IndvsSA-अलाहुद्दीन पालेकर: मराठी मातीशी नातं असलेले आंतरराष्ट्रीय अंपायर

फोटो स्रोत, Cricket South Africa
- Author, पराग फाटक, मुश्ताक खान
- Role, बीबीसी मराठी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग टेस्ट आजपासून सुरू होत आहे. भारतीय संघाच्या बरोबरीने भारतातल्या विशेषत: राज्यातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडजवळच्या शिव गावासाठी एक अनोखी घटना असणार आहे.
जोहान्सबर्ग टेस्टमध्ये अल्लाहुद्दीन पालेकर ग्राऊंड अंपायर म्हणून पदार्पण करणार आहेत. अल्लाहुद्दीन यांचे आजोबा रत्नागिरी जिल्ह्यातील खेडजवळच्या शीव गावचे. अनेक वर्षांपूर्वी ते दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले.
अल्लाहुद्दीन यांचे वडीलही दक्षिण आफ्रिकेत अंपायर म्हणून काम करतात आणि आता त्यांचे चिरंजीवही आंतरराष्ट्रीय टेस्ट मॅचमध्ये अंपायरिंग करताना दिसणार आहेत. यानिमित्ताने कोकणातल्या एका कुटुंबातील माणूस भारतीय संघ खेळत असलेल्या टेस्ट मॅचमध्ये अंपायरिंग करताना दिसणार आहे.
44वर्षीय पालेकर गेली 15 वर्ष अंपायरिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. याआधी त्यांनी वनडे आणि ट्वेन्टी20 प्रकारात अंपायरिंग केलं आहे. फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलेले पालेकर, दक्षिण आफ्रिकेचे ज्येष्ठ अंपायर मारइस इरॅसमस यांच्या बरोबरीने मैदानात उतरतील.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने एक पत्रक काढले आहे त्या पत्रकात पालेकर म्हणतात, "माझ्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. जेव्हा कोणीही अंपायरिंगला सुरुवात करतं तेव्हा त्याचं स्वप्न टेस्ट मॅचमध्ये अंपायरिंग करणं हे असतं. मी 15 वर्षांपूर्वी अंपायरिंगला सुरुवात केली. या कामात अथक मेहनत आहे. खूप सारा संयम बाळगावा लागतो.
"कुटुंबीयांकडून पाठिंबा तितकाच महत्त्वाचा असतो. माझ्या सुदैवाने मला कुटुंबीयांची नेहमीच साथ लाभली आहे. गेल्या अनेक वर्षात मी कोणत्याही कौटुंबिक समारंभांना उपस्थित राहू शकलेलो नाही. माझी पत्नी शकिराचं योगदानही महत्त्वाचं आहे. ती माझ्यासाठी आधारस्तंभ आहे. कोरोना काळात काम करणं सगळ्यांसाठीच कठीण आहे. त्यामुळे या काळात टेस्ट मॅचमध्ये अंपायरिंग करायला मिळणं हा सन्मान आहे," असं पालेकर यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
क्रिकेट साऊथ आफ्रिकेने दिलेल्या माहितीनुसार, अलाहुद्दीन यांचे वडील जमालोद्दीन हेही अंपायरिंग क्षेत्रातच आहेत. केपटाऊनमधल्या वेनबर्ग हायस्कूलमध्ये ते कार्यरत आहेत.
सत्तरीत असलेले जमालोद्दीन यांनी 90च्या दशकात दक्षिण आफ्रिकेतील महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये अंपायरिंग केलं आहे. जमालोद्दीन यांचे बंधू म्हणजे अलाहुद्दीन यांचे काका हेही अंपायर आहेत. अलाहुद्दीन यांची भावंडंही याच क्षेत्रात आहेत.

