हर्षल पटेलचं स्वप्नवत पदार्पण; घरचे अमेरिकेत गेले, याने घडवलं क्रिकेटमध्ये करिअर

फोटो स्रोत, RCB@twitter
यंदाच्या आयपीएल हंगामात परपल कॅप अर्थात सर्वाधिक विकेट पटकावण्याचा मान हर्षल पटेलने पटकावला होता. दशकभराहून अधिक काळ डोमेस्टिक क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करणाऱ्या हर्षलने शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण केलं.
माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर यांच्या हस्ते हर्षलला भारतीय संघाची कॅप देण्यात आली. हर्षलने 4 षटकात 25 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेत संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला. हर्षललाच मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने पटकावण्यात आलं. हर्षलच्या कारकीर्दीचा घेतलेला आढावा.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
हर्षल गेली अनेक वर्ष डोमेस्टिक क्रिकेट खेळतोय. नुसता खेळत नाहीये तर हरियाणा संघाचा कर्णधार आहे, प्रमुख गोलंदाज आहे. हरियाणाच्या ट्वेन्टी20 संघातर्फे खेळताना सलामीवीर म्हणून फटकेबाजीही करतो. पण आयपीएलच्या परिघात त्याची ओळख 'दुसऱ्या फळीतला गोलंदाज म्हणूनच होती.
आयपीएलमध्येही तो अनेक वर्षं आहे. पण त्याची भूमिका दुय्यम गोलंदाज म्हणूनच होती. अंतिम अकरात तो असेलच असं नाही. कधी तो संघात असायचा कधी नाही. संघही बदलत राहिले.
पण यंदाचा हंगाम हर्षल पटेलने आपल्या नावावर केला. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांना देण्यात येणाऱ्या पर्पल कॅपचा तो मानकरी आहे.
हाणामारीच्या षटकात म्हणजे 15 ते 20 या षटकांमध्ये टिच्चून मारा करत धावा रोखणं आणि विकेट्स काढणं यासाठी हर्षल ओळखला जातो.
सुरुवात गुजरातहून
गुजरात राज्यातल्या साणंदमध्ये हर्षलचा जन्म झाला. वयोगट स्पर्धांमध्ये गोलंदाज म्हणून त्याची कामगिरी चांगली होत होती.

फोटो स्रोत, Facebook/Harshal patel
2008-09 हंगामात विनू मंकड ट्रॉफी स्पर्धेत हर्षलने अवघ्या 11च्या सरासरीने 23 विकेट्स काढल्या होत्या. त्याचवर्षी त्याने गुजरात 'अ' संघासाठी पदार्पण केलं.
कामगिरीत सातत्य असल्याने 2010 मध्ये झालेल्या U-19 वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात त्याची निवड झाली होती. तेव्हाच्या गुजरात संघात स्थान मिळत नसल्याने हर्षलने हरियाणाकडून खेळायला सुरुवात केली.

