IndiavsPakistan: पाकिस्तानला विरोध म्हणून जेव्हा शिवसैनिकांनी फिरोझशहा कोटला खणलं...

शिवसेना, भारत, पाकिस्तान, दिल्ली, अनिल कुंबळे

फोटो स्रोत, RAVI RAVEENDRAN

फोटो कॅप्शन, फिरोझशाह कोटलाचे कर्मचारी खेळपट्टीची पाहणी करताना
    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी

पाकिस्तानच्या संघासाठी भारताचा दौरा खास असतो. 1999 मध्ये पाकिस्तानचा संघ तिरंगी एकदिवसीय स्पर्धा आणि दोन कसोटी मालिकेसाठी भारतात येणार होता. मात्र शिवसेनेने पाकिस्तानच्या या दौऱ्याला कडाडून विरोध केला होता.

पाकिस्तानचा संघ दिल्ली येथे पहिली तर दुसरी कसोटी चेन्नई येथे खेळणार होता. मात्र 7 जानेवारीच्या रात्री शिवसेना समर्थकांनी राजधानी दिल्लीतील फिरोझशहा कोटला मैदानाची खेळपट्टी खणली. 28 जानेवारीला दिल्ली कसोटीला सुरुवात होणार होती.

काय घडलं कोटलावर?

'इंडियन एक्स्प्रेस'ने त्यादिवशी नेमकं काय घडलं याचं वृतांकन केलं होतं. त्या रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की, "रात्री अकरा वाजता शिवसैनिक फिरोझशाह कोटलाच्या आतमध्ये गेले. लोखंडी रॉडच्या साह्याने त्यांनी खेळपट्टी खणली. त्यानंतर त्यांनी माध्यमप्रतिनिधी आणि छायाचित्रकारांना घटनास्थळी बोलावलं. त्यांनी फोटो काढून घेतले, पाकिस्तान दौऱ्याच्या निषेधाची पत्रकं वाटली. अर्ध्या तासात शिवसेनेचा ध्वजही मैदानात रोवण्यात आला."

"थोड्या वेळात जवळच्या इंद्रप्रस्थ इस्टेट स्टेशनमधून पोलिसांचा ताफा कोटलामध्ये पोहोचला. आम्ही मैदानात पोहोचलो तेव्हा सुरक्षेसाठी केवळ दोनच सुरक्षारक्षक असल्याचं शिवसैनिकांनी सांगितलं. अशाप्रकारे खेळपट्टी खणण्याचा प्रकार होईल याची आम्ही कल्पना नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं होतं."

"खेळपट्टी खणल्याप्रकरणी चार शिवसैनिकांना अटक करण्यात आली. शिवसेनेने दिलेल्या इशाऱ्यासंदर्भात त्याच दिवशी संध्याकाळी दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आणि विशेष सचिव यांची बैठक झाली होती. मात्र शिवसैनिक इतकं टोकाचं पाऊल उचलतील याची कल्पना नव्हती असं संघटनेने सांगितलं."

"खेळपट्टीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. खेळपट्टी पूर्ववत करण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागेल मात्र सामना नियोजित दिवशी होईल असं संघटनेनं म्हटलं होतं."

दुसऱ्या दिवशी 8 जानेवारीला दिल्ली पोलिसांनी खेळपट्टी खणणाऱ्या चार शिवसेना समर्थकांना अटक केली.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाकिस्तानच्या भारत दौऱ्यासंदर्भात इशारा दिला होता. छातीत दुखू लागल्याने तसंच थकव्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना मुंबईत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याचवेळी दिल्लीत शिवसेना समर्थकांनी कोटलाची खेळपट्टी खणली.

कसोटीचं आयोजन अशाप्रकारे रोखलं जाऊ शकत नाही. कसोटी ठरल्याप्रमाणेच होईल असं दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे रामबाबू गुप्ता यांनी म्हटलं होतं.

