शेती : एक शास्त्रज्ञ आणि टीव्ही स्टारने शेतीच्या माध्यमातून बांगलादेशचं चित्र कसं बदललं?

शेती

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मुअज्जम हुसैन,
    • Role, बीबीसी बांग्ला, लंडनहून

टंगाईलमधील एका गावात शेड लावलेल्या एका घरासमोर शहरातून आलेले काही लोक उभे आहेत. शेतीचा दौरा करून आल्यानंतर ते थकले होते आणि आराम करत होते.

भातशेतीसाठी स्थानिक प्रकार चामराऐवजी अधिक उत्पादन देणाऱ्या भातशेतीचा आढावा घेण्यासाठी काही जण इथे आले आहेत.

एवढ्या शहरी लोकांना पाहून घरातून एक जण बाहेर आला. एवढी माणसं कुठून आली आहेत याची त्याला उत्सुकता होती. त्यांनी सांगितलं, "आम्ही बांगलादेश तांदूळ संशोधन संस्था म्हणजेच राईस रिसर्च इन्स्टिट्यूटचे लोक आहोत."

हे समजल्यावर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्याने माझी गळाभेट घेतली. तो म्हणाला, "अल्लाने तुम्हाला देवदूत म्हणून आमच्याकडे पाठवलं आहे. आम्हाला धक्का बसला, नेमकं काय चाललंय काहीच कळत नव्हतं."

ही घटना 1996 सालची आहे. जमुनावर पूल बांधण्यासाठी नदीचं पाणी नियंत्रित केलं गेलं आणि त्यामुळे हे क्षेत्र पूरमुक्त झालं. यापूर्वी इथे चामरा या एका स्थानिक प्रकारची भातशेती केली जात होती. हा तांदूळ पुराच्या पाण्यात पिकवला जात होता. तीन ते चार फूट पाण्यात पिकवला जाऊ शकतो. पण पीक कमी येत होतं. हा परिसर पूर मुक्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यापेक्षाही अधिक पीक देणाऱ्या तांदळाची शेती केली.

त्या शेतकऱ्याने डॉ. सलाम आणि त्यांच्या साथीदारांचा हात पकडून त्यांना घरात नेले. तो म्हणाला, "हे टिनच्या छताचे घर तुम्ही पाहत आहात ते मी भात लागवडीच्या विक्रीतून पैसे घेऊन बांधले आहे. माझ्या सात पिढ्या आतापर्यंत झोपडपट्टीतच राहत आल्या आहेत. चामरा भातलागवडीच्या वेळी आमच्याकडे खाण्यासाठी कधी अन्न असायचे कधी नसायचे. पण आता तुम्हीच पाहा माझ्याकडे किती तांदूळ आहे. तुम्ही आमचं आयुष्य बदललं."

शास्त्रज्ञ एम. ए. सलाम तरुणपणी हबीबगंजमधील एका प्रदर्शनात शेतीची माहिती घेताना

फोटो स्रोत, BRRI

फोटो कॅप्शन, शास्त्रज्ञ एम. ए. सलाम तरुणपणी हबीबगंजमधील एका प्रदर्शनात शेतीची माहिती घेताना

यशस्वी शास्त्रज्ञ म्हणून अनेक दशकं काम करत असताना माझ्या संपूर्ण कार्यकाळातील ही आतापर्यंतची सर्वात गोड आठवण आहे, असं डॉ. सलाम सांगतात.

ते पुढे म्हणाले, "आउस, आमन आणि बोरो - हे तीन प्रकार मिळून आता आमच्या देशात आता एकूण 11 ते 11.5 दशलक्ष हेक्टर जमिनीवर लागवड केली जाते. आता आम्हाला हेक्टरी सरासरी चार टन उत्पादन मिळते. यामुळे आता आम्ही अतिरिक्त धान तयार करू शकतो. हे होऊ शकलं नसतं तर आम्ही हेक्टरी फक्त दीड ते दोन टन भाताचे उत्पादन करू शकलो असतो, त्यामुळे बांगलादेशात 17 कोटी लोकांचं पोट भरणं अशक्य झालं असतं."

