You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस, प्रतिकारक्षमता, संसर्ग याबद्दल लहान मुलांना कसे समजावून सांगाल?
- Author, डॉ. प्राजक्ता करंबेळकर
- Role, बालरोगतज्ज्ञ, न्यू जर्सी, अमेरिका
"लस घेतल्यावर हात दुखतोय का?"
"हो...थोडासाच... "
"मग का घेतो आपण व्हॅक्सिन? मला आवडत नाही... टोचलेलं..."
सहा वर्षाच्या मुलाचा हा प्रश्न, सगळ्यांनाच पडणारा आहे. आपल्या घरातही मुलांना असे प्रश्न पडत असतीलच, त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं सोप्या शब्दात देण्याचा प्रयत्न करत आहे.
संसर्ग म्हणजे काय?
रक्तात दोन प्रकारच्या सेल/ पेशी असतात. लाल पेशी आणि पांढऱ्या पेशी. यातल्या पांढऱ्या पेशी म्हणजे आपल्या शरीराची संरक्षक सेना.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे सर्व गनिमी कावे आत्मसात केलेली अत्यंत हुशार संघटना! या सेनेतले काही मावळे शरीराच्या सर्व भागांमध्ये दबा धरून बसलेले असतात त्यांना "अॅंटिजेन प्रेझेंटिंग सेल्स" (अॅंटिबॉडीज निर्माण करण्यासाठी रक्ताला उत्तेजित करणारं द्रव्य असणाऱ्या पेशी) म्हणतात.
संपूर्ण शरीराला स्किन/ त्वचेची तटबंदी असते. जंतू (बॅक्टेरिया/ व्हायरस/ आणखी कोणताही) चुकून जर या भिंतीला भेदून आत गेलाच तर या मावळ्यांच्या नजरेतून तो सुटू शकत नाही. यांचा पहिला हेतू त्याला पकडणं हाच आहे. पेशी जंतुला पकडून मारून टाकतात आणि थेट सेनापतीकडे घेऊन जातात.
प्रत्येक भागातून येणाऱ्या या शिपायांसाठी निरनिराळी ठाणी/ छावण्या लावलेल्या असतात या म्हणजे आपल्या "lymph nodes" यांना लसिका गाठी असं म्हटलं जातं.
(ताप, घसादुखी असताना गळ्याकडे गाठी येतात त्याच!) इथे जंतू घेऊन आलेल्या शिपायांना "टी सेल" नावाचे सेनापती भेटतात. आणलेल्या कैद्याची या तपासणी करतात.
तो धोकादायक आहे का? त्याच्याकडे कोणत्या प्रकारची शक्ती आहे?काय शस्त्र आहेत? अशी त्याची कसून झडती घेतली जाते. आणि या सगळ्याची इथंभूत माहिती सेनेला दिली जाते.
"टी सेल" च्या सेनेमध्ये "बी सेल" नावाचा विशिष्ट शिपाई असतो त्याच्याकडे निरनिराळी शस्त्र तीही प्रत्येक शत्रूला अनुरूप अगदी "कस्टमाइज्ड" बनवून द्यायचं कसब असतं. त्याच्या या शक्तीचा उपयोग करून ही शस्त्र म्हणजेच " IgM, IgG, IgA, IgE आणि IgD" या पाच प्रकारच्या "अॅंटिबॉडिज" (ज्या टेस्ट करून लॅब मध्ये मोजल्या जातात त्याच!).
या पाच प्रकारच्या शस्त्रांची अगदी विशिष्ट कामं आहेत. समोरच्या शत्रूच्या हातात जर तलवार असेल तर आपल्या हातात, ढाल असावी लागते, तिथं वाघनखं कामाची नाहीत !! बी सेल ही शस्त्र मोठ्या प्रमाणात तयार करून ठेवते. तिचं अजून एक महत्वाचं काम म्हणजे आलेल्या शत्रूला चांगलं आठवणीत साठवून ठेवणं.
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-लहान मुलांमध्ये कोव्हिड-19ची कोणती लक्षणं आढळतात? MIS-C म्हणजे काय?