शिवसेना

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तान, भारतविरोधी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तान क्रिकेट संघाला भारतात खेळू देणार नाही असं बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं. यामुळे मुंबईत कसोटी आयोजनाचा प्रस्ताव बारगळला. दिल्ली आणि चेन्नईला आयोजनाचा मान मिळाला.

दिल्लीत खेळपट्टी खणल्याने बीसीसीआयने कसोटी केंद्रांची अदलाबदली करण्याचा निर्णय घेतला. पहिली कसोटी दिल्लीऐवजी चेन्नईत खेळवण्यात आली. सचिन तेंडुलकरच्या दिमाखदार शतकानंतरही भारताने 12 धावांनी कसोटी गमावली. पाकिस्तानने मालिकेत 1-0 आघाडी घेतली.

दोन्ही संघांचा ताफा राजधानी दिल्लीत अवतरला. खेळपट्टी खणण्याचं प्रकरण लक्षात घेऊन या सामन्यासाठी अभूतपूर्व सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती.

शिवसेना, भारत, पाकिस्तान, दिल्ली, अनिल कुंबळे

फोटो स्रोत, JOHN MACDOUGALL

फोटो कॅप्शन, या कसोटी सामन्यासाठी प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कसोटीचं आयोजन होऊ नये यासाठी मैदानात सामना सुरू असताना विषारी साप सोडू असा इशाराही देण्यात आला होता. हा प्रकार टाळण्यासाठी बीसीसीआयने मैदानात वीसहून अधिक गारुडींची फौज तैनात केली होती.

स्टेडियम ते हॉटेल या मार्गावरची वाहतूक संघ जात असताना थांबवून अन्यत्र वळवण्यात आली होती. स्टेडियमच्या प्रवेशद्वाराशी प्रत्येक चाहत्याची कसून तपासणी करण्यात येत होती. टेलिव्हिजन क्रू, पत्रकार, समालोचक, तंत्रज्ञ यांनाही कसून चौकशीला सामोरं जावं लागलं होतं.

सामन्यात काय घडलं?

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सकलेन मुश्ताकने 5 विकेट्स घेतल्याने भारताचा 252 धावांतच आटोपला. कर्णधार अझरुद्दीनने 67 तर सदागोपन रमेशने 60 धावांची खेळी केली.

शिवसेना, भारत, पाकिस्तान, दिल्ली, अनिल कुंबळे

फोटो स्रोत, RAVEENDRAN

फोटो कॅप्शन, सदागोपन रमेश

प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तानचा डाव 172 धावांतच गडगडला. शाहिद आफ्रिदीने 32 तर सलीम मलिकने 31 धावांची खेळी केली. अनिल कुंबळेने 4 तर हरभजन सिंगने 3 विकेट्स घेतल्या. भारतीय संघाने 80 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.

भारतीय संघाने दुसऱ्या डावात चांगला खेळ सुधारत 339 धावांची मजल मारली. सदागोपन रमेशचं शतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. त्याने 15 चौकारांसह 96 धावांची खेळी केली. सौरव गांगुलीने नाबाद 62 धावा केल्या.

जवागल श्रीनाथचं अर्धशतक अवघ्या एका धावेनं हुकलं. साकलेन मुश्ताकने पुन्हा एकदा डावात 5 विकेट्स पटकावल्या. वासिम अक्रमने 3 आणि मुश्ताक अहमदने 2 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.

अनिल कुंबळेचा अविश्वसनीय विक्रम

पाकिस्तानला जिंकण्यासाठी 420 धावांचं आव्हानात्मक लक्ष्य मिळालं. मात्र त्यानंतर जे घडलं ते अद्भुत होतं. अनिल कुंबळेने डावात सर्व विकेट्स घेण्याची किमया केली.

पाकिस्तानच्या सर्व फलंदाजांना कुंबळेनेच माघारी धाडलं. डावात 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम करणारा कुंबळे केवळ दुसरा गोलंदाज ठरला. त्याआधी जिम लेकर यांनी अशी कामगिरी केली होती.

