बांगलादेशात 1971 साली आम्हाला हिंदू धर्म सोडून मुसलमान व्हावं लागलं कारण....

सचिंद्र चंद्र आईच यांचं कुटुंब

फोटो स्रोत, FAMILY PHOTO ALBUM OF SACHINDRA CHANDRA

    • Author, सईद-उल-इस्लाम
    • Role, बीबीसी बांगला, ढाका.

1971 च्या काळात मुक्तीसंग्रामादरम्यान बांग्लादेशात अनेक हिंदूंना आपला जीव वाचवण्यासाठी धर्मांतर करावं लागलं होतं. जीव वाचवण्यासाठी त्यांना ते दिवस मुस्लीम असल्याचे दाखवून घालवावे लागले होते.

सचिंद्र चंद्र आईच यांच्या कुटुंबालाही 1971 दरम्यान अशाच एका भयानक अनुभवातून जावं लागलं होतं.

इंग्रजी विषयाचे शिक्षक असलेल्या सचिंद्र यांना त्यावेळी सर्वजण सचिन सर म्हणून ओळखत असत. त्यावेळी ते मेमनसिंह सिटी कॉलेजमध्ये शिकवत असत.

सचिंद्र चंद्र आईच यांनी बीबीसी बांगलाशी बोलताना आपल्या आठवणी सांगितल्या.

त्यावेळी 25 मार्च 1971 नंतर त्यांच्या शहरात हिंदू आणि अवामी लीगच्या कार्यकर्त्यांच्या हत्या, घरांची जाळपोळ सुरू झाली होती.

हिंदू समाजातील सर्वच जण यांमुळे पीडित होते. जिवाच्या भीतीने नंतर अनेकजण आपल्या गावीही निघून गेले होते.

युद्धाच्या सुरुवातीच्या काळात 31 मार्चला आम्ही सगळे शिवरामपूर गावी निघून गेलो होतो. गावात अनेक दिवस राहिल्यानंतर आमच्याकडचे पैसेही संपले होते. आपल्या मुस्लीम मित्रांच्या मदतीने पुन्हा शहरात परतलो. काही काळ मुस्लीम विद्यार्थ्यांच्या घरी राहिलो.

जीव आणि नोकरी वाचवण्यासाठी धर्मांतर

सिटी कॉलेजामध्ये कार्यरत असूनही केवळ हिंदू असल्यामुळे सचिंद्र चंद्र त्याठिकाणी जाऊ शकत नव्हते.

त्यावेळी तिथं प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्राध्यापकांनी मला म्हटलं, तुम्ही कॉलेजला कसं जाणार आहात? तिथं हिंदूंना कुणीच सहन करून घेणार नाही."

सचिंद्र चंद्र आईच

फोटो स्रोत, FAMILY PHOTO ALBUM OF SACHINDRA CHANDRA

फोटो कॅप्शन, सचिंद्र चंद्र आईच

आईच सांगतात, "या परिस्थितीमुळेच आम्हाला आमचा जीव आणि नोकरी वाचवण्यासाठी नाईलाजाने मुस्लीम धर्म स्वीकारावा लागला. मी बडी मस्जीद याठिकाणी जाऊन सहकुटुंब मुस्लीम धर्म स्वीकारला. त्यानंतर मी पुन्हा नोकरीवर जाण्यास सुरुवात केली होती."

त्यावेळी सचिंद्र स्वतः, त्यांची पत्नी, आई-वडील तसंच बहीण या सर्वांनीच इस्लाम धर्म स्वीकारला.

त्यांची बहीण कनन सरकारने बीबीसी बांगलाशी बोलताना म्हटलं, "धर्मांतर केल्यानंतरही आम्हाला काही समस्यांना तोंड द्यावं लागलं. विविध प्रकारच्या दबावांमुळेच आम्हाला धर्मांतर करावं लागलं होतं. दबाव म्हणजे त्यासाठी थेट कुणी दबाव टाकला नाही. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की आम्हाला नाईलाजाने धर्मांतर करणं भाग पडलं."

आमच्या एका नातेवाईकाला पकडण्यासाठी पाकिस्तानींनी जंग-जंग पछाडले होते. त्यांची एकदा आमच्याशी भेट झाली.

ते आम्हाला म्हणाले, "जिवंत राहण्याची इच्छा असेल, तर मुस्लीम धर्म स्वीकारा. मीसुद्धा मुस्लीम बनलो आहे."

त्यावेळी आम्ही गावात होतो. नंतर आम्ही गावातून पुन्हा शहरात परतलो. शहरात आल्यानंतर त्या काळी आम्ही घरातूनही बाहेर पडू शकत नव्हतो. भाऊसुद्धा कॉलेजमध्ये नोकरीवर जाऊ शकत नव्हते. इस्लामी कार्ड बनवल्याशिवाय लोकांना घरातून बाहेरही पडता येणार नाही, असंच सगळीकडे सांगितलं जात होतं. आम्ही घरातच अडकून पडलो होतो. कोणताच मार्ग उपलब्ध नव्हता. अशा प्रकारे कैदेत किती दिवस राहू शकतो?"

"यानंतर आम्ही आई-वडिलांना समजावलं. आधी जिवंत राहू. नंतर धर्माचा हिशोब करता येईल. यानंतर आम्ही सर्वांनीच धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला."

