You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस : 'लशीचा एक डोस घेतला, तरी सगळ्या वयोगटात संसर्गाचा धोका कमी'
'ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका (जी भारतात कोव्हिशिल्ड या नावाने दिली जाते) किंवा फायझर या लशींचा एक डोस जरी घेतला, तरी कोव्हिड-19 चा संसर्ग होण्याचा प्रमाण झपाट्याने कमी होतं,' असं यूकेमधल्या एका अभ्यासात समोर आलं आहे.
या लशींचा फायदा 75 वर्षांच्या वर असणारे जेष्ठ नागरिक, कोमॉर्बिडीटी असणारे पेशंट आणि इतर नागरिक अशा सगळ्याच वयोगटांना झाला आहे.
द ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटेस्टिक्स आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी केलेल्या या अभ्यासात असं आढळून आलं की दोन्ही प्रकारच्या लशी घेतलेल्या सगळ्या वयोगटात शक्तीशाली अँटीबॉडी रिस्पॉन्स तयार झाला आहे.
दोन्हीपैकी कोणतीही एक लस घेतलेल्या लोकांमध्ये सारख्याच प्रकारचा रिस्पॉन्स आढळून आल्याचं ते म्हणाले.
या संशोधनात दोन अभ्यास निबंधांचा समावेश होता, जे अजून कुठे प्रसिद्ध झालेले नाहीत किंवा इतर संशोधकांनी त्याचा आढावा घेतलेला नाही. पण या संशोधनात यूकेतल्या 3,70,000 लोकांचा अभ्यास केलला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा अभ्यास करणारा हा पहिलाच अभ्यास ठरला आहे.
या अभ्यासातून नियंत्रित चाचणीत केलेले नाही, तर खऱ्याखुऱ्या जगात केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष समाविष्ट आहेत. लस कोव्हिड-19 च्या विरोधात नक्की कशी काम करते, त्यामुळे लोकांचं कोरोना व्हायरसपासून कसं सरंक्षण होतं हे समोर आलेलं आहे.
पहिल्या अभ्यासात असं दिसून आलं की, ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेका (कोव्हिशिल्ड) किंवा फायझरपैकी कोणत्याही लशीचा एक डोस घेतलेल्या लोकांना कोरोना व्हायरसचा नवा संसर्ग व्हायचं प्रमाण 65 टक्क्यांनी कमी झालं आहे.
नव्या व्हेरिएंटपासून संरक्षण
डिसेंबर 2020 ते एप्रिल 2021 या काळात दिलेल्या लशींच्या अभ्यासात लक्षात आलं की लस दिल्यानंतर 3 आठवड्यानंतर लक्षणं दिसत असणाऱ्या संसर्गाचं प्रमाण 74 टक्क्यांनी कमी झालं तर लक्षणं दिसत नसलेल्या (असिंप्टॉमॅटिक) संसर्गाचं प्रमाण 57 टक्क्यांनी कमी झालं.
ज्यांना फायझरचा दुसरा डोस मिळाला त्यांना संसर्ग होण्याची शक्यता 90 टक्क्यांनी कमी झाली. पण ऑक्सफर्ड-अॅस्ट्रझेंकाबाबतीत या गोष्टीला दुजोरा मिळू शकला नाही कारण या अभ्यासात समावेश झालेल्या फार कमी लोकांना या लशीचा दुसरा डोस मिळाला.
पण या अभ्यासात हे दिसून आलं की दोन्ही लशी त्यावेळेस यूकेमध्ये पसरलेल्या केंट व्हेरिएंट (B117) च्या विरोधात काम करतात.
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-लहान मुलांमध्ये कोव्हिड-19ची कोणती लक्षणं आढळतात? MIS-C म्हणजे काय?
- वाचा-कोरोनाची लक्षणं जाणवल्यावर कोणती टेस्ट करायची?
- वाचा-लस घेण्यासाठी Co-Win वर नोंदणी कशी करायची?
