You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'सेक्स नको पण प्रेम आणि कुटुंब हवं,' एका असेक्शुअल महिलेची कहाणी
- Author, सिंधुवासिनी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
हसणारी-खिदळणारी आणि स्टायलिश पोशाख परिधान करणारी संध्या स्वतःचं वय 40 वर्षं असल्याचं सांगते, तेव्हा त्यावर पहिल्यांदा आपला विश्वासच बसत नाही.
"तुम्ही तर जेमतेम 30 वर्षांच्या वाटता! 40 तर अजिबातच नाही. यामागचं गुपित काय आहे?"
"गुपित म्हणजे- बॉयफ्रेंड नाही, नवरा नाही, कुटुंब नाही आणि टेन्शन नाही," संध्या हसत उत्तर देते.
संध्या बन्सल एका ख्यातनाम कंपनीत मार्केटिंग अधिकारी आहे आणि दिल्ली-एनसीआर भागात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये ती एकटी राहते.
असेक्शुअल म्हणजे अलैंगिक सल्यामुळे ती एकटी राहते. तिने लग्न केलेलं नाही आणि कुटुंबाबाबतचे तिचे विचार बरेच वेगळे आहेत.
काही लोकांना दुसऱ्या व्यक्तीबाबत (पुरुष वा महिला) लैंगिक आकर्षण वाटत नाही. हा एक प्रकारचा लैंगिक कल (सेक्शुअल ओरिएन्टेशन) आहे.
'कुटुंबापेक्षा कधीही ओळख महत्त्वाची'
कुटुंबाच्या पारंपरिक साच्यात आपली ओळख हरवून जावी, असं संध्याला वाटत नाही.
पती-पत्नी आणि मुलं, एवढीच सुखी कुटुंबाची व्याख्या तिला मान्य नाही. प्रत्येक व्यक्तीची कुटुंबाची व्याख्या वेगवेगळी असू शकते.
संध्या सांगते, "23-24व्या वर्षी मला स्वतःमध्ये काही वेगळे बदल जाणवू लागले. माझ्या वयाच्या मुलींचे बॉयफ्रेण्ड होते, त्या मुलांसोबत डेटवर जायच्या, त्यांचं नवीन नातं जुळायचं, पण मला असं काही वाटत नव्हतं."
संध्याला पुरुष अजिबात आवडायचे नाहीत, असंही नाही.
"त्या वेळी एक मुलगा मला खूप आवडायचा. त्याच्या सोबत असायला खूप आवडायचं. सोबत वावरल्यामुळे त्याची आशा वाढू लागली. ते स्वाभाविकही होतं. पण हे नातं सेक्सपर्यंत पोचलं तेव्हा मी एकदम अवघडून गेले. माझ्या शरीराला हे सर्व स्वीकारताच येणार नाही, असं मला वाटलं. जणू काही मला सेक्सची गरजच नव्हती."
संध्याच्या मनात सेक्ससंबंधी काही भीती होती असंही नाही. सेक्सविना तिला स्वतःच्या जगण्यात काही अभाव जाणवत होता का, तर तसंही नाही.
स्वतःच्या लैंगिकतेची ओळख कशी झाली?
संध्या सांगते, "नात्यांमध्ये मी रोमँटिक व्हायचे, पण कोणाही विषयी शारीरिक आकर्षण मला वाटायचं नाही. ज्या मुलावर माझं प्रेम होतं, त्याचा हात पकडून चालायला मला खूप आवडायचं. त्याला मिठी मारणं, त्याच्यासोबत वेळ घालवणं.. हे सगळं मला खूप चांगलं वाटायचं, पण सेक्सच्या वेळी मला अवघडल्यासारखं व्हायचं. माझं शरीर काही प्रतिसाद द्यायचंच नाही."
संध्याला असा अनुभव अनेकदा आला. प्रत्येक वेळी नात्यामध्ये शारीरिक जवळीक साधण्याचा टप्पा आला, की ती मागे सरायची. तिने तिच्या मित्राला हे सांगितलं, तर त्याने तिला डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला.
परंतु, डॉक्टरकडे जाण्यापूर्वी संध्याने स्वतः याबाबतीत वाचायला आणि गोष्टी समजून घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी तिने इंटरनेट आणि लैंगिकतेविषयी विविध प्रकारची माहिती देणाऱ्या संकेतस्थळांचा मार्ग चोखाळला.