फोटो स्रोत, Hindustan Times
2011-12 हंगामात हरियाणाकडून पदार्पण करताना हर्षलने कर्नाटक आणि राजस्थानविरुद्ध दमदार कामगिरी केली. त्या हंगामात हर्षलने तब्बल 28 विकेट्स पटकावल्या.
तेव्हापासून हर्षल आणि हरियाणा हे समीकरण पक्कं झालं. हरियाणाचा मुख्य गोलंदाज म्हणून जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली. गेली अनेक वर्षं हर्षल या जबाबदारीला न्याय देतो आहे.
हरियाणासाठी खेळताना हर्षलने 64 सामन्यात 23.56च्या सरासरीने 226 विकेट्स घेतल्या आहेत. डावात पाच विकेट्स घेण्याची करामत हर्षलने 12वेळा केली आहे तर सामन्यात 10 विकेट्स घेण्याची किमया चार वेळा केली आहे.
फलंदाजीतही हर्षलने चमक दाखवताना 1,363 धावा केल्या आहेत. हर्षलच्या नावावर 5 अर्धशतकांचा समावेश आहे.
2019 मध्ये हर्षलने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत हरियाणासाठी सलामीला येण्याचा निर्णय घेतला. 165च्या स्ट्राईक रेटने हर्षलने 374 धावा कुटल्या. या स्पर्धेत त्याने 19 विकेट्सही पटकावल्या.
2019-20 रणजी हंगामात हर्षलने 9 सामन्यांमध्ये 52 विकेट्स घेतल्या. हरियाणासाठी एका हंगामात सर्वाधिक विकेट घेण्याचा राजिंदर गोएल यांचा विक्रम हर्षलने मोडला. याच स्पर्धेत हर्षलने 292 धावा करत अष्टपैलू खेळाडू म्हणून उपयुक्तता सिद्ध केली.
अमेरिकेला जायची संधी
हर्षल 15 वर्षांचा असताना त्याच्या घरचे अमेरिकेला स्थायिक झाले. त्यालाही अमेरिकेला जाण्याची संधी होती. मात्र प्रशिक्षक तारक त्रिवेदी यांना हर्षलमधलं नैपुण्य दिसलं होतं.
आईवडील अमेरिकेत, मुलगा भारतात, लहान वय हे समीकरण अवघड होतं. मात्र तारक यांच्या आग्रहाखातर हर्षल उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये अमेरिकेत आणि उर्वरित काळ भारतात असेल असं ठरलं. भाऊ तपन पटेलने पालकत्वाची जबाबदारी घेतली.
हर्षलकडे ग्रीन कार्ड आहे, त्याच्या घरचे तिकडेच असतात. अमेरिकेत हर्षल न्यू जर्सीमधल्या अॅग्रेसिव्ह क्रिकेट क्लबकडून खेळला आहे. क्रिकेटच्या ध्यासासाठी हर्षलने अमेरिकेतलं सुखवस्तू जीवन सोडून देत भारतात राहून खेळण्याचा निर्णय घेतला.
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये हरयाणासाठी आणि आयपीएल स्पर्धेत विविध संघांसाठी खेळत हर्षलने स्वत:च्या प्रतिभेला न्याय दिला.
हर्षल 30 वर्षांचा आहे. आयपीएल स्पर्धेतल्या चांगल्या कामगिरीच्या बळावर अनेक खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे. हर्षलचं भारतीय संघासाठी खेळण्याचं स्वप्न अद्याप पूर्ण झालेलं नाही.
आयपीएल स्पर्धेत खेळताना सचिन तेंडुलकर, ड्वेन ब्राव्हो, विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स यासारख्या असंख्य मोठ्या खेळाडूंबरोबर हर्षल नियमितपणे खेळतो. पण टीम इंडिया कॅप पासून तो अजूनही दूर आहे. यंदाच्या आयपीएल हंगामातली कामगिरी हर्षलचं प्रलंबित स्वप्न प्रत्यक्षात साकारू शकते.
आयपीएल स्पर्धेतली रोलरकोस्टर राईड
डोमेस्टिक क्रिकेटमधील कामगिरीची दखल घेत मुंबई इंडियन्स संघाने 2010 मध्ये त्याला ताफ्यात समाविष्ट केलं. 2010 U19 वर्ल्ड कप संघातील खेळाडूंना आयपीएल संघांमध्ये स्थान मिळालं.
त्याअंतर्गत मुंबईने हर्षलला घेतलं. मात्र मुंबईकडे एकापेक्षा एक खेळाडूंचा भरणा असल्याने त्याला अंतिम अकरात खेळण्याची संधीच मिळाली नाही.
2012 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने हर्षलला संघात घेतलं. प्रमुख गोलंदाजांना दुखापत झाली तर हर्षलच्या नावाचा विचार केला जात असे.

फोटो स्रोत, Hindustan Times
2013 मध्ये हर्षलला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. बेंगळुरू संघाने हर्षलला संघातून रिलीज केलं मात्र लिलावात 40 लाख रुपये खर्चून पुन्हा संघात घेतलं.
2015 हंगामात बेंगळुरू संघव्यवस्थापनाने हर्षलला आपल्या योजनांचा भाग केलं. हर्षलने 15 सामन्यात 17 विकेट्स घेत संघाचा विश्वास सार्थ ठरवला. मात्र काही हंगामांनंतर बेंगळुरूने हर्षलला रिलीज केलं.
दिल्ली कॅपिटल्स संघाने हर्षलच्या कर्तृत्वावर विश्वास दाखवला. 2020 हंगामाच्या आधी दिल्ली कॅपिटल्स संघाने हर्षलला संघात कायम राखलं.
तीन हंगाम दिल्लीकडून खेळल्यानंतर दिल्लीने ट्रेड ऑफ म्हणजे खेळाडूंच्या देवाण घेवाण प्रक्रियेत हर्षलला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला देऊन टाकलं. हा निर्णय बेंगळुरू आणि हर्षलच्या पथ्यावर पडला.
दिल्लीकडे कागिसो रबाडा, अँनरिक नॉर्कियासारखे आंतरराष्ट्रीय अव्वल गोलंदाज आहेत. तिसरा गोलंदाज म्हणून अवेश खानला संधी देण्यात येते. दिल्लीकडे इशांत शर्मा, उमेश यादव असे अव्वल भारतीय गोलंदाजही आहेत.

