कोरोना : तरुणांमध्ये 'या' कारणांमुळे कोरोना झपाट्यानं पसरतोय

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"मला कोरोना होणार नाही, हा गैरसमज आहे. मी बॉडी-बिल्डर आहे, मला कोरोना कसा होईल, असा लोक विचार करतात. कोरोना होणार नाही याची खात्री कोणीही दिलेली नाही. त्यामुळे मी सुदृढ असलो, तरी मला कोरोना होऊ शकतो, असंच आपण समजाला हवं."

मुंबईच्या केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांचे शब्द प्रत्येकाने कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखे आहेत.

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट झपाट्याने पसरतेय. मुंबई, पुणे, नागपूरसारखी मोठी शहरंच नाही. तर ग्रामीण भागालाही कोरोना संसर्गाच्या त्सुनामीने विळखा घातलाय.

तज्ज्ञांच्या मते, म्युटेट झालेला (बदललेला) कोरोना व्हायरस अधिक तीव्रतेने पसरणारा, संसर्ग क्षमता जास्त असलेला आणि रोगप्रतिकारशक्तीला चकवा देणारा आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत अनेक कुटुंबं कोरोनाबाधित होत आहेत.

कोव्हिड-19 संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत वेगळेपण काय? तरुणांमध्ये कोरोना संसर्ग तीव्रतेने का पसरतोय? याबाबत आम्ही डॉ. हेमंत देशमुख यांच्याकडून जाणून घेतलं.

प्रश्न - कोरोनाची पहिली लाट आणि दुसरी लाट यामध्ये काय वेगळेपण दिस आहे?

डॉ. हेमंत देशमुख - कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत 15 ते 40 वयोगटातील व्यक्तींमध्ये संसर्ग जास्त दिसून येत नव्हता. मधुमेह, उच्च रक्तदाबाने आजारी व्यक्ती, फुफ्फुसं निकामी झालेले किंवा फुफ्फुसांचे आजार असलेल्यांमध्ये कोरोनासंसर्ग जास्त दिसून आला होता.

यावेळी कोमॉर्बिडिटी असल्यांबरोबर इतर कोणतेही आजार नसलेल्यांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं दिसून येतंय. डायलेसिसवर असलेल्या रुग्णांमध्ये संसर्ग कमी दिसून येतोय. पण ज्यांना कोणताही आजार नाही, जे सुदृढ आहेत, अशांमध्ये कोरोनासंसर्गाची शक्यता जास्त वाढली आहे.

प्रश्न - कोणताही आजार नसलेल्या 15 ते 30 वयोगटातील तरुणांना कोरोनासंसर्ग जास्त होतोय? हा आजार गंभीर स्वरूपाचा आहे?

डॉ. हेमंत देशमुख - गेल्यावर्षी एक्युट रिस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंन्ड्रोम (ARDS) ने ग्रस्त युवा रुग्णालयात दाखल झाले होते. पण यावर्षी 15 ते 30 वर्ष वयोगटातील तरुणांमध्ये कोरोना होण्याचं प्रमाण वाढलंय.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लक्षणं दिसून आल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी लोक रुग्णालयात येत आहेत. आजाराचा पहिला दिवस ओळखणं महत्त्वाचं आहे. आजार झाल्यानंतर पाचव्या किंवा सहाव्या दिवसाच्या आधी रुग्णालयात दाखल होणं गरजेचं आहे.

पण यावेळी असं जाणवलंय की, सुशिक्षित युवा वर्ग बराचकाळ घरी राहातोय. याचं कारण ते काही ब्लड टेस्ट करतायत. हाय रिझोल्युशन सीटी स्कॅन (HRCT) करतात, तर घरीच RTPCT टेस्ट करून घेतात. खासगी लॅबमध्ये रिपोर्ट येण्यास तीन दिवस लागतात. हे तीन दिवस हानिकारक ठरत आहेत.

रिपोर्ट पॉझिटिव्ह येईपर्यंत हा वर्ग उपचारांकडे दुर्लक्ष करतोय. केईएममध्ये दाखल रुग्णांपैकी 20 टक्के रुग्ण तरुण आहेत. त्यांना गंभीर स्वरूपाचा संसर्ग असल्याचं दिसून आलंय.

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सुशिक्षित युवा RTPCT टेस्टची CT (Cycle Threshold) व्हॅल्यू पाहतात. CT व्हॅल्यू 35 पेक्षा जास्त असणारे सर्व निगेटिव्ह असणार आहेत. जेवढी CT व्हॅल्यू कमी तेवढा शरीरात व्हायरल लोड जास्त असतो.

दुसरीकडे HRCT व्हॅल्यू 5/25 पेक्षा जास्त असलेले युवा बिनधास्त बाहेर फिरत आहेत. या सुशिक्षित लोकांमधील गैरसमज दूर करणं, शक्य होत नाहीये. जे सर्वात महत्त्वाचं आहे.

प्रश्न - सशक्त लोकांनाही कोरोनासंसर्ग होऊ शकतो?

