मानसिक आरोग्य : लहान मुलांशी मृत्यूबद्दल कसं बोलायचं?

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

गेल्या वर्षभराच्या काळात कोव्हिड 19च्या साथीमुळे अनेकांनी आपले कुटुंबीय, जिवलग गमावले. मृत्यूबद्दल अजूनही आपल्याकडे मोकळेपणाने बोललं जात नाहीत. घरात कुणाचं निधन झाल्यावर जिथे मोठ्यांनाच आपल्या भावना व्यक्त करणं कठीण जातं, तिथे ही गोष्ट घरातल्या लहानांना कशी समजवायची?

मुलांशी त्यांच्या वयानुसार मोकळेपणाने, त्यांना समजेल अशा शब्दांत आणि खरं बोलणं हेच सगळ्यात योग्य असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

4 वर्षांच्या अयानचा दिवस आजोबांच्या अवतीभवती जायचा. अगदी लहान असल्यापासून त्यांच्यासोबत बाहेर जाणं, घरात त्यांच्याशी खेळणं याची त्याला सवय होती.

पण आजोबा आजारी पडले आणि गोष्टी बदलल्या. डॉक्टरला भेटून घरी येणारे आजोबा कधी 2-3 दिवस, तर कधी त्यापेक्षाही जास्त दिवसांनी घरी येत. दादू घरी कधी येणार, हे विचारून अयान आईला हैराण करायचा.

हळुहळू त्याला आजोबांच्या आजारी असण्याची सवय झाली. पण आजोबांचं निधन झालं त्या दिवशीच्या गोष्टी अजूनही अयानच्या लक्षात आहेत.

अयानची आई, टेसियाना नवानी सांगतात, "तो शाळेतून आला तेव्हा गर्दी दिसू नये, म्हणून मी त्याला माझ्या मैत्रिणीसोबत ठेवलं. पण नंतर नमस्कार करण्यासाठी त्याला आणलं. आजोबांना असे कपडे का घातले होते, त्यांना असं अस्ट्रॉनॉटसारखं गुंडाळलं का होतं असे प्रश्न त्याला पडले. मी ही मग त्याचा आधार घेत आजोबा आता देवाला मदत करण्यासाठी स्पेसमध्ये जात असल्याचं सांगितलं. त्याने विचारलं, मग ते परत कधी येतील? आम्ही म्हटलं - काही दिवसांनी."

दीड वर्षं उलटून गेल्यावरही या सगळ्या गोष्टी अयानच्या लक्षात आहेत आणि दादू परत येतील अशी आशाही आहे. आणि आता त्याला खरं कसं सांगायचं हा प्रश्न त्याच्या आईबाबांना पडलाय.

याविषयी बोलताना मुंबईतल्या केईएम हॉस्पिटलच्या माजी प्राध्यापिका डॉ. शुभांगी पारकर सांगतात. "मुलांशी त्यांच्या वयानुसार आणि त्यांची इमोशनल मॅच्युरिटी समजून बोलावं. लहान मुलं त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, संभाषणं यातून माहिती टिपत असतात. त्यामुळे त्यांच्याशी थेट बोललं नाही तर ही मुलं अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे आपल्या परीने अर्थ लावतात. अनेकदा घरातली मोठी माणसंही दुःखातून वा धक्क्यातून सावरत असल्याने मुलांना ही निधन झालेली व्यक्ती 'देवाघरी' गेली किंवा काही दिवस लांब राहणार आहे, असं सांगितलं जातं. पण हे खरंतर ती वेळ सावरून नेण्यापुरतं असतं. हे मूल थोडं मोठं झाल्यावर त्याला समजेल अशा पद्धतीने परिस्थिती सांगावीच लागते."

लहान मुलांना मृत्यूविषयी कसं सांगायचं?

याविषयी बोलताना न्यू होरायझेन्स चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटरचे डेव्हलपमेंटल पीडिअॅट्रिशियन डॉ. समीर दलवाई सांगतात, "अगदी लहान मुलांना मृत्यू म्हणजे काय हे समजत नसतं. पण त्यांना आनंद आणि दुःख, भीती, काळजी या भावना कळत असतात.

आपल्या जवळची व्यक्ती आनंदात आहे का, सुरक्षित आहे का याविषयीचे प्रश्न त्यांना पडतात. अशावेळी कुटुंबातल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, ती व्यक्ती आता आपल्यामध्ये परत येणार नसली, तरी तिला आता त्रास होत नाहीये असं मुलांना सांगता येईल. गोष्टी लपवल्या तर मग मुलांना नक्की काय चाललंय याविषयीची शंका यायला लागते."

