You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गुढीपाडवा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घरच्या घरी कसा साजरा कराल?
- Author, दिपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
गेल्या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे गुढीपाडवा नेहमीप्रमाणे साजरा करता आला नाही. यावर्षीही चित्र वेगळं नाहीये. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने काही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
गुढीपाडव्यासाठीही सरकारने नियमावली जाहीर केली आहे. यंदाचा गुढीपाडवा घरीच्या घरीच साजरा करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. घरी गुढीपाडवा कसा साजरा करता येईल, हे सांगणारा लेख गेल्या वर्षी प्रसिद्ध केला होता. तो आज पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
शालिवाहन शके अर्थात मराठी कालगणनेनुसार गुढीपाडव्याचा दिवस हा नववर्षदिन असतो. मात्र यंदाच्या गुढीपाडव्याला कोरोनाचं ग्रहण आहे.
हिंदू नववर्षाचं स्वागत महाराष्ट्रात गुढी उभारून करण्याची परंपरा आहे. शिवाय, साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहुर्त समजला जात असल्यानं गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. पण यंदाचा गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाही याची जाणीव प्रत्येकालाच आहे.
गुढी उभारण्यासाठी आणि तिची पूजा करण्यासाठी प्रत्येक घरात जय्यत तयारी असते. पुजेसाठी लागणारी फुलं, साखरेच्या माळा, दारावर तोरण, गोडधोड पदार्थ, बांबूची काठी असे सर्व साहित्य गुढीपाडव्यासाठी खरेदी केलं जातं. पण यंदा आरोग्याच्या हितासाठी पूजेच्या या साहित्याची खरेदी न करताच गुढीपाडवा साजरा करणं गरजेचं आहे.
घरच्या घरी कसा साजरा कराल गुढीपाडवा ?
यंदा गुढीपाडव्याचा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन सर्वच स्तरांतून केलं जात आहे. घरी उपलब्ध साहित्य वापरुन गुढी कशी उभारावी, यासाठी पंचागकर्ते दा.कृ.सोमण यांनी मार्गदर्शन केलं आहे.
तुम्ही काय करू शकता ?
- गुढी उभारण्यासाठी बाजारातून नवीन बांबूची काठी आणण्याची गरज नाही. त्याऐवजी घरात उपलब्ध काठी धुऊन ती वापरू शकता. घरातली फूटपट्टी किंवा लाकडाची काठी वापरावी.
- नवीन वस्त्र आणू नये. घरात एखादी नवीन साडी अथवा कोणतेही रंगीत वस्त्र गुढीसाठी वापरू शकता.
- साखरेची माळ, फुलं विकत आणण्याची आवश्यकता नाही. पुजेसाठी एखादं साहित्य नसेल तर त्याऐवजी तुम्ही अक्षता वापरू शकता.
- नवीन वर्षाची सुरुवात आपण गोड पदार्थ बनवून करत असतो. त्यासाठी साखर, गूळही पुरेसा असतो. त्यामुळे बाहेरून पदार्थांची खरेदी करण्याची गरज नाही."
बीबीसी मराठीशी बोलताना दा.कृ. सोमण यांनी सांगितलं, "दरवर्षी तुम्हाला गुढीपाडव्याला सुट्टी घ्यावी लागते. अनेकांना सुट्टी मिळत नाही. कुटुंबासोबत सण साजरा करता येत नाही. पण यंदा तुम्ही कुटुंबासोबत आहात. त्यामुळे कुटुंबासोबत संवाद साधा आणि नवीन वर्षाची सुरुवात करा. बाहेर न पडता स्वयंशिस्तीची गुढी उभारा"
कुटुंबासोबत कसं कराल नववर्षाचं स्वागत ?
गुढीपाडव्याच्या मंगल दिनी तुम्हाला पूर्ण कुटुंबासोबत संपूर्ण दिवस नवीन वर्ष साजरा करण्याची संधी मिळाली आहे. तुम्ही बाहेर न जाता हा दिवस कसा साजरा करू शकता ?
या विषयी लेखिका शुभदा चौकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, " मी स्वत: घरीच झेंडूच्या फुलांपासून तोरण बनवते. पण यंदाची परिस्थिती वेगळी आहे. कुटुंबासोबत कसा वेळ घालवाल यासाठी तुम्हाला काही गोष्टी सुचवते.
- झेंडूची फुलं नसली तरी घरी रंगीत कागद किंवा कागदाला रंग लावून त्याचे तोरण बनवता येईल. यामध्ये लहान मुलंही रमतील.
