T20 World Cup: आला वर्ल्डकप, केला फस्त- ऑस्ट्रेलियाची अद्भुत वर्चस्वाची गोष्ट

ऑस्ट्रेलिया, क्रिकेट, वर्ल्डकप

फोटो स्रोत, Alex Davidson

फोटो कॅप्शन, ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यावहिल्या ट्वेन्टी20 जेतेपदासह
    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

1987, 1999, 2003, 2007, 2015 आणि 2021 - हे आकडे कदाचित तुम्ही ओळखले असतील.

ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकला ती वर्ष आहेत. वर्ल्डकप आणि ऑस्ट्रेलिया हे जणू समानार्थी शब्द वाटावेत असं अद्भुत वर्चस्व कांगारूंनी वर्षानुवर्ष राखलं.

कोरोनाच्या सावटातून बाहेर पडत आपण हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलोय याची जाणीव करून देणारे हे आकडे. ही फक्त वर्षं नाहीयेत.

काल रविवारी दुबईत त्यांनी जेतेपदांच्या फडताळात आणखी एका झळाळत्या जेतेपदाची भर घातली. 'न्यू नॉर्मल' नव्हे तर खरंखुरं नॉर्मल झाल्याची जाणीव करून देणारा हा विजय आहे.

प्रदीर्घ काळासाठी खुंटलेल्या वारशाला संजीवनी देणारा असा हा विजय आहे. वर्ल्डकप आणि ऑस्ट्रेलिया म्हणजे एखादा विजयरथ रोरावत यावा आणि प्रतिस्पर्ध्यांना चीतपट करून जावा अशी स्पर्धा.

वर्ल्डकप आणि ऑस्ट्रेलिया म्हणजे पिवळीधम्मक जर्सी. वर्ल्डकप आणि ऑस्ट्रेलिया म्हणजे धावांच्या अगणित राशी. वर्ल्डकप आणि ऑस्ट्रेलिया म्हणजे बुंध्यात पडणारे यॉर्कर, छाताडावर आदळणारे उसळते चेंडू, भंबेरी उडवणारी फिरकी.

वर्ल्डकप आणि ऑस्ट्रेलिया म्हणजे अफलातून रनआऊट्स आणि शरीराची लवचिकता सिद्ध करणारे कॅच. वर्ल्डकप आणि ऑस्ट्रेलिया म्हणजे प्रतिस्पर्ध्यांनी अवाक होणं आणि कांगारूंची भरारी.

ऑस्ट्रेलिया, क्रिकेट, वर्ल्डकप

फोटो स्रोत, Brett Hemmings

फोटो कॅप्शन, ऑस्ट्रेलियाला विश्वविजेतेपद मिळवून देणारे कर्णधार

अॅलन बॉर्डर यांच्या नेतृत्वात 1987 मध्ये ऑस्ट्रेलियाचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. त्यानंतर बरीच वर्ष गेली. एक तपानंतर स्टीव वॉच्या फौजेने विश्वविजेतेपदावर कब्जा केला.

चार वर्षांनी पॉन्टिंगच्या सेनेने विश्वविजेतेपद नावावर केलं. पुन्हा चार वर्षांनी पॉन्टिंग ब्रिगेडने विश्वविजेतेपदाची कमाई केली. आठ वर्षांनंतर मायकेल क्लार्कच्या चमूने विश्वविजेतेपदाचा झेंडा रोवला.

सहा वर्षं लोटली, पुलाखालून पाणी नव्हे अख्खं धरणच वाहून गेलं. काल अखेर तो दिवस उजाडला. पिवळ्या जर्सीतल्या फौजांनी विश्वविजेतपदाला गवसणी घातली.

खेळायला उतरायचं ते जिंकण्यासाठी हा सिद्धांत ऑस्ट्रेलियानेच मनात रुजवला. विजयात दयामाया, क्षमाशांती, करुणा, सहिष्णूता वगैरेंना स्थान द्यायचं नाही हा फंडा.

नुसतं जिंकायचं नाही, खणखणीत वर्चस्व गाजवून जिंकायचं. जी काही गुणकौशल्यं असतील ती परजायची आणि झोकून द्यायचं. वर्ल्डकप ही आपलीच जहागीर आहे अशा आवेशात खेळायचं.

चोख नियोजन आणि त्याबरहुकूम कृती हे समीकरण. फिट नसाल, बाहेर व्हा. प्रतिस्पर्ध्यांची एकाग्रता भंग करण्यासाठी शेरेबाजीचं हत्यार वापरण्याची क्लृप्तीही त्यांचीच. या कारणामुळेच ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांइतकीच टीकाकारांची संख्या जास्त आहे.