दुष्काळाच्या आठवणी

मैमनसिंग शहरातून जुनी ब्रह्मपुत्रा नदी ओलांडल्यानंतर चर ईश्वरदिया नावाचे गाव आहे. 1974 साली शरद ऋतू सुरू झाला आणि बांगलादेशला आपल्या इतिहासातील सर्वात भयंकर अन्न संकटाचा सामना करावा लागला होता, त्यावेळी या गावात अन्नाची प्रचंड कमतरता होती.

डॉ. एम. ए. सलाम

फोटो स्रोत, DR MA SALAM

फोटो कॅप्शन, डॉ. एम. ए. सलाम

या गावात राहणारी रशीदा त्यावेळी किशोरवयीन होती. जेवणासाठी दररोज तिला आपल्या घराजवळील लंगरखान्यात रांगेत उभं रहावं लागत असे.

रशीदा सांगते, "रांगेत बराच वेळ उभं राहूनही कधी पोळी मिळायची, तर कधी केवळ कणीक मिळायचे. जवळपास वर्षभर ही टंचाई भासली. तांदूळ उपलब्ध होता पण आमच्याकडे खरेदीसाठी पैसे नव्हते. म्हणून आम्ही पीठ, बटाटा हे पदार्थ आणून खायचो. कधी कधी तर उपाशी झोपायचो. कधी अरबीच्या हिरव्या पानांच्या भाज्या खायचो. आम्ही असेच दिवस काढले."

एम.ए. सलाम त्यावेळी चर ईश्वरदियाहून दहा किलोमीटर दूर बांगलादेश कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी होते. ते एका गरीब शेतकरी कुटुंबातून होते. ते ज्या कुटुंबासोबत तिथे राहत होते त्यांची परिस्थितीही अत्यंत वाईट होती.

रशीदा सांगते, "त्यांनी त्यावेळी जे केलं, ते मी कधीही विसरू शकणार नाही. त्यांना कितीही अडचणी आल्या तरी ते दररोज मला भात द्यायचे. ते स्वत: केवळ दलिया खायचे. ते माझ्यावर एवढं प्रेम करत होते."

एम ए सलाम यांनी कृषी शास्त्रज्ञ बनायचं स्वप्न पाहिलं होतं. ते लहान असतानाच त्यांच्या गरीब शेतकरी वडिलांनी त्यांना हे स्वप्न दाखवलं.

"मी तिसरीत शिकत होतो तेव्हा एकेदिवशी भात कापणीच्या हंगामात मी माझ्या वडिलांसोबत बैलगाडीतून शेतात धान घेण्यासाठी गेलो होतो. थोड्यावेळात माझ्या गालावरून घाम गळू लागला. माझे वडील मला म्हणाले, बघ हे किती मेहनतीचे काम आहे. तू शिक्षण घेतलेस तर तुला एवढी अंग मेहनत करावी लागणार नाही. तू चांगला राहिलास तर आम्हीही चांगले राहू." आपल्या बालपणीच्या या आठवणी सांगताना डॉ. सलाम यांचे डोळे पाणावले.

डॉ. एम ए सलाम आता बांगलादेशच्या सर्वात प्रमुख तांदूळ शास्त्रज्ञांपैकी एक आहेत. बांगलादेश राईस रिसर्च इन्स्टिट्यूशनने तांदळाचे जेवढे प्रकार विकसित केले आहेत त्यापैकी कमीत कमी 20 प्रकारांशी त्यांचा थेट संबंध आहे. त्यांच्या शोधामुळे बांगलादेशच्या शेतीचे चित्र बदलले आहे. मी ढाका येथील गुलशन याठिकणी असलेल्या एका संस्थेत त्यांच्याशी बोलत होतो. ते आता एका नवीन संशोधनात व्यस्त आहेत.