- गुढीपाडवा आपण साजरा करतो तो चैत्र महिना सुरू होतो आणि झाडांना नवी पालवी फुटते म्हणून, मग या निमित्त तुम्ही तुमच्या घरातल्या खिडकीतून निसर्गाचे निरीक्षण करा. बाहेर पक्षी, झाडं काय दिसतंय ते पाहा, लिहा, वाचा.
- घर ही सगळ्यात सुरक्षित ठिकाण आहे. हे आपल्याला सध्याच्या परिस्थितीमुळे पटलं असेल. पण हेच घर जगातलं सर्वाधिक आनंददायी ठिकाण आहे हे मुलांना पटवून द्या. त्यासाठी त्यांच्यावर ओरडणं टाळा. सगळ्यांनीच त्यांच्याशी प्रेमाने वागा. संवाद साधा.
- गोड पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही दुधाचा वापर करु शकता. दुधापासून तुम्ही चक्का बनवा, त्यापासून श्रीखंड बनवा आणि या सगळ्या प्रक्रियेत मुलांना सहभागी करुन घ्या.
- आपल्याला सारखं नवीन वस्तू खरेदी करण्याची सवय लागली आहे. पण आता बाहेर जाता येत नसल्यानं घरातल्या निरुपयोगी वस्तू कशा उपयोगात आणता येतील ते पाहा. वस्तूंपासून विविध कलाकृती साकारता येतील, असे प्रयोग करून पाहा.
- जगभरात झाडांना नवीन मोहर आला की विविध सण साजरे केले जातात. त्याची माहिती इंटरनेटवरुन मिळवा."
'कोट्यवधीचं आर्थिक नुकसान'
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होते. झेंडूच्या फुलांची खरेदी करण्यासाठी ग्राहक प्रचंड गर्दी करतात. तर गुढीपाडव्याला शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी केलं जातं. पण यंदा बाजारात शुकशुकाट आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. त्यामुळे बाजारातील उलाढाल ठप्प आहे.
दादर फूल बाजार संघटनेचे अध्यक्ष मनोज पुंडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं," दादर फूल बाजार ३१ मार्चपर्यंत बंद आहे. दरवर्षी गुढीपाडव्या निमित्तानं ३० ते ४० टेम्पो भरुन फुलं येतात. पण यंदा शेतकऱ्यांना फुलं पाठवू नका असं कळवलं आहे. या बाजारात जवळपास ५०० छोटे व्यापारी फुलं विकण्याचा व्यवसाय करतात. पण आता संपूर्ण बाजार बंद असल्याने सर्वांचा व्यवसाय ठप्प झालाय."
सुप्रसिद्ध सोन्याचे व्यापारी आसावरी पेडणेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "गुढीपाडव्याची विक्री आमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असते. कारण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त गुढीपाडवा असल्याने या दिवशी खरेदीसाठी ग्राहकांची दुकानात मोठी गर्दी होते. पण दुकान सध्य़ा बंद आहे."
"मुहूर्ताचे चार दिवस वर्षभराच्या व्यवसायावर परिणाम करत असतात. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात ग्राहक नसल्याने कोट्यवधीचं नुकसान होत आहे. आता ही परिस्थिती आटोक्यात आल्यावर सरकारने व्यापाऱ्यांना काही दिलासा द्यायला हवा. ऑनलाइन बुकींग होत नाही कारण आपल्याकडे आजही प्रत्यक्ष सोनं खरेदीला महत्त्व दिलं जातं."
शोभायात्रा रद्द
गुढीपाडव्याला महाराष्ट्रात शोभायात्रा काढण्याची परंपरा आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील गिरगाव, विलेपार्ले, डोंबिवली,कल्याण तर पुण्यातही शोभायात्रेचे नियोजन केलं जातं. संपूर्ण शहरात सामाजिक जनजागृतीसाठी नागरिक पारंपरिक वेशभूषेत एकत्र येतात. ढोल पथक, लेझीम अशी पारंपरिक वाद्य वाजवली जातात. पण यंदा कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून राज्यातील सर्व शोभा यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत.
डोंबिवलीतील शोभायात्रेचे आयोजक राहुल दामले यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "डोंबिवलीमध्ये १९९९ पासून संपूर्ण शहरात शोभा यात्रेचे नियोजन केलं जातं. मोठ्या संख्येनं डोंबिवलीकर यात सहभागी होतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही शोभायात्रा रद्द केली आहे. तेव्हा नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहून घराबाहेर न पडता गुढीपाडवा साजरा करावा."