जबाबदारी घ्यायची म्हणजे स्वत:मधलं सर्वोत्तम संघाप्रति देऊन टाकायचं. विक्रमांसाठी खेळायचं नाही, जिंकण्यासाठी खेळायचं. पडेल ते काम करायचं.

प्रतिस्पर्ध्यांचा सखोल अभ्यास करायचा आणि आपल्या खेळातल्या चुका कमी करत न्यायच्या. मोक्याच्या दडपणाच्या क्षणी कामगिरी उंचावायची. आता पडले-खचले असं वाटत असतानाच उलटं फिरून डंख द्यायचा. मिशन एकच- कप उचलणे.

क्लुसनरचं वादळ ते वहाबचा वॉटसनला झणझणीत स्पेल

वर्ल्डकप आणि ऑस्ट्रेलिया म्हणजे आठवणींचं गाठोडं आहे. 1999च्या वर्ल्डकपमध्ये आफ्रिका-ऑस्ट्रेलिया मॅचचा थरार. लान्स क्लुसनर नामक वादळाचा झंझावात. तो रनआऊट.

हर्षल गिब्सने कॅच सोडल्यावर स्टीव वॉ ने त्याला- 'मित्रा तू कॅच नव्हे वर्ल्ड कप सोडलास,' हे सांगणं. फायनलमध्ये पाकिस्तानचा उडवलेला धुव्वा.

ऑस्ट्रेलिया, क्रिकेट, वर्ल्डकप

फोटो स्रोत, Adrian Murrell

फोटो कॅप्शन, लान्स क्लुसनरला रोखण्यात ऑस्ट्रेलिया यशस्वी ठरलं

2003चा वर्ल्डकप आठवतोय- अँड्यू सायमंड्सने वासिम अक्रम-वकार युनिस-शोएब अख्तर त्रिकुटाला तोंड देत झळकावलेलं शतक. ग्लेन मॅकग्राने नवख्या नामबियाची भंबेरी उडवत घेतलेल्या 7 विकेट्स.

इंग्लंडविरुद्ध घसरगुंडी उडालेली असताना अँडी बिकेल-मायकेल बेव्हन यांनी केलेली पार्टनरशिप. सेमी फायनलसारख्या महत्त्वाच्या लढतीत 99वर अंपायरने आऊट दिलेलं नसताना गिलख्रिस्टचं तंबूत परतणं. फायनलमध्ये आपल्याविरुद्ध उभा केलेला धावांचा डोंगर.

2007 मध्ये आठवतात मॅथ्यू हेडनची दणादण शतकं. बॅक ऑफ द हँड स्लोअरवन टाकून स्पर्धेत भल्याभल्या फलंदाजांना माघारी धाडणारे नॅथन ब्रॅकनचे स्पेल.

स्क्वॉश ग्लोव्ह्जमध्ये ठेऊन गिलख्रिस्टने फायनलला झळकावलेलं शतक. रीतसर अंधारात नियमांच्या जांगडगुत्यात झालेल्या शेवटच्या तीन ओव्हर्स आणि जेतेपदाचा जल्लोष.

ऑस्ट्रेलिया, क्रिकेट, वर्ल्डकप

फोटो स्रोत, Gallo Images

फोटो कॅप्शन, ऑस्ट्रेलियाचा संघ 2007 विश्वचषकासह

8 वर्षांनंतर घरच्या मैदानावर सख्खे शेजारी किवींविरुद्धच्या लो स्कोअरिंग थ्रिलरमध्ये झालेला निसटता पराभव. अफगाणिस्तानला 417 धावा करून शिकवलेला धडा.

श्रीलंकेविरुद्ध ग्लेन मॅक्सवेलचं सुरेख शतक. वहाब रियाझचा झणझणीत स्पेल आणि शेन वॉटसनचं प्रत्युत्तर. सेमी फायनलमध्ये आपल्याविरुद्ध नेहमीच धावांची टांकसाळ उघडणाऱ्या स्टीव्हन स्मिथचं शतक आणि स्वप्नभंग. फायनलला ब्रेंडन मॅक्युलमच्या ऑल अटॅक अप्रोचला सुरुंग लावून केलेली खांडोळी.

का झाली घसरण?

29 मार्च 2015 ते 14 नोव्हेंबर 2021 या काळात ऑस्ट्रेलियाच्या साम्राज्याला नुसते तडे गेले नाहीत तर भगदाड पडलं. काही मोठे खेळाडू निवृत्त झाले.

काहींच्या पाठी दुखापतींचा ससेमिरा लागला. डोमेस्टिक स्पर्धांमधून येणारी गुणवत्तेची कुमक आटली. जगात कुठेही जाऊन कुठल्याही प्रकारच्या खेळपट्टीवर जिंकूच ही मानसिकता विरली.

