You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : फुफ्फुसांचं आरोग्य तपासण्यासाठीची '6 मिनिट वॉक टेस्ट' काय आहे?
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना, '6 मिनिट वॉक टेस्ट'ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.
कोव्हिड-19 देशभरात त्सुनामीसारखा पसरतोय. एका दिवसातच 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळल्याने, देशभरात हाहा:कार उडालाय. कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेत कुटुंबच्या-कुटुंब बाधित होत आहेत. प्रत्येकाच्या मनात मला कोरोना संसर्ग होईल, किंवा झाला असेल ही भीती घर करून बसलीये.
बाजूला जरा कोणी खोकलं किंवा शिंकलं तर, लगेच आपण त्या व्यक्तीकडे संशयानं पहातो. त्या व्यक्तीपासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो. अनेकांना सारखं वाटतं मला दम लागतोय. खोकला नाहीये, पण बेचैन वाटतंय. सतत एक भीती मनात रहाते, मला कोरोनासंसर्ग तर झाला नाही?
तुमच्यासोबत कधी असं घडलंय? हो ना! तुम्ही असा विचार नक्कीच केला असेल. डॉक्टरांच्या माहितीनुसार, '6 मिनिट वॉक टेस्ट' ही तुमच्या मनातील सर्व प्रश्नांचं सोपं उत्तर आहे.
'6 मिनिट वॉक टेस्ट' काय आहे?
कोरोनाव्हायरस फुफ्फुसांवर आघात करतो. ज्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. कोव्हिड-19 संसर्ग झाल्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते, असं तज्ज्ञ सांगतात.
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, "कोव्हिड-19 काळात फुफ्फुसांचं आरोग्य किंवा कार्यक्षमता चांगली आहे का नाही. याची तपासणी करणारी सहज आणि सोपी पद्धत म्हणजे '6 मिनिट वॉक टेस्ट' किंवा '6 मिनिटं चालण्याची चाचणी."
फोर्टिस रुग्णालयाच्या इंटेन्सिव्ह केअर विभागाचे संचालक डॉ. राहुल पंडीत सांगतात, "6 मिनिट वॉक टेस्ट, व्यायामानंतर हृदय आणि फुफ्फुसांची सहनशीलता किती आहे हे शोधण्यासाठी विकसित करण्यात आली. आता याचा वापर कोव्हिडग्रस्त रुग्ण, ज्यांची ऑक्सिजन लेव्हल आराम करताना 94 पेक्षा जास्त आहे. जे लोक हाय-रिस्क आहेत. ज्यांना हृदयरोगासारखे इतर आजार आहेत. त्यांच्यासाठी केला जातोय."
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने लोकांना 6 मिनिट वॉक टेस्टबद्दल माहिती देण्यासाठी एक परिपत्रक जारी केलंय.
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-लहान मुलांमध्ये कोव्हिड-19ची कोणती लक्षणं आढळतात? MIS-C म्हणजे काय?
- वाचा-कोरोनाची लक्षणं जाणवल्यावर कोणती टेस्ट करायची?
- वाचा-लस घेण्यासाठी Co-Win वर नोंदणी कशी करायची?
- वाचा- कोरोना लसीकरणाबाबत तुम्हाला पडलेले 15 प्रश्न आणि त्यांची उत्तरं
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, '6 मिनिट वॉक टेस्ट'च्या माध्यमातून रक्तातल्या ऑक्सिजनची लपलेली कमतरता (Happy Hypoxia) जाणून घेण्यास मदत होते. जेणेकरून गरजू रुग्णांना वेळीच रुग्णालयात दाखल करता येईल.
हॅप्पी हायपॉक्सिया म्हणजे काय?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली, तरी रुग्ण सामान्यच दिसत असतो. रुग्णाला श्वास घेण्यास अडथळा होण्याची कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. वैद्यकीय भाषेत याला 'हॅप्पी हायपॉक्सिया' (Happy Hypoxia) म्हणतात.
कशी करावी 6 मिनिट वॉक टेस्ट?
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार -
- 6 मिनिट वॉक टेस्ट करण्याआधी पल्स ऑक्सिमीटरने (Pulse Oximeter) शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासून त्याची नोंद घ्यावी
- त्यानंतर घरातल्या-घरात घड्याळ किंवा स्टॉपवॉच लाऊन सहा मिनिटं चालावं
- चालताना अतिवेगात किंवा अत्यंत हळू चालू नये. चालण्याचा वेग मध्यम आणि स्थिर असावा
- सहा मिनिटं चालून झाल्यानंतर पुन्हा रक्तातील ऑक्सिजनची पातळी तपासावी
नानावटी मॅक्स सूपर स्पेशालिटी रुग्णालयाचे फिजीओथेरपी विभागाचे प्रमुख, डॉ. अली इराणी सांगतात, "ही टेस्ट करताना काहींना दम लागण्याची शक्यता आहे. किंवा थांबण्याची गरज पडल्यास थांबावं. पण, घड्याळ सहा मिनिटं सुरूच ठेवावं. दम लागणं बरं झाल्यानंतर पुन्हा टेस्ट सुरू करू शकता. काठी किंवा वॉकरची मदत घेऊनही चालू शकता."
वॉक टेस्ट झाल्यानंतर काय करावं?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, घरच्या घरी वॉक टेस्ट केल्यानंतर पुन्हा रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजावी. टेस्ट आधी आणि टेस्टनंतर ऑक्सिजनची पातळी किती आहे याची तूलना करावी. जेणेकरून ऑक्सिजनच्या पातळीत झालेला फरक कळून येईल.
