के. एल. राहुल : निलंबन, नोटीस, चौकशी, टीम इंडियाचा कर्णधार ते सुनील शेट्टीचा जावई

- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
के. एल. राहुल आणि आथिया शेट्टी हे दोघे विवाहबंधनात अडकले आहेत. के. एल. राहुलची कारकीर्द अनेक चढ-उतारांनी भरलेली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी भारताचं नेतृत्व देखील केलं आहे. त्याच्या रोलरकोस्टररुपी कारकीर्दीचा घेतलेला आढावा.
कॉफी शो पडला महागात
असं म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण प्रसंग येतात, हातून चुका घडतात. त्या प्रसंगाला तोंड देत, परिस्थितीवर मात करत जो यशस्वी पुनरागमन करतो ते खऱ्या अर्थाने जिगरबाज म्हटला जातो. 2019 मध्ये लोकप्रिय 'कॉफी विथ करण' या चॅट शो दरम्यान आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर बीसीसीआयने निलंबनाची कारवाई केली होती.

कारवाईची घोषणा झाली तेव्हा दोघेही ऑस्ट्रेलियात होते. दोघांनाही तातडीने मायदेशी परत पाठवण्यात आलं. दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. आक्षेपार्ह उद्गार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली.
त्या कार्यक्रमादरम्यान सूत्रसंचालक करण जोहर यांनी हार्दिक आणि राहुलला वैयक्तिक आयुष्यासंदर्भात काही प्रश्न विचारले. राहुलने तोलूनमापून उत्तरं दिली. मात्र हार्दिकने जी उत्तरं दिली त्यामुळे वादाला तोंड फुटलं. हार्दिककडून महिलांसंदर्भात आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी झाली. राहुल आणि हार्दिक कार्यक्रमाला एकत्रित उपस्थित असल्यामुळे दोघांवरही कारवाई करण्यात आली.
कारकीर्द बहरू लागत असतानाच निलंबन, नोटीस, चौकशी आणि प्रचंड प्रमाणात ट्रोलिंग यांचा सामना राहुल आणि हार्दिक यांनी केला. माजी खेळाडूंनी दोघांवर जोरदार टीका केली. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही असं वर्तन, बोलणं योग्य नाही असं स्पष्ट केलं. महिला संघटनांनी हार्दिकच्या उद्गारांवर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली.
हार्दिक आणि राहुल दोघेही अतिशय जिवलग मित्र. म्हणूनच या दोघांना एकत्रित कॉफी विथ करण या कार्यक्रमात बोलावण्यात आलं होतं. हार्दिक बोलला त्याने वाद निर्माण झाला. कार्यक्रमादरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान राहुल म्हणाला की, वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी20 सामन्यात मी शतक झळकावलं पण त्या मॅचच्या आदल्या रात्री मी पार्टीत होतो. पण त्याचा खेळावर परिणाम होऊ न देता शतक केलं. मात्र पुढच्याच वाक्यात हे योग्य वर्तन नसल्याचं राहुलने स्पष्ट केलं होतं.
राहुलने संयत भाषेत प्रश्नांची उत्तरं दिली होती. पण ओल्याबरोबर सुकंही जळतं याचा प्रत्यय राहुलला आला. हार्दिकच्या बोलण्यापायी राहुललाही कारवाईला सामोरं जावं लागलं.

फोटो स्रोत, Surjeet Yadav
बंदीच्या कारवाईमुळे दोघेही पाच वनडे सामन्यांना मुकले. दोघांनीही सदरहू घटनेबद्दल माफी मागितली. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीने बंदीची कारवाई रहित केली. बीसीसीआय ओमबड्समनने दोघांना प्रत्येकी 20 लाख रुपये दंड ठोठावला. दंडाच्या रकमेपैकी काही भाग युद्धात जीव गमावलेल्या सैनिकांच्या पत्नींना देण्यात आला तर काही भाग अंध क्रिकेट संघटनेला देण्यात आला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून घरी पाठवल्याने झालेली नामुष्की, जोरदार टीका यामुळे दोघांच्या कारकीर्दीचं काय होणार असं प्रश्नचिन्ह होतं. राहुलने या प्रसंगातून बोध घेत सगळं लक्ष खेळावर केंद्रित केलं.

