अश्लील उद्योग मित्र मंडळ : पॉर्नविषयी पालकांनी मौन सोडण्याची वेळ आलीये?

    • Author, अमृता कदम
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

सविता भाभी...वयात येणाऱ्या तरूणांची फँटसी...एका कॉमिकच्या रुपानं हे पात्र अनेक मुलांच्या आयुष्यात आलं. याच पात्राचा आधार घेत सेक्शुअल फँटसी, सहजपणे उपलब्ध असणारे पॉर्न आणि त्याच्या आहारी गेलेली किंबहुना अॅडिक्ट झालेली तरूण पीढी हा विषय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अश्लील उद्योग मित्र मंडळ या चित्रपटातून हाताळला आहे.

या चित्रपटाच्या नावावरून, त्यातल्या सविता भाभी गाण्यावरून तसंच सई ताम्हणकरच्या व्यक्तिरेखेवरून वाद निर्माण झाला असला तरी मुलांमधलं पॉर्नचं वाढतं व्यसन, त्यातून वाढणारी गुन्हेगारी-हिंसाचार या विषयावर आता भाष्य करणंही गरजेचं आहे.

वयात येताना आपलं लैंगिक कुतूहल भागवण्यासाठी चोरून पिवळ्या चोपड्या वाचणारी पीढी आता मागे पडली आहे. आता हातातल्या मोबाईलवर सहजपणे पॉर्न साइट पाहायला मिळतात. आपण असलं काही वाचायचो हे आजही अनेक जण उघडपणे मान्य करत नाहीत. त्यामुळे मुलांच्या बाबतीतही आमच्या मुलांना नाहीत असली काही वळणं असं पालक सरसकटपणे म्हणून मोकळे होतात. पण खरंच अशी परिस्थिती आहे का?

कुटुंबामध्ये सेक्स हा शब्दही उघडपणे उच्चारला जात नाही. आमच्यावेळी असं नव्हतं काही...अशा गोष्टी कळायच्या तेव्हा कळतातच की असं म्हणत मुलांशी लैंगिकता, सेक्स एज्युकेशन अशा विषयांवर मोकळेपणानं बोललं जात नाही.

पॉर्न हा विषय तर फार दूर राहिला. आणि मग मुलांच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये काहीबाही सापडलं की गहजब उडतो. म्हणूनच आता पालकांनी सेक्स एज्युकेशनच्या पलीकडे जाऊन आता पॉर्न या विषयावरही मुलांशी संवाद साधण्याची वेळ आली आहे?

'संवादाअभावी अनैसर्गिक कुतूहूल वाढतं'

मुळात आता हा प्रश्नच उपस्थित करण्याची गरज नाहीये. हा संवाद व्हायलाच हवा, असं मत अश्लील उद्योग मित्र मंडळ या चित्रपटाचे दिग्दर्शक आलोक राजवाडे यांनी व्यक्त केलं.

"कारण न बोलण्याचं काहीच कारण नाहीये. उलट संवादाअभावी खूप नुकसान होतं. अज्ञानामुळे गोष्टी चुकीच्या पद्धतीनं पसरतात. आपल्याकडे शरीराविषयी फारसं बोललं जात नाही. अनेक पुरूषांना अगदी मासिक पाळीबद्दलही माहीत नसतं. अशावेळी स्त्रीशरीराबद्दल चुकीच्या पद्धतीनं कुतूहल निर्माण होतं, ते तसंच शमवलंही जातं. पुरूषांमध्ये एक अॅग्रेसिव्हनेस येतो. त्यामुळे या सगळ्या विषयावर डायलॉग व्हायलाच हवा."

याबद्दल आलोकनं आपला वैयक्तिक अनुभवही सांगितला. "मला मोठी बहीण आहे. मी जेव्हा वयात येत होतो, तेव्हा तिनं मला स्वतः बसून मुलींच्या शरीराबद्दल माहिती दिली होती, पाळीबद्दल सांगितलं होतं. आईनं पण मला पालकनीती नावाचं एक मासिक आणून दिलं होतं. त्यामधून मला लैंगिकतेविषयी योग्य पद्धतीनं माहिती मिळाली. त्याची मला लैंगिक गोष्टी समजून घेण्यासाठी मदत झाली."

पॉर्नमागचं वास्तव समजून देण्याची गरज

"मागच्या पीढीतल्या लोकांपेक्षा सध्याच्या पिढीला मोठ्या प्रमाणावर आणि वेगानं सर्वच बाबतीतलं एक्सपोजर मिळत आहे. त्यामुळे मुलांना लैंगिक शिक्षण देणं ही आता गरजच बनली आहे. त्यातही लैंगिक शिक्षण म्हणजे शारीरिक क्रियांविषयी माहिती एवढ्यापुरतं मर्यादित नाही हेसुद्धा समजून घ्यायला हवं. आपल्या शरीराची ओळख करून देणं, त्यांना स्पर्शांबद्दलची माहिती देणं, शारीरिक स्वच्छता या सगळ्या गोष्टींचाही लैंगिक शिक्षणामध्ये समावेश होतो," असं सोशल मीडिया अभ्यासक मुक्ता चैतन्य यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

मुक्ता चैतन्य यांना '8 ते 18 वयोगटातील मुलांचा गेमिंग-पोर्नोग्राफिक वापर आणि परिणाम' या विषयावरील अभ्यासासाठी अरुण साधू फेलोशिपही मिळाली आहे.

पण पालकांनी आता स्वतःला लैंगिक शिक्षणापुरतं मर्यादित ठेवायला नको, असंही मुक्ता चैतन्य यांनी स्पष्ट केलं.