लैंगिकतेविषयीच्या समाजमाध्यमांवरील काही गटांमध्येही ती सहभागी झाली.
संध्या सांगते, "माझी समस्या खूप गंभीर आहे, असं मला सुरुवातीला वाटायचं. नाती तुटत असल्याबद्दल मी स्वतःला दोष द्यायचे, पण हळुहळू अलैंगिकतेविषयी मी वाचू लागले, त्यातल्या गोष्टी माझ्या लक्षात येऊ लागल्या आणि मी स्वतःला स्वीकारायला लागले. हळुहळू माझ्या लक्षात आलं की, मला काहीही आजार नाही किंवा माझ्यात काहीही विचित्र नाही. सोशलमीडियाद्वारे माझी इतर असेक्शुअल लोकांशी ओळख झाली. सरत्या काळानुसार माझं स्वतःच्या शरीराविषयीचं आणि माझ्या लैंगिकतेविषयीचं अवघडलेपण पूर्णतः निघून गेलं."
त्यानंतर त्यांनी स्वतःसाठी साथीदार शोधायचा प्रयत्न केला नाही का?
यावर उत्तर देताना संध्या म्हणते, "बऱ्याच अनुभवांनंतर माझ्या लक्षात आलं की, मी एखाद्या पुरुषासोबत नातं जोडलं, तर विशिष्ट काळाने त्याच्या अपेक्षा वाढणारच. दरम्यानच्या काळात मी स्वतःच्या असेक्शुअल असण्याबद्दल पूर्ण सजग झाले होते आणि त्याबाबतीत कोणतीही तडजोड करण्याची माझी अजिबात तयारी नव्हती. असेक्शुअल मुलगा असेल तर, तो माझा साथीदार होऊ शकतो, एवढं मला कळलं होतं. म्हणून मग मी नव्याने साथीदार शोधायचंच थांबवलं."
संध्याला कसं कुटुंब हवंहवंसं वाटतं?
पण आयुष्य सोबत घालवावं असं वाटण्यासारखं कोणी तिला 'असेक्शुअल कम्युनिटी'मध्ये भेटलं नाही का?
यावर संध्या म्हणते की, समाजमाध्यमांवर अनेक लोक भेटले, पण वास्तव जीवनात कोणी भेटलं नाही.
ती म्हणते, "अनेक लोक असेक्शुअल असतात, पण योग्य माहिती अभावी ते स्वतःचा कल ओळखू शकत नाहीत. काही लोक सामाजिक व कौटुंबिक दबावापायी आपला लैंगिक कल उघड करू शकत नाहीत आणि आतल्याआत त्यांची घुसमट होते."
अलैंगिक समुदायातला कोणी चांगला मुलगा भेटला, तर आपण जरूर त्याचा विचार करू, असं संध्या सांगते.
अलैंगिक स्त्री म्हणून कुटुंबाविषयी तिला काय वाटतं?
याला उत्तर देताना संध्या म्हणते, "सध्या तरी मी एकटीच आहे आणि माझ्या समजुतीनुसार येत्या काळातही मी एकटीच असेन. माझे मित्र, मैत्रिणी आणि माझ्या बिल्डिंगमध्ये राहाणाऱ्या मुली, हेच माझं कुटुंब आहे. आम्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहतो, पण आमचं स्वयंपाकघर एकच आहे. आम्ही भेटतो, गप्पा मारतो आणि सुखात नि दुःखात एकमेकांसोबत असतो. हेच माझं कुटुंब आहे. माझी स्वतःची ओळख पुसली जाईल, इतक्या प्रमाणात कुटुंबाने वरचढ ठरावं, हे मला नकोय."
'एकटं राहण्याची भीती वाटत नाही.'
मनासारखा साथीदार मिळाला तर संध्याला त्याच्यासोबत राहायला आवडेल, पण त्या नात्याच्याही काही चौकटी आहेत.
ती म्हणते, "कुटुंब म्हटल्यावर माझ्या मनात जे चित्र उभं राहातं, त्यात मी आणि माझा साथीदार एकत्र असतो, पण आमची स्वतंत्र स्पेसही असते. आम्ही एका घरात राहात असलो, तरी आमच्या खोल्या वेगवेगळ्या असाव्यात. आमचं स्वयंपाकघर एक असावं, तिथे आम्ही एकत्र जेवण तयार करू. आम्ही वेगवेगळ्या खोलीत राहिलो, तरी एकमेकांची भावनिक गरज असताना आम्ही सोबत असू."
