कोरोना महाराष्ट्र: रेमडेसवीरबाबत तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

"रेमडेसिवीर जीव वाचवणारं औषध नाही. लोकांच्या मनात भ्रम पसरलाय. हे औषध म्हणजे जादूची कांडी आहे. ही जादूची कांडी नाही."

कोव्हिड-19 विरोधातील लढाईत रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी 'रेमडेसिवीर' सामान्यांना आशेचा किरण वाटतंय. पण, कोव्हिड-19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्या सांगण्यानुसार, रेमडेसिवीरमुळे रुग्णांचा जीव वाचतो याचा कोणताच पुरावा नाही.

महाराष्ट्रात कोव्हिड-19 ची दुसरी लाट त्सुनामीसारखी पसरतेय. ज्यामुळे आरोग्यसेवा कोलमडून पडलीये.

रुग्णांना बेड मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागतेय. ऑक्सिजन, ICU आणि व्हेन्टिलेटर बेड्स उपलब्ध नाहीयेत. काही ठिकाणी बेड न मिळाल्याने, तर, काही ठिकाणी ऑक्सिजनच्या अभावी रुग्णांना प्राण गमवावे लागेत आहेत.

एकीकडे बेड्सचा प्रश्न गंभीर बनलाय. तर, दुसरीकडे रेमडेसिवीरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धडपड सुरू आहे. कोरोनाविरोधातील लढाईत रेमडेसिवीर फायदेशीर आहे? कोणत्या रुग्णाला दिलं पाहिजे? महाराष्ट्राच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्याशी बीबीसीने बातचीत केली.

प्रश्न 1. - रेमडेसिवीरमुळे कोरोना रुग्णाचा जीव वाचतो?

डॉ. शशांक जोशी- रेमडेसिवीर जीव वाचवणारं औषध अजिबात नाही. हे व्हायरसला मारणारं, अॅन्टी व्हायरल औषध आहे. याचा वापर 'इबोला' व्हायरसविरोधात केला जात होता. आता आपण याचा वापर कोव्हिडविरोधात करतोय.

या औषधाचा दुरुपयोग होऊ नये यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन, देशभरातील टास्क फोर्स आणि तज्ज्ञांनी एक पत्रक जारी केलंय.

रेमडेसिवीरला आपात्कालीन परवानगी देण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर याचा वापर करण्यात येतोय.

प्रश्न 2. - रेमडेसिवीरचा फायदा काय?

डॉ. शशांक जोशी- योग्य वैद्यकीय सल्ल्याने रेमडेसिवीर घेतलं तर कोरोना रुग्णाचे रुग्णालयात राहाण्याचे दिवस कमी होतात. रेमडेसिवीरमुळे कोरोनाबाधितांची रिकव्हरी लवकर होण्यास मदत होते.

एक ते तीन दिवस रुग्णालयातील स्टे कमी होईल आणि रुग्ण लवकर बरा होण्यास मदत मिळेल.

प्रश्न 3. - रुग्णालयात दाखल झाल्यानंतर किती दिवसात रेमडेसिवीर फायदेशीर ठरतं?

डॉ. शशांक जोशी- कोरोनाग्रस्त रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर पहिल्या 10 दिवसातच हे औषध काम करतं. फक्त पाच दिवस हे औषध द्यावं लागतं. याबद्दल अजिबात दुमत नाही. जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

प्रश्न 4. - कोणत्या रुग्णाला रेमडेसिवीर द्यावं?

डॉ. शशांक जोशी- वैद्यकीय सल्ल्याने मॉडरेट म्हणजेच, मध्यम स्वरूपाचा कोरोनासंसर्ग झालेल्या, ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना देण्यात यावं.

रुग्णालयात उपचारांसाठी दाखल रुग्णांना रेमडेसिवीर द्यावं. घरी असलेल्यांना रेमडेसिवीर अजिबात देऊ नये. लोकांना वाटलं सौम्य आजारात रेमडेसिवीर घरी घेता येईल. हा याचा दुरूपयोग आहे.

रुग्णालयात दाखल असलेल्या, पण ऑक्सिजनची गरज नाही अशा रुग्णांना रेमडेसिवीर देण्याची गरज नाही. योग्य रुग्णाला, योग्यवेळी रुग्णालयातच रेमडेसिवीर द्यावं.

पण, देशभरात रेमडेसिवीरसाठी रुग्णांचे नातेवाईक धावपळ करताना दिसून येत आहेत. लोकांच्या रांगा पहायला मिळत आहेत.

डॉ. शशांक जोशी- रेमडेसिवीरसाठी गोंधळून रुग्ण, त्यांचे नातेवाईक धावपळ करतात. याची अजिबात गरज नाही. कोरोनासंसर्गात योग्य औषध योग्यवेळी दिलं पाहिजे.

लोकांच्या मनात भ्रम पसरला आहे. हे औषध म्हणजे जादूची कांडी आहे. ही जादूची कांडी अजिबात नाही.

लोकांच्या मनातील भ्रम दूर करण्याची गरज आहे. रेमडेसिवीरसाठी जीवाचा आटापिटा करू नका. नातेवाईक मोठ्या रांगेत उभं राहातात. सोशल डिस्टंसिंग पाळत नाहीत. यामुळे त्यांनाही कोरोनासंसर्ग होण्याची शक्यता असते.

रेमडेसिवीरबाबत लोकांना खोटी आशा देऊ नये.

प्रश्न 5. - लोकांमध्ये भ्रम पसरण्याची कारणं काय?

डॉ. शशांक जोशी- याची दोन प्रमुख कारणं आहेत. कोरोनाची त्सुनामी आपल्याकडे मोठ्या झपाट्याने पसरली. रेमडेसिवीर, रुग्णालयातील बेड्सचा एकदम तुटवडा भासू लागला.

कोरोनासंसर्ग एवढ्या झपाट्याने पसरेल याचा आपल्याला अंदाच नव्हता. या लाटेचा सामना करण्यासाठी आपण तयार नव्हतो. त्यामुळे लोकांचे गैरसमज झाले. हे गैरसमज दूर करणं महत्त्वाचं आहे.

आम्ही डॉक्टरांनाही सांगितलंय, रेमडेसिवीरच्या मागे लागू नका. ज्यांना गरज आहे त्यांनाच हे औषध द्या.

लोकांनी ऑक्सिजन मोजणं, ताप, सर्दी, खोकला याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

प्रश्न 6. - रुग्णांकडून रेमडेसिवीरसाठी डॉक्टरांवर दबाव टाकला जातो?

डॉ. शशांक जोशी- रुग्ण डॉक्टरांवर खूप दबाव आणतात. त्यामुळे रुग्णांनी किंवा नातेवाईकांनी दबाव टाकला तरी डॉक्टरांनी ठामपणे सांगितलं पाहिजे. रुग्णाला रेमडेसिवीरची गरज नाही.

प्रयोगशाळेतील औषधांचा आपल्या पेशंटवर प्रयोग करू नये. योग्य रुग्णांना वैद्यकीय सल्ल्याने औषध देण्यास हरकत नाही. डॉक्टरांनी ठरवावं, रुग्णांनी ठरवू नये, आपल्याला कुठल्या औषधाची गरज आहे.

प्रश्न 7 - रेमडेसिवीर कोणामार्फत द्यावं?

डॉ. शशांक जोशी- विविध राज्यांनी अन्न व औषध प्रशासन आणि डॉक्टरांच्या मार्फत औषध द्यावं असे निर्देश दिले आहेत.

कोणत्या रुग्णाला रेमडेसिवीर द्यायचं हे डॉक्टरांना ठरवू द्या. शास्त्रीय कारणांवर हे ठरवलं जाईल. हा निर्णय सरकारी अधिकारी, नेते यांनी घेऊ नये.

प्रश्न 8 - रेमडेसिवीरच्या चाचणीत काय पुढे आलं?

डॉ. शशांक जोशी- जागतिक आरोग्य संघटनेने रेमडेसिवीरची तपासणी केली होती. यावर चार मोठ्या ट्रायल झाल्या आहेत. ज्यामध्ये या औषधाने जीव वाचत नाही हे स्पष्ट झालं.

जगभरातील कोणत्याही संशोधनात रेमडेसिवीरमुळे लोकांचा जीव वाचतो असं दाखवण्यात आलेलं नाही.

प्रश्न 9 - कोव्हिडची लाट पुन्हा येईल?

डॉ. शशांक जोशी- लोकांनी काळजी घेतली पाहिजे. आपण जोपर्यंत मास्क अनिवार्य करत नाही. यासाठी 5000 दंड ठोठावत नाही. तोपर्यंत आपण कोव्हिडवर विजय मिळवू शकणार नाही.

दुसरी, तिसरी, चौथी लाट येत राहील. आपण अर्थचक्रामागे लागलोय पण आरोग्यावर लक्ष देत नाही, ही मोठी निराशाजनक बाब आहे. व्हायरस म्युटेट होत राहील. कोव्हिड आपल्यासोबत राहाणार आहे.

दुसऱ्या लाटेत युवा वर्ग आणि लहान मुलांना संसर्ग होतोय. पण, रिकव्हरी चांगली आहे. पूर्ण भारतामध्ये गेल्यावर्षी जेवढी संख्या होती. आता तेवढी महाराष्ट्रात आहे. प्रशासनाने कठोर रहायला हवं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)