"रक्तदाब, ऑक्सिजनची पातळी आणि हृदयाचे ठोके टेस्ट झाल्यानंतर तात्काळ, एक मिनिटाने आणि पाच मिनिटाच्या अंतराने मोजावेत. आपला रिकव्हरी पिरिएड किती आहे हे समजण्यासाठी याची नोंद गरजेची आहे," असं डॉ. इराणी पुढे सांगतात.
कोणी करावी '6 मिनिट वॉक टेस्ट'?
आरोग्य विभागाने जारी केलेल्या पत्रकानुसार, ताप, सर्दी, खोकला किंवा कोरोना संसर्गाची इतर लक्षणं असलेल्या व्यक्तींनी, तसंच होम आयसोलेशनमध्ये (गृह विलगीकरणात) असलेल्यांनी 6 मिनिट वॉक टेस्ट' करावी
डॉ. अली इराणी पुढे सांगतात, "ही टेस्ट कोणताही व्यक्ती करू शकतो. याला वयाचं बंधन नाही. ही टेस्ट स्वत:साठी किंवा कुटुंबातील व्यक्तीसाठी केली जाऊ शकते."
तर डॉ. पंडीत यांच्या मते, "लक्षणं दिसू लागल्यानंतर 5 ते 12 दिवसांमध्ये ही टेस्ट करावी."
कोव्हिडग्रस्त रुग्ण ही टेस्ट करू शकतात?
डॉ. इराणी सांगतात, "कोरोनाग्रस्त रुग्ण ही टेस्ट करू शकतात. त्यांना ऑक्सिजन लागण्याची भीती वाटते. त्यांनी ही टेस्ट केली तर शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल कळेल आणि गरज पडल्यास रुग्णालयात वेळेवर जाता येईल."
डॉक्टर रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांना डिस्चार्ज देताना ही टेस्ट करून घेतात.
60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी काय करावं?
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार -
- 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी 6 मिनिटाऐवजी 3 मिनिटं चालून ही चाचणी करावी.
- चाचणी करताना कोणी व्यक्ती सोबत असेल तर चांगलं. जेणेकरून खूप दम लागला तर मदत होऊ शकते.
ज्येष्ठ नागरिक 6 मिनिटाऐवजी 3 मिनिटं चालून ही टेस्ट करू शकतात, असं डॉ. पंडीतही सांगतात.
या टेस्टचा निष्कर्ष काय सांगतो?
व्यायामानंतर हृदयाचे ठोके आणि ऑक्सिजनची पातळी बदलते. ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते का नाही याची माहिती मिळू शकते, असं डॉ. राहुल पंडीत म्हणतात.
आरोग्य विभागाच्या सांगण्यानुसार -
- सहा मिनिटं चालल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली नाही तर तुमची तब्येत चांगली आहे
- ऑक्सिजनची पातळी 1-2 टक्क्यांनी कमी झाली तर, काळजीचं कारण नाही.
- यामध्ये काही बदल होत नाही हे पहाण्यासाठी दिवसातून दोन वेळा टेस्ट करावी
टेस्ट आधी आणि नंतरचे आकडे काय सांगतात हे समजावून देण्यासाठी डॉ. इराणी उदाहरण देतात.
"टेस्ट आधी ऑक्सिजन लेव्हल 97 असेल आणि नंतर 95 झाली. तर, काळजी करू नका. तुम्हाला ऑक्सिजनची गरज आहे असं नाही. टेस्टनंतर 2-3 टक्क्यांचा फरक सामान्य आहे. पण, ऑक्सिजनच्या पातळीत खूप जास्त फरक दिसत असेल तर ती चिंतेची गोष्ट आहे."
त्वरित सल्ला केव्हा घ्यावा?
राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार -
- सहा मिनिटं चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी 93 पेक्षा कमी झाली
- धाप किंवा दम लागला
- तीन टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजनची पातळी कमी आली
वरील तीनपैकी एखादी गोष्ट आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.
डॉ. इराणी म्हणतात, "याचा अर्थ, फुफ्फुसात जेवढा ऑक्सिजन जाण्याची गरज आहे. तेवढा जात नाहीये. म्हणून ऑक्सिजनच्या पातळीत फरक जावणतो."
"ही टेस्ट केल्यानंतर शरीरातील ऑक्सिजन 94 पेक्षा जास्त असेल. तर, रुग्णालयात धावत जाण्याची गरज नाही. तुम्ही डॉक्टरांना फोनवरून या टेस्टची माहिती देऊन सल्ला घेऊ शकता," असं डॉ. राहुल पंडीत म्हणतात.
ही टेस्ट कुठे करू शकतो?
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार -
- ही टेस्ट कुठल्याही कडक पृष्ठभागावर किंवा जमिनीवर करावी
- ज्या जमिनीवर चालणार आहात त्याठिकाणी चढ-उतार नसावेत
- पायऱ्यांवर ही चाचणी करू नका
- घरातल्या घरात जमिनीवर चाला
- जास्तीत जास्त रिकामी जागा असेल त्याठिकाणी टेस्ट करा
या टेस्टसाठी काय लागतं?
डॉ. राहुल पंडीत म्हणतात, "ही टेस्ट करण्यासाठी डॉक्टर, नर्स किंवा पॅरामेडिकल स्टाफ उपस्थित असण्याची गरज नाही. कुटुंबातील कोणताही व्यक्ती बोटाला लागणारं पल्स ऑक्सिमीटर वापरून ही टेस्ट करू शकतो."
यासाठी फक्त पल्स ऑक्सिमीटर, घड्याळ, स्टॉपवॉच किंवा तुमच्या मोबाईल फोनची गरज आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)