आई होण्याविषयी किंवा मुलं जन्माला घालण्याविषयी संध्या स्पष्टपणे सांगते, "मुलं दुसऱ्यांची असतात तेव्हाच मला आवडतात. मला स्वतःचं मूल नकोय. मुलांविषयीची ओढ नसणं ही स्त्रीमधली कमतरता आहे, असं मी मानत नाही."
ती म्हणते, "एकटी राहिलीस, मुलं झाली नाहीत, तर म्हातारपणी तुला कोण सांभाळेल, असं लोक मला अनेकदा विचारतत. त्यावर माझा साधा प्रश्न आहे: सगळ्या वृद्ध लोकांना त्यांची मुलं सांभाळतात का? मी स्वतःच्या म्हातारपणासाठी सेव्हिंग करतेय, गुंतवणूकही करतेय. मी एकटी आहे आणि मला स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला हवी, हे मला माहितेय. म्हणून मी स्वतःच्या तब्येतीकडे आणि फिटनेसकडे लक्ष देते. चांगलं अन्न खाते, योगा करते आणि कोणताही निर्णय अगदी समजून-उमजून विचारपूर्वकच घेते."
संध्याच्या कुटुंबीयांकडून आणि नातेवाईकांकडून लग्नासाठी सातत्याने दबाव येत असतो, पण तिने याबाबतीत स्पष्ट नकार कळवलेला आहे.
'लग्न केलं नाही म्हणून काही बिघडत नाही'
संध्या सांगते, "माझ्या धाकट्या बहिणीचंही लग्न झालंय, त्यामुळे माझ्यावर लग्नासाठी बराच दबाव आहे, पण आता मी लोकांचे सल्ले नि टोमणे ऐकायचं बंद करून टाकलंय. मी एकटी राहते आणि पूर्णपणे स्वावलंबी आहे. मी एकटी लंचला किंवा डिनरला जाते, एकटी शॉपिंग करते.. एवढंच नव्हे तर, मी आजारी पडले, तर डॉक्टरकडेही एकटीच जाते. आयुष्यात लग्न करणं ही काही मोठी गरज आहे, असं मला वाटत नाही. स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य आणि मानसिक शांतता या आयुष्यातल्या जास्त मोठ्या गरजा आहेत."
ऑफिसातल्या किंवा बाहेरच्या जगातल्या लोकांचा दृष्टिकोन कसा असतो?
यावर संध्या सांगते, "चाळीसाव्या वर्षीसुद्धा मी अविवाहित आहे आणि कोणाशी माझं काही नातंही नाही, यावर लोकांचा विश्वास बसत नाही. मी खोटं बोलतेय, असं त्यांना वाटतं. माझं खूप जणांशी जुळलेलं असेल किंवा मला काही आजार असेल, असं त्यांना वाटतं. लोक माझ्याविषयी वाकड्यातिकड्या गोष्टी बोलत राहातात, पण मी तिकडे लक्ष देत नाही. माझे मित्र खूप चांगले आहेत, पण माझं अलैंगिक असणं त्यांना कळत नाही आणि त्यांना स्वीकारताही येत नाही. त्यांना माझी काळजी वाटते आणि मी डॉक्टरकडे जावं असा सल्ला ते मला देत राहातात. पण मला वाटतंय ती मुळात समस्याच नाहीये, हे मला माहितेय, त्यामुळे मी डॉक्टरकडे जाणार नाही."
समलैंगिक, लिंगांतरित किंवा अलैंगिक नात्यांना स्वीकारलं, तर कुटुंबव्यवस्थेचा पाया डळमळीत होईल, असं समाजातील विशिष्ट वर्गाला वाटतं. यावर संध्या म्हणते, "अगदी सोप्या भाषेत सांगते. कोणत्याही बागेत एकाच रंगाची फुलं नसतात. अनेक फुलं लाल रंगाची असतात, काही पिवळ्या, तर काही जांभळ्या रंगाची असतात. म्हणून ती बाग सुंदर दिसते. तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमुळे आपली ही सृष्टी सुंदर झालेय."
जगाची लोकसंख्या इतकी प्रचंड आहे की, काही लोकांनी लग्न केलं नाही, पारंपरिक अर्थाने संसार थाटला नाही, किंवा मुलांना जन्म दिला नाही, एवढ्याने काही बिघडणार नाही, असं संध्या म्हणते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)