1977 मध्ये जेव्हा त्यांनी बांगलादेश राईस रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी सुरू केली, तेव्हा दुष्काळानंतर बांगलादेश समोर सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे देशाच्या प्रचंड लोकसंख्येसाठी अन्नधान्याची व्यवस्था कशी करायची याचा.

डॉ. सलाम सांगतात, "तेव्हा बांगलादेशातील लोक कदाचित दिवसातून एकदाच जेवत असत आणि तेही बहुधा भात खायचे."

भात हेच त्यांचे प्रोटीन होते आणि भात हेच त्यांचे जीवनसत्त्व होते. बांगलादेश ही तांदळाची भूमी आहे. पण तरीही भीषण दुष्काळ आणि दुःखद परिस्थिती होती.''

तांदळाचे उत्पादन कसे वाढवायचे हे सर्वात मोठे आव्हान भात संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांसमोर होते. डॉ. सलाम म्हणतात, "मी काम करायला सुरुवात केली तेव्हा आमच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी सांगितले की, आपल्याला हे करावेच लागेल. आम्ही या देशातील परिस्थिती बदलू अशी आमचीही प्रतिज्ञा होती."

बीआर-3 किंवा विप्लव

बांगलादेशात स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळात आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेने विकसित केलेला प्रयोग म्हणून 'ईरी-8' ह्या एका चांगलं उत्पादन देणाऱ्या भाताची लागवड केली जात होती.

कृषी प्रदर्शन

फोटो स्रोत, BRRI

परंतु बांगलादेशात या प्रकारच्या लागवडीची सर्वात मोठी समस्या म्हणजे शेतीचा काळा बराच मोठा होता. शिवाय बोरो हंगामात शेती करण्यासाठी जमिनीला सिंचनाची गरज असते आणि त्या वेळी बांगलादेशात आधुनिक सिंचन प्रणाली विकसित झाली नव्हती.

त्यानंतर राइस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी बांगलादेशातील स्थानिक लतीशाइल धान मिसळून संकरप्रजातीच्या प्रकारावरून बीआर-3 विकसित करण्याचा निर्णय घेतला. ज्याचे दुसरे नाव 'विप्लव' होते. परंतु धान लागवडीत अपेक्षित यश आणण्यातही त्यांना अपयश आले.

"मुख्य समस्या पिकाची प्रकाशाशी संवेदनशीलता होती. बांगलादेशात सामान्यत: लागवड केल्या जाणाऱ्या धानाच्या सर्व स्थानिक जाती प्रकाशाशी संवेदनशील होत्या. त्यामुळे लागवडीपासून ते कापणीपर्यंतचा काळ खूप मोठा होता. आता आमच्यासमोर आव्हान होते की, आपण स्थानिक प्रकारच्या धानापासून प्रकाश संवेदनशीलता कशी दूर करू शकतो."

1985 मध्ये एम.ए. सलाम याच संवेदनशीलतेच्या विषयावर पीएचडी करण्यासाठी फिलिपाईन्सला गेले. 1988 मध्ये ते परतले.

"आता आम्ही स्थानिक प्रकारच्या तांदळापासून फोटो पीरिएड संवेदनशीलता कशी काढून टाकू शकतो हे पाहण्याचा आमचा प्रयत्न सुरू झाला आहे. हे करता आलं तर तीन महिन्यांत धानाची लागवड करता येते. आम्हाला त्याचे विज्ञान माहीत आहे. ही पूर्णपणे अनुवांशिकता आहे."

ब्री -29 ने क्रांती आणली

भात संशोधनात बांगलादेशला हळूहळू यश मिळू लागले. एकापाठोपाठ एक तांदळाचे जास्त उत्पादन देणाऱ्या जाती येत असल्याने अन्न उत्पादन वाढू लागले.

सर्वांत मोठे यश नव्वदच्या दशकाच्या मध्यात मिळाले. तांदूळ संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या 'ब्री-28' आणि 'ब्री-29' धानाच्या जातींनी अखेर क्रांती घडवून आणली.

