You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हैदराबाद एन्काउंटरः बलात्कार-खून प्रकरणातील मृत आरोपीची पत्नी म्हणाली होती 'पोलिसांनी मलापण मारून टाकावं'
डिसेंबर 2019मध्ये हैदराबाद बलात्कार प्रकरणातील 4 आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार झाले होते. आता या प्रकरणाने एक वेगळे वळण घेतले आहे. या प्रकरणाची चौकशी करणारा एक अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला. या अहवालात हे एन्काउंटर खोटे असून चारही आरोपींना जाणिवपूर्वक ठार मारण्यात आले असं म्हटलं आहे.
हैदराबादपासून 50 किमी अंतरावर असलेल्या चटनपल्ली गावात ही घटना घडली होती.
या एन्काउंटरशी संबंधित असणाऱ्या 10 पोलिसांवर खटला दाखल करण्यात यावा असं या अहवालात म्हटलं आहे.
व्ही सुरेंद्र, के, नरसिंह रेड्डी, शेखलाल माधर, मोहम्मद सिराजुद्दिन, कोचेर्ला रवी, के. व्यकंटेश्वरुलू, एस. अरविंद गौड, डी. जानकीराम, आर बालू, डी श्रीकांत अशी यांची नावे आहेत. यांच्यावर भारतीय दंडविधान संहितेनुसार हत्या, पुरावा नष्ट करणे, एकत्रित गुन्हा करणे अशा आरोपांखाली कारवाई व्हावी असे या अहवालात म्हटले आहे.
काय म्हणाली होती आरोपीची पत्नी?
2019च्या डिसेंबरमध्ये हैदराबादमध्ये झालेल्या एन्काउंटरमुळे आरोपींच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या चार आरोपींपैकी एका आरोपीच्या पत्नीने आता पोलिसांनी आपल्याला पण मारून टाकावं, अशी मागणी केली आहे. त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं.
"माझ्या नवऱ्याला काहीही होणार नाही, तो लवकरच परत येईल असं सांगण्यात आलं होतं. आता मला काय करायचं माहिती नाही. आता माझा नवरा जिथं गेलाय तिथं मलाही पाठवण्यात यावं. पोलिसांनी मलाही मारून टाकावं," अशी मागणी तिने केली आहे.
दोनच दिवसांपूर्वी आणखी एका आरोपीच्या वडिलांनी आपल्या मुलानं गुन्हा केला असेल तर त्याला फाशीची शिक्षा व्हावी असं मत व्यक्त केलं होतं. आज त्यांची पत्नी मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच दुःखात बुडून गेली आहे.
आणखी एका आरोपीच्या वडिलांनी आजच्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "माझ्या मुलाने कदाचित गुन्हा केलाही असेल परंतु त्याला अशारीतीनं संपवणं आजिबातच योग्य नव्हतं. अनेक लोक हत्या, बलात्कार करतात, पण त्यांना असं मारलं जात नाही. या मुलांनाच का अशी वागणूक दिली गेली," असा प्रश्नच त्यांनी विचारला आहे.
ही सर्व कुटुंबं अशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास होती, परंतु ते चांगल्या राहणीमानासाठी भरपूर खर्च करायचे, असं गावकऱ्यांनी सांगितलं.
अशी घडली होती घटना
मृत तरुणी गच्चीबावली भागामध्ये नोकरीसाठी जात होती. प्रवासासाठी ती स्कूटीचा वापर करायची. घटनेच्या दिवशी टोंडुपल्ली टोल प्लाझाजवळ स्कूटी पार्क करून ती टॅक्सीने पुढे गेली. पण ती परतली तेव्हा तिच्या स्कूटीचे टायर पंक्चर झालेले होते. म्हणून मग स्कूटी तिथेच टोल प्लाझाजवळ सोडून टॅक्सीने घरी परतण्याचं तिने ठरवलं.
टोल प्लाझाजवळच्या दोन जणांनी पंक्चर काढतो असे सांगत तिची स्कूटी नेली. मृत तरुणीनं आपल्या बहीण आणि भावाला फोनवरून याबाबत सांगितलं होतं. रस्त्यावर एकटं उभं रहायला भीती वाटतेय, अचानक काही लोक दिसू लागले आहेत आणि एक ट्रक आल्याचंही तिने फोनवर बोलताना सांगितलं होतं.
थोड्या वेळात परत फोन करते असं सांगून तिने बहिणीसोबतच संभाषण संपवलं, पण त्यानंतर फोन बंदच झाला.
मृत तरुणीच्या कुटुंबाने टोल प्लाझाजवळ तिचा शोध घेतला आणि त्यांनतर शमशाबाद पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
त्यानंतर शमशाबाद पोलिसांच्या शादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकाम सुरू असलेल्या एका पुलाखाली तरुणीचा अर्धवट जळलेला मृतदेह सापडला होता.
त्यानंतर हा मृतदेह गायब झालेल्या मुलीचाच असल्याचं समोर आलं होतं.
वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)