शिवसेना, भारत, पाकिस्तान, दिल्ली, अनिल कुंबळे

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, अनिल कुंबळेने डावात 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.

जी कसोटी बाह्य कारणांमुळे रद्द होण्यासाठी प्रयत्न सुरू होते ती कसोटी कुंबळेने आपल्या नावावर केली. पाकिस्तानचा डाव 207 धावांतच संपुष्टात आला. कुंबळेचे आकडे होते 26.3-9-74-10.

कुंबळे विक्रमासमीप आल्यानंतर अन्य गोलंदाजांनी विकेट मिळू नये यासाठी स्वैर गोलंदाजी केली. दिल्लीत थंडीच्या काळात दाट धुक्याची चादर पसरलेल्या दिवशी कुंबळेने आपल्या फिरकीच्या जाळ्यात पाकिस्तानच्या फलंदाजांना अडकवलं.

कुंबळेला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. 2 सामन्यात 20 विकेट्स घेणाऱ्या सकलेन मुश्ताकला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

शिवसेना, भारत, पाकिस्तान, दिल्ली, अनिल कुंबळे

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, अनिल कुंबळे सहकाऱ्यांबरोबर विकेटचा आनंद साजरा करताना

कुंबळेच्या ऐतिहासिक प्रदर्शनामुळे सामन्याआधी काय घडलं होतं ते विसरायला झालं. सामना संपल्यानंतर पुढचे अनेक दिवस फक्त कुंबळेच्या नावाची चर्चा होती.

सामन्यात दहा विकेट्स अनेक गोलंदाज घेतात परंतु एका डावात 10 विकेट्स हा अतिशय दुर्मीळ विक्रम आहे. त्यामुळे कुंबळेच्या नावाची चर्चा देशभरात रंगली.

आजही म्हणजे 22 वर्षांनंतरही जिम लेकर आणि अनिल कुंबळे या दोघांच्याच नावावर हा विक्रम आहे. कुंबळे यांनी रचलेला विक्रम पुढे कोणालाही मोडता आलेला नाही.

शिवसेनेचा पाकिस्तान विरोध नेहमीचा

  • ऑक्टोबर 1991 मध्ये शिशिर शिंदेंच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी खणली होती. पाकिस्तानने मुंबईत खेळू नये यासाठी असं करण्यात आलं. ती मालिका रद्द करण्यात आली.
  • 2006 मध्ये भारतात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार होता. पाकिस्तानचे सामने ज्या ठिकाणी होणार आहेत अशा जयपूर आणि मोहाली या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असंही शिवसेनेने सांगितलं. पाकिस्तानला भारतात खेळू देणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला होता. मात्र पाकिस्तानचा संघ भारतात दाखल झाला. पाकिस्तानचे सामने सुरळीतपणे पार पडले.
  • 2010 मध्ये शाहरूख खान आयपीएल स्पर्धेत पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या सहभागासंदर्भात बोलला. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळायला मिळावं अशी शाहरुखची भूमिका होती. शिवसेनेने शाहरुखविरोधात आंदोलन केलं. शाहरुखचा 'माय नेम इज खान' चित्रपट ज्या चित्रपटगृहांमध्ये सुरू होता तिथे हल्ले करण्यात आले.
  • 2014 मध्ये प्रो कबड्डी स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूंना सहभागी करून घेऊ नका असा इशारा शिवसेनेने दिला. महाराष्ट्रात झालेल्या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना खेळवण्यात आलं नाही.

तळटीप- या स्टेडियमचं पूर्वीचं नाव फिरोझशाह कोटला असं होतं. फिरोझशाह तुघलक यांचं नाव स्टेडियमला देण्यात आलं होतं. याच परिसरात फिरोझशाह यांनी बांधलेला किल्ला आहे. 27 ऑगस्ट 2019 रोजी दिवंगत भाजप नेते, माजी केंद्रीय मंत्री तसंच दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष अरुण जेटली यांचं नाव या स्टेडियमला देण्यात आलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)