2006 साली भारतात आयोजित आंतरराष्ट्रीय भात परिषदेत सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञाचा पुरस्कार स्वीकारताना एम. ए. सलाम

फोटो स्रोत, DR M A SALAM

फोटो कॅप्शन, 2006 साली भारतात आयोजित आंतरराष्ट्रीय भात परिषदेत सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञाचा पुरस्कार स्वीकारताना एम. ए. सलाम

बांगलादेशातील वार्षिक धान उत्पादनाचे निम्मे उत्पादन आता केवळ या दोन तांदळांमधून येते. ब्री-28 मधून हेक्टरी पाच टनांपर्यंत उत्पादन होते आणि ब्री-29 मधून सहा टन प्रति हेक्टरपर्यंत उत्पन्न मिळते. हे प्रमाणित आहे.

डॉ. सलाम यांच्या आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी संशोधनांपैकी एक म्हणजे 'ब्री-50'. 2006 मध्ये शोधलेल्या या तांदळाच्या प्रजातीचे लोकप्रिय नाव बंगलामती आहे. या तांदळाचा सुगंध बासमतीसारखा आहे. डॉ. एम ए सलाम यांना तांदूळ संशोधनातील योगदानाबद्दल 2006 मध्ये भारतात झालेल्या आंतरराष्ट्रीय तांदूळ काँग्रेसमध्ये सर्वोत्कृष्ट वैज्ञानिकाचा पुरस्कार मिळाला.

शेख सिराज

बांगलादेशातील शेतीच्या आधुनिकीकरणाचा पहिला प्रयत्न 1960 मध्ये कुमिल्ला ग्रामीण विकास अकादमीमध्ये करण्यात आला. त्याचे संस्थापक, अख्तर हमीद खान यांनी प्रायोगिक तत्त्वावर जपानमधून आणलेल्या धानाच्या प्रगत जातींची लागवड सुरू केली.

मात्र, या भातशेतीसाठी कृत्रिम सिंचनाची गरज होती. त्यामुळे गावात ट्यूबवेल बसवण्यात आल्या.

शेख सिराज यांच्या शेतीविषयक कार्यक्रमाचीही शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यात मोठी भूमिका राहिली.

फोटो स्रोत, TANBHIR ASHIK

फोटो कॅप्शन, शेख सिराज यांच्या शेतीविषयक कार्यक्रमाचीही शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यात मोठी भूमिका राहिली.

"ज्यावेळी भूगर्भातून ट्यूबवेलच्या सहाय्याने पाणी काढले जात होते, तेव्हा काही गावकरी घाबरून पळून गेले होते. हे अल्लाविरुद्ध आहे असे त्यांनी मानले. सुरुवातीला शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाबाबत त्यांचा दृष्टिकोन कसा होता हे यावरून लक्षात येते," असं शेख सिराज म्हणाले.

ते बांगलादेशी टेलिव्हिजनचे अतिशय लोकप्रिय सादरकर्ता आहेत. गुडघ्यापर्यंत दुमडलेली पँट, त्यांचा ट्रेडमार्क हिरवा शर्ट आणि हातात कॅमेरा घतलेले शेख सिराज आता बांगलादेशात कुठेही गेले तरी शेतकरी त्यांचं स्वागत करतात.

परंतु त्यांनी बांगलादेशच्या राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर पहिल्यांदा शेतीवर कार्यक्रम सुरू केला तेव्हा परिस्थिती खूपच प्रतिकूल होती.

ते म्हणाले, "तेव्हा आम्ही मोठे कॅमेरे घेऊन गावोगावी जायचो, ते पाहून लोक घाबरायचे. त्यांना ती तोफ वाटायची. ते मायक्रोफोनला बंदुकीची नळी समजायचे. तेव्हा गावं सामाजिकदृष्ट्या खूप मागासलेली होता. लोक इतके लाजाळू होते की त्यांना कॅमेऱ्यासमोर बोलण्यासाठी समजवणं कठीण होतं."

