2022 : 'या' 5 गोष्टी नव्या वर्षात तुमचं आयुष्य बदलतील

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
2022 सालात आणखी कुठला कोरोना व्हेरियंट त्रास देईल की, लशीमुळे सगळे सुरक्षित असू? वर्क फ्रॉम होममध्ये काही बदल होईल का? मेटाव्हर्स, 5जी यामुळे आपलं जग किती बदलेल? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. त्याचीच उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न.
2022 हे वर्षं आधीच्या म्हणजे 2021च्या तुलनेत आपल्यासाठी चांगलं असेल, असं जगातल्या 75 टक्के लोकांना वाटतं. डेटारॅपर या अमेरिकन संस्थेनं तसं सर्वेक्षणच केलं होतं आणि यात कोव्हिडची परिस्थिती सुधारून आपल्या आयुष्यात, राहणीमानातही फरक पडेल अशी अपेक्षा लोकांनी व्यक्त केली.
थोडक्यात 2022 बद्दल आपण बरेच सकारात्मक आहोत. पण, त्याचबरोबर समोर काय वाढून ठेवलंय याची हूरहूरही तुमच्या मनात असेल.
तेव्हा नवीन वर्षात हे ही जाणून घेऊया की, कोव्हिड, तुमची कामाची पद्धत, तंत्रज्ञान, तुम्हाला मिळणारा पैसा आणि पर्यावरण या बाबतीत नवं वर्षं नेमकं कसं असेल.
कोव्हिड संपेल का?
2020 हे वर्षं कोव्हिड उद्रेकाचं होतं. 2021 हे कोरोना लशीचं. आणि आता 2022 हे कोरोनाला गुडबाय म्हणायचं वर्ष असेल का? ओमिक्रॉन व्हेरियंटचं सावट असलं तरी जगातल्या 80 टक्के लोकांचा लशीचा पहिला डोस मिळाला आहे. तसंच कोव्हिड झालेल्यांसाठी अँटीव्हायरल गोळ्याही उपलब्ध होत आहेत.
त्यामुळे कोरोनाविरोधात संरक्षण मिळवण्याच्या बाबतीत जग नक्कीच पुढे गेलेलं आहे. त्यामुळे 2022 या वर्षात कोरोना जाण्याची शक्यता नसली तर त्याचे गांभीर्य कमी होऊन आपल्याला त्याची सवय होईल, असं जाणकारांना वाटतं. महाराष्ट्र कोव्हिड कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला ओमिक्रॉनचा जोर वाढताना दिसतोय. आणि तो प्रभाव येणारे काही महिने राहणार आहे. तेव्हा कोरोना इतक्यात आपल्यातून जाणार नाही. पण, दुसरीकडे आता आपल्याला कोरोनाबद्दल निश्चित अशी माहिती आहे. उपचारपद्धती विकसित होतेय. लस आहे, अँटी व्हायरल गोळ्या आहेत. त्यामुळे कोरोनाचा सामना करायला आपण आता तयार आहोत.
नवीन लाटेचा किंवा पुढचा अंदाज व्यक्त करणं योग्य होणार नाही. पण, जसं लसीकरण वाढेल तसं आजाराची गंभीरता नक्कीच कमी होणारए. त्यामुळे आपल्याला कोरोनाला घाबरण्याची आता गरज नाही. आपल्याला फक्त नियम पाळायचे आहेत.
घरून की ऑफिसातून?
कोरोनाबरोबर जुळवून घेता घेता मागची दोन वर्षं अनेकांनी वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम केलं. मॅककिन्सी या जगप्रसिद्ध मनुष्यबळ विकास कंपनीने केलेल्या संशोधनानुसार, वर्क फ्रॉम होमचे फायदे आणि तोटे दोन्ही दिसले.
कंपनीची उत्पादकता वाढत असताना कर्मचाऱ्यांची वैयक्तिक काम करण्याची क्षमता कमी होत होती आणि याचं मुख्य कारण, कंपनीच्या निर्णय प्रक्रियेत तसंच उत्पादकतेत आपला नेमका सहभाग किती याचा अंदाज कित्येक कर्मचाऱ्याला येत नव्हता. पण कोरोनाचा वावर पाहता येत्या वर्षात कधी घरून तर कधी ऑफिसातून अशा हायब्रिड पद्धतीने काम करण्याची पद्धत रूढ होईल, असं तज्ज्ञांना वाटतं. मनुष्यबळ विकासतज्ज्ञ निलेश कुलकर्णी सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
"उत्पादन करणारी युनिट्स आपण घरी हलवू शकत नाही. आणि ही यंत्रणा सातही दिवस कारखान्यातूनच चालवावी लागेल. पण, इतर अनेक बाबतीत कोव्हिडच्या काळात आपण प्रगती केली. कस्टमर सेवाही हायब्रीड केली. घरून काम करताना वेळ कसा वाचवता येईल यावर काम केलं. भारतात याचं चांगलं मॉडेल आता तयार झालं आहे.
"सध्याच्या परिस्थितीत नवं मॉडेलच कार्यरत राहील असं दिसतंय. आता घरून काम करणाऱ्यांच्या उत्पादकतेचं मूल्यमापन करणारी यंत्रणा उभारायची गरज आहे. कारण, कर्मचाऱ्यांमध्येच असा गैरसमज आहे की, ऑफिसमध्ये न दिसल्यामुळे कंपनीला त्यांच्या कामाची गरज नाही. हा समज पुसून टाकायला हवा."
नवं तंत्रज्ञान आपल्याला कुठे घेऊन जाईल?
मूळात वर्क फ्रॉम होम शक्य झालं ते आधुनिक तंत्रज्ञानामुळे…झूम किंवा स्काईपवर घरच्या घरी मिटिंग करणं शक्य झालं. इंटरनेटच्या सोयीमुळे घरी केलेलं काम दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं शक्य झालं. अनेकांची कितीतरी कामं मोबाईल अॅपवर पूर्ण झाली. आता 2022मध्ये काय होईल?
सोशल मीडिया - कितीही टीका झाली तरी अगदी फेसबुकचेही सबस्क्रायबर्स या वर्षी वाढतच राहतील. म्हणजे सोशल मीडियाचा वापर सुरूच राहिल. आणि ही अँप बनवणाऱ्या कंपन्या लोकांचा खाजगीपणा आणि गोपनियता जपण्यासाठी विशेष प्रयत्न करतील.
मेटाव्हर्स - मेटाव्हर्स सारखं तंत्रज्ञान जिथं इंटरनेटच्या मदतीने आपण आभासी पद्धतीने पण, अगदी याची देही याची डोळा एखाद्या गोष्टीचा अनुभव आपण घेऊ शकू.
आपला टीव्ही, गेमिंग आणि इतर कुठलाही ऑनलाईन अनुभव या तंत्रज्ञानामुळे 2डी मधून 3डीमध्ये बदलून जाईल. मेटाव्हर्स म्हणजे काय हे सोपी गोष्ट क्रमांक 452 मध्ये आपण पाहिलंय. आता ते आणि त्यासारखं आणखी एखादं तंत्रज्ञान प्रत्यक्षात यायची वेळ आलीय.

