ICC T20-World Cup : ट्वेन्टी20 विश्वचषकासाठी हे आहेत भारतीय शिलेदार

भारतीय संघ, ट्वेन्टी20 विश्वचषक, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी

फोटो स्रोत, Kai Schwoerer

फोटो कॅप्शन, कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा

भारतीय संघाने 2007 मध्ये पहिल्यावहिल्या ट्वेन्टी20 विश्वचषकाचं जेतेपद पटकावलं होतं. मात्र त्यानंतर जेतेपदाने भारताला हुलकावणी दिली आहे.

5 फलंदाज, 1 यष्टीरक्षक, 3 फिरकीपटू, 3 अष्टपैलू आणि 3 गोलंदाज अशी संतुलित रचना असलेला संघ निवडसमितीने विश्वचषकासाठी निवडला आहे. विश्वचषकात के.एल. राहुल आणि रोहित शर्मा सलामीला येतील असं कर्णधार विराट कोहलीने सराव सामन्याच्या नाणेफेकीदरम्यान सांगितलं.

इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात रोहित शर्माला विश्रांती देण्यात आल्याने इशान किशनला संधी मिळाली.

यंदा भारताचा पहिला सामना पाकिस्तानबरोबर 24 ऑक्टोबरला होणार आहे.

विराट कोहली (कर्णधार)

ट्वेन्टी-20 प्रकारात प्रचंड सातत्यासह धावा करण्यासाठी विराट कोहली प्रसिद्ध आहे. 2014 आणि 2016 ट्वेन्टी20 विश्वचषकात कोहलीने मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार पटकावला आहे.

ट्वेन्टी-20 प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट अव्वलस्थानी आहे. ट्वेन्टी20 क्रमवारीत विराट प्रदीर्घकाळ अव्वलस्थानी होता.

सध्याच्या घडीला या क्रमवारीत कोहली चौथ्या स्थानी आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत कोहली अव्वल स्थानी आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला आयसीसी स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. ट्वेन्टी20 विश्वचषकानंतर कोहलीने भारताच्या ट्वेन्टी20 प्रकाराचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसी स्पर्धेचं जेतेपद पटकावत कर्णधारपद दिमाखात सुपुर्द करण्याची संधी कोहलीकडे आहे.

रोहित शर्मा

हिटमन नावाने प्रसिद्ध रोहित शर्मा धुवांधार खेळींसाठी प्रसिद्ध आहे. संघाचा उपकर्णधार असलेल्या रोहित शर्मावर संघाला दमदार सलामी देण्याची जबाबदारी आहे. वय, अनुभव आणि कर्तृत्व या तिन्ही आघाड्यांवर रोहितने स्वत:ला सिद्ध केलं आहे.

उत्तम स्ट्राईकरेट, चौकार-षटकार लगावण्याची क्षमता, भागीदारी करत डावाला आकार देण्याची हातोटी हे रोहितच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे.

रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने पाचवेळा आयपीएल जेतेपदावर नाव कोरलं आहे.

ट्वेन्टी20 प्रकारात रोहितच्या नावावर चार शतकं आहेत. महिनाभरापूर्वी आटोपलेल्या इंग्लंड दौऱ्यात रोहितने शतक झळकावलं होतं. मात्र रोहितला हा फॉर्म आयपीएलमध्ये कायम राखता आला नाही.

के.एल.राहुल

ऑल फॉरमॅट स्पेशालिस्ट राहुल हा ट्वेन्टी20 प्रकारात भारताचा आधारस्तंभ आहे. संघाच्या गरजेनुसार कुठल्याही क्रमांकावर खेळण्याची क्षमता राहुलकडे आहे. भात्यात सर्व प्रकारचे फटके असणारा राहुल अत्यंत कमी वेळात मोठी खेळी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आवश्यकता भासल्यास राहुल यष्टीरक्षणही करतो.

भारतीय संघ, ट्वेन्टी20 विश्वचषक, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी

फोटो स्रोत, Gareth Copley

फोटो कॅप्शन, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह

आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी20 क्रमवारीत राहुल अव्वल दहा खेळाडूंमध्ये आहे. इंग्लंड दौऱ्यातला फॉर्म कायम राखत आयपीएल स्पर्धेत धावांची टांकसाळ उघडून ट्वेन्टी20 विश्वचषकासाठी सज्ज असल्याचं राहुलने सिद्ध केलं.