"माझे वडील माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांना फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अंपायरिंग करायचं होतं. पण काही कारणांमुळे ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. त्यांच्याकडून मिळालेला अंपायरिंगचा वारसा मी पुढे चालवत आहे," असं पालेकर यांनी सांगितलं.
"अंपायरिंगमध्ये पाकिस्तानचे अलीम दार यांचं मार्गदर्शन मोलाचं आहे. 2012 मध्ये न्यूझीलंडमध्ये दार यांच्या बरोबर आठवडाभर होतो. त्या काळात अंपायरिंग संदर्भात अनेक बारकावे शिकता आले. दक्षिण आफ्रिकेचे मारइस इरॅसमस यांचं मार्गदर्शन नेहमीच मिळतं. गेली अनेक वर्ष आयसीसीच्या एलिट पॅनेल अंपायर म्हणून ते कार्यरत आहेत", असं पालेकर यांनी सांगितलं.
अंपायरिंगला सुरुवात करण्यापूर्वी अलाहुद्दीन फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायचे. वेस्टर्न प्रोव्हिन्स आणि टायटन्स संघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. या संघांकडून फॅफ डू प्लेसिस, एबी डीव्हिलियर्स, डेल स्टेन असे खेळाडू खेळले आहेत.
'अलाहुद्दीन यांचा अभिमान'
अलाहुद्दीन पालेकर यांच्या यशाबद्दल प्रचंड आनंद होत आहे. त्यानं अतिशय कष्टाने हे यश मिळवलं आहे. आम्हा पालेकर कुटुंबीयांना त्याचा अभिमान आहे. खरं तर आमचं संपूर्ण घराणंच क्रिकेटशी संबंधित आहे. मी सुद्धा युएईच्या राष्ट्रीय संघामध्ये खेळलो आहे. आमची पुढची पिढी सुद्धा क्रिकेटमध्ये करिअर घडवू पाहत आहे असं अलाहुद्दीन पालेकर यांचे चुलत बंधु बख्तियार पालेकर यांनी सांगितलं.

"आम्ही जरी भारतात राहत नसलो तरी आमची नाळ भारताशी आजही जोडली गेली आहे. लग्न सोहळा असो किंवा एखादा घरगुती सोहळा आम्ही सगळे वर्ष दोन वर्षात आमच्या रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील शिव या गावी एकत्र जमतो", असं बख्तियार म्हणाले.
वानखेडेवर नाकारला होता प्रवेश
काही वर्षांपूर्वी कौटुंबिक कारणांसाठी भारतात आलेल्या पालेकर यांना वानखेडे मैदानावर प्रवेश नाकारण्यात आला होता. पण योगायोग म्हणजे याच वानखेडे मैदानावर पालेकर यांना अंपायरिंग करण्याची संधी मिळाली होती.
बीसीसीआयच्या अंपायर्स एक्स्चेंज प्रोग्रॅम अंतर्गत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे अंपायर भारतातल्या रणजी करंडक स्पर्धेत अंपायरिंग करतात. याच योजनेअंतर्गत पालेकर यांनी भारतात अंपायरिंग केलं.

फोटो स्रोत, Hindustan Times
2015 मध्ये वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यातील सामन्यासाठी पालेकर अंपायर होते. क्रिकेटचं माहेरघर असणाऱ्या मुंबईत अंपायरिंग करायला मिळणं खास आहे असं पालेकर म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी चेन्नईत तामिळनाडू आणि मध्य प्रदेश यांच्यातील सामन्यासाठी अंपायरिंग केलं होतं.
रोहित शर्माला दिलं होतं आऊट
2018 मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना पालेकर यांनी ट्वेन्टी-20 सामन्यात ग्राऊंड अंपायर म्हणून पदार्पण केलं.
त्या मॅचमध्ये ज्युनियर डालाच्या बॉलिंगवर रोहित शर्माविरुद्ध अपील झालं. पालेकर यांनी रोहित बाद असल्याचा कौल दिला होता.
कोरोना संकटाने मिळवून दिली टेस्ट अंपायरिंगची संधी
आयसीसी म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार, टेस्ट मॅचसाठी तटस्थ देशांच्या पंचांची नियुक्ती केली जाते. जेणेकरून निःपक्षपातीपणे निर्णय देता यावेत. त्याच देशाचे अंपायर्स असतील तर यजमान संघाला विनाकारण फायदा मिळायला नको या दृष्टिकोनातून आयसीसीने हा निर्णय घेतला आहे.