'माटी ओ मानुष'

गेल्या काही दशकांमध्ये बांगलादेशच्या कृषी क्षेत्रात झालेल्या बदलांमागे प्रमुख व्यक्तींचे नाव घेताना शेख शिराज यांचा उल्लेख केला जातो. बांगलादेशात जेव्हा शास्त्रज्ञ एकापाठोपाठ एक नवीन उच्च उत्पादन देणार्‍या तांदळाच्या जातींचा शोध लावत होते, तेव्हा सरकारकडून लोकांना शेतीतील नवीन पद्धती आणि माहितीची ओळख करून देण्यासाठी विविध प्रयत्न केले जात होते.

शेख सिराज यांचा कृषी कार्यक्रम 'माटी ओ मानुष'ने माहितीचा प्रसार करण्यात मोठी भूमिका बजावली.

शेख सिराज यांनी शेतीविषयक टीव्ही कार्यक्रमासाठी संपूर्ण बांगलादेश पालथा घातला आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या कहाण्या समोर आणल्या.

फोटो स्रोत, S M NASIR

फोटो कॅप्शन, शेख सिराज यांनी शेतीविषयक टीव्ही कार्यक्रमासाठी संपूर्ण बांगलादेश पालथा घातला आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या कहाण्या समोर आणल्या.

ते सांगतात, "सुरुवातीला या कार्यक्रमाचे नाव 'अमर देश' असे होते. नंतर हा 50 मिनिटांचा पाक्षिक कार्यक्रम होता. नंतर मी तो 'माटी ओ मानुष' या साप्ताहिक कार्यक्रमात बदलला. मला वाटले की बांग्लादेशातील शेतकऱ्यांना करमणुकीच्या कार्यक्रमांपेक्षा शैक्षणिक आणि प्रेरक कार्यक्रमांची जास्त गरज आहे. नवीन बियाणे, नवीन धोरणे आणि नवीन कौशल्ये शेतकऱ्यांना योग्य प्रकारे समजावून सांगितल्यास कृषी क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणे शक्य आहे."

गेल्या चार दशकांपासून शेख सिराज हे बांगलादेशातील शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक माहिती देण्यासाठी मुख्य स्त्रोत राहिले आहेत. 1980 च्या दशकात, जेव्हा टेलिव्हिजन प्रत्येक घरात पोहोचले नव्हते, तेव्हा लोक दर शनिवारी संध्याकाळी गावातील बाजारपेठांमध्ये आणि समुदाय केंद्रांमध्ये 'माटी ओ मानुष' कार्यक्रम पाहण्यासाठी जमत असत.

दरम्यान, त्या काळात शेतकऱ्यांना शेतीच्या नवीन पद्धती अवलंबण्यासाठी प्रोत्साहन देणं सोपं नव्हतं.

शेख सिराज

फोटो स्रोत, TANBHIR ASHIK

ते पुढे सांगतात, "आजचे शेतकरी आणि तीस वर्षांपूर्वीचे शेतकरी यांच्यात खूप फरक आहे. शेतीच्या संवर्धनासाठी काम करणारे तेव्हाचे अधिकारी काय म्हणायचे किंवा मी टेलिव्हिजन प्रेझेंटर म्हणून जे काही सांगायचो ते त्यांना सहज मान्य नव्हतं. त्यांना वाटायचं की ह्यांचं ऐकलं आणि अपेक्षित पीक आलं नाही तर? म्हणून ते सहजासहजी प्रेरित होत नव्हते. त्यांना नवीन तंत्रज्ञान लगेच स्वीकारायचे नव्हते."

"80 च्या दशकात जेव्हा मी जास्त उत्पादन देणार्‍या भाताच्या नवीन जातींबद्दल बोलायचो, गव्हाबद्दल बोलत होतो तेव्हा त्यांनी मला अगदी स्पष्ट सांगितलं की, ते हा रबरी भात खाणार नाहीत. तांदळाचा दर्जा तितकासा चांगला नव्हता. शिजवलेला भात रबरासारखा होता, भात ताटात देतानाही तो रबरासारखा पडायचा."

