You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र लॉकडाऊन : राज्याची वाटचाल कडक लॉकडाऊनच्या दिशेने होतेय का?
- Author, हर्षल आकुडे
- Role, बीबीसी मराठी
राज्यात कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी प्रशासनाचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या प्रसारावर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (13 एप्रिल) रात्री साडेआठ वाजता राज्यात 15 दिवसांच्या लॉकडाऊनसदृश्य नियमांची घोषणा केली होती.
गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन करण्याचा इशारा राज्य सरकारकडून वारंवार देण्यात येत होता. गुढीपाडव्याच्या दिवशी याला मुहूर्त मिळाला. पण, ती घोषणा करतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांचे कठोर निर्बंध असा शब्दप्रयोग केला.
यानुसार, 14 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.
अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असतील, रिक्षा, रेल्वे, विमानसेवा या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सुरू असतील.
ही संपूर्ण नियमावली तुम्हाला याठिकाणी वाचायला मिळेल.
पण, हे निर्बंध लागू होऊनसुद्धा राज्यातील परिस्थितीत काहीच फरक जाणवला नाही. 'लॉकडाऊन'मधील आतापर्यंतच्या चार दिवसांत राज्यात सर्वच बाबतीत जैसे थे स्थिती पाहायला मिळते.
लॉकडाऊन करूनसुद्धा अजूनही रस्त्यांवरील गर्दी, वाढती रुग्णसंख्या, बेड, औषधं, ऑक्सिजन यांची कमतरता यांचीच चर्चा ठिकठिकाणी पाहायला मिळते.
या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून आता पुन्हा लॉकडाऊनचा इशारा दिला जात आहे. पुढील लॉकडाऊन आता आणखी कठोर असेल असा इशारा सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून पुन्हा दिला जात आहे. देशात इतर राज्यांमध्येही निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत.
या सर्व गोष्टींचा विचार केल्यास महाराष्ट्राची वाटचाल कडक लॉकडाऊनच्या दिशेने होतेय का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
'समोरून कुलूप, मागून चालू'
सत्ताधारी राजकीय नेते तसंच अधिकाऱ्यांकडून संपूर्ण लॉकडाऊन होण्यामागचं एक कारण म्हणजे रस्त्यांवर दिसणारी गर्दी.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी निर्बंध लादले असले तरी रस्त्यांवरची गर्दी कमी होताना दिसत नाही.
अत्यावश्यक सेवा, पार्सल जेवण, औषधं, भाजी यांसारखी कारणे दाखवून लोक घराबाहेर पडत आहेत. भाजी मंडईमध्ये तर तुफान गर्दी पाहायला मिळते.
या गर्दीला रोखण्यात पोलीस आणि प्रशासन अपयशी ठरत आहे का, अशीही चर्चा दुसऱ्या बाजूला सुरू आहे.
याचा फायदा घेऊन गल्लोगल्ली नागरिक घोळका करून उभे असलेले, कट्ट्यांवर बसल्याचं पाहायला मिळतात. मैदानात जाऊ शकत नसल्याने काही क्रिकेटप्रेमी तरूणांनी मोकळ्या रस्त्यांना आपलं खेळाचं मैदान बनवलं आहे. चहा टपऱ्