भारतीय संघात सलामीवीर, मधल्या फळीत जिथे संधी मिळेल तिथे फलंदाजी केली. संघाला संतुलन मिळवून देण्याकरता वनडे आणि ट्वेन्टी20 प्रकारात विकेटकीपिंगची जबाबदारीही सांभाळली. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून स्थान निर्माण केलं. आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा मुख्य फलंदाज म्हणून त्याने धावांची टांकसाळ उघडली. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचं राहुलने नेतृत्वही केलं.
अथक मेहनत, फलंदाजीत चुका कमी करून राखलेलं सातत्य, जबरदस्त फिटनेस, संघासाठी पडेल ते काम करण्याची तयारी या सगळ्याची परिणती म्हणजे कॉफी विथ करण प्रसंगानंतर दोन वर्षात राहुल भारताच्या टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी20 संघाचा अविभाज्य भाग आहे.
वनडे कर्णधार रोहित शर्मा दुखापतीतून न सावरल्याने राहुलकडे आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. रोहित टेस्ट सीरिजमध्ये खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर राहुलकडे टेस्ट संघाचं उपकर्णधारपद सोपवण्यात आलं.
राहुल नावामागची गंमत
लोकेश आणि राजेश्वरी या प्राध्यापक दांपत्याचा राहुल हा सुपत्र. मंगलोरहून कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या राहुलने अठराव्या वर्षी बेंगळुरू गाठलं. घरातून शैक्षणिक बाळकडू मिळालेल्या राहुलला सुरुवातीपासूनच क्रिकेटच खेळायचं होतं.
2010 मध्ये राहुल भारताच्या U19 संघाचा भाग होता. त्याच वर्षी त्याने कर्नाटकसाठी खेळायला सुरुवात केली. 2013-14 हंगामात कर्नाटकने रणजी करंडक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. राहुलने त्या हंगामात 3 शतकांसह 1033 धावा करत कर्नाटकच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
राहुलने त्याच्या नावातली गंमत 'व्हॉट द डक' कार्यक्रमात उलगडली होती. राहुलच्या आईला शाहरुख खानच्या चित्रपटांची आवड होती. म्हणून त्यांना मुलाचं नाव राहुल ठेवायचं होतं. राहुलचे बाबा सुनील गावस्कर आणि गुंडप्पा विश्वनाथ यांचे चाहते.
सुनील गावस्कर यांच्या मुलाचं नाव रोहन असल्याचं त्यांनी रेडिओ कॉमेंट्रीदरम्यान ऐकलं होतं. त्यांचा ऐकण्यात गोंधळ झाला आणि त्यांना रोहनऐवजी राहुल वाटलं. यातूनच दोघांनी बाळाचं नाव राहुल ठेवलं, असं राहुलने स्वत:च सांगितलं.
ऑल फॉरमॅट स्पेशालिस्ट
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं कॅलेंडर अतिशय व्यग्र स्वरुपाचं असतं. टेस्ट, वनडे, ट्वेन्टी अशा तिन्ही प्रकारांबरोबरच बहुतांश खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळतात. काही खेळाडू ठराविक फॉरमॅटच खेळतात. त्यांचा खेळ एका विशिष्ट प्रकारासाठी साजेसा असतो. राहुलचं सुरुवातीपासूनचं वैशिष्ट्य की तो ऑल फॉरमॅट स्पेशालिस्ट खेळाडू आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये संयमाची परीक्षा असते.
ऑफस्टंपबाहेरचे चेंडू सोडून देणं, नवीन बॉलचा सामना करणं, वेगवान गोलंदाज ताजेतवाने असताना त्यांना सामोरं जाणं हे आव्हान असतं. वनडेतही सुरुवातीला बॅटिंग मिळाली किंवा धावांचा पाठलाग करायचा असेल तर मॅरेथॉन खेळी करावी लागते. भागीदाऱ्या रचाव्या लागतात. ट्वेन्टी20 प्रकार अतिशय वेगवान आहे.