"फोन आणि इंटरनेटचा uncontrolled acess पाहता अगदी 8-10 वर्षाच्या मुलांनाही न्यूड फोटो, पोर्न साइट्स उपलब्ध होऊ शकतात. अशावेळी त्यांच्यासमोर येणाऱ्या चित्रांचा, दृश्यांचा अर्थ त्यांना समजावून देणं खूप गरजेचं आहे. पोर्न व्हीडिओमधली दृश्यं ही खरी नसतात, चित्रपटांप्रमाणे रचलेली असतात, याची मुलांना जाणीव करून द्यायला हवी."

वयात येणाऱ्या मुलांत पॉर्नमध्ये violent, abusive व्हीडिओ पाहण्याचं प्रमाण खूप जास्त आहे, या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. हिंसाचार, स्त्रियांसोबत होणारं गैरवर्तन हा आनंदाचा भाग असू शकत नाही, हे मुलांना पटवायला हवं असंही मुक्ता यांनी म्हटलं.

अवघड प्रश्न टाळण्याकडे पालकांचा कल

पॉर्नबद्दल आपल्या मुलांशी बोलायला पालक का अनुत्सुक असतात, हेही त्यांनी सांगितलं.

"याबाबतीत पालक मुळात denial mode मध्ये असतात. म्हणजे इतर मुलं असं करत असतील, माझं मूल करत नाही हीच पालकांची पहिली भूमिका असते. माझ्या संशोधनाच्या निमित्तानं मी अनेक पालकांशी बोलले, तेव्हा मला लक्षात आलं, की 80 टक्के पालक आपली मुलं पॉर्न पाहतात, हे मान्य करत नाहीत. 20 टक्के पालक आपली मुलं 'असं काही' पाहू शकतात हे मान्य करतात.

दुसरं म्हणजे याबद्दल नेमकं काय आणि कसं सांगावं हाही प्रश्न पालकांना पडतो. कारण मग मुलं तुम्ही पण असं काही पहायचा का? तुमच्या वेळी पण असं काही होतं का? असे प्रश्न मुलं विचारू शकतात. आणि मग या अवघड प्रश्नांची उत्तरं देणं अवघड होतं. कारण आपण असं काही पहायचो, हे उघडपणे मान्य करायची कोणाचीही तयारी नसते."

त्यामुळे सर्वांत आधी मुलांना पॉर्न, त्यातले धोके समजून देण्यासाठी तसंच मुलांचे प्रश्न हाताळण्यासाठी पालकांनाही सजग करणं गरजेचं आहे, असं मुक्ता यांनी स्पष्ट केलं.

'हा विषय लाज वाटण्यासारखा नाही'

नाशिकचे नितीन परांजपे यांनी कायम आपल्या मुलीशी मोकळेपणानं संवाद साधला. वयात येतानाच्या शास्त्रीय गोष्टी तर तिला समजावून सांगितल्याच पण त्यापलिकडे जाऊन शारीरिक संबंध, वयात येतानाचं आकर्षण, प्रेम या विषयावरही मुलीशी खुलेपणानं चर्चा केली.

"कामावरून घरी आल्यावर आम्ही कायम आमच्या मुलीशी, सखीशी गप्पा मारायचो, तिला वेळ द्यायचो. सहावीनंतर तिला आम्ही वेगळ्या पद्धतीनं शिक्षण देण्याचं ठरवलं आणि तिचं नाव शाळेतून काढलं. पण तिच्या आवडी-निवडी जोपासण्यात सक्रियपणे सहभागी झालो. मी तिच्यासोबत ड्रॉइंगच्या क्लासला जायचो आणि माझी पत्नी तिच्यासोबत डान्स क्लासला जायची. अशा सगळ्या वातावरणामुळे तिचा आमच्यावरचा विश्वास वाढला," असं नितीन परांजपे यांनी सांगितलं.

"ती मोठी होत असताना अगदी सुरुवातीला आम्ही तिला मासिक पाळीबद्दल सांगितलं. त्यानंतर आम्ही तिला लैंगिकतेसंबंधीची काही पुस्तकं वाचायला दिली. त्यामध्ये चित्रांच्या मदतीने स्त्री-पुरुषांच्या शरीररचना समजावून दिल्या होत्या. हे वाचून तिनं आम्हाला तिच्या शंका विचारल्या. प्रश्न विचारताना तिला आणि उत्तर देताना आम्हालाही कधी संकोचल्यासारखं झालं नाही," नितीन परांजपे सांगत होते.

वयात येण्याची प्रक्रिया मला कशी कळली, त्याकाळात या सगळ्याबद्दल आई-वडिलांशी बोलण्याचा आम्हाला कसा संकोच वाटायचा आणि मग आम्ही कोणती पुस्तकं वाचायचो, हेसुद्धा सखीशी शेअर केल्याचं नितीन परांजपेंनी सांगितलं.

"मला याची लाज वाटली नाही आणि आपली मुलगी पण अशी काही माहिती समोर आली तर आपल्याशी शेअर करेल हा विश्वासही निर्माण झाला."

या गोष्टींबद्दल संकोचण्यासारखं, लाजण्यासारखं काहीच नसल्याचं नितीन परांजपेंनी आवर्जून नमूद केलं.

त्यामुळेच एकीकडे चित्रपट, वेबसीरीजच्या माध्यमातून आता मराठीतही बोल्ड, टॅबू समजल्या गेलेल्या गोष्टींना हात घातला जात असताना पालक मात्र अजूनही हा विषय आपल्या घरापर्यंत आला नाही, या भ्रमात राहणार की सजगपणे आपल्या मुलांशी बोलणार हा कळीचा मुद्दा आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)