पण शास्त्रज्ञ संशोधनात नवनवीन यश मिळवत असताना शेख सिराज यांनीही आपल्या कार्यक्रमांद्वारे शेतकऱ्यांची मने जिंकण्यासाठी नवनवीन रणनीती अवलंबली.

भाषेत बदल

ते सांगतात, "बांगलादेशच्या टेलिव्हिजन कार्यक्रमात त्यावेळी प्रमाण भाषेत बोलावे लागायचे. गावातील लोकांशी अंतर वाढत चाललं आहे हे मला कळत होतं. काही शेतकऱ्यांना मी जे सांगतोय ते समजत होते, काहींना समजत नव्हते. दुसऱ्या बाजूला मी जेव्हा शेतकऱ्यांशी बोलायचो तेव्हा ते आपलं म्हणणं नीट समजवू शकत नव्हते."

भात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बांगलादेशात अन्न धान्याचं उत्पादन स्वातंत्र्यानंतर तीन पटींनी वाढलं आहे.

टेलिव्हिजन कार्यक्रमात शेख शिराज यांनी आपल्या भाषेत बदल केला. गावकऱ्यांसोबत त्यांच्या भाषेत त्यांनी चर्चा सुरू केली. आपल्या वेशभूषेतही त्यांनी बदल केला. फॅशनेबल शहरी कपड्यांची जागा आता वर्तमानातील ट्रेडमार्क असलेल्या त्यांच्या हिरव्या रंगाच्या शर्टने घेतली.

कॅमेऱ्यासमोर आता केवळ तेच उभे राहत नाहीत तर गावातील सामान्य शेतकरी, मजूर, महिला शेतकऱ्यांशी ते चर्चा करताना दिसतात.

ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धापासून परिस्थिती झपाट्याने बदलू लागली. जागतिक बँकेनुसार, बांगलादेश गेल्या काही दशकांतील कृषी क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उत्पादकतेचे एक उत्तम उदाहरण आहे. केवळ एका देशाने त्यापेक्षा जास्त शेती केली आहे आणि तो देश चीन आहे.

शेख सिराज म्हणाले, "प्रत्येकाला तेव्हापासून एक गोष्ट समजू लागली ती म्हणजे लोकांची अन्न सुरक्षा सुनिश्चित करावी लागेल. आज आमच्या स्वातंत्र्याच्या 50 व्या वर्धापनदिनी आम्ही अभिमानाने सांगू शकतो की लोकांचा मृत्यू भूकेने होत नाहीय. यात सर्वात मोठी भूमिका बांगलादेशच्या शेतकऱ्यांची आहे. ते या यशाचे खरे नायक आहेत."

बीएडीसीचे योगदान

शेतीत नवे शोध लागले, लोकांना नवे तंत्रज्ञान दिले गेले, शेतकरीही त्यांचा अवलंब करू लागले. पण पीक घेण्यासाठी त्यांना आणखी बऱ्याच गोष्टींची आवश्यकता होती. शेख सिराज सांगतात, बांगलादेशातील सरकारची सहाय्यक नीती आणि बीएडीसी (बांगलादेश कृषी विकास महामंडळ) अशा संस्थांनी या दिशेने मोठी भूमिका बजावली.

शेती

फोटो स्रोत, MUNIR UZ ZAMAN

ते म्हणाले, "बांगलादेशात आजच्या सिंचन पायाभूत सुविधा बीएडीसीद्वारा बांधल्या आहेत. आज बियाणांची उत्पादकता, देशभरातील शेतकऱ्यांना मिळणारी बियाणे बीएडीसीच्या माध्यमातून दिली जातात."

