You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हैदराबाद बलात्कार आणि एन्काउंटर : 'उद्या एखाद्या प्रकरणात निष्पाप आरोपीचं एन्काउंटर झालं तर?'
हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील 4 आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार झाले आहेत. तेलंगाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) जितेंद्र यांनी बीबीसीला ही माहिती दिली आहे.
त्यानंतर आता याप्रकरणी सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. काही जणांनी पोलिसांचं स्वागत केलं आहे, तर काहींनी याला विरोध केला आहे.
राजन सावे यांनी फेसबुकवरील प्रतिक्रियेत पोलिसांच्या कार्याचं कौतुक केलं आहे.
त्यांनी लिहिलंय, "पोलिसांचे अभिनंदन. कायद्याप्रमाणे जातांना एवढा वेळ लागला असता, की न्याय मिळायला कित्येक वर्षं गेली असती. योग्य निर्णय योग्य अमंलबजावणी. आता जरब बसेल असे गुन्हे करणाऱ्यांना."
तर दिलीप हातवळणे यांनी म्हटलंय, "प्रत्येक राज्यांनी असंच अभिनंदनीय कार्य केले पाहिजे. तेलंगणा पोलिसांना सलाम."
पत्रकार रश्मी पुराणिक यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, "हा खून आहे. समाजकार्यासाठी केलेली हत्या पण हत्याच असते! आज ते होते उद्या कोणीही असेल आणि त्यासाठी कारण ही लागणार नाही. शस्त्र ज्याच्या हातात तो जर स्वतःच्या मर्जीवर न्याय ठरवणार असेल, तर ते चूकच आहे."
अंजली दमानिया यांनी म्हटलंय की, "तेलंगणातील बलात्कार प्रकरणातील दोषींना शिक्षा झाल्याचा आनंद आहे, पण एक भारतीय नागरिक म्हणून मला हे पसंत पडलं नाही. न्यायालयानं काहीतरी निर्णय द्यायला पाहिजे होता. पोलिसांचं या प्रकारचं एन्काउंटर मी स्वीकारू शकत नाही. जलद न्याय होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं विशेष न्यायालयं स्थापन करायला हवी."
ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी हैदराबाद एन्काउंटर प्रकरण कायद्याच्या कक्षेबाहेर असल्याचं म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
भाऊसाहेब अजबे यांनी ट्वीटरवर एक प्रश्न उपस्थित केला आहे.
ते लिहितात, "कायदा व सुव्यवस्थेचे अपयश एन्काउंटर ने झाकून जाईल, विलंबकारी न्याय व्यवस्थेपेक्षा असा झटपट न्याय बरा असेही लोकांना वाटेल. प्रश्न एवढाच आहे की, उद्या एखाद्या प्रकरणात निष्पाप आरोपींचं एन्काउंटर झालं तर?"
कुस्तीपटू बबिता फोगट यांनी ट्वीट केलंय, "हैदराबाद पोलिसांच्या या निर्णयाचं संपूर्ण देश स्वागत करत आहे. यामुळे देशातील महिलांमध्ये एकप्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)