IPL 2021: महेंद्रसिंग धोनी नावाची जादू आणि सीएसके नावाचं कुटुंब

फोटो स्रोत, Gallo Images
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
आयपीएलच्या जेतेपदाचा चषक कर्णधाराला सुपुर्द केला जातो. आयपीएलचं चौथं जेतेपद पटकावलेल्या चेन्नईतर्फे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चषक स्वीकारला. तो घेऊन तो संघाच्या दिशेने सरसावला. त्याने चषक दीपक चहरला देऊन टाकला आणि स्वत: कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. विजेत्या संघाचा फोटो काढण्यात आला, त्यात धोनी डावीकडे जेमतोय दिसतोय.
चेन्नई सुपर किंग्स नावाच्या संघरुपी कुटुंबाची मोट बांधणाऱ्या, कार्यपद्धती ठरवणाऱ्या, युवा खेळाडूंना मार्गदर्शन करणाऱ्या धोनीला फोटोच्या केंद्रस्थानी उभं राहता आलं असतं. पण संघातल्या युवा खेळाडूंना चषक देऊन बाजूला उभं राहण्याची धोनीची जुनी सवय. ती त्याने कालही सोडली नाही.
महेंद्रसिंग धोनी नावाचं वादळ 2005 साली भारतीय क्रिकेटमध्ये अवतरलं. लांब केसांचा, दणकट बांध्याचा हा रांचीवीर साधासुधा नाही हे लक्षात येऊ लागलं. त्याच्या बॅटचा तडाखा प्रतिस्पर्धी संघांना बसू लागला.
2007 मध्ये झालेल्या 50 षटकांच्या विश्वचषकात भारतीय संघाला प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळावा लागला. 2007 मध्येच झालेल्या पहिल्या ट्वेन्टी20 विश्वचषकावेळी धोनीकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं. संघातल्या वरिष्ठ खेळाडूंनी धोनीच्या नावाची शिफारस केली होती.
संघात युवराज सिंग, हरभजन सिंग यासारखे खेळाडू असतानाही धोनीकडे ही जबाबदारी देण्यात आली. धोनीच्या नेतृत्वात भारताने ट्वेन्टी20 विश्वचषक जिंकला आणि तडाखेबंद फलंदाजीसाठी प्रसिद्ध धोनी कर्णधारपदाच्या काटेरी मुकूटासह वावरू लागला.
दोन विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, एशिया कप यासह कसोटी क्रमवारीत भारताला अव्वल स्थान मिळवून देण्यात धोनीचा सिंहाचा वाटा होता. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात करायचे बदल, संघनिवड, तांत्रिक आघाडी बघताना धोनीने स्वत:ची बॅटिंग ढासळू दिली नाही. कॅप्टन कूल आणि फिनिशर अशा दोन्ही बिरुदावल्या त्याने समर्थपणे पेलल्या.
2008 मध्ये धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स या नात्याचा जन्म झाला. एक तपानंतरही या नात्याची वीण घट्ट अशीच आहे. रांचीच्या या मुलाला चेन्नईकरांनी, तामिळनाडूतील क्रिकेटप्रेमी चाहत्यांनी आपलंसं केलं. त्याला 'थाला' हे टोपणनाव मिळालं. चेन्नई त्याचं दुसरं घर झालं. धोनीची एक छबी टिपण्यासाठी हजारोंची गर्दी जमू लागली. धोनी सरावाला आला तरी त्याला पाहण्यासाठी खचात गर्दी होऊ लागली.

फोटो स्रोत, ARUN SANKAR
जिंकण्यात अद्भुत सातत्य राखणारा संघ धोनीने निर्माण केला. तुम्ही प्रोसेसवर लक्ष द्या, निकालाची चिंता करू नका, असं धोनी सहकाऱ्यांना सांगतो. आम्ही कॉर्पोरेट संघ तयार करण्याऐवजी नाती जोडली, असंही तो म्हणतो.
धोनीला यारों का यार म्हटलं जातं. त्याने एखाद्या माणसाला आपलंसं केलं की ते नातं तो आयुष्यभर जपतो.