- वाचा-कोरोनाची लक्षणं जाणवल्यावर कोणती टेस्ट करायची?
- वाचा-लस घेण्यासाठी Co-Win वर नोंदणी कशी करायची?
- वाचा- कोरोना लसीकरणाबाबत तुम्हाला पडलेले 15 प्रश्न आणि त्यांची उत्तरं
सगळ्या शिपायांना सतत जागरूक ठेवायला शत्रूचे फोटो काढून गावभर "वॉन्टेड" ची पोस्टर लावल्यासारखंच! पुढच्या वेळी जर तोच शत्रू पुन्हा आला तर त्याची धडगत नाही! या 'टी सेल' आणि 'बी सेल' मिळून बाकीच्या अगदी पुढच्या आघाडीवर लढणाऱ्या सैन्याला म्हणजेच "phagocyte" (शरीरात प्रवेश करणार्या सूक्ष्मजंतूंचा नाश करणारी रक्तातील एक प्रकारची पांढरी पेशी) या जंतूला अगदी अक्षरशः खाऊन टाकणाऱ्या पेशींनाही नियुक्त करतात. कोणत्याही प्रकारच्या जंतूंच्या अशा प्रकारच्या भेटीला इन्फेक्शन-संसर्ग म्हणतात.
प्रतिकारशक्ती म्हणजे काय?
वर सांगितलेली सर्व प्रक्रिया आपल्या शरीरात सतत चालू असते कारण सतत आपण कोणत्या ना कोणत्या जंतूला एक्सपोज (जंतूच्या संपर्कात येतो) होतच असतो. ही शक्ती आपल्याला जन्मजात आपल्या आई वडिलांकडून देणगी मिळालेली असते. पण ती जन्मतः अगदी "naive" म्हणजे बाळबोध असते.
जसजसे आपण मोठे होत जातो आणि जास्तीत जास्त जंतूंना एक्सपोज होत जातो तसतशा या पेशी तयार होत जातात. आणि ही लढवय्यी सेना मोठी आणि बलाढ्य होत राहते.
आईच्या शरीरात तिच्या जन्मापासून तयार झालेली ही सेना, काही शस्त्र नुक्त्या जन्म झालेल्या बाळाला उधार देते. थोडी जन्म होण्याच्या प्रक्रियेत आणि थोडी दुधातून. आईच्या दुधात नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक असतात.
जेव्हा ही सेना तयार असते तेव्हा जर एखादा शत्रू तट भेदून आत आलाच तर अॅंटिबॉडिज त्याला पकडून ठेवतात आणि phagocytes खाऊन टाकतात. आणि जरी इन्फेक्शन झालं असलं तरी त्याची लक्षणं दिसत नाहीत, किंवा आपल्याला त्रास होत नाही.
लस म्हणजे काय?
अगदी सोप्यात सोप्या पद्धतीनं सांगायचं तर लस म्हणजे मेलेला जंतू! मेलेला/ शस्त्र काढून घेतलेला/ शक्ती संपवलेला जन्तू शरीरात टोचला जातो आणि खरंच शत्रू आलाय ही समजूत होऊन आपली संरक्षक सेना वरची सगळी प्रोसेस करून सुसज्ज, सशस्त्र तयार राहते. म्हणजे जेव्हा खरा शत्रू येईल तेव्हा त्याने शरीराला इजा करायच्या आधीच त्याला संपवून टाकलं जातं. एडवर्ड जेन्नर नावाच्या हुशार शास्त्रज्ञाची आपल्याला देणगी आहे.
लस बऱ्याच प्रकारची असतात, किल्ड (मारलेले जंतू), इनअॅक्टिवेटेड( निष्क्रिय केलेले जंतू), live attenuated( शक्ती काढून घेतलेले जिवंत जंतू) subunit( नुसतेच जंतूचे अवशेष).
लस कशी काम करते?
लस टोचल्यानंतर वर लिहिलंय तीच सगळी प्रोसेस शरीरात होते. या सगळ्याला जादूची कांडी नाही त्यामुळे एका डोसनंतर अँटीबॉडीज तयार व्हायला चार ते सहा आठवडे लागतात. त्यांनतर पुढचा डोस घेतला की पुढे अजून तीन ते चार महिने लागतात.