"जर सरकारने कमी किंमतीत अनुदानित खते दिली नसती, तर शेतीला हे यश मिळाले नसते," असंही ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत युरिया खताची किंमत बांगलादेश सरकारने पुरविलेल्या अनुदानित खतांच्या किंमतीच्या निम्मी आहे. "बांगलादेशातील शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळत नसली तरी ते भातशेती का करतात? कारण त्यांना कमी किमतीत कृषी उपकरणं मिळतात," असं शेख सिराज म्हणाले.

हिरव्या भाज्यांच्याबाबतीतही क्रांती

केवळ धान उत्पादनातच नव्हे तर सर्व प्रकारच्या अन्नउत्पादनातही बांगलादेश यशस्वी झाला आहे. "आता अनेक प्रकारचे पीक ते घेतात. गोड्या पाण्याच्या मत्स्यपालन क्षेत्रात क्रांती झाली आहे. या बाबतीत बांगलादेश आता जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे.

गावांमध्ये गायींची शेती आहे, कुक्कुटपालन शेती आणि कोंबड्यांचे पोल्ट्री फार्म आहे. एकूणच बांगलादेशच्या शेतीत मोठी क्रांती झाली आहे."

शेख सिराज आणि त्यांच्या दूरचित्रवाणी कार्यक्रमांनी या क्रांतीत एक महत्त्वपूर्ण काम केलं आहे.

ईश्वर दिया येथील कालिकपूरमध्ये बांगलादेश सरकारच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी किती भाज्या पिकवता येतील हे दाखवण्यासाठी 16 फूट पट 12 फूट जमिनीवर सहा बेड्स बांधून दाखवले. तिथे किती प्रकारच्या भाज्या पिकवल्या जाऊ शकतात. प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावण्यात आल्या होत्या. यामुळे वर्षभर कुटुंबाचे पोषण होऊ शकेल हे त्यांना दाखवण्यात आलं.

"तेव्हा एवढ्या भाज्या उगवल्या जात नव्हत्या. शेतकर्‍यांच्या अंगणातही इतक्या भाज्या नव्हत्या. मी दूरचित्रवाणीवर त्याचे विस्तृत प्रसारण केले." असं शेख सिराज सांगतात.

याने काय बदल घडला याबाबत शेख सिराज यांना शंका नाही.

ते म्हणाले, "स्वातंत्र्यानंतर गावातील सामान्य शेतकऱ्याला जेवणासाठी भात एवढाच खाद्यपदार्थ माहिती होता. त्यासोबत खाण्यासाठी हिरवी मिरची आणि मीठ. आज बांगलादेशात गावातील लोकांच्या ताटात भात, थोडी भाजी, थोडे मासे. मांसचा एक तुकडाही असतो. तेच हे पिकवत आहेत. याला गेल्या 50 वर्षातील बांगलादेशातील एक मोठा बदल मी मानतो."

टेलिव्हिजनसोबत यूट्यूबवरही

शेख शिराज आजही 'हृदाये माटी ओ मानुष' (हृदयात माती आणि माणसं) नावाचा एक कृषी कार्यक्रम नियमित करतात. या कार्यक्रमासाठी कृषी क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना बांगलादेश स्वतंत्रता पुरस्कार, एकुशे पदक आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ते बांगलादेशचे चॅनेल आय टेलिव्हिजनच्या निर्देशकांपैकी एक आहेत.

आताच्या आधुनिक युगात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी टेलिव्हिनजसोबत ते यूट्यूब आणि इतर सोशल मीडियाचा वापरही करत आहेत. यूट्यूबवर ते बांगलादेशीताल सर्वात मोठ्या सेलिब्रिटीपैंकी एक आहेत. त्यांच्या यूट्यूब चॅनेलला 27 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.

ते सांगतात, "पाच वर्षांपूर्वी मी गावी जायचो तेव्हा शेतकरी म्हणायचे तुम्हाला टेलिव्हिजनवर पाहिलं. आता गावी गेल्यावर शेतकरी म्हणतात तुम्हाला यूट्यूबवर पाहिलं, मोबाईलवर पाहिलं."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)