फोटो स्रोत, Robert Cianflone
चेन्नई सुपर किंग्स संघ म्हणजे धोनीच्या खास दोस्तांची फौज आहे. काहींचं धोनीशी नातं भावाप्रमाणे आहे. वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो धोनीला brother from different mother म्हणतो. दक्षिण आफ्रिकेचा फॅफ डू प्लेसिस त्याला भावासारखं मानतो.
भारतासाठी खेळलेला रॉबिन उथप्पासाठी चेन्नई हा सहावा संघ. रॉबिन धोनीचा जुना दोस्त. माझ्यामुळे तुझी निवड झाली असं व्हायला नको म्हणून मी तुझ्या समावेशाच्या निर्णयावेळी बाजूला गेलो. कोअर टीमने तुला संघात घेतलं असं धोनीनेच उथप्पाला सांगितलं. 35व्या वर्षी रॉबिन धोनीसेनेत दाखल झाला. रॉबिनला मोजक्याच संधी मिळाल्या पण ज्या मिळाल्या त्याचं त्याने सोनं केलं.
सुरेश रैना आणि रवींद्र जडेजासाठी धोनी मोठ्या भावासारखा आहे. इंग्लंडसाठी खेळणारा मोईन अली आणि धोनीसाठी खेळणारा मोईन अली ही दोन वेगळी माणसं आहेत, असं गमतीने क्रिकेटविश्वात म्हटलं जातं. दीपक चहर आणि शार्दूल ठाकूर यांना ताफ्यात घेऊन त्यांच्या प्रतिभेला पैलू पाडण्याचं काम चेन्नई संघव्यवस्थापनाने केलं.
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या ऋतुराजला सीएसकेनं ताफ्यात घेतलं. गेल्यावर्षी कोरोनामुळे ऋतुराजला प्रदीर्घ काळ खेळताच आलं नाही. चेन्नईने त्याचा आत्मविश्वास खचू दिला नाही. संधी मिळाल्यानंतर ऋतुराजची कामगिरी सर्वसाधारण झाली पण संघव्यवस्थापनाने त्याला काढलं नाही. आज तोच ऋतुराज त्यांच्या विजयाचा शिल्पकार आहे.

फोटो स्रोत, BCCI/IP
स्पर्धा आहे म्हणून एकत्र आलोय- म्हणून तुमचा कर्णधार झालोय, असा धोनीचा पवित्रा नसतो. झोपण्याची वेळ सोडली तर माझ्या खोलीचा दरवाजा तुमच्यासाठी सदैव उघडा आहे, असं धोनी सहकाऱ्यांना सांगतो. युवा खेळाडूंना तो सर म्हणू देत नाही. मला माही म्हणा, भाई म्हणा, भैय्या म्हणा, एमएस म्हणा पण सर नको असं सांगत तो वलयांकित दरी कमी करून टाकतो. म्हणूनच त्याच्या निम्या वयाचे खेळाडू त्याच्या खोलीत जाऊन प्लेस्टेशन खेळतात.
वाढदिवसाचे केक कापायच्या वेळी खेळाडू केक कापतात. चेहऱ्याला केक लावून घ्यायला अनेकजण तयार नसतात. धोनी त्या खेळाडूच्या मागे जातो आणि दोन्ही हात घट्ट पकडून ठेवतो. मग बाकी खेळाडू बर्थडे बॉयच्या चेहऱ्याला केक फासतात. चेन्नईच्या ताफ्यातल्या कोणाचाही वाढदिवस असला तरी असाच साजरा होतो. धोनी हात पकडायचं काम इमानेइतबारे करतो.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
खेळाडूंना खेळपट्टीवर, मैदानात स्थिरावायला वेळ लागतो हे धोनी-फ्लेमिंग जाणतात. त्यामुळे तुला आज अंतिम अकरात घेतलं, परफॉर्म कर नाहीतर हो बाजूला असं ही जोडी कधीच करत नाही. एखाद्या खेळाडूला 8-10 सामने खेळूनही दमदार कामगिरी करता आली नाही तरी ते पाठिंबा देतात.
काही वर्षांपूर्वी संपूर्ण हंगाम शेन वॉटसन चाचपडत होता पण धोनी-फ्लेमिंग जोडीने वॉटसनवरचा विश्वास कायम ठेवला. प्लेऑफच्या लढतीत वॉटसनने शतक झळकावत त्यांचा विश्वास सार्थ ठरवला.
धोनीच्या मनात काय चाललं आहे, तो कोणती रणनीती आखतो आहे, काहीच कळत नाही. त्याच्या डोक्यात सतत चक्र फिरत असतात. मैदानाचा आकार किती आहे, कुठली बाऊंड्री लांब अंतरावर आहे, दव पडतंय का, कुठल्या गोलंदाजांना दुखापत सतावते आहे, कोणाचं क्षेत्ररक्षण तितकंसं चांगलं नाही त्यानुसार क्षेत्ररक्षण सजवायचं हे त्याचं काम चोख सुरू असतं.
गेल्या काही वर्षात तर त्याने विद्युत वेगाने स्टंपिंग करण्याचा विडाच उचलला आहे. संघाला जेव्हा गरज भासते तेव्हा फिनिशर धोनी अवतरतो. यंदाच्या आयपीएलच्या क्वालिफायर1च्या लढतीत तो जुना धोनी दिसला.