- वाचा- कोरोना लसीकरणाबाबत तुम्हाला पडलेले 15 प्रश्न आणि त्यांची उत्तरं
ऑक्सफर्डच्या नटफिल्ड इथल्या लोकसंख्येचं आरोग्य या विभागात काम करणारे डॉ कोएन पॉवेल्स यांनी सांगितलं की दोन डोसमध्ये जास्त अंतर असावं ही गोष्ट आमच्या हाती आलेल्या डेटाने सिद्ध झाली.
"पहिल्या डोसनंतर जे सरंक्षण मिळतं त्याने हे सिद्ध होतं की पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये 12 आठवड्यांचं अंतर असावं. यामुळे पहिल्या डोसामुळे मिळणाऱ्या संरक्षणाचा कालावधी वाढेल आणि दवाखान्यात अॅडमिट होणाऱ्या रूग्णांची संख्या कमी होईल तसंच मृत्यूचं प्रमाणंही कमी होईल."
पण त्यांनी याही मुद्द्यावर भर दिला की ज्यांना लस मिळाली आहे अशा लोकांनाही कोव्हिडचा संसर्ग होऊ शकतो आणि त्यांनी लस घेतल्यानंतरही सोशल डिस्टन्सचं पालन करावं आणि मास्क घालावेत.
दुसऱ्या अभ्यासात लशीचा पहिला डोस घेतलेल्या जवळपास 46,000 प्रौढ व्यक्तींमध्ये शक्तीशाली अँटीबॉडी रिस्पॉन्स आढळून आला. याचाच अर्थ होता की लशीमुळे शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्तीला कोरोना व्हायरसच्याविरोधात लढण्याची ताकद मिळतेय.
संशोधकांनी म्हटलं की हे अँटीबॉडी रिस्पॉन्स "जवळपास 10 आठवडे टिकले."
ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेकाची लस दिल्यानंतर शरीरातले अँटीबॉडी रिस्पॉन्स हळूहळू वाढले, त्यांचं प्रमाणही कमी होतं. बायोटेक-फायझरची लस घेतल्यानंतर अँटीबॉडी रिस्पॉन्स झपाट्याने वाढले पण झपाट्याने खालीही आले, विशेषतः वयोवृद्ध लोकांमध्ये.
80 वर्षांच्या वरच्या लोकांमधले अँटीबॉडी रिस्पॉन्स
लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर तरूणांमध्ये वृद्धांच्या तुलनेत चांगला प्रतिसाद आढळून आला. पण फायझरची लस घेतल्यानंतर सगळ्याच वयोगटांमध्ये अँटीबॉडीचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं असं या अभ्यासात म्हटलं आहे.
पण एका निष्कर्षांने अभ्यासकांना आश्चर्य वाटलं तो म्हणजे लशीच्या दुसऱ्या डोसनंतर 80 पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांमध्ये इम्युन रिस्पॉन्स मोठ्या प्रमाणात वाढला - अगदी तरूण लोकांपेक्षा कित्येक पटींनी अधिक .
या संशोधनाने लशीचे दोन्ही डोस घेणं किती महत्त्वाचं आहे हे अधोरेखित होतं असं संशोधकांचं म्हणणं आहे. पण कोव्हिडची लस दिल्यानंतर अँटीबॉडी कशा तयार होतात हे अजून स्पष्ट नाहीये.
या संशोधनाच्या मुख्य संशोधक प्रा. सारा वॉकर म्हणतात, "लोकांना कोव्हिड-19 पासून प्रदीर्घ काळासाठी वाचवण्यासाठी लोकांना नक्की किती अँटीबॉडी रिस्पॉन्स गरजेचा असेल किंवा तो किती काळ असावा लागेल याबद्दल अजून काहीच स्पष्ट नाही. पण पुढच्या वर्षभरात आम्ही केलेल्या सर्व्हेतून मिळालेली माहिती या गोष्टींवर प्रकाश टाकू शकेल."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)