रेणुका खोत 4 वर्षांच्या असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "मला आई आता नीटशी आठवत नाही. पण जाताना ती माझं नाव घेत होती ही तिची माझ्याकडची शेवटची आठवण...ती गेल्यानंतर माझ्या शेजारी बसून कोणी माझ्याशी बोललं नाही. मला नीट सांगितलं नाही. इतकंच काय तिच्या आठवणी, दागिने, साड्या माझ्यासाठी जपून ठेवल्या नाहीत. माझ्या आईच्या चांगल्या आठवणींचा उल्लेख होण्याऐवजी तिच्या मृत्यूविषयीच सतत बोललं जायचं.

नवीन मेमरीज निर्माण करण्याचा प्रयत्न झाला नाही. काय झालं ते विसरण्याची संधी, आपल्या समाजाकडून त्या मुलाला दिली जात नाही...एकदा समजवून सांगितलं, आठवणी जपून ठेवल्या तर त्या मुलांना मदत होईल. त्यांचं ते सगळं तोडून टाकू नका. माझ्या आईचं माझ्याकडे काहीच नाही. एक मृत्यू सोसायटी नीट हँडल करत नाही, तेव्हा त्याचे पुढच्या अनेक वर्षांवर परिणाम होतात. नात्यांवर परिणाम होतात. आता त्याचा सल जाणवतो."

याविषयी बोलताना डॉ. समीर दलवाई सांगतात, "आपल्याकडे एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर 10 लोकं येऊन तेच तेच बोलतात. ही व्यक्ती कशी आजारी पडली किंवा कधी-कसं, काय झालं हे परत परत सांगून कुटुंबियांवरही याचा परिणाम होत असतो. लहान मुलांवरही याचा परिणाम होतो. समाज म्हणून आपण या गोष्टी बदलण्याची गरज आहे.

त्या व्यक्तीच्या मृत्यूबद्दल बोलण्याऐवजी तिचं आयुष्य सेलिब्रेट का करत नाही? परदेशामध्ये असं केलं जातं...सगळेजण गोळा होऊन त्या व्यक्तीबद्दलच्या चांगल्या आठवणी शेअर करतात. एखाद्या व्यक्तीला ऑफिसमधून निरोप देताना - फेअरवेलच्या वेळी त्या व्यक्तीची चांगली कामगिरी सांगितली जाते. आयुष्याबद्दलही तसंच आहे."

"त्या व्यक्तीबद्दलची एक हॅपी स्पेस क्रिएट तयार करा. त्यांच्याबद्दलच्या चांगल्या आठवणी सांगा. कुणाला भेटायला जात असाल तर फुलं घेऊन जा आणि त्या व्यक्तीबद्दलच्या तुमच्या चांगल्या आठवणी सांगा. त्याने घरात एक पॉझिटिव्हिटी निर्माण होईल. शिवाय त्या व्यक्तीच्या जाण्याने मुलांच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण होते, ती देखील लक्षात घ्यायला हवी. आजी नाही तर माझ्याशी कोण खेळणार, आजोबांसारखं मला कोण फिरायला नेणार, लाड करणार असं त्यांना वाटू शकतं. अशावेळी मी तुझ्याशी खेळीन किंवा फिरायला नेईन असं घरातल्या इतर कोणीतरी सांगणं मुलांना दिलासा देणारं असतं."

आयुष्यातली एक महत्त्वाची व्यक्ती निघून गेलेली असली, तरी अजूनही काही महत्त्वाच्या व्यक्ती आयुष्यात आहेत हे त्या मुलाला सांगणं आणि त्याला आयुष्य आनंदाने जगायला आणि अनुभवायला शिकवणं महत्त्वाचं असल्याचं रेणुका खोत सांगतात.

त्यांच्या 9 वर्षांच्या लेकाला आता त्यांनी मृत्यूबद्दल काही गोष्टी सांगितल्या तर आहेतच पण सोबतच 'माणूस मरू शकतो...तू थांबायचं नाही. तू तुझं आय़ुष्य आनंदाने आणि चांगलं जग,' हे सांगायलाही त्या विसरलेल्या नाहीत.