जंतू येताना एकटा कधीच येत नाही, त्याचीही सेना असते, त्या संपूर्ण सेनेशी लढता येईल इतक्या पुरेपूर अँटीबॉडीज तयार होण्यासाठी दोन डोसमधील अंतर आणि शेवटच्या डोसनंतरचा काळ खूप महत्वाचा असतो. यालाच 'सिरो कन्व्हर्जन' म्हणतात.
कधीकधी डोस घेऊन फार वर्ष झाली असतील तर तयार झालेल्या अँटीबॉडीजची क्षमता आणि पातळी दोन्ही कमी होते त्यामुळे धनुर्वात, टायफॉईड सारख्या लशी वारंवार घ्यावी लागतात.
जशी आपली ही सेना हुशार तसा कधीकधी जंतूही दुप्पट हुशार असतो तो रूप बदलून, शस्त्र आणि युद्धनीती बदलून येतो. अशा बदलत्या जंतूंसाठी दरवर्षी नवी बदलती लस घ्यावी लागते. फ्लू व्हायरस या प्रकारचा जन्तू आहे.
डोस घेतल्यावर ताप येणं, अंग दुखणं हे प्रकार होतात कारण लस हेही एक प्रकारचं इन्फेक्शन आहे. त्याला शरीराच्या लढाऊ पेशी योग्य प्रतिकार करायची तयारी करताहेत याची ही एक प्रकारची पावती आहे.
हे काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायला हवेत :
1) प्रतिकारशक्ती ही प्रत्येकाला मिळालेली निसर्गदत्त ताकद आहे. कोणतेही काढे, हळद-दूध औषधं पिऊन किंवा चूर्ण खाऊन ती रातोरात वाढू किंवा बळकट होऊ शकत नाही.
2) योग्य चौरस आहार, पुरेसा व्यायाम, सूक्ष्मपोषक तत्व म्हणजेच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांचा योग्य समावेश आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा प्रदीर्घ काळासाठी (दोन दिवस, चार आठवडे नाही) जीवनशैलीत समावेश केला तर फायदे आहेत.
3) ही शरीराची संरचना कितीही शक्तिशाली असली तरी त्याला मर्यादा आहे. एक्स्पोजर टाळणे हा साथीच्या आजारांसाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे. आताच्या करोना साथीला अनुसरून वारंवार साबणाने हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझर लावणे (कोरोना व्हायरस 'एनव्हलप्ड' म्हणजेच कवच असलेला जंतू आहे. साबण आणि सॅनिटायझर मध्ये हे कवच विरघळून जातं आणि जंतू मरून जातो, एकटा हा नाही तर असे अनेक व्हायरस आहेत), मास्क (नाकावर आणि व्यवस्थित) लावणे आणि स्वच्छता ठेवणे हे योग्य.
4) Vaccine Preventable diseases म्हणजेच डोस घेऊ ज्या रोगांना आळा घालता येतो त्यांच्यावर हा खात्रीशीर इलाज आहे त्यामुळे हे डोस चुकवू नये. शेवटी "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा" हे सत्य आहे. आपल्या मुलांच पुढे येणारं आयुष्य निरोगी राहण्यात आपलाच मोठा हात आहे.
आजपर्यंत या जग बदलवून टाकणाऱ्या तंत्रज्ञानामुळे, पोलिओ, देवी सारख्या असाध्य आणि दुर्धर रोगांवर मात झाली आहे आणि कांजिण्या, गोवर, फ्लू, धनूर्वात यासारख्या आणखीही किती रोगांवर आळा घालता आला आहे.
आताच्या कोरोना या ज्वलंत समस्येला कोणत्या टप्प्यावर समाधान मिळेल माहित नाही. पण लस हा एक मोठा आशेचा किरण आहे. मागच्या शतकातल्या हुशार शास्त्रज्ञांनी तयार केलेली ही "कवच कुंडलं" पुढच्या पिढ्यांनाही देणगी ठरतील हे नक्की!
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)