डॉ. हेमंत देशमुख - लोकांना गैरसमज आहे की मला कोरोना होणार नाही. लोक उदाहरण देतात, इतर ठिकाणी गर्दी आहे. तिथे कोरोना होत नाही. कोरोना होणार नाही याची खात्री कोणीही दिलेली नाही. त्यामुळे मलाही कोरोना होऊ शकतो, असा समज लोकांनी ठेवला पाहिजे. मी कितीही सुदृढ असलो करी मला कोरोना संसर्ग होऊ शकतो. याचं कारण, हा विषाणू वय पाहत नाही. नवजात मुलांपासून ते 100 वर्षाचे वृद्ध सर्वांना हा आजार होतो.

तरुण वर्ग बेफिकीरपणे वागतोय. पार्टी, विकेंडला बाहेर जाणं, काम नसतानाही बाहेर फिरणं यामुळे युवा पिढीला संसर्ग जास्त होतोय.

प्रश्न - कोरोनासंसर्गाची दुसरी लाट किती धोकादायक आहे? विषाणू हवेतून पसरत आहे का?

डॉ. हेमंत देशमुख - ही दुसरी लाट नाही. याला त्सुनामी म्हणावं लागेल. त्सुनामी लाटेपेक्षा भयंकर असते. गेल्यावर्षीच्या तुलनेत कोरोनाने महाभयंकर रूप धारण केलंय. कोरोनाचा हा विषाणू चिंतेत टाकणारा आहे.

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा विषाणू हवेतून पसरतोय. पहिल्या लाटेत कोरोनासंसर्ग खोकल्यातून, कोणत्याही पृष्ठभागाच्या संपर्कात आल्याने होतो असं गृहीत धरण्यात येत होतं. पण, यावेळी नक्की जाणवलंय की कोरोनासंसर्ग हवेतून पसरतोय.

म्हणूनच मास्क वापरणं अत्यंत गरजेचं आहे. हा मास्क कापडी नसावा. ट्रिपल लेअर किंवा सर्जिकल मास्क वापरावा. मास्क वापरल्यानंतर अस्वस्थ वाटलं, तर मास्क चांगला आहे असं समजावं.

जपानमध्ये दोन लोक एकत्र आले तर गर्दी मानली जाते. पण आपल्याकडे पाच लोक भेटल्याशिवाय चैन पडत नाही. दोन ही गर्दी समजावी. यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळावं.

सर्वात महत्त्वाचं, जेवताना एकटे जेवा. बोलताना मास्क खाली करून बोलू नका.

प्रश्न - पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लक्षणं वेगळी आहेत?

डॉ. हेमंत देशमुख - कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत कोरोनाबाधित झाल्यानंतर हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक, पायात रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी किंवा गॅंगरीन झाल्याने येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती.

पण दुसऱ्या लाटेत डोळे लाल होणं, तोंडाला चव नसणं, वास न येणं. त्यासोबत सर्दी, खोकला, ताप, थकवा आणि सांधेदुखी (संधिवात) अशी लक्षणं पहायला मिळत आहेत.

प्रश्न - कोरोना व्हायरसमध्ये झालेल्या डबल म्युटेशनमुळे संसर्ग पसरतोय?

डॉ. हेमंत देशमुख - व्हायरसमध्ये बदल होत असतात. कोरोना व्हायरसलाही म्युटेट होण्यासाठी 400 दिवस मिळाले. आपण लोकांमध्ये मिसळलो. त्यामुळे व्हायरस म्युटेट होत गेला. या व्हायरसशी लढण्यासाठी आपण लसीकरण सुरू केलंय.

लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली की हर्ड इम्युनिटी तयार होईल.

प्रश्न - गेले वर्षभर आरोग्य कर्मचारी दिवसरात्र काम करतायत? त्यांची मनस्थिती कशी आहे?

डॉ. हेमंत देशमुख - कोरोना सुरू होऊन 400 दिवस झालेत. सर्व डॉक्टर्स कोरोनाबाधितांची सेवा करतायत. पण सतत काम करून येणारा थकवा जाणवत आहे.

400 दिवसांनंतर थकवा नक्कीच आलेला आहे. पण, सर्व डॉक्टर्स एक लक्ष समोर ठेऊन का करतायत. त्सुनामी कितीही तीव्रतेने आली तरी, आम्ही रुग्णांसाठी झटत राहू.

प्रश्न - तरुण वर्गाला काय संदेश द्याल?

डॉ. हेमंत देशमुख - तुम्ही कुटुंबाचे आधारस्तंभ आहात. त्यामुळे काळजी घ्या. तुम्हाला पिढी पुढे न्यायची आहे. मागच्या पिढीला सांभाळायचंय. त्यामुळे सशक्त रहाणं गरजेचं. आहे.

आपल्याकडे असलेली 35 वर्षाची ताकद कोरोनाला हरवू शकत नाही. मास्क, स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगच्या त्रिसूत्रीचं पालन कराल तर तुम्ही सुरक्षित राहाल आणि तुमचं कुटुंब सुरक्षित राहील.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)