उन्नाव बलात्कार: 90 टक्के भाजलेल्या पीडितेचा मृत्यू, योगी आदित्यनाथ यांचे फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवण्याचे आदेश

उत्तर प्रदेशच्या उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास दिल्लीत अखेरचा श्वास घेतला.

गुरुवारी आपल्या वकिलांना भेटायला जात असताना आरोपींनी तिच्यावर हल्ला करून तिला पेटवून दिलं होतं. त्यात तिचं 90 टक्के शरीर भाजलं होतं. आधी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं, मात्र नंतर तिला तातडीने कानपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मात्र तब्येत खालावत असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आल्यावर तिला एअरलिफ्ट करून दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. "शुक्रवारी रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी तिला हृदयविकाराचा झटका आला. आम्ही तिला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले मात्र ती जगू शकली नाही," असं सफदरजंग हॉस्पिटलच्या बर्न आणि प्लास्टिक विभागाचे प्रमुख डॉ. शलभ कुमार यांनी सांगितलं.

तिला जिवंत जाळण्याच्या प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडितेच्या मृत्यूवर शोक व्यक्त केल्याचं ट्वीट ANI वृत्तसंस्थेने केलं आहे. सर्व आरोपींना अटक करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

उत्तर प्रदेशचे न्याय मंत्री बृजेश पाठक यांनीही ANIशी बोलताना सांगितलं की, "आम्ही संबंधित कोर्टाला विनंती करू की त्यांनी या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात दररोज घ्यावी."

नेमकं काय झालं होतं?

उन्नावचे पोलीस अधीक्षक विक्रांत वीर यांच्यानुसार पीडित तरुणीने मार्चमध्ये दोन जणांविरुद्ध बलात्काराचा खटला भरला होता. स्थानिक पत्रकार विशाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्चमध्ये या तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. याच प्रकरणात या खटल्याच्या सुनावणीसाठी ती कोर्टाकडे जात असताना आरोपींसह काही तरुणांनी तिला घेरलं आणि पेटवून दिलं.

पोलीस महानिरीक्षक एस. के. भगत यांनी सांगितलं, "बिहार ठाण्याच्या क्षेत्रात तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं तिने सांगितलं. पीडितेने हॉस्पिटलमध्ये ज्या लोकांची नावं सांगितली, त्यापैकीच एक नाव तिच्यावर बलात्काराचा आरोप असलेल्या मुलाचंही होतं. तो मुलगा तुरुंगात होता आणि काही दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता.

पोलिसांनी या प्रकरणी आधी 4 जणांना ताब्यात घेतलं होतं, नंतर पाचवा आरोपीही सापडला. सर्व आरोपींची कसून चौकशी होते आहे, असं भगत यांनी सांगितलं.

प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्यावर उत्तर प्रदेश सरकारही सक्रीय झालं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडितेच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत जाहीर केली.

पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितलं की आरोपी जामिनावर बाहेर आल्यावर धमकावत होते आणि यापूर्वीही तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावरील खटला मागे घेण्यासाठी ते दबाव टाकत होते, असा त्यांनी दावा केला. कमीत कमी 10-12 वेळा त्यांनी खटला मागे घेण्याची धमकी दिली होती, आमच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, असं पीडितेच्या आईने सांगितलं.

मात्र या प्रकरणी कुठल्याही धमकीची सूचना कुटुंबीयांनी दिली नसल्याचं पोलीस महानिरीक्षक एस. के. भगत यांनी सांगितलं.

उन्नावचं हे दुसरं प्रकरण

याआधीही उन्नावचं नाव एका दुसऱ्या बलात्कार प्रकरणात चर्चेत आलं होतं. भाजप नेता कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप ठेवला होता. त्यानंतर तिच्या गाडीला एका ट्रकने धडक दिल्यावर ती गंभीर जखमी झाल्याने प्रकरण मोठं झालं होतं.

या प्रकरणी कुलदीप सेंगरसमवेत काही अन्य लोक तुरुंगात आहेत. पीडित तरुणी उपचारांनंतर सध्या घरी आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)