You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : 18 वर्षांखालील मुलांना लसीकरणातून का वगळलं? त्यांचं संरक्षण कसं होईल?
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
देशात कोरोनासंसर्ग त्सुनामीसारखा पसरतोय. मुंबई, दिल्ली, उत्तरप्रदेश, गुजरात सर्व राज्यात कोरोनासंसर्गाने हाहा:कार माजलाय. फक्त, ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले रुग्ण नाही. तर, 15 ते 35 वयोगटातील युवा वर्गात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरल्याचं दिसून येतंय.
कोव्हिड-19 च्या झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गाला आळा घालण्यासाठी, लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय असल्याचं, तज्ज्ञांच मत आहे.
त्यामुळे, देशातील लसीकरण मोहिमेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतलाय. 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाविरोधी लस मिळणार आहे.
पण, सर्वात मोठा प्रश्न 18 वर्षाखालील मुलं आणि लहान मुलांचा आहे. लहान मुलांना लसीकरणातून का वगळलं? त्यांच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्न निर्माण झालाय.
18 वर्षाखालील मुलांना लस का नाही?
कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांनाही संसर्ग होत असल्याचं दिसून आलंय. काही प्रकरणात लहान मुलांमध्ये आजार गंभीर स्वरूपाचा असल्याचं पहायला मिळालंय. मग लहान मुलांना लस का नाही?
याबाबत बोलताना, मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. तनू सिंघल यांनी चार महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करतात.
- सद्यस्थितीत देशात उपलब्ध लशीची चाचणी लहान मुलांवर करण्यात आलेली नाही
- लस लहान मुलांसाठी सुरक्षित आहे का? याचा अजूनही ठोस पुरावा उपलब्ध नाही
- ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेल्या लोकांच्या तुलनेत लहान मुलांना आजराचा धोका कमी
- देशात निर्माण होणाऱ्या लशींची मर्यादित संख्या
"लहान मुलांना कोरोना होण्याची संख्या वाढत असली. तरी, 95 टक्क्यांपेक्षा जास्त मुलांना होणारा आजार अत्यंत सौम्य स्वरूपाचा आहे. फार कमी मुलांमध्ये कोरोनामुळे गंभीर आजार झालाय," असं डॉ. तनू सिंघल पुढे म्हणतात.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 1000 प्रौढ व्यक्तींमागे फक्त एका लहान मुलाला कोरोनासंसर्ग होतोय.
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-लहान मुलांमध्ये कोव्हिड-19ची कोणती लक्षणं आढळतात? MIS-C म्हणजे काय?
- वाचा-कोरोनाची लक्षणं जाणवल्यावर कोणती टेस्ट करायची?
- वाचा-लस घेण्यासाठी Co-Win वर नोंदणी कशी करायची?
- वाचा- कोरोना लसीकरणाबाबत तुम्हाला पडलेले 15 प्रश्न आणि त्यांची उत्तरं
लहान मुलांना लसीकरणातून वगळणं योग्य आहे? त्यांच्या सुरक्षेचं काय? याबाबत मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या बालरोग आणि लहान मुलांच्या विभागाचे प्रमुख डॉ. तुषार मणियार म्हणाले, "18 वर्षांखालील मुलांमध्ये आजाराचा मुकाबला करण्याची क्षमता चांगली आहे. ज्येष्ठांच्या तूलनेत लहान मुलांमध्ये, आजारामुळे गुंतागुंत होण्याची शक्यता कमी आहे."
"त्यामुळे 18 वर्षांवरील ज्या व्यक्तींना आजाराचा धोका जास्त आहे. त्यांचं लसीकरण ही आपली प्राथमिकता असली पाहिजे," असं डॉ. मणियार पुढे सांगतात.
राज्यातील 18 वर्षांखालील मुलांमध्ये कोरोनासंसर्गाची आकडेवारी
मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार -
- 0 ते 9 वयोगटातील 9,514 मुलांना कोरोनाची लागण
- 17 मुलांचा मृत्यू झाला
- तर, 10 ते 19 वर्ष वयोगटातील 24,727 कोरोनाग्रस्त मुलांपैकी 33 मुलांचा मृत्यू झाला
- एकूण मुलांच्या 55 टक्के मुलं तर 45 टक्के मुली
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, राज्यात 10 वर्षांखालील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाखापेक्षा जास्त आहे. तर, एकूण दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त कोव्हिड रुग्ण 11 ते 20 या वयोगटातील होते.
लहान मुलांवर कुठे लशींची चाचणी सुरू आहे?
मार्च महिन्यातच अमेरिकेत, लसनिर्मिती करणाऱ्या मॉडर्ना कंपनीने लहान मुलांवर लशीची चाचणी सुरू केलीये. कंपनीने आपल्या प्रेस रिलीजमध्ये याची माहिती दिली आहे. 6 महिन्यांपेक्षा जास्त आणि 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 6750 लहान मुलांवर या लशीची चाचणी करण्यात येणार आहे.
तर, औषधनिर्मिती करणाऱ्या फायझर कंपनीने मार्च महिन्यात, 12 ते 15 वर्षं वयोगटातील मुलांमध्ये लशीचा 100 टक्के प्रभाव दिसून आल्याची माहिती दिली होती. लस दिल्यामुळे मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचं कंपनीने सांगितलं होतं.
फायझर कंपनीच्या माहितीनुसार, 6 महिने ते 11 वर्षांच्या मुलांवर मार्च महिन्यात लशीची चाचणी सुरू करण्यात आली आहे.
तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे, भारतात उपलब्ध असलेल्या कोणत्याही कोरोनाविरोधातील लशीची लहान मुलांवर चाचणी सुरू करण्यात आलेली नाही. संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. तनू सिंघल म्हणतात, "मॉडर्ना आणि फायझर कंपनीने लहान मुलांवर लशीचा चाचणी सुरू केली आहे."
लहान मुलांच्या लसीकरणाबाबत काय म्हणते जागतिक आरोग्य संघटना
लशींची सामान्यत: प्रौढांवर चाचणी केली जाते. लहान मुलं वाढत्या वयात असतात. त्यामुळे त्यांच्यावर चाचणी केली जात नाही. कोव्हिड-19 लहान मुलांच्या तूलनेत प्रौढांसाठी गंभीर आणि धोकादायक आहे.
लस प्रौढांसाठी सुरक्षित आहे. हे चाचणीतून पुढे आलंय. आता मुलांवर त्याची चाचणी सुरू झाली आहे. एकदा चाचणी पूर्ण झाली की त्यानंतर याबद्दल मार्गदर्शक सूचना दिल्या जातील.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)