शरद पवारांनी 'ही' 5 विधानं कोणत्या विषयांवर बोलताना केली?

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

केंद्र सरकार तपास यंत्रणांचा सतत राजकीय वापर करताना दिसत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

शरद पवार यांनी आज (13 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ईडीची अजित पवार तसंच अनिल देशमुख आणि इतर नेत्यांवरील कारवाई, एनसीबीची कारवाई, देवेंद्र फडणवीसांची गेल्या काही दिवसांतील वक्तव्यं यांवर भाष्य केलं.

या मुद्द्यांवर बोलताना त्यांनी पाच मोठी विधानं केली. शरद पवारांची ही विधानं काय होती?

1. अनिल देशमुखांवर आरोप करणारे अधिकारी कुठे गायब आहेत?

केंद्र सरकार तपास यंत्रणांचा सतत राजकीय वापर करतय असं दिसतय. अनिल देशमुखांवर एका पोलीस कमिशनरने आरोप केले. त्यामुळे अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला.

या आरोपांवरून विविध आरोपांची मालिका सुरू झाली. हे आरोप करणारे गृहस्थ गायब आहेत. काल अनिल देशमुखांवर पाचव्यांदा छापा टाकला. या यंत्रणांचं कौतुक केलं पाहीजे. एकाच घरावर 5 वेळा छापा घातला.

अनिल देशमुखांवर आरोप करणारे अधिकारी कुठे आहेत?

2. NCB वर आरोप केल्यावर उत्तर द्यायला भाजपचे लोक पुढे येतात

मुंबई पोलिसांनी आता पर्यंत केंद्राच्या एजन्सीपेक्षा जास्त ड्रग्ज पकडली असून केंद्रीय यंत्रणांपेक्षा मुंबई पोलीस जास्त कार्यक्षम आहे.

मुंबई पोलिसांच्या कामगिरीविषयी कोणाला शंका नसते, NCBने पंच म्हणून निवडलेले गोसावी अनेक दिवसांपासून फरार आहेत.

सीबीआय, ईडी, एनसीबीचा गैरवापर होत असून केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईसाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे.

समीर वानखेडे

फोटो स्रोत, ANI

आमच्यामध्ये सुसंवाद असतो आणि सत्तेचा उन्माद आम्ही कधी केला नाही. आम्ही केंद्राच्या एजन्सीने तपासात किती काय सापडलं याची माहिती आम्ही घेण्याचा प्रयत्न केला. पण केंद्रीय एजन्सीपेक्षा राज्याच्या एजन्सीने (मुंबई पोलीस) ड्रग्ज अधिक पकडल्याचं दिसून येतं. त्यामुळे केंद्रीय एजन्सी सरकारला दाखवण्यासाठी काम करतेय.

केंद्रीय एजन्सीचे अधिकारी ज्या पंचाच्या सह्या घेतात त्यावरून कळतं की अधिकारी कोणत्या लोकांशी संबंधित आहेत. या एजन्सीवर आरोप केले तर उत्तर देण्यासाठी सर्वात आधी भाजपचे नेते आधी येतात.

शरद पवार यांनी यावेळी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवरही टिप्पणी केली.

समीर वानखेडे हे अधिकारी याआधी एअर फोर्सवर एक्साईज विभागात होते. तिथेही काही कथा मला ऐकायला मिळाल्या. पण त्याविषयी पूर्ण माहिती नसल्यामुळे मी त्यावर भाष्य करत नाही, असं पवार यांनी म्हटलं.

3. अजीर्ण होईल इतका पाहुणचार घेऊ नये

अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी आयकर विभागानं मारलेल्या छाप्यांवरूनही शरद पवारांनी भाष्य केलं.

या तिन्ही मुलींचा कारखाना नाही. एक पब्लिकेशनमध्ये आहे, एक डॉक्टर आहे आणि तिसरी गृहिणी आहे. मी माहिती घेतली की असे पाहुणे अनेक ठिकाणी येतात. एक-दोन-तीन दिवस असतात. पण आजचा सहावा दिवस आहे. पाहुणचार घ्यावा. पण अजीर्ण व्हावा इतका पाहुणचार घेऊ नये.

हे अधिकारी तिथे गेले, चौकशी करायची होती ती केली. आमच्या मुलींनी त्यांना विचारलं की, दोन तीन दिवस झाले तुमच्या घरचे वाट बघत नाहीत का? ते म्हणाले जोपर्यंत पुढच्या सूचना येत नाहीत तोपर्यंत घर सोडायचं नाही.

अजित पवार

फोटो स्रोत, Getty Images

ही चौकशी पूर्ण झाल्यावर मी त्यावर बोलेन.

अशोक चव्हाण यांच्या सहकार्यांवर छापे घातले. अजित पवार यांच्या सहकार्यांवर छापे घातले. सुभाष देसाई यांच्या चिरंजीवांची चौकशी होतेय. महाराष्ट्रातलं सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे.

4. फडणवीसांच्या बाबतीत परिस्थिती वेगळी दिसतीये

"मी अजूनही मुख्यमंत्री आहे असंच वाटतं," असं म्हणणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनांही शरद पवारांनी टोला लगावला.

मी चारवेळा मुख्यमंत्री होतो, पण ते माझ्या लक्षात राहत नाही. ही कमतरता असल्याचं म्हणत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलं.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, TWITTER

शरद पवार म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं मी मुख्यमंत्री नाही असं अजूनही वाटत नाही. मी चार वेळा मुख्यमंत्री होतो पण मला कधी लक्षात नाही. ही आमच्यातली कमतरता आहे. सत्तेवर नसताना आपण तिथे का नाही याचं assessment करण्याची संधी असते. पण फडणवीसांच्या बाबतीत काहीतरी वेगळी परिस्थिती दिसतेय. सत्तेचा वापर हा लोकांच्या भल्यासाठी केला पाहीजे."

5. मावळमध्ये परिस्थिती चिघळण्यासाठी कोण कारणीभूत हे सर्वांना माहीत

लखीमपूर मधील शेतकऱ्यांवर झालेल्या हिंसाचाराबद्दल बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मावळमधील घटनेचा उल्लेख केला होता. त्यावरही शरद पवार यांनी टिप्पणी केली.

लखीमपूरचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्यातल्या माजी मुख्यमंत्र्यांनी मावळमधील घटनेचा उल्लेख केला हे बरं झालं. कारण त्यावेळी तिथे काय घडलं हे कुणाच्या फारसं लक्षात आलं नाही. तेव्हा शेतकरी मृत्यूमुखी पडले, त्याला जबाबादार कुणी सरकारी नेते नव्हते. तो आरोप पोलिसांवर होता.

मावळमध्ये परिस्थिती हाताबाहेर जावं यासाठी कोणी प्रयत्न केले हे पण सर्वांना माहीत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळातला मावळचा गोळीबार झाला, याच काळात लोकांना भडकवण्याचं काम कुणी केलं हे मावळच्या जनतेच्या लक्षात आल्यानंतर तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार 90 हजारांहून अधिक मताधिक्यानं निवडून आला. संताप असता, तर इतक्या मतांनी राष्ट्रवादीची जागा आली नसती

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)