फोटो स्रोत, Francois Nel
एखादं षटक सामना फिरवू शकतं. अनेकदा खेळपट्टीवर आल्या आल्या फटक्यांची पोतडी उघडावी लागते. त्यासाठी भात्यात सगळ्या प्रकारचे फटके असावे लागतात. राहुलची फटक्यांची पोतडी भरगच्च आहे.
पूल, हुक, कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअरकट, लेटकट, स्वीप, कट, ऑनड्राईव्ह अशा विविधांगी फटक्यांची तो मुक्त उधळण करतो. राहुल, ख्रिस गेल किंवा आंद्रे रसेलसारखा ताकदवान भासत नाही. गेल-रसेलची फटकेबाजी हिंसक स्वरुपाची असते.
राहुलही चौकार-षटकारांची लयलूट करतो पण त्याच्या फलंदाजीत नजाकत आहे. त्याचा खेळ देखणा आहे. मनगटाचा अतिशय सुरेख उपयोग त्याच्या खेळात दिसतो. चौकार-षटकार वसूल होत नसतील तर धावा पळून काढण्याची त्याची तयारी असते. फॉरमॅट बदललं की राहुलच्या खेळात आवश्यक बदल दिसतात.

फोटो स्रोत, Ryan Pierse
तिन्ही प्रकारात लीलया मुशाफिरी करणारा सर्वसमावेशक फलंदाज असं त्याचं वर्णन केलं जातं. टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी20 अशा तिन्ही प्रकारात भारतासाठी शतक झळकावण्याचा विक्रम राहुलच्या नावावर आहे.
अतिशय उच्च दर्जाचा फिटनेस असल्यामुळे राहुल बॅटिंगच्या बरोबरीने विकेटकीपिंगही करतो. महत्त्वाचं म्हणजे राहुल कामचलाऊ स्वरुपाचं विकेटकीपिंग करत नाही, तो या जबाबदारीला पूर्ण न्याय देतो.
विदेशात शतकांची चळत
घरच्या मैदानावर शेर असणाऱ्या अनेक फलंदाजांची विदेशातल्या खेळपट्यांवर भंबेरी उडते. चेंडूला प्रचंड उसळी मिळणाऱ्या खेळपट्ट्या, दर्जेदार गोलंदाजांची फौज, बोचरे वारे किंवा चेंडू स्विंग होण्यासाठी अनुकूल असं ढगाळ वातावरण अशी खडतर आव्हानं असतात. सलामीवीर फलंदाजांना तर नव्या चेंडूचा सामना करायचा असतो.