धर्मांतर केल्यानंतरही ठेवली पाळत

सचिंद्र चंद्र आईच यांच्या कुटुंबीयांनी धर्मांतर केल्यानंतरही त्यांना सुटकेचा निःश्वास सोडता आला नाही. पुढचा काही काळही बिकटच होता.

कनन सरकार

फोटो स्रोत, FAMILY PHOTO ALBUM OF KANAN SARKAR

फोटो कॅप्शन, कनन सरकार

कनन सरकार सांगतात, "आम्ही धर्मांतर केल्यानंतरही पूर्णपणे शांततेने जगलो, असंही घडलं नाही. आमच्यावर विविध प्रकारे दबाव यायचा. एकदा आमच्या लहान भावाला पकडून नेलं जाणार आहे, अशी चर्चा आम्ही ऐकली. ते टाळण्यासाठी आम्ही खूप धावपळ केली होती."

त्या म्हणाल्या, "रमजानच्या काळात महिला आमच्या घरात घुसायच्या. आमचं जेवण, भात यांची भांडी ते उलथवून द्यायच्या. अरे, तुम्ही तर रोजा पाळतच नाही, असं त्या सतत म्हणायच्या."

हिंदू विवाहित महिलेसाठी सिंदूर लावणं महत्त्वाचं मानलं जातं. पण बांगलादेश स्वतंत्र होईपर्यंत आम्ही सिंदूर लावणं बंद करून टाकलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.

मुस्लीम धर्म स्वीकारल्यानंतरही आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी घरं बदलत राहावं लागलं होतं. त्यावेळी ते वेगवेगळ्या मुस्लीम विद्यार्थ्यांच्या घरात लपून राहत असत. सोन्याचे तसंच इतर मौल्यवान दागिने आणि वस्तू ते त्यांच्याच घरात लपवून ठेवत असं सचिंद्र चंद्र आईच म्हणाले.

स्वतःला मुस्लीम सिद्ध करण्यासाठी त्यांना वारंवार मशिदीत जाऊन नमाजपठण करावं लागत असे.

त्यावेळी सचिंद्र यांना नमाज पढण्याबाबत विशेष अशी माहिती नव्हती. पण इतरांना पाहत ते त्यांचं अनुकरण करायचा प्रयत्न करत असत.

ते सांगतात, "पहिल्या दिवशी मला हात-पाय धुणं शिकवण्यात आलं. इतरांना पाहून त्याप्रकारे बसत जा, असं मला सांगितलं जायचं. त्यावेळी मी दर शुक्रवारी मशिदीत जात असायचो. कधी-कधी तर दिवसातून पाचवेळाही मी नमाज पढण्यासाठी गेलो आहे."

रमजानच्या काळात पहिले काही दिवस मी रोजा पाळला. पण मला ते सहन व्हायचं नाही. त्यामुळे फक्त बाहेर असताना मी ते पाळल्याचं भासवत असे, असं ते म्हणाले.

मुस्लीम ओळखीसह सचिंद्र चंद्र आईच यांनी नोकरीला जाणं सुरू केलं. त्यानंतर त्यांना एक ओळखपत्र देण्यात आलं होतं. शहरात विविध ठिकाणच्या नाकाबंदीच्या ठिकाणी ते मुस्लीम ओळखपत्र दाखवावं लागत असे.

ते म्हणतात, "एखादा पाकिस्तानी पंजाबी समोर आल्यानंतर तो हमखास आम्हाला विचारायचा, तू हिंदू आहेस की मुस्लीम? मी उत्तर द्यायचो, मुस्लीम. त्यानंतर ते मला सुरा म्हणून दाखवण्यास सांगायचे. मी सुरा फातिहाचं पाठांतर करून ठेवलं होतं. ते म्हणून दाखवल्यानंतर ते तिथून जाण्याची परवानगी द्यायचे."

धर्मांतराच्या कटू आठवणी

सचिंद्र आईच म्हणाले, "बांगलादेश स्वतंत्र झाला, तेव्हा असं वाटलं की आम्हाला आमचा धर्मच परत मिळाला."

"देश स्वतंत्र झाल्यानंतर आजूबाजूला राहणाऱ्या मुस्लीम महिला धावत आमच्या घरी आल्या माझी पत्नी, आई आणि बहीण यांच्या माथ्यावर सिंदूर लावला. आम्ही त्यानंतर पुन्हा हिंदू झालो," असं ते म्हणाले.

कनन सरकार म्हणतात, देश स्वतंत्र झाल्यानंतर आम्ही धर्मांतराच्या कटू आठवणी विसरून गेलो. पुन्हा आपला धर्म परत मिळाल्याची जाणीव आम्हाला झाली.

त्या म्हणतात, हिंदू धर्मात परतल्यानंतर आम्हाला कोणत्याही प्रकारचे नियम-कायदे किंवा कोणतंही प्रायश्चित यांच्यातून जाण्याची आवश्यकता भासली नाही.

सचिंद्र चंद्र आईच म्हणतात, "जर देश स्वतंत्र झाला नसता, तर कदाचित आमचं अस्तित्व कायमचं पुसलं गेलं असतं."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)