फोटो स्रोत, Cricket South Africa
टेस्ट मॅचेससाठी एलिट पॅनेल अंपायर्समध्ये असणाऱ्या अंपायरची नियुक्ती केली जाते. उदाहरणार्थ भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये मालिका असेल तर हे दोन देश सोडून अन्य देशांच्या अंपायरची नियुक्ती केली जाते.
पण कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध आले. कोरोनाचा शिरकाव टाळण्यासाठी बायोबबलची निर्मिती केली जाते.
सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ बायोबबलमध्ये असतात. अंपायर आणि मॅचरेफरी दुसऱ्या देशांमधून येतात. वेगवेगळ्या देशात कोरोनाची परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार नियम, निर्बंध वेगवेगळे असतात. हे सगळं लक्षात घेऊन आयसीसीने नियम शिथिल करत यजमान देशाचे अंपायर्स आणि मॅचरेफरी यांची नियुक्ती करायला सुरुवात केली.
म्हणूनच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत, सेंच्युरियन इथे झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये, दक्षिण आफ्रिकेचे मारइस इरॅसमस आणि अॅड्रियन होल्डस्टॉक मैदानावरील अंपायर्स होते तर पालेकर थर्ड अंपायर होते. जोहान्सबर्ग इथे आजपासून सुरू होणाऱ्या मॅचसाठी पालेकर, इरॅसमस यांच्याबरोबरीने मैदानावरील अंपायर म्हणून काम पाहतील.
पालेकर यांनी आतापर्यंत 3 वनडे आणि 29 ट्वेन्टी20 सामन्यात अंपायरिंग केलं आहे. देशांतर्गत स्पर्धांमध्ये अंपायर म्हणून काम केल्यानंतर आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायरिंगची संधी मिळू शकते.
मात्र यासाठी परीक्षा, मुलाखत, कामगिरी या प्रक्रियेतून जावं लागतं. सुरुवातीला फोर्थ अंपायर म्हणून काम करावं लागतं. त्यानंतर थर्ड अंपायर म्हणून संधी मिळते. त्यानंतर वनडे आणि ट्वेन्टी20 साठी मैदानावरील अंपायर म्हणून निवड होऊ शकते. प्रत्येक देशाचे ठराविक अंपायर्स आयसीसीतर्फे निवडले जातात. या अंपायर्समधून एलिट पॅनेलची निवड केली जाते.
सँडपेपर वादावेळी केलं होतं अंपायरिंग
2018 मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता. केपटाऊन इथे झालेल्या तिसऱ्या टेस्टदरम्यान ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेरुन बॅनक्रॉफ्ट चेंडूला पिवळ्या रंगाच्या वस्तूने घासत असल्याचं दिसलं.
चेंडू रिव्हर्स स्विंग करण्यासाठी तो हे करत असल्याचं स्पष्ट झालं. बॅनक्रॉफ्ट एकट्याने करत असला तरी हे कुभांड ऑस्ट्रेलिया संघानेच रचलं असल्याचं स्पष्ट झालं. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने तशी कबुली दिली.
आयसीसीने नियमानुसार स्मिथला एका सामन्यासाठी निलंबित केले आणि सामन्याचे संपूर्ण मानधन दंड म्हणून ठोठावले. बँक्रॉफ्टच्या मानधनाची 75 टक्के रक्कम दंड करण्यात आली, तसेच त्याच्या खात्यावर गैरवर्तनाचे दोन गुण जमा करण्यात आले.

फोटो स्रोत, Gallo Images
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चौकशीला प्रारंभ केला. याचप्रमाणे स्टीव्ह स्मिथला कर्णधार पदावरून आणि डेव्हिड वॉर्नरला उपकर्णधार पदावरून पायउतार केले. स्मिथ, वॉर्नर आणि बँक्रॉफ्ट यांची ऑस्ट्रेलियाच्या संघातून हकालपट्टी करून त्यांची रवानगी मायदेशी करण्यात आली.
मायदेशी ऑस्ट्रेलियात या प्रकरणाने खळबळ उडाली. चीटर म्हणून ऑस्ट्रेलियाच्या संघाला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी ही घटना म्हणजे नामुष्की असल्याचं म्हटलं.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रकरणाचं गांभीर्य ओळखून स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर वर्षभराची तर बॅनक्रॉफ्टवर 9 महिन्यांची बंदी घालण्यात आली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदांमध्ये वॉर्नर आणि स्मिथ यांना अश्रू आवरले नाहीत.
त्या वादग्रस्त केपटाऊन टेस्टमध्ये पालेकर फोर्थ अंपायर म्हणून कार्यरत होते. मैदानावरील अंपायर्सना एनर्जी ड्रिंक देणं, साईटस्क्रीनची व्यवस्था पाहणं, रोलर आणि पाऊस आल्यास व्यवस्थेची पाहणी करणं याबरोबरीने मैदानावर काय घडतंय याकडे बारकाईने नजर ठेवणं हेही फोर्थ अंपायरचं काम असतं.
स्थलांतराचे प्रवासी
दक्षिण आफ्रिका संघाकडून भारतीय वंशाचे खेळाडू खेळले आहेत. माजी फलंदाज हशीम अमला, फिरकीपटू केशव महाराज आणि सेनुरान मुथुसामी यांनी दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे.
दक्षिण आफ्रिकेत फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खेळणार जोनाथन व्हँडिअर आणि प्रीनलेन सुब्रायन हेही भारतीय वंशाचे आहेत. पालेकर यांच्या निमित्ताने भारतीय वंशाचे अंपायर झळकणार आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