ऑस्ट्रेलिया, क्रिकेट, वर्ल्डकप

फोटो स्रोत, Andy Kearns

फोटो कॅप्शन, ऑस्ट्रेलियाने गेल्या काही वर्षात असंख्य पराभव पचवले

प्रतिस्पर्ध्यांनी कच्चे दुवे हेरले. सातत्य गमावलं. बिग बॅश नावाची चित्ताकर्षक जत्रा भरते पण त्याने ऑस्ट्रेलियाला दिलं नाही. मानधनाच्या मुद्यावरून खेळाडू आणि बोर्ड यांच्यात खटका उडाला.

भूस्खलन झाल्यावर मार्गात येईल ते सगळं अनिर्बंध घसरत जातं तसं झालं. एकेकाळी वर्चस्वामुळे ऑस्ट्रेलियाच्या विजयाऐवजी त्यांचा पराभव ही मोठी बातमी व्हायची. त्यांच्या हरण्यात सातत्य आलं. हे सगळं होत होत एक शेवटचा घाव बसला.

सँडपेपर गेट

2018 मध्ये कुप्रसिद्ध असं सँडपेपरगेट स्कँडल झालं. सोप्या शब्दात सांगायचं तर बाह्य वस्तूच्या साह्याने चेंडू कुरतडताना डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ आणि कॅमेरन बॅनक्रॉफ्ट सापडले.

दिसताना हे तिघे दिसले पण हे सामूहिक कुभांड असल्याचं स्पष्ट झालं. आयसीसीने मोठी शिक्षा केली नाही पण जगभरात चीटर म्हणून झालेली नामुष्की आणि मायदेशात गमावलेली इभ्रत यामुळे स्मिथ-वॉर्नर जोडीवर वर्षभराची बंदी घालण्यात आली.

ऑस्ट्रेलिया, क्रिकेट, वर्ल्डकप

फोटो स्रोत, PETER PARKS

फोटो कॅप्शन, स्टीव्हन स्मिथ

जे दोघं खोऱ्याने धावा करत आणि प्रतिस्पर्ध्यांना सळो की पळो करून सोडत त्या दोघांना पत्रकार परिषदेत ओक्साबोक्शी रडताना जगाने पाहिलं.

कर्णधार बदलला, प्रशिक्षक बदलला. सगळं एकदम खिळखिळं झालं. चहूबाजूंनी टीकेचा भडिमार झाला. पातक घडलं होतं, त्यामुळे घाव वर्मी बसणार हे पक्कं होतं.

ऑस्ट्रेलियाची व्यवस्था ढवळून निघाली. स्मिथ-वॉर्नर आणि पर्यायाने ऑस्ट्रेलिया यातून सावरत नाही अशी भाकितं वर्तवण्यात आली. पण हार मानणं त्यांच्या वाणातच नाही.

पुनरागमनाच्या वाटेवर

जस्टीन लँगर कोच झाला. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणारा टीम पेन कर्णधार झाला. कामगिरीत सातत्य नसल्याने संघातलं स्थान तळ्यात मळ्यात असणाऱ्या आरोन फिंचकडे शॉर्ट फॉरमॅटचं नेतृत्व आलं.

परतणं अवघडच होतं. पराभवाच्या थपडा बसल्या. टीका होतच होती. वर्षभराची बंदी वॉर्नर-स्मिथ यांची धावांची भूक रोखू शकली नाही.

स्मिथने 774 धावा चोपत ऑस्ट्रेलियासाठी प्रतिष्ठेच्या अशेस विजयात निर्णायक भूमिका बजावली. मार्नस लबूशेनच्या रुपात नवा तारा मिळाला. एक मिशन पूर्ण झालं होतं. 2019 मध्ये कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंडने वारू रोखल्यामुळे विश्वविजेतेपदाचं स्वप्न भंगलं.

ऑस्ट्रेलिया, क्रिकेट, वर्ल्डकप

फोटो स्रोत, Tom Jenkins

फोटो कॅप्शन, अॅशेस जिंकल्यानंतर

पुनरागमनाच्या प्रवासात भारतीय संघाने दोनदा येऊन लोळवलं. पहिल्या खेपेत चेतेश्वर पुजारा बोकांडी बसला. दुसऱ्या खेपेस मात्र अनुनभवी मंडळींनी कच्चं खाल्लं.

हे दोन्ही मालिका पराभव जिव्हारी लागणारे होते. घरच्या मैदानावर चीतपट होणं नामुष्की ओढवणारं असतं. एरव्ही वाचाळपणाला दमदार प्रदर्शनाची जोड असते. इथे फक्त वाचाळपणा राहिला, कामगिरी यथातथाच राहिली.