फोटो स्रोत, Robert Cianflone
सामन्याआधी सराव सुरू असताना, धोनी आणि अन्य संघात असलेल्या भारतीय संघातल्या खेळाडूंशी गप्पाटप्पा, चेष्टामस्करी सुरू असलेली दिसते. सामना संपल्यावर प्रतिस्पर्धी संघातले युवा खेळाडू धोनीच्या शिकवणीसाठी दाखल झाल्याचं नियमितपणे दिसतं. हातचं न राखता धोनी त्यांना सल्ला देतो.
काही दिवसांपूर्वी क्वालिफायर1च्या लढतीत चेन्नईने विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली. या सामन्याला चेन्नईचे चाहते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यामध्ये एक भाऊबहीणही होते. चेन्नई जिंकल्यावर हे दोघे रडू लागले. धोनीच्या ते लक्षात आल्यानंतर त्याने मॅचबॉलवर स्वाक्षरी केली आणि तो लहानग्या भावाबहिणींच्या जोडीला देऊन टाकलं.
धोनीची स्वाक्षरी असलेला चेंडू मिळाल्यानंतर त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता. धोनीने, सीएसकेने असा एकेक चाहता कमावला आहे.

फोटो स्रोत, MANAN VATSYAYANA
चांगल्या खेळभावनेने खेळण्यासाठी आयपीएल स्पर्धेत फेअरप्ले अवॉर्ड दिला जातो. धोनीच्या संघाला अनेक वर्ष हा पुरस्कार मिळतो आहे. जिंकण्यासाठीच खेळायचं पण जिंकण्यासाठी वाट्टेल ती पातळी गाठायची नाही हा धोनीने घालून दिलेला दंडक सगळे खेळाडू पाळतात. धोनी, मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आणि फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी यांना अपेक्षित सद्वर्तनाच्या चौकटीत जे खेळाडू बसतात त्यांनाच घेतलं जातं. संघातल्या युवा खेळाडूंच्या वर्तनावर वाईट परिणाम होऊ शकेल, अशा मोठ्या खेळाडूला धोनी आणि सीएसकेने लिलावात घेतलं नाही.
धोनी कौतुकाने, जिंकल्यामुळे हुरळून जात नाही. पराभवाने खचून जात नाही. जेतेपद पटकावल्यानंतरही कोणतंही आक्रस्ताळं सेलिब्रेशन करत नाही. पराभूत झाल्यानंतर अश्रू ढाळत नाही. धोनी लष्करात मानद पदावर कार्यरत आहे. तो लष्करी खाक्या त्याच्या व्यक्तिमत्वात परावर्तित झाला आहे.
कामाप्रति अत्युच्य निष्ठा हवी पण भावनांचं बटबटीत प्रदर्शन नको हे त्याचं ठरलेलं असतं. विरक्तीकडे झुकलेल्या स्थितप्रज्ञाप्रमाणे धोनीचं वागणं असतं. इतक्या दडपणाच्या क्षणी हा माणूस एवढा थंड कसा राहू शकतो याचं कोडं त्याच्या सहकाऱ्यांनाही सुटलेलं नाही.
धोनीच्या छत्रछायेखाली आलेल्या अनेक युवा खेळाडूंच्या त्याच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला. काहींनी दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघातही स्थान पटकावलं.
तो चाळिशीत आलाय. सर्वसाधारणपणे त्याच्या वयाचे माजी खेळाडू समालोचन, प्रशिक्षण, अंपायरिंग या क्षेत्रात मुशाफिरी करताना दिसतो. पण धोनी अपवाद आहे. 39 वर्ष 226 दिवसांचा असताना धोनीने चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलचं चौथं जेतेपद मिळवून दिलं. शु्क्रवारी झालेला सामना धोनीच्या कारकीर्दीतला कर्णधार म्हणून 300वा ट्वेन्टी-20 सामना होता. एवढं खेळूनही, नेतृत्व करूनही त्याची जिंकण्याची ऊर्मी तसूभरही कमी होत नाही.
धोनीसंदर्भात बोलताना महान खेळाडू सुनील गावस्कर काल म्हणाले, धोनी ज्या ड्रेसिंगरुममध्ये आहे त्यामध्ये खेळण्याचं भाग्य मला लाभलं नाही. कारण मी आधीच्या कालखंडात खेळलो. धोनीचा शांतपणा आणि खेळाची सखोल समज त्याला वेगळं करते. चेन्नईच्या यशात धोनीच्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे.
कपिल शर्मा यांच्या कार्यक्रमात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा दीपक चहर आला होता. एका सामन्यात स्वैर गोलंदाजीसाठी धोनीकडून त्याला ओरडा मिळाला होता. त्यासंदर्भात दीपकला विचारण्यात आलं. त्यावर तो म्हणाला, त्यांचा खेळाचा अभ्यास दांडगा आहे. त्यादिवशी मी त्यांना म्हणालो, कोणाचा तरी राग माझ्यावर निघतो. तर ते म्हणाले, तुझ्यावर तितकंच प्रेमही करतो.
तासनतास चालणाऱ्या मीटिंगा, डेटा, अनॅलिटिक्स यांना फाटा देऊन, सराव सत्रावर लक्ष केंद्रित करून प्रोसेसवर भर देणारा संघ तयार करण्याचं श्रेय धोनी आणि कंपनीला जाईल एवढं नक्की!
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








