कोरोना लसीकरण : महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटातील सर्वांचं मोफत लसीकरण होणार

महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्रातील 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज (28 एप्रिल) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली.

लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेयावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, "गेल्या वर्ष-सव्वा वर्षांपासून आपण कोरोनाची लढाई लढतो आहोत. जानेवारीपासून केंद्राच्या सहकार्याने राज्यात लसीकरण सुरु आहे. आजतागायत 45 च्या पुढील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देशात विक्रम आहे."

महाराष्ट्रातील मोफत लसीकरण मोहिमेतून 5.71 कोटी लोकांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मोफत लसीकरणाचा कार्यक्रम राज्य सरकारच्या तिजोरीतून हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी 6 हजार 500 कोटींचा भार राज्यावर पडणार असल्याचं सांगण्यात आलंय.

"उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या राज्यसमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळेच 18 ते 44 च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे," असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेतले 5 महत्त्वाचे मुद्दे -

1) "सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसी उपब्ध असून, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून, पाठपुराव्याने जास्तील जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल," अशी माहिती मुख्यंमत्र्यांनी दिली.

2) 18 ते 44 वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे

3) या वयोगटातील नागरिकांनी कोविन मोबाईल एपवर नोंदणी करावी, कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, लसीकरणाबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना मिळतील असेही मुख्यमंत्री म्हणाले.

4) लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

5) महाराष्ट्रातील मोफत लसीकरण मोहिमेतून 5.71 कोटी लोकांना मोफत लस देणार असून, त्यासाठी 6 हजार 500 कोटींचा भार राज्यावर पडणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने एक मे पासून देशभरात 18 वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

याआधी भारतातील जवळपास 15 हून अधिक राज्यांनी मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)