Ind Vs SA : सेंच्युरिअन कसोटीत भारताचा दिमाखदार विजय, दक्षिण आफ्रिकेवर 113 धावांनी मात

फोटो स्रोत, Getty Images
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटींच्या मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने दिमाखदार विजय मिळवला आहे.
भारताने दुसऱ्या डावात दिलेल्या 305 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 191 धावांपर्यंतच मजल मारू शकला.
त्यामुळे या विजयासह भारताला या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळाली आहे.
पहिल्या डावातील शतकवीर KL राहुल, दक्षिण आफ्रिकेचे 5 बळी मिळवणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्यासह इतर खेळाडूंच्या लक्षवेधी कामगिरीमुळे भारताला या कसोटी सामन्यात विजय मिळवता आला.
पहिल्या डावात काय घडलं?
सेंच्युरिअनच्या सुपरस्पोर्ट्स पार्क या स्टेडियमवर या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी खेळवण्यात आली.
बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर के. एल. राहुल आणि मयांक भागवत यांनी हा निर्णय सार्थ ठरवत शतकी सलामी दिली.
त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनीही सावध खेळ करत धावसंख्येला आधार दिला. दरम्यान, के. एल. राहुलने या सामन्यात आपलं सातवं शतक पूर्ण केलं.

फोटो स्रोत, Getty Images
पहिल्या दिवशीचा संपूर्ण खेळ भारताच्या नावे राहिला होता. तर दुसऱ्या दिवशी पावसामुळे खेळात व्यत्यय आला. त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा संपूर्ण दिवसाचा खेळ होऊ शकला नाही.
तिसऱ्या दिवशी पुन्हा फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाची फलंदाजी मात्र पुरती ढेपाळली. 3 बाद 276 वरून भारताचा डाव सर्वबात 327 असा संपुष्टात आला होता. के. एल. राहुलने सर्वाधिक 123 धावांची खेळी केली.
पण, पहिल्या डावात फलंदाजीस उतरलेला यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघही विशेष कामगिरी करू शकला नाही. मोहम्मद शमीच्या आक्रमक गोलंदाजीपुढे शरणागती पत्करल्याने दक्षिण आफ्रिकेला केवळ 197 धावा धावफलकावर लावता आल्या. मोहम्मद शमीने 44 धावांच्या मोबदल्यात 5 बळी घेतले.
गोलंदाजांनी वाचवलं
पहिल्या डावात 130 धावांची मोठी आघाडी मिळवत भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीस उतरला खरा. पण या डावात भारतीय फलंदाजांनी निराशा केली. एकाही भारतीय फलंदाजाला या डावात अर्धशतक झळकावता आलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
दुसऱ्या डावात भारतीय डाव 174 वर संपुष्टात आला. भारताकडून सर्वाधिक धावा ऋषभ पंतने (34) केल्या. दक्षिण अफ्रिकेकडून रबाडा आणि जानसेन यांनी प्रत्येकी 4 बळी घेतले.
पहिल्या डावातील 130 धावांच्या आघाडीमुळे भारताला दक्षिण आफ्रिकेला 305 धावांचं मजबूत आव्हान देता आलं.
धावांचा पाठलाग करताना सुरुवातीपासूनच दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत.
सलामीवीर कर्णधार डिन एल्गरने थोडाफार संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. त्याने 77 धावांची खेळी केली. पण इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 191 पर्यंतच मजल मारता आली.
भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 3 तर मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन आश्विन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पुढचा सामना 3-7 जानेवारीदरम्यान जोहान्सबर्गच्या द वाँडरर्स स्टेडियमवर खेळवण्यात येईल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








