IPL 2021: धोनी म्हणतो, मी चेन्नई सुपर किंग्स अजून सोडलेलं नाही

फोटो स्रोत, Getty Images
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या 14व्या हंगामाच्या जेतेपदावर नाव कोरलं.
अंतिम लढतीत कोलकाता नाईट रायडर्सला नमवत चेन्नईने चौथ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. याआधी चेन्नईने 2010, 2011, 2018 मध्ये जेतेपद पटकावलं होतं.
गेल्यावर्षी प्लेऑफ्ससाठी पात्र ठरू न शकलेल्या चेन्नईने आम्ही दिमाखात पुनरागमन करू असा विश्वास चाहत्यांना दिला होता. चाहत्यांच्या विश्वासाला पात्र ठरत चेन्नईने जेतेपद आपलंसं केलं. मात्र यापुढे धोनी आणि यलो जर्सी हे नातं कायम राहील का याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
याबाबत धोनीला विचारण्यात आलं. त्यावर तो म्हणालं, "हे बीसीसीआयच्या हातात आहे. 15व्या हंगामापूर्वी खेळाडूंचा लिलाव होईल. महालिलाव असणार आहे. दोन आणखी संघ आयपीएलच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक संघाची फेररचना होईल.

फोटो स्रोत, BCCI/IPL
चेन्नईसाठी भविष्यात चांगला संघ बांधण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. मी संघात असेन का, मला संघात कायम राखलं जाईल का हा मुद्दाच नाही. संघाचं नुकसान न होता चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ तयार करायचा आहे. पुढची 10 वर्ष चेन्नईसाठी खेळू शकतील असे खेळाडू निवडण्याचा कोअर टीमचा प्रयत्न असेल".
चेन्नई सुपर किंग्ससाठी तू जो वारसा सोडून जातो आहेस त्याचा तुला अभिमान असेल असं समालोचकांनी म्हटल्यानंतर धोनीने हसत हसत मिश्कीलपणे म्हटलं की- "मी अजून चेन्नई (सीएसके) सोडलेलं नाही".
धोनीच्या या उत्तराने तो पुढचा हंगाम तरी यलो जर्सीत दिसेल असा विश्वास चाहत्यांना वाटतो आहे. मात्र लिलावात काय होईल, सीएसकेची पुढची रणनीती काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
कोलकाताचं केलं कौतुक
पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान धोनीने उपविजेत्या कोलकाता संघाचं अभिनंदन केलं. धोनी म्हणाला, "सीएसकेबद्दल बोलण्याआधी कोलकाता संघाबद्दल बोलणं आवश्यक आहे.
भारतात झालेल्या पहिल्या टप्प्यात कोलकाताचा संघ पिछाडीवर होता. त्या परिस्थितीतून पुनरागमन करणं अवघड होतं. यंदाच्या आयपीएलचं जेतेपद जिंकण्याचा खरा दावेदार संघ केकेआर होता. केकेआरचे खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफचं मनापासून अभिनंदन".
आम्ही बैठका घेत नाही
जेतेपदापर्यंतच्या प्रवासाबद्दल धोनी म्हणाला, "हंगाम स्थगित झाला त्यामुळे आम्हाला विश्रांती मिळाली. आम्ही काही खेळाडू बदलले. आम्हाला प्रत्येक सामन्यात नवनवीन मॅचविनर्स मिळाले. प्रत्येक अंतिम लढत खास असते. आम्ही अनेकदा अंतिम फेरी गाठली आहे पण त्याचवेळी आम्ही अनेकदा हरलोय हेही विसरून चालणार नाही.

फोटो स्रोत, BCCI/IPL
आम्ही खूप बोलत नाही. आम्ही प्रदीर्घ काळ चालणाऱ्या बैठका घेत नाही. आम्ही एकमेकांशी वैयक्तिक बोलण्यावर भर देतो. आमचं सराव सत्र हीच आमची बैठक असते. बैठकीसाठी कक्षात माणसं जमतात त्याचं एक दडपण येतं. आमची सराव सत्रं चांगली होतात".
चाहत्यांचा पाठिंबा मोलाचा
"या जेतेपदाच्या निमित्ताने आम्हाला चाहत्यांचे आभार मानायचे आहेत. हा हंगाम युएईत होत असला, अंतिम लढत दुबईत होत असली तरी चेपॉकसारखंच वातावरण आहे.
भविष्यात चेन्नईत चाहत्यांसमोर खेळायला मिळेल अशी आशा आहे. आम्ही जिथे जिथे खेळलोय तिथे तिथे चाहत्यांनी पाठिंबा दिला आहे. आम्ही दक्षिण आफ्रिकेत खेळलो होतो- तिथेही चाहते आले होते. असं प्रेम चांगलं खेळायला प्रोत्साहन देतं", असं धोनी म्हणाला.
ऋतुराज-फॅफने गाजवला हंगाम
फॅफ डू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड या सलामीवीरांनी चेन्नईच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
संपूर्ण हंगामात धावांच्या राशी ओतत ऋतुराज गायकवाडने आयपीएलच्या 14व्या हंगामात सर्वाधिक धावांसाठीच्या ऑरेंज कॅपवर नाव कोरलं. ऑरेंज कॅप पटकावणारा ऋतुराज सगळ्यात लहान वयाचा फलंदाज ठरला आहे. ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या खेळाडूच्या संघाने जेतेपद पटकावण्याची ही दुसरीच वेळ आहे.
ऋतुराजने 16 सामन्यात 635 धावा करत ऑरेंज कॅपचा मान पटकावला.