सूर्यकुमार यादव

वयाच्या तिशीत भारतासाठी वनडे आणि ट्वेन्टी-20 पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमारकडे डोमेस्टिक क्रिकेटचा आणि आयपीएल स्पर्धेचा प्रदीर्घ अनुभव आहें.

मात्र विश्वचषकात खेळण्याचा त्याचा हा पहिलाच अनुभव असणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्ससाठी खेळताना सूर्यकुमारने विविध क्रमांकावर फलंदाजी केली आहे.

ऋषभ पंत

महेंद्रसिंग धोनीचा वारसदार म्हणून ऋषभ पंतकडे पाहिलं जातं. वादळी खेळींसाठी प्रसिद्ध ऋषभने अतिशय लहान वयात मोठं नाव कमावलं आहे.

टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी20 प्रकारात ऋषभने तडाखेबंद खेळी करत छाप उमटवली आहे. कारकीर्दीत सुरुवातीला ऋषभच्या यष्टीरक्षणात काही त्रुटी होत्या, मात्र गेल्या दोन वर्षांत ऋषभने यावर मेहनत घेत अमूलाग्र बदल केला आहे.

भारतीय संघ, ट्वेन्टी20 विश्वचषक, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी

फोटो स्रोत, DIBYANGSHU SARKAR

फोटो कॅप्शन, ऋषभ पंत

आव्हानात्मक खेळपट्टीवर तसंच दर्जेदार गोलंदाजीसमोर ऋषभ अडखळताना दिसतो. अनोखे फटके खेळताना त्याने विकेट गमावणं संघाला परवडणारं नाही. विश्वचषकात यष्टीरक्षणाची जबाबदारी ऋषभकडे असेलच पण त्याच बरोबरीने कमीत कमी चेंडूत वेगवान खेळी करणंही त्याच्याकडून अपेक्षित आहे. निवड समितीने मोजक्याच फलंदाजांची निवड केल्याने ऋषभच्या खांद्यावर दुहेरी जबाबदारी आहे.

इशान किशन

आक्रमक फटकेबाजी आणि यष्टीरक्षण या दोन गुणांमुळे इशानची संघात निवड झाली आहे. अनुभवी शिखर धवन ऐवजी निवड समितीने इशानच्या नावाला प्राधान्य दिले आहे. रोहित शर्माच्या बरोबरीने इशान सलामीला येऊ शकतो.

भारतीय संघ, ट्वेन्टी20 विश्वचषक, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी

फोटो स्रोत, Surjeet Yadav

फोटो कॅप्शन, इशान किशन

गुजरात लायन्स, मुंबई इंडियन्स संघासाठी खेळताना इशानने जोरदार फटकेबाजीचा प्रत्यय घडवला आहे. आवश्यकता भासल्यास यष्टीरक्षणही करू शकत असल्याने इशानच्या नावावर मोहोर उमटवण्यात आली. विश्वचषकात खेळण्याचा इशानचा हा पहिलाच अनुभव असणार आहे.

रवींद्र जडेजा

आक्रमक फलंदाजी, काटेकोर फिरकी आणि भन्नाट क्षेत्ररक्षकयामुळे जडेजा संघात असणं भारतीय संघासाठी अतिशय फायदेशीर आहे. टेस्ट, वनडे आणिट्वेन्टी20 अशा तिन्ही प्रकारांचा दांडगा अनुभव जडेजाकडे आहे. टिच्चून मारा करत भराभर षटक टाकण्यात तरबेज. जडेजाच्या गोलंदाजीवर धावा लुटणं फलंदाजांना अवघड जातं.

भागीदारी तोडण्यात कुशल. जडेजाची फलंदाजी दिवसेंदिवस परिपक्व होत चालली आहे. क्षेत्ररक्षण करताना जडेजा किमान दहा धावा वाचवतो.

अशक्य असे झेल टिपण्यात वाकबगार. चेन्नई सुपर किंग्सच्या चौथ्या आयपीएल जेतेपदात जडेजाचा सिंहाचा वाटा होता. जडेजा उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि त्याचा फायदा भारतीय संघाला होईल.

हार्दिक पंड्या

स्फोटक फटकेबाजी, भागीदारी तोडण्यात प्रवीण असा गोलंदाज आणि अफलातून क्षेत्ररक्षक या गुणवैशिष्ट्यांमुळे हार्दिकचं संघात असणं महत्त्वाचं आहे.

पण दुखापतीने त्रस्त असल्यामुळे हार्दिक इंग्लंड दौऱ्यावर जाऊ शकला नाही. नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत तो मुंबई इंडियन्ससाठी काही सामने खेळला मात्र तो गोलंदाजी करू शकला नाही.

भारतीय संघ, ट्वेन्टी20 विश्वचषक, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी

फोटो स्रोत, Cameron Spencer

फोटो कॅप्शन, हार्दिक पंड्या गोलंदाजी करू शकणार नसेल तर भारतीय संघाला डावपेचात बदल करावे लागतील.

हार्दिक अंतिम अकरात असेल तर संघाला संतुलन मिळतं आणि अतिरिक्त गोलंदाज किंवा फलंदाज खेळवता येतो. विशेषज्ञ फलंदाज म्हणून हार्दिक खेळू शकतो. परंतु सध्या तो धावांसाठी झगडताना दिसत आहे. अशा परिस्थितीत हार्दिकला संघातस्थान मिळणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

शार्दूल ठाकूर

हार्दिक पंड्या गोलंदाजी करू शकणार नसेल तर संघात बॉलिंग ऑलराऊंडर हवा या दृष्टिकोनातून निवडसमितीने अगदी शेवटच्या क्षणी राखीव खेळाडूंमध्ये निवड झालेल्या शार्दूलला मुख्य संघात पाचारण केलं. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यात दडपणाच्या क्षणी गोलंदाजी आणि फलंदाजीत शार्दूलने शानदार कामगिरी केली आहे.

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईसाठी शार्दूलने अनेक वर्ष चांगली कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएलचं चौथं जेतेपद पटकावलं. या यशात शार्दूलचा मोठा वाटा आहे.

आयपीएलच्या अंतिम लढतीत वेंकटेश अय्यरला बाद करत शार्दूलनेच चेन्नईच्या विजयाचा पाया रचला होता. दबाव असतानाही अतिशय आत्मविश्वासाने खेळण्याचं दुर्मीळ कौशल्य शार्दूलकडे आहे. वेगवान गोलंदाजी आणि उपयुक्त फलंदाजी यामुळे निवडसमितीने अक्षर पटेलऐवजी शार्दूलच्या नावाला पसंती दिली आहे. 

रवीचंद्रन अश्विन

विश्वचषक संघातील सगळ्यात चकित करणारी निवड अश्विनची ठरली आहे. 2017 मध्ये अश्विनने भारतासाठी ट्वेन्टी20 लढत खेळली आहे.

युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यावर लक्ष केंद्रित केल्याने अश्विन संघनिवडीपासून दूर गेला होता. मात्र निवड समितीने विश्वचषकासाठी अनुभव, चतुरपणा आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांचं मन ओळखून गोलंदाजी करण्याची ताकद यामुळे अश्विनच्या नावाला पसंती दिली आहे.

अश्विनच्या ताफ्यात एकापेक्षा एक अस्त्रं आहेत. पॉवरप्ले तसंच मधल्या षटकांमध्ये तो गोलंदाजी करू शकतो. आवश्यकता भासल्यास अश्विन उत्तम फलंदाजीही करू शकतो.

जसप्रीत बुमराह

छोटासा रनअप, बुचकळण्यात टाकणारी अक्शन आणि अविश्सनीय वाटावी अशी अचूकता. आयपीएलस्पर्धेत मुंबई इंडियन्सचं मुख्य अस्त्र असलेला जसप्रीत बुमराह हा जगभरातल्या फलंदाजांसाठी डोकेदुखी आहे.

यॉर्कर, उसळते चेंडू, फसवे स्लोअरवन, कटर असे अनेकप्रकार बुमराहच्या भात्यात आहेत. स्कूटर चालवणाऱ्या माणसाप्रमाणे अक्शन असलेलाबुमराह हा ऑल फॉरमॅट स्पेशालिस्ट गोलंदाज आहे.

डावाच्या सुरुवातीला आणि शेवटच्या षटकांमध्ये धावा रोखणं आणि विकेट्स पटकावणं या दोन्ही आघाड्यांवर निष्णात असा शिलेदार.

भुवनेश्वर कुमार

अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत फलंदाजांना धावा करण्यापासून रोखणारा गोलंदाज. स्विंग गोलंदाजी करण्यात माहीर.

डावाच्या सुरुवातीला आणि हाणामारीच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत विकेट्स पटकावण्यासाठी भुवी प्रसिद्ध आहे.

दुखापतीमुळे भुवनेश्वर आयपीएलस्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघासाठी खेळू शकला नाही. इंग्लंड दौऱ्यालाही त्यालामुकावं लागलं होतं. मात्र आता तो फिट आहे.

भुवनेश्वर आमच्या योजनांचा अविभाज्य भागआहे, असं कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केलं आहे. चांगला क्षेत्ररक्षक असलेला भुवीउपयुक्त फलंदाजीही करतो.

मोहम्मद शमी

कर्णधार कोहली शमीचं वर्णन गन बॉलर असं करतो. बुंध्यात चेंडू टाकून फलंदाजांना हैराण करणे, अडचणीत टाकणारे उसळते चेंडू नियमितपणे टाकणे या गुण वैशिष्ट्यांसाठी ओळखला जाणारा शमी हा एक सर्वसमावेशक गोलंदाज आहे.

खेळपट्टीवर स्थिरावलेल्या फलंदाजांना बाद करण्याची हातोटी शमीकडे आहे. जबरदस्त वेग आणि अचूकता यांचा सुरेख मिलाफ शमीच्या गोलंदाजीत पाहायला मिळतो.

भारतासाठी ट्वेन्टी20 खेळण्याचा अनुभव शमीकडे कमी असला तरी आयपीएल स्पर्धेत दिल्ली, कोलकाता आणि पंजाब अशा तीन संघांसाठी मिळून शमी गेली अनेक वर्ष खेळतो आहे.

राहुल चहर

विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड जाहीर झाली तेव्हा त्यात युझवेंद्र चहलचं नाव नव्हतं.

गेली काही वर्षं भारताच्या वनडे आणि ट्वेन्टी20 संघाचा चहल महत्त्वाचा भाग आहे. पण चहलचा फॉर्म आटल्याने निवड समितीने राहुल चहरची निवड केली.

चहलचा भारतीय संघासाठी तसंच आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी खेळतानाचा अनुभव कामी आला असता अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली.

भारतीय संघ, ट्वेन्टी20 विश्वचषक, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी

फोटो स्रोत, ISHARA S. KODIKARA

फोटो कॅप्शन, राहुल चहर

चहलने नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केली. योगायोग म्हणजे राहुलला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. राहुलऐवजी चहलला निवडा अशी मागणीही झाली.

मात्र तरीही राहुलला संघात कायम राखण्यात आलं आहे. युएईतल्या खेळपट्यांवर चेंडू वेगात टाकणारा फिरकीपटू संघाला हवा होता. रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्ससाठी खेळण्याचा अनुभव राहुलकडे आहे. राहुलचाही हा पहिलाच विश्वचषक असणार आहे.

भारतीय संघ, ट्वेन्टी20 विश्वचषक, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी

फोटो स्रोत, ISHARA S. KODIKARA

फोटो कॅप्शन, वरुण चक्रवर्ती

वरुण चक्रवर्ती

रहस्यमय गोलंदाज अशी वरुणची ओळख आहे. पेशाने वास्तूरचनाकार असलेल्या वरुणने क्रिकेटची आवड जोपासण्याचा निर्णय घेतला.

तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये चांगलं प्रदर्शन केल्याने आयपीएल स्पर्धेत कोलकाता संघाने त्याला ताफ्यात घेतलं. तेव्हापासून तो कोलकाता संघाचा अविभाज्य भाग झाला आहे.

त्याच्या गोलंदाजीतील वैविध्य चक्रावून टाकणारं आहे. महेंद्रसिंग धोनीही वरुणची गुगली खेळू शकला नाही. कमीत कमी धावा देत सातत्याने विकेट्स पटकावणं ही वरुणची खासियत आहे.

दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातदौऱ्यात तो खेळू शकला नाही. पण कोलकातासाठी खेळताना त्याने त्याचं वेगळेपण सिद्ध केलं. विश्वचषकात वरुण भारतीय संघाचं हुकूमी अस्त्र ठरू शकतं.

राखीव खेळाडू

श्रेयस अय्यर, दीपक चहर आणि अक्षर पटेल हे राखीव खेळाडू असतील. कोरोना नियमावलीमुळे अचानक गरज भासलयास यांच्यापैकी कोणाचाही मुख्य संघात समावेश होऊ शकतो.

नेट बॉलर

उम्रान मलिक, हर्षल पटेल, वेंकटेश अय्यर, अवेश खान, लुकमन मेरिवाला, करण शर्मा, शाहबाझ अहमद, कृष्णप्पा गौतम.

फलंदाजांना विविध पद्धतीच्या गोलंदाजीच्या शैलीचा सराव व्हावा यासाठी नेट बॉलर्सना ताफ्यात ठेवलं जातं. हे नेट बॉलर म्हणून विश्वचषकादरम्यान भारतीय संघाबरोबर असतील.

आपात्कालीन परिस्थितीत मुख्य संघातील खेळाडूंना दुखापत झाल्यास, आयसीसीच्या तांत्रिक समितीच्या परवानगीनंतर राखीव खेळाडूंपैकी कुणालाही मुख्य संघात स्थान मिळू शकतं.

महेंद्रसिंग धोनी मेन्टॉरच्या भूमिकेत

आयसीसी 50 षटकांचा विश्वचषक, ट्वेन्टी20 विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी यासह आयपीएल स्पर्धेची जेतेपदं नावावर असणारा माजी कर्णधार, कॅप्टन कूल आणि अव्वल फिनिशर महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा मेन्टॉर असणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर पहिल्यांदाच धोनी अशा स्वरुपाच्या भूमिकेत दिसणार आहे.

ट्वेन्टी20 विश्वचषक, विराट कोहली, रवी शास्त्री, महेंद्रसिंग धोनी, भारतीय संघ

फोटो स्रोत, SAEED KHAN

फोटो कॅप्शन, महेंद्रसिंग धोनी

फलंदाज आणि कर्णधार म्हणून धोनीचा अनुभव भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बीसीसीआयने विश्वचषकासाठी म्हणून धोनीची खास नियुक्ती केली आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने आयसीसी स्पर्धेचं जेतेपद पटकावलेलं नाही. कोहलीची भारताच्या ट्वेन्टी20 संघाचा कर्णधार म्हणून शेवटची स्पर्धा आहे.

जेतेपदासह कर्णधारपदाला अलविदा करण्याचा कोहलीचा मानस असेल. कोहलीच्या या मोहिमेत धोनीची उपस्थिती मोलाची ठरू शकते.

सपोर्ट स्टाफचीही शेवटची मोहीम

विश्वचषकानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक तसंच सपोर्ट स्टाफ बदलणार आहेत. माजी खेळाडू आणि समालोचक म्हणून प्रसिद्ध रवी शास्त्री यांना जेतेपदासह निरोप देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

ट्वेन्टी20 विश्वचषक, विराट कोहली, रवी शास्त्री, महेंद्रसिंग धोनी, भारतीय संघ

फोटो स्रोत, Hagen Hopkins

फोटो कॅप्शन, रवी शास्त्री

मुख्य प्रशिक्षक-रवी शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक-विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक-भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक- आर.श्रीधर

भारतीय संघाची आतापर्यंतच्या ट्वेन्टी20 विश्वचषकातील कामगिरी

2007-विजेता

2009- प्राथमिक फेरी

2010- सुपर8

2012- सुपर8

2014- उपविजेते

2016- उपांत्य फेरी

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)