फोटो स्रोत, Gareth Copley
राहुलच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये सात शतकं आहेत. यापैकी 6 विदेशात आहेत. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका अशा पाच विविध देशांमध्ये राहुलने सलामीवीर म्हणून खेळताना केलेली शतकं त्याच्या खणखणीत तंत्रकौशल्याचं, संयमाचं आणि फिटनेसचं द्योतक आहे.
वनडेत पदार्पणातच शतक
नव्या वर्षात राहुल भारतीय वनडे संघाचा कर्णधार असणार आहे. 5 वर्षांपूर्वी राहुलने झिम्बाब्वेत पदार्पण केलं. पदार्पणाच्या सामन्यातच राहुलने शतक झळकावण्याची किमया केली. वनडेत असा विक्रम करणारा तो तर पहिला भारतीय ठरला.
दोन वर्षांआधी 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबर्न दौऱ्यात राहुलने भारतीय टेस्ट संघात पदार्पण केलं. पहिल्या सामन्यात दडपणाखाली खेळताना राहुलच्या हातून समाधानकारक कामगिरी झाली नाही. संघव्यवस्थापनाने राहुलवर विश्वास ठेवला. पुढच्याच म्हणजेच सिडनी कसोटीत राहुलने शतक झळकावत संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला.
आयपीएलमधलं चलनी नाणं
बेंगळुरू-हैदराबाद-बेंगळुरू आणि पंजाब अशा तीन संघांतर्फे खेळण्याचा अनुभव राहुलच्या गाठीशी आहे. सातत्याने मोठ्या खेळी करत संघाला जिंकून देणारा खेळाडू अशी राहुलची ओळख आहे.
2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने 10 लाख ही बेस प्राईज खर्चून राहुलला संघात समाविष्ट केलं.
पुढच्याच वर्षी सनरायझर्स हैदराबाद संघाने 1 कोटी रुपये खर्चून राहुलला संघात घेतलं. राहुल हैदराबादसाठी दोन हंगाम खेळला.
ट्रान्सफर विंडोच्या माध्यमातून राहुलला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने हैदराबादकडून 1 कोटी किमतीलाच विकत घेतलं. राहुल बेंगळुरूसाठी दोन वर्ष खेळला.

फोटो स्रोत, Punjab Kings
2018 मध्ये झालेल्या लिलावात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने तब्बल 11 कोटी रुपये खर्चून राहुलला संघात घेतलं.
अफलातून सातत्यासह खेळणारा फलंदाज अशी ओळख असलेला राहुल किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचं नेतृत्वही करतो. त्याचवेळी विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळतो. सलामीवीर, कर्णधार आणि यष्टीरक्षक अशा तिहेरी भूमिका साकारत असल्यामुळे राहुल आयपीएलमधलं चलनी नाणं आहे. 2021 हंगामात राहुलने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅपही पटकावली होती.
चार हंगाम खेळल्यानंतर पंजाबने राहुलला रिलीज केलं. 2022 आयपीएलपूर्वी मोठा लिलाव होणार आहे. राहुल लखनौ संघाचं नेतृत्व करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोठ्या लिलावात राहुलसाठी तब्बल 20 कोटींची बोली लागण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातली ही सर्वाधिक रकमेची बोली ठरू शकते. भारतीय संघाचं कर्णधारपदही भूषवलेलं असल्यामुळे राहुलच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळू शकते.
सुनील शेट्टीचा जावईराहुल आणि अभिनेता सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी लग्नाआधी बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते.यंदाच अथियाच्या वाढदिवसाला राहुलने पोस्ट लिहिली होती. राहुलने अथियाचा उल्लेख माय लव्ह असा केला होता.

फोटो स्रोत, Hindustan Times
विदेश दौऱ्यात अथिया राहुलच्या बरोबर असते. सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षही दोघे सातत्याने एकमेकांबरोबर दिसतात. एका वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार राहुलने एका विदेश दौऱ्यापूर्वी बोर्डाला लिहिलेल्या मेलमध्ये अथियाचा उल्लेख पार्टनर असा केला होता. अथियाने 2015 मध्ये चित्रपटात पदार्पण केलं होतं.
8 टॅटूंचा मानकरी आणि फिटनेसप्रेमी
शरीराच्या विविध भागांवर रेखाटलेले 8 टॅटू, पिळदार आणि काटक शरीरयष्टी, प्रत्येक हंगामागणिक आकर्षक केशरचना या सगळ्यामुळे राहुल स्टाईल आयकॉन म्हणून प्रसिद्ध आहे.

फोटो स्रोत, Pankaj Nangia
केवळ भारतीय संघातल्या नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या अतिशय फिट खेळाडूंमध्ये राहुलची गणना होते. व्यायाम राहुलच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.
फुटबॉलपटू डेव्हिड बेकहमचा कट्टर चाहता असलेल्या राहुलकडे सिंबा नावाचा कुत्रा आहे. सोशल मीडियावर या सिंबाची नेहमी चर्चा असते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