ट्वेन्टी20 जेतेपदासाठी

ट्वेन्टी20 प्रकार ऑस्ट्रेलिया गांभीर्याने घेत नाही असं नेहमी बोललं जातं. म्हणूनच 6 स्पर्धांनंतरही त्यांची झोळी रिकामी होती. ऑस्ट्रेलियाने विचारपूर्वक निर्णय घेतले.

आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाने डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून काढलं, संघातून वगळलं. हॉटेलात बसून सामना बघायला लावला. ऑस्ट्रेलियाने दुखावलेल्या वॉर्नरला साद घातली.

असेल हिंमत तर करून दाखव असा थेट मामला होता. वॉर्नरने 298 धावा करत, महत्त्वाच्या सामन्यात निर्णायक खेळी करत विश्वास सार्थ ठरवला.

ऑस्ट्रेलिया, क्रिकेट, वर्ल्डकप

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE

फोटो कॅप्शन, मॅन ऑफ द टूर्नामेंट डेव्हिड वॉर्नर

टेस्टचा बॉलर असा शिक्का बसलेल्या जोश हेझलवूडला आयपीएल स्पर्धेत चेन्नईकडून खेळू देणं ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर पडलं.

कारकीर्दीत दुखापतीमुळे जेवढं खेळलाय त्याच्या चौपट मिस केलेल्या मिचेल मार्शला यंदाच्या वर्षी तू ट्वेन्टी20 प्रकारात तिसऱ्या क्रमांकावर खेळशील असं सांगण्यात आलं.

फायनलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येत मार्शने साकारलेली खेळी आपल्यासमोर आहे. ट्वेन्टी20 प्रकाराला साजेसा नसूनही त्यांनी स्टीव्हन स्मिथवर विश्वास ठेवला.

शेन वॉर्ननंतर मालगाडी भरून स्पिनर्स ऑस्ट्रेलियाकडून खेळले. स्पिन आपलं अस्त्र असू शकतं हे अॅडम झंपाने दाखवून दिलं. धोनी आणि नंतर कोहलीच्या नेतृत्वात खेळलेला झंपा हा गेल्या 5 वर्षात सातत्याने सुधारणा करत गेलेल्या खेळाडूंपैकी एक आहे.

एकीकडे अलेक्स कॅरेचं विकेटकीपर ग्रूमिंग सुरू असताना मॅथ्यू वेडवर विश्वास दाखवला. कर्करोगाला पिटाळून लावलेल्या वेडला रंगाधळेपणही आहे.

प्लंबर आणि सुतार म्हणूनही काम केलेल्या वेडने या स्पर्धेतला बेस्ट बॉलर शाहीन शहा आफ्रिदीला रॅम्प शॉटने निष्प्रभ केलं.

ऑस्ट्रेलिया, क्रिकेट, वर्ल्डकप

फोटो स्रोत, Alex Davidson

फोटो कॅप्शन, जेतेपद पटकावल्यानंतर

पिळदार शरीरयष्टीमुळे हंक असं टोपणनावाने प्रसिद्ध मार्कस स्टॉइनसने अँड्यू सायमंड्सची आठवण करून दिली. सर्वसाधारण बॅटिंग करत असतानाही फिंचच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्यात आला. फिंचने यशस्वी मोट बांधली आणि ऑस्ट्रेलियाला ट्वेन्टी20 प्रकारातलं पहिलं जेतेपद पटकावून दिलं.

वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाला कमी लेखू नका असा इशारा जाणकार मंडळी देत होती. इंग्लंडविरुद्ध दारुण पराभवानंतर ऑस्ट्रेलिया जागं झालं आणि नंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही.

न्यू नॉर्मल नव्हे नॉर्मलच

कोरोनामुळे मास्क अनिवार्य झाला आणि फेस टू फेस भेटणंही. आपण घरकोंडले झालो. झूम बैठका प्रमाण झाल्या. उपदेशाच्या डोसांपेक्षा लशीचे डोस चर्चेत आले.

लालगबडू सिलिंडरऐवजी ऑक्सिजनचा सिलिंडर लागू लागला. बोबडी वळवणाऱ्या औषधांसाठीची धडपड. आपलं जगणं हरवलं आणि साहजिक जिंकणंही.

ऑस्ट्रेलिया विजयपथावर परतलंय. कोरोनाही माघारी जातोय हळूहळू. न्यू नॉर्मल जगण्यात ऑस्ट्रेलियाचा विजय नॉर्मलत्वावर मोहोर उमटवणारा आहे. कांगारू जिंकू लागलेत, आपणही हरवलेलं जगणं शोधायला हवं. जगायला जिंकण्याचं कोंदण द्यायला हवं…

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)