुसऱ्यांदा घडलं आहे.
सुल्ली डील्स हे अॅप तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात दिल्ली पोलिसांना अपयश आलं असतानाच आता बुल्ली बाई असं बीभत्स नाव देऊन दुसरं अॅप पुढे आलं. यावेळी मुंबई पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली आहे.
अश्लील शेरेबाजी करणारी ही अॅप कोण तयार करतं?
गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुल्ली डील्स अॅपनेही खळबळ उडवून दिली होती.
सुल्ली हा खरंतर मुस्लीम स्त्रीसाठी वापरला जाणारा अत्यंत अपमानकारक शब्द आहे. विकाऊ स्त्री असा त्याचा ढोबळ अर्थ आहे. अनेक मुस्लीम महिला पत्रकार आणि विचारवंतांचे फोटो आणि नावं देऊन या अॅपमध्ये चक्क लिलाव सुरू केले होते.
अर्थातच हे लिलाव तोतया होते आणि हा केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न होता. या अॅपमध्ये अत्यंत अवमानजनक आणि अश्लील मजकूरही छापला होता.
या प्रकरणाचा छडा दिल्ली पोलिसांना अजून पर्यंत लावता आलेला नाही. त्यातच आता बुल्ली बाई अॅप समोर आलं आहे. गिटहब या खुल्या ऑनलाईन व्यासपीठावर हे अॅप सुरू केलं. मग गदारोळ झाल्यानंतर हे अॅप त्यांनी काढूनही टाकलं.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी वेगाने कारवाई करत आतापर्यंत 3 जणांना अटक केली आहे.
अशी अॅप का काढली जातात?
जसं फेसबुक, ट्विटरवर ट्रोलिंग होतं, तसाच, पण त्याहून गंभीर असा हा ट्रोलिंगचाच प्रकार आहे. पण, यातला मजकूर खूपच खालच्या दर्जाचा आणि अश्लील आहे.
अश्लीलता विरोधी कायद्याच्या आधारे या अॅपकर्त्यांवर कारवाईही होईल. पण मुळात ही मानसिकता आणि त्यातही एखाद्या समाजाविरोधात बदनामी करण्याचे हे प्रकार कुठून जन्म घेतात?
ऑनलाईन माहितीच्या सुरक्षिततेसाठी काम करणारे ALT न्यूजचे संस्थापक प्रतीक सिन्हा लिहितात, "आमच्या टीमने सुल्ली डिल्स प्रकार घडला तेव्हा ट्विटर हँडल चालवणाऱ्यांशी थेट संपर्क साधला होता. एखाद्या समाजाला आणि स्त्रियांना बदनाम करण्याचा हा संघटित प्रयत्न असल्याचं आमच्या लक्षात आलं. पण पोलीस तपास म्हणावा तसा पुढे सरकला नाही. आणि पुढे आमच्या संपर्कात असलेल्या लोकांनीही आधी कबूल केलेला गुन्हा नाकारला."
अशा अॅपमध्ये नाव आलेल्या महिलेला या गोष्टीचा प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दिन तांबोळी सांगतात, "महिलांना टार्गेट केलं की समाजही टार्गेट होतो. यापूर्वी जातीय दंगलींच्या वेळीही एखाद्या समाजातल्या स्त्रियांबद्दल असं अवमानजनक बोललं गेलं आहे.
"आताचं व्यासपीठ ऑनलाईन आहे, इतकाच बदल आहे. यातून समाजाचं खच्चीकरण होतंच, दोन समाजांत द्वेषही पसरतो. आणि दुसरं म्हणजे मुस्लीम धर्मातल्या मूलतत्त्ववाद्यांकडूनही महिला सोशल मीडियावर येऊ नयेत असा प्रसार केला जातो. म्हणजे स्त्रियांची वाढही खुंटते."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)