फोटो स्रोत, BCCI/IPL
योगायोग म्हणजे अंतिम लढतीत 86 धावांची खेळी करणाऱ्या फॅफ डू प्लेसिसला ऋतुराजला मागे टाकण्याची संधी होती. शेवटच्या चेंडूवर 2 धावा केल्या असत्या तर डू प्लेसिसला ऑरेंज कॅप मिळाली असती पण तो बाद झाला आणि ऋतुराजच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. डू प्लेसिसने 633 धावा केल्या.
या दोघांनी मिळून चेन्नईने एकूण केलेल्या धावांपैकी 60 टक्के धावा केल्या. शारजा, दुबई, अबू धाबी अशा तिन्ही मैदानांवर या जोडीने भरपूर धावा केल्या. एकेरी-दुहेरी धावा, चौकार, षटकार यांचा मिलाफ या भागीदारीदरम्यान दिसून येत असे. ऋतुराजने ऑरेंज कॅप पटकावतानाच एक शतकही झळकावलं.
मॅथ्यू हेडन, माईक हसी यांच्याप्रमाणे सीएसकेसाठी ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ऋतुराजचा समावेश झाला आहे.

फोटो स्रोत, BCCI/IPL
अनोखे फटके खेळण्यापेक्षा पुस्तकी फटके खेळण्यावर भर देत या जोडीने प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणलं.
36 वर्षीय डू प्लेसिस दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑल फॉरमॅट स्पेशालिस्ट खेळाडूंमध्ये डू प्लेसिसचं नाव घेतलं जातं. डू प्लेसिसचा अनुभव ऋतुराजसाठी मोलाचा ठरला. डू प्लेसिसने ऋतुराजचं भरभरून कौतुक केलं- ऋतुराज हा विलक्षण प्रतिभाशाली खेळाडू आहे. त्याचं भविष्य उज्वल आहे.
डॅडीज आर्मीने दिला दणका
2018 लिलावानंतर चेन्नई सुपर किंग्सचा संघ म्हणजे वयस्क खेळाडूंचा संघ झाला होता. वयाची तिशी नव्हे तर पस्तिशी ओलांडलेले खेळाडू संघात होते. ट्वेन्टी20 सारखा वेगवान प्रकार त्यांना झेपेल का याविषयी साशंकता होती. मात्र धोनीसेनेने आपल्या कामगिरीतून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं.
सामना संपला की लहान मुलांना सांभाळणारे, कडेवर घेऊन फिरणाऱ्या खेळाडूंच्या संघाला डॅडी आर्मी म्हटलं गेलं.
स्वत: धोनी चाळिशीपल्याड गेला आहे. मात्र विकेटकीपिंग, फलंदाजी अशा कोणत्याच आघाडीवर त्याच्या चपळतेत शैथिल्य आल्याचं दिसलं नाही.

फोटो स्रोत, IPL
इंग्लंडचा मोईन अली 33 वर्षांचा आहे पण त्याचं क्षेत्ररक्षण उत्तम आहे. कमी चेंडूत वेगवान खेळी करत मोईनने चेन्नईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
जगभरात ट्वेन्टी20 लीग खेळणारा अनुभवी ड्वेन ब्राव्हो 37 वर्षांचा आहे. पण फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही गोष्टीत ब्राव्हो एखाद्या तरुणाला लाजवेल असं खेळतो.
फॅफ डू प्लेसिस 36 वर्षांचा आहे मात्र सीमारेषेपार जात चेंडू आतमध्ये टाकून रिले कॅच घेण्यातलं त्याचं कौशल्य वाखाणण्याजोगं आहे.
इम्रान ताहीर 41 वर्षांचा असून, त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा विकेट्स पटकावत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवतो.
रवींद्र जडेजा 32 तर चेतेश्वर पुजारा 33 वर्षांचा आहे. जगातल्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये जडेजाची गणना होते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