फोटो स्रोत, PRAKASH SINGH
2020 हंगामात दिल्लीकडे तुषार देशपांडेही होता. मोहित शर्मा, कीमो पॉल हे गोलंदाज राखीव खेळाडूंमध्ये होते. अमित मिश्रा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल हे फिरकी गोलंदाजांचं त्रिकुटही आहे.
यामुळे हर्षलला दिल्ली कॅपिटल्स संघाच्या अंतिम अकरात स्थान मिळणं अवघड होतं. त्यामुळे त्यांनी हर्षलला बेंगळुरूला देण्याचा निर्णय घेतला.
बेंगळुरूने अनुभवी डेल स्टेनला संघातून बाहेर केलं. ख्रिस मॉरिस आणि इसरू उदाना यांनाही रिलीज केलं. केन रिचर्डसनच्या उपलब्धतेबाबत साशंकता होती.
मोहम्मद सिराजच्या जोडीला एका चांगल्या भारतीय गोलंदाजाची बेंगळुरूला आवश्यकता होती. हर्षलने ही गरज अचूक हेरली आणि आरसीबीच्या संघाचा कणा झाला.
कायले जेमिसन, जॉर्ज गार्टन, डॅन ख्रिस्तियन या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या बरोबरीने हर्षलने आपली उपयुक्तता सिद्ध केली. मोठ्या संघांविरुद्ध मोठ्या खेळाडूंना बाद करत हर्षलने प्रतिस्पर्ध्यांच्या डावाला खिंडार पाडलं.
स्वप्नवत हंगाम
2021चा हंगाम हर्षलसाठी स्वप्नवत ठरला आहे. सलामीच्या लढतीत मुंबईविरुद्ध खेळताना हर्षलने 5 विकेट्स घेण्याची करामत केली. हार्दिक पंड्या, इशान किशन, कृणाल पंड्या, मार्को जेन्सन आणि राहुल चहर यांना तंबूत परतावलं.
हर्षलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. हर्षलच्या या कामगिरीच्या बळावर बेंगळुरूने मुंबईला नमवलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
हैदराबादविरुद्ध हर्षलने विजय शंकर आणि शाहबाझ नदीम यांना बाद केलं. कोलकाताविरुद्ध खेळताना हर्षलने आयोन मॉर्गन आणि आंद्रे रसेल या धोकादायक फलंदाजांना बाद करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
राजस्थानविरुद्ध खेळताना हर्षलने रियान पराग, ख्रिस मॉरिस, चेतन सकारिया यांना बाद केलं. चेन्नईविरुद्ध खेळताना हर्षलने फॅफ डू प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायुडू या प्रमुख फलंदाजांना बाद केलं.
दिल्लीविरुद्धच्या चुरशीच्या लढतीत बेंगळुरूने एका धावेने विजय मिळवला. हर्षलने पृथ्वी शॉ आणि मार्कस स्टॉइनस यांना बाद केलं. पंजाबविरुद्ध हर्षलच्या 4 षटकात 53 धावा कुटण्यात आल्या.
अबू धाबी इथे झालेल्या लढतीत हर्षलने 2 षटकात 13 धावा दिल्या मात्र त्याला विकेट मिळू शकली नाही. चेन्नईविरुद्ध खेळताना हर्षलने मोईन अली आणि अंबाती रायुडू यांना बाद केलं.
मुंबईविरुद्ध हर्षलने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली. हर्षलने कायरेन पोलार्ड, हार्दिक पंड्या, अॅडम मिल्न, राहुल चहर यांना बाद करत बेंगळुरूला शानदार विजय मिळवून दिला.
राजस्थानविरुद्ध हर्षलने रियान पराग, ख्रिस मॉरिस, चेतन सकारिया यांना बाद केलं. पंजाबविरुद्ध हर्षलला एकही विकेट मिळाली नाही. हैदराबादविरुद्ध खेळताना हर्षलने केन विल्यमसन, वृद्धिमान साहा, जेसन होल्डर या तीन फलंदाजांना बाद केलं.
यंदाच्या हंगामात हर्षलने एक अनोखा विक्रम नावावर केला. आयपीएलच्या एका हंगामात भारतीय खेळाडूंनी घेतलेल्या सर्वाधिक विकेट्सचा विक्रम आता हर्षलच्या नावावर आहे. याआधी मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या नावावर होता.
जडेजाच्या बॅटचा प्रसाद
25 एप्रिल रोजी मुंबईत झालेल्या लढतीत हर्षल पटेलला चेन्नईकडून खेळणाऱ्या रवींद्र जडेजाच्या बॅटचा तडाखा बसला. चेन्नईच्या डावात शेवटचं षटक टाकण्यासाठी हर्षल तयार झाला तेव्हा त्याचे आकडे 3-0-14-3 असे होते.
डावाच्या शेवटच्या षटकात मात्र रवींद्र जडेजाने हर्षलच्या षटकात तब्बल 37 धावा चोपून काढल्या. या षटकाचं वर्णन 6, 6, 6 (नोबॉल), 6, 2, 6, 4 असं होतं. हर्षलचे आकडे 4-0-51-3 असे झाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