5जी मोबाईल - मेटाव्हर्स शक्य होईल ते फाईव्ह जी टेलिफोनीमुळे. 5जी बरोबरच वायफाय 6 मुळेही इंटरनेटचा वेग प्रचंड वाढेल. आणि त्यातून वर्क-फ्रॉम-होम जास्त सोपं होईल. जगही इंटरनेटच्या माध्यमातून नव्या पद्धतीने जोडलं जाईल.
स्पेस टुरिझम - 2022मध्ये अंतराळवीरांसारखंच तुम्हालाही मजा म्हणून अंतराळात जाता आलं तर? स्पेसएक्स, व्हर्जिन गॅलेक्टिक आणि ब्ल्यू ओरिजिन या कंपन्यामध्ये तर अंतराळ सफरीची सेवा देण्यासाठी चढाओढ सुरू झालीय.
आता लवकरच सर्वसामान्यांनाही अंतराळ सफरीवर जाता येणार आहे. पण, अर्थात, सुरुवातीला त्यासाठी खूप पैसे मोजायची तुमची तयारी हवी.
पैसे कैसे देणार?
भारतात क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक आणि ट्रेडिंग करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या त्यावर सरकारी संस्थेचं नियंत्रण नाही. त्यामुळे मोबाईल appवरून बनावट क्रिप्टो एक्सचेंज उघडण्याचा आणि ग्राहकांना फसवण्याचा धोका राहतो.
तसंच मोठ्या चढ-उतारांमुळे ग्राहकांचं नुकसान होण्याची भीतीही असते. पण, क्रिप्टोकरन्सीचा जगभरात वाढत असलेला वापर पाहता आपल्याला त्यापासून दूरही राहता येणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images
अशावेळी केंद्र सरकारचं पहिलं काम असेल ते क्रिप्टोकरन्सीच्या वापरासाठी काही ठोस नियमावली आणण्याचं आणि त्यादृष्टीने क्रिप्टो करन्सी विधेयक संसदेत आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असेल.
क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीला सरकारची हरकत नसेल. पण, तिचा चलन म्हणून वापर सरकार इतक्यात मान्य करेल अशी शक्यता नाही.
पुन्हा वादळं, पुन्हा पूर?
गेल्या वर्षी महाराष्ट्रात पूर, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट, दरडी कोसळणं असं बरंच काही घडलं. जागतिक तापमान वाढीचे परिणाम अख्खं जगच भोगतंय.
तापमानवाढ रोखण्यासाठी कॉप परिषदेसारखे प्रयत्नही जागतिक स्तरावर सुरू आहेत. पण त्यांना म्हणावं तसं यश नाही मिळालं.
2022 हे वर्षं पर्यावरण दृष्ट्या नेमकं कसं असणार आहे, जाणून घेऊया भारतीय हवामान विभागाचे मुख्य संशोधक कृष्णानंद होसाळीकर यांच्याकडून.

फोटो स्रोत, Shrikant Bangale/BBC
ते सांगतात, "जागतिक तापमान वाढीचा परिणाम आपल्यालाच नाही. तर जगालाही भोगावा लागतो आहे. त्यासाठी आपली साधनं सक्षम करणं, हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणारी यंत्रणा उभारणं, लोकांना तातडीने मदत पोहोचवणं असे बदल आपल्याला करावे लागतील. सध्या साधारण आठ दिवस आधी आपण हवामानाचा अंदाज वर्तवू शकतो."
थोडक्यात काय तर आपल्याला काही त्रासदायक गोष्टींसाठीही तयार रहावं लागू शकेल. पण एकंदर आपण पाहिलं तर या वर्षात अनेक चांगल्या गोष्टीही होणार आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