लहान मुलांशी मृत्यूबाबत बोलताना

  • त्यांच्या वयाला समजेल अशा शब्दांत, तशी उदाहरणं देऊन मोकळेपणाने बोला. झाडं, प्राणी, तुमचे आजी-आजोबा अशी उदाहरणं देऊन बोलता येईल.
  • खरी परिस्थिती आणि माहिती टप्प्याटप्याने सांगा.
  • ती व्यक्ती आपल्यात नसली, तरी तिच्याबद्दल बोलू शकतो, तिच्या आठवणी सांगू शकतो याची जाणीव मुलांना होऊ द्या.
  • या व्यक्तीच्या निधनामुळे मुलांच्या आय़ुष्यात, दिनक्रमात होणारे बदल लक्षात घ्या.
  • मुलांच्या मनातल्या असुरक्षितता दूर करण्याचा प्रयत्न करा. कधीही काहीही वाटलं तरी ते मोकळेपणाने बोलण्यासाठी आपण सोबत असू, याची त्यांना हमी द्या.
  • मुलांच्या शंकांना उत्तर द्या. कदाचित मुलं पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतील, पण संयम ठेऊन त्यांची उत्तरं द्या.
  • वाईट वाटणं, रडू येणं साहजिक आहे हे देखील मुलांना कळू द्या. तुमचं दुःखही त्यांच्यापासून लपवू नका. यामुळे मुलंही भावना व्यक्त करायला शिकतील.
  • रंगवणं, चित्रं काढणं यासारख्या गोष्टींमधूनही अगदी लहान मुलं व्यक्त होऊ शकतात.
  • घरातली एक महत्त्वाची व्यक्ती निघून गेली असली तरी हसण्यात, आनंदी राहण्यात काही गैर नाही हे मुलांना सांगा.
  • घरातील सदस्य आजारी असेल, तर मुलांना वेळोवेळी त्याविषयीची माहिती द्या.
  • मुलांसाठी घरातल्या पाळीव प्राण्याचा मृत्यूही मोठा परिणाम करणारा असतो. अशा परिस्थितीत त्यांच्या वाईट वाटण्याकडे दुर्लक्ष करू नका.
  • कोणत्याही परिस्थितीत, काहीच घडलेलं नाही अशा अर्विभावात वागू नका. हे परिस्थिती न स्वीकारण्यासारखं आहे आणि असं केल्याने काहीच फायदा होणार नाही.

मोठ्या मुलांचं दुःख कसं हाताळायचं?

थोड्या मोठ्या मुलांना मृत्यू ही संकल्पना काहीशी माहिती असते. किंवा त्यांनी इतर कोणाच्यातरी मृत्यूबद्दल ऐकलेलं असतं. पण अगदी जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर ही परिस्थिती हाताळणं या किशोरवयीन, पौगंडावस्थेतल्या मुलांना कठीण जातं. या वयातल्या मुलांचं मानसिक स्वास्थ्य जपणं महत्त्वाचं असल्याचं डॉ. पारकर सांगतात.

त्या म्हणतात, "या मुलांशी बोलत राहणं महत्त्वाचं आहे. पण सोबतच त्यांना बोलतं करणं आणि त्यांच्या मनात सुरू असलेले विचार जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. अनेकदा हे आपल्याच सोबत का झालं असं या मुलांना वाटत असतं. किंवा आपण या व्यक्तीशी चांगले वागलो नाही असं वाटून अपराधीपणाची भावना मनात येते.

या मुलांच्या मनातले हे समज दूर करणं गरजेचं आहे. शिवाय ही मुलं निधन झालेल्या व्यक्तीशी भावनिकदृष्ट्या अगदी जवळ असतील, त्यांनी आई वा बाबा गमावले असतील तर त्यांना या व्यक्तीची उणीव जास्त भासते. हे देखील समजून घ्यायला हवं."

मूल कोणत्याही वयातलं असो पण त्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या वागण्यात मोठा बदल घडला, वा त्यांना व्यक्त होता येत नसेल तर डॉक्टरांची आणि मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी.

मृत्यूला धार्मिक वा काल्पनिक गोष्टींशी जोडावं का?

डॉ. शुभांगी पारकर याविषयी सांगतात, "एखादी व्यक्ती देवाघरी गेली किंवा चांदणी (Star) झाली हे मानसिक दिलासा वा सुरक्षितपणाची भावना देणारं असतं. मृत्यूला धार्मिक गोष्टींशी जोडल्याने याच्याशी काहीतरी दैवी निगडीत आहे असा आधार मिळतो किंवा मनाला शांती मिळते. मरण पावलेली व्यक्ती कुठेतरी चांगल्या ठिकाणी आहे अशी भावना यातून निर्माण होते. पण हे सगळं एका ठराविक मर्यादेपर्यंत ठेवावं. अतिरेक करू नये. शिवाय असं सांगितल्यानंतर मुलांच्या मनात देवाविषयीच्या शंका निर्माण झाल्या तर त्यांचं उत्तरही देणं आवश्यक आहे. "

"मृत्यूचा संबंध काल्पनिक गोष्टीशी लावणं हा त्या व्यक्तीचं अस्तित्त्वं कायम ठेवण्याचा प्रयत्न असतो. फँटसीत आपण त्या व्यक्तीला जिवंत ठेवतो. यामुळे अचानक झालेल्या घावाला काहीसा सपोर्ट मिळतो. पण हे देखील काही मर्यादेपर्यंतच योग्य आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)