You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना काळात एक दिवसही सुटी न घेता काम करणाऱ्या धारावीतल्या योद्ध्या
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"बस्स झालं! असं कसं म्हणायचं? घरोघरी गेलो नाही, तर रुग्ण वाढतील. हे आमचं काम आहे.
मला शिकून डॉक्टर होता आलं नाही. पण, कोरोना काळात केलेल्या कामाचं खूप समाधान मिळालंय. लोक खूप मान देतात. मला अभिमान आहे, मी आरोग्यसेविका असल्याचा."
धारावीत कोणत्याही गल्लीत, वाडीत सकाळच्या सुमारास जा...हातात कागद-पेन, तोंडावर मास्क, सॅनिटाईझरची बाटली, ऑक्सिमीटर आणि गन थर्मामीटर घेतलेल्या महिला घराघरात जाऊन लोकांची विचारपूस करताना दिसून येतात.
अंकिता शेडगे, उल्का परब आणि मीराबाई काळे...ही नावं तुम्ही ऐकली नसतील. पण, धारावीकर यांना कुटुंबातील एक सदस्य मानतात.
या महिलांना धारावीतील गल्लीबोळा पाठ आहेत. लोकांची नावं तोंडपाठ आहेत. पण, कोण आहेत या महिला? आम्ही यांच्याबद्दल का बोलतोय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
धारावीच्या कोव्हिड योद्धा
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख. कोरोनासंसर्गाच्या पहिल्या लाटेत धारावी कोव्हिड-19 चा हॉटस्पॉट बनला. धारावीत कोरोनाचा प्रसार झपाट्याने होईल अशी भीती सर्वांना होती.
पण, या क्युनिटी हेल्थ वर्कर कोरोनाविरोधातील लढाईत ढाल बनून उभ्या राहिल्या आणि उभ्या आहेत. यांना धारावीत आरोग्यसेविका म्हणून ओळखतात. वर्ष झालं सुट्टी न घेता, कोरोनाची भीती न बाळगता, लोकांचा जीव वाचवण्यासाठी या आरोग्यसेविका कानाकोपरा पिंजून काढत आहेत.
दररोज, सकाळी 9 वाजता यांचं काम सुरू होतं. एकापाठोपाठ एक गल्ली पायदळी तुटवत या महिला निघतात. "गेले वर्षभर हे असंच सुरू आहे आणि कोरोना संपेपर्यंत सुरू राहिल," असं अंकिता शेडगे सांगतात.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना नियंत्रणासाठी धारावी पॅटर्नचं कौतुक केलं. याचं श्रेय्य प्रशासनासोबत या आरोग्यसेविकांच्या मेहनतीला जातं.
'आरोग्यसेविका असल्याचा अभिमान'
उल्का परब, 1990 पासून धारावीत आरोग्यसेविका म्हणून काम करतायत. गुरुवारी नेहमीप्रमाणेच त्यांची ड्यूटी होती.
"घरोघरी गेलो तरच, रुग्णांची माहिती मिळेल. लोकांना वेळीच उपचार मिळतील, त्यांचे प्राण वाचतील," असं त्या म्हणतात.
धारावीतील एनएल कॅम्प परिसराची जबाबदारी उल्का परब यांच्यावर आहे. आम्ही पोहोचलो तेव्हा त्या घरोघरी तपासणी करत होत्या. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा अनुभव त्या सांगतात.
"धारावीत पहिली केस मी पाहिली. खूप भीती वाटत होती. घरी मुलं, पती आहेत. त्यांचं काय? हा प्रश्न मनात होता. घाबरत-घाबरत का होईना, परिसराचा सर्व्हे केला."
कोरोना काळात एकही दिवस उल्का परब यांनी सुट्टी घेतलेली नाही. कोरोनाची भीती वाटते?
त्या म्हणतात, "गेल्या वर्षभरात खूप शिकलोय. आता एवढी भीती वाटत नाही. पण, रुग्णांकडे गेल्यानंतर योग्य काळजी घ्यावीच लागते. "
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-लहान मुलांमध्ये कोव्हिड-19ची कोणती लक्षणं आढळतात? MIS-C म्हणजे काय?
- वाचा-कोरोनाची लक्षणं जाणवल्यावर कोणती टेस्ट करायची?
- वाचा-लस घेण्यासाठी Co-Win वर नोंदणी कशी करायची?
- वाचा- कोरोना लसीकरणाबाबत तुम्हाला पडलेले 15 प्रश्न आणि त्यांची उत्तरं
धारावीत महापालिकेने घरोघरी शोधमोहिम सुरू केलीये. याचा मोठा फायदा संशयित आणि कोरोना रुग्ण शोधण्यासाठी होत आहे.
कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी लोकांची साथ महत्त्वाची. गेल्या वर्षभरात लोकांनी साथ दिली? त्यावर त्या म्हणतात, "आम्ही गेलो की, लोकांना वाटतं त्यांचं कोणीतरी आलं. तुम्ही आलात, आता काळजी नाही, असं लोक म्हणतात. आमच्याशी बोलल्यानंतर त्यांना विश्वास वाटतो."
"कम्युनिटी हेल्थ वर्कर म्हणून कित्येक वर्ष काम करतेय. पण, कोरोनामध्ये कामाचं खरं समाधान मिळालं. वर्षोनवर्ष या परिसरात काढली, त्याचं अखेर चीज झालं," असं उल्का म्हणतात.
'होय, शरीर थकलंय!'
एका 80 वर्षाच्या आजीची तपासणी करताना, गेले वर्षभर सतत काम करून थकवा आलाय का? असा प्रश्न आम्ही विचारला.
"शरीर थकलंय. जीव पूर्ण थकलाय, नको ते काम असं वाटतं. जरा चार-आठ दिवस सुट्टी घेऊन आराम करू म्हटलं तर कोरोनाने पुन्हा डोकंवर काढलं. सणवार गेले, दिवाळी गेली. कोरोना रुग्ण वाढतात, मग सुट्टी कशी घेणार,' असं त्या म्हणतात.
पुढे सांगतात, "मी डॉक्टर नाही. पण, माझ्याकडे असलेलं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवता येतं याचा मला आनंद आहे. पेशंटबद्दल कॉल आला की सगळं विसरायला होतं. झटक्यात थकवा दूर होतो. थकवा नंतरही दूर करता येईल. सध्या रुग्णांना आमची गरज आहे. "
उल्का यांचे पती कुरिअर कंपनीत कामाला होते. "माझ्या मिस्टरांची नोकरी गेली. कामावर बोलावत नाहीत. त्यामुळे काम करायलाच हवं," असं त्या म्हणता.
'बस्स झालं! असं कसं म्हणणार?'
धारावीच्या कुंभारवाडा परिसराची जबाबदारी अंकिता शेडगे यांच्या खांद्यावर आहे. गेल्यावर्षापर्यंत जोगेश्वरीला रहाणाऱ्या अंकिता आता धारावीत शिफ्ट झाल्या आहेत.
"बस्स झालं, असं म्हणणार नाही. घरोघरी नाही गेलो तर रुग्ण आणखी वाढतील. आम्हाला काम करायलाच हवं."
अंकिता यांच्यसोबत फिरताना त्यांनी अचानक गुजरातीत बोलण्यास सुरूवात केली. "केम छो? तब्येत सारी छे.." अंकिता शेडगे एका वृद्ध महिलेची विचारपूस करत होत्या.
या परिसरात विविध भाषा बोलणारे लोक रहातात. त्यामुळे त्यांच्या भाषेत बोललं तर, लोक या आरोग्यसेविकांना आणखी आपलसं मानतात, हे दिसून आलं. म्हातारे, लहान मुलं, महिला-परूष यांच्यात जनजागृतीचं मोठं काम या आरोग्यसेविका करतात.
प्रशासन आणि सामान्य लोक यांच्यातील दुवा म्हणून त्या काम करत आहेत.
त्या म्हणतात, "लोकांना सांगतो घाबरू नका. याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं. त्यांची तपासणी करतो. काही लोक स्वत:हून फोन करतात. लक्षणं सांगतात. काय करू मॅडम असं विचारतात. मग, त्यांना गरजेनुसार क्वारेंन्टाईन सेंटर किंवा रुग्णालयात पाठवतो."
कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेत धारावीत रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. पण, अजूनही अनेक लोक मास्क घालून फिरताना दिसत नाहीत, तर काहींचा मास्क त्यांच्या हनुवटीवर असलेला पहायला मिळाला.
लोकांच्या वागण्यावर अंकिता काहीशा नाराज होऊन म्हणतात. "लोक ऐकत नाही. मास्क घालत नाहीत. आपण सांगितलं की मास्क घालतात. पाठ फिरली की पुन्हा काढतात."
पण, गेल्यावर्षीच्या तुलनेत लोक आता सहकार्य करायला लागल्याचं त्या सांगतात.
"गेल्यावर्षी लोक अजिबात पुढे येत नव्हते. पीपीई कीट घालून पाहिलं, की पळून जायचे. घराबाहेर येत नव्हते. पण, आता लोकांचं खूप सहकार्य मिळतं. "
'आमचा पण संसार आहे'
मीरा काळे, उल्का परब आणि अंकिता यांच्यासारख्याच कम्युनिटी हेल्थ वर्कर आहेत.
त्या म्हणतात, "लोकांना सांगतो, आम्ही तुमच्यासारखेच आहोत. आम्हीपण काळजी घेतोय. तुम्ही देखील घरच्यांची काळजी घ्या."
उद्विग्नपणे त्या म्हणतात, "लोकं ऐकत नाही म्हणून रुग्ण वाढत आहेत. कोरोना नाही असा लोकांचा गैरसमज झालाय."
धारावीत रुग्णसेवा देणाऱ्या महापालिकेच्या डॉ. प्रियांका सांगतात, "पहिल्या लाटेत लोक क्वारेन्टाईन सेंटरला जाण्यास घाबरत होते. पण, आता त्यांना माहिती झालंय. लोक टेस्ट करत आहेत. क्वॉरेन्टाईन होत आहेत. इतर कामासोबत कोव्हिडचं काम करताना थकवा आलाय. पण, आम्ही काम करत राहू."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)