चंद्रकांत पाटील : शरद पवार हे केंद्राची ऑफर न स्वीकारण्याइतके कच्च्या गुरूचे चेले नाहीत #5मोठ्याबातम्या

शरद पवार चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, facebook/getty

आज विविध वृत्तवाहिनी आणि वेबसाईटवर प्रकाशित बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. केंद्राची ऑफर न स्वीकारण्याइतके पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत - चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारने सत्ता स्थापन करण्यासाठी ऑफर दिली होती का, या संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

'केंद्राची ऑफर न स्वीकारण्याइतके पवार हे कच्च्या गुरूचे चेले नाहीत,' असा टोला चंद्रकांत पाटील यांनी यावेळी लगावला.

बुधवारी (13 ऑक्टोबर) नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते बोलत होते.

'केंद्रातील भाजपकडून आपल्याला सत्तेसाठी ऑफर आली होती. मात्र आपण ती स्वीकारली नाही,' असा दावा शरद पवार यांनी केला होता. यावर पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं.

'सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली आहे,' असंही पाटील म्हणाले. ही बातमी लोकमतने दिली आहे.

2. गांधीजी देशाचे राष्ट्रपिता असल्याचं वाटत नाही - रणजीत सावरकर

महात्मा गांधी यांच्या सल्ल्यानंतर सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती, असं वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केल्यानंतर त्यावर विविध प्रकारचे पडसाद उमटत आहेत.

महात्मा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत, असं आपल्याला वाटत नाही,' असं वक्तव्य रणजित सावरकर यांनी केलं.

"देशाला 5 हजार वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे कुणी एक व्यक्ती देशाची राष्ट्रपिता होऊ शकत नाही, असं रणजित सावरकर ANI वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली.

3. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर चढून हार घातल्याने वाद

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येत आहे. पण बुधवारी शहरात हा पुतळा आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार राजू नवघरे यांच्या एका कृत्याने वादाला तोंड फुटल्याचं दिसून आलं.

शिवाजी महाराज पुतळा

फोटो स्रोत, facebook

दरम्यान, यासंदर्भात व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर नवघरे यांनी माफी मागितली असून प्रकरण संपवण्याची विनंती केली आहे.

व्हायरल व्हीडिओमध्ये आमदार राजू नवघरे पुतळ्याचं स्वागत करताना हार घालण्यासाठी चक्क महाराजांच्या पुतळ्यावर चढल्याचं दिसून येतात.

हा व्हिडिओ आता सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर नवघरे यांच्या या कृतीचा निषेध होऊ लागला. नवघरे यांनीही यासंदर्भात माफी मागून वादाला पूर्णविराम दिला आहे. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.

4. आम्ही भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत जाणार, पार्थ पवारांचा भाजपला इशारा

पिंपरी चिंचवडमध्ये इंद्रायणी नदी प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांनी केला आहे.

पार्थ पवार

फोटो स्रोत, @parthpawar

याबाबत ट्विट करून पार्थ पवार यांनी आपली भूमिका सर्वांसमोर मांडली.

सर्वांच्याच अस्मितेचा विषय आणि मातेसमान नदीतून पैसे खाण्याचा उद्योग पिंपरी-चिंचवड भाजपने चालवल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत आम्ही जाणार आहोत, हीच का स्मार्ट सिटी? असा प्रश्न पार्थ पवार यांनी विचारला आहे. ही बातमी लोकमतने दिली.

5. रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्याच्या महिला आयोग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

रुपाली चाकणकर

फोटो स्रोत, Rupali chakankar

विजया राहाटकर यांच्यानंतर गेली दोन वर्षे हे पद रिक्तच होतं. आता या पदावर चाकणकर यांची वर्णी लागली आहे.

रुपाली चाकणकर यांचा जन्म दौंडमधील शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी रयत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं. पुढे त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला.

लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली चाकणकर यांचाही राजकारणात प्रवेश झाला होता. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)