You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : नाईट कर्फ्यू का लावला जातो? त्याने काय साध्य होतं?
- Author, सरोज सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"मला एक गोष्ट सांग ताई...कोरोना व्हायरस फक्त रात्री सगळ्यात जास्त अॅक्टिव्ह असतो का?"
ऑफिसमधून रात्री उशीरा घरी परतणाऱ्या राशीने मला विचारलं. रात्रीचे जवळपास साडे दहा वाजले होते. मी जेवल्यानंतर घराबाहेर फेऱ्या मारत होते आणि राशी ऑफिसमधून घरी उशीरा परतत होती. घरी येताना वाटेत पोलिसांसोबत तिचा वाद झाला होता.
महाराष्ट्रासोबतच दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशांतल्या काही जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आलंय.
महाराष्ट्रामध्ये रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू - रात्रीची संचारबंदी लावण्यात आलेली आहे. देशातल्या अनेक राज्यांनी असं केलंय. गेल्या वर्षी केंद्र सरकारनेही रात्रीची संचारबंदी लावली होती.
पण असं करण्यामागचं कारण काय आहे? ही सगळी राज्यं एकमेकांकडे पाहून असा निर्णय घेतायत की केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला, हे कोणत्याही राज्य सरकारने जाहीर केलेलं नाही.
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयांक भागवत यांच्या मते, रात्री मोठ्या संख्येने लोक मौजमजेसाठी घराबाहेर पडतात, नाईट क्लबला जातात, रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातात. अशा लोकांना थांबवण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न असून त्यासाठी नाईट कर्फ्यू लावण्यात आलाय.
दिल्ली सरकारनेही नाईट कर्फ्यू लावलाय, पण त्यामागचं कारण देण्यात आलेलं नाही. बीबीसीने यावरच्या प्रतिक्रियेसाठी दिल्ली सरकारला प्रश्न विचारला पण त्याचं अधिकृतरित्या उत्तर आलं नाही. दिल्लीच्या उप-राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचं एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.
सामान्य नागरिकांच्या मनातही या नाईट कर्फ्यूविषयी अनेक शंका आहेत.
अशा प्रकारे रात्रीची संचारबंदी लावण्यामागची कारणं काय आहेत हे आम्ही 3 तज्ज्ञ डॉक्टर्सना विचारलं. या तिघांचीही उत्तरं वेगवेगळी आहेत.
पहिलं मत - एम्स (AIIMS) चे कम्युनिटी मेडिसिनचे प्राध्यापक डॉ. संजय राय
"नाईट कर्फ्यू हा कोरोना व्हायरसच्या संसर्गाला आळा घालण्यासाठीचा फार प्रभावी पर्याय नाही. सरकारला याविषयी चिंता आहे आणि सरकार काही ना काही उपाययोजना करतंय, इतकंच यातून दिसतं. हे जनतेसमोर धूळफेक करण्यासारखं आहे.
"कोरोना व्हायरस 3 प्रकारे पसरतो. कोरोनाचा संसर्ग सगळ्यात जास्त ड्रॉपलेट्मुळे पसरतो. जेव्हा आपण बोलतो, शिंकतो, एकमेकांच्या जवळ जाऊन बोलतो, तेव्हा तुषारांच्या माध्यमातून कोरोना पसरू शकतो. पण हे तुषार दोन मीटरपेक्षा जास्त पुढे जात नाहीत. मास्कचा वापर करून, सुरक्षित अंतर ठेवून या प्रकारच्या संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो.
"दुसऱ्या प्रकारचं संक्रमण होतं फोमाइटद्वारे. यामध्ये हे तुषार एखाद्या पृष्ठभागावर स्थिरावतात. अशा प्रकारे संक्रमण होऊ नये, म्हणून वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला जातो. पण अशा प्रकारे संसर्ग झाल्याचीही कमी उदाहरणं आहेत.
"तिसऱ्या प्रकारचा संसर्ग एरोसोलद्वारे होतो. काही अत्यंत सूक्ष्म तुषार काही काळापर्यंत हवेत तरंगत राहू शकतात. हे लहान तुषार मोकळ्या जागांवर आणि बंदिस्त खोलीत जास्त संसर्ग पसरवू शकतात. पण अशा प्रकारे संसर्ग झाल्याची सगळ्यात कमी उदाहरणं पहायला मिळाली आहे.
"जास्त संसर्ग हा ड्रॉपलेट्स किंवा तुषारांमुळे पसरत असल्याने जगभरात मास्क वापरण्याचा, दोन फुटांचं अंतर ठेवण्याचा आणि हात धुण्याचा सल्ला दिला जातोय."
दुसरे तज्ज्ञ - CSIR चे महासंचालक डॉ. शेखर मांडे
कोरोनाच्या या जागतिक साथीविषयी सुरू असलेल्या विविध संशोधनांवर CSIR - काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ही संस्था लक्ष ठेवून आहे.
डॉ. शेखर मांडेंनी सांगितलं, "लोक जास्त करून बंदिस्त ठिकाणी जातात आणि कोरोना पसरण्याचं हे एक कारण आहे. जिथे हवा खेळती असेल तिथे कोरोना पसरण्याची शक्यता कमी असते आणि रेस्टॉरंट, बार, जिम अशा बंदिस्त खोल्यांसारख्या जागी कोरोना पसरण्याची जास्त शक्यता असते. जागतिक आरोग्य संघटनेनेही हे मान्य केलंय.
लोकांनी रात्रीच्या वेळी अशा बंदिस्त ठिकाणी जाऊ नये, हेच नाईट कर्फ्यू लावण्यामागचं वैज्ञानिक कारण आहे. जर लोकांनी स्वतःहून अशा ठिकाणी जाणं कमी केलं, तर सरकारवर असं करायची पाळी येणार नाही.
"जेव्हा लोक ऐकत नाहीत, तेव्हा सरकारला रात्री संचारबंदी लावण्याची पावलं उचलावी लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळी लोक काम करण्यासाठी कमी आणि बहुतेक वेळा मौजमजेसाठी घराबाहेर पडतात. दिवसा लोक कामासाठी घराबाहेर पडतात आणि मनोरंजनासाठी कमी.
"नाईट कर्फ्यू लावण्यासोबतच कार्यालयं बंद करून, काही आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आणूनही कोरोनावर काबू मिळवता येऊ शकतो. पण त्याने आर्थिक नुकसान होतं. म्हणूनच या दोन्हींच्या मधला मार्ग काढणं गरजेचं होतं. त्यासाठी नाईट कर्फ्यू हा चांगला पर्याय ठरू शकतो."
तिसरे तज्ज्ञ - दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलच्या कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉक्टर जुगल किशोर
"नाईट कर्फ्यू लावणं हा सरकारच्या कोरोना विरुद्धच्या मोठ्या रणनीतीचा एक लहानसा भाग असू शकतो. लोकांना ठोस कारणाशिवाय एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ न देणं हे व्यापक स्वरूपातलं धोरण असू शकतं. वेगवेगळ्या मार्गांनी याची अंमलबजावणी करता येऊ शकते.
"पहिली गोष्ट म्हणजे लोकांनी हे स्वतःच लक्षात घेत कारणाशिवाय बाहेर जाणं थांबवावं. कंटेन्मेंट झोन्स तयार करून लोकांचा वावर थांबवणं, हा दुसरा मार्ग असू शकतो. पण लहान परिसरातच याची अंमलबजावणी करता येऊ शकते. याने बाकीच्या भागांमध्ये काही फरक पडत नाही. तिसरा पर्याय म्हणजे अशा समारंभांवर बंदी घालणं जिथे मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येतात. म्हणजे लग्न, बर्थ डे पार्टी, पब, बार इत्यादी.
"राज्य सरकारं तिसरा पर्याय म्हणून नाईट कर्फ्यूचा वापर करतायत. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठीचा हा फार प्रभावी मार्ग नाही, पण ही समस्या आता गंभीर रूप धारण करतेय आणि लोकांनी आताच मनावर घेतलं नाही तर परिस्थिती आणखीन बिघडू शकते, असा संदेश यामुळे नक्की लोकांपर्यंत जातो.
"फक्त नाईट कर्फ्यू लावल्याने कोरोनाचा संसर्ग किती कमी होतो याविषयी कोणतंही संशोधन अद्याप झालेलं नाही. पण लोकांचा वावर कमी करून कोरोनाच्या प्रसारावर काबू करता येऊ शकतो हे विज्ञानातल्या संशोधनाने सिद्ध झालंय. लोकांचा वावर कमी झाला की R नंबर (व्हायरसचा रि-प्रॉडक्टिव्ह नंबर) हळुहळू कमी होतो. पण यासोबतच इतर कठोर पावलं उचलण्याची गरज आहे."
केंद्र सरकारने दिलेली माहिती
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी 15 मार्च 2021 ला महाराष्ट्र सरकारला एक पत्र पाठवलं होतं. वीकेंड लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूचा कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यामध्ये अगदीच कमी परिणाम होत असल्याचं या पत्राच्या शेवटच्या भागात स्पष्ट म्हटलं होतं.
कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी राज्य सरकारने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ठरवलेल्या कंटेन्मेंट स्ट्रॅटेजीकडे लक्ष द्यावं, असं यात म्हटलं होतं.
यावरून हे स्पष्ट होतंय की यावेळचा नाईट कर्फ्यू हा केंद्र सरकारच्या सांगण्यावरून होत नसून राज्य सरकारांच्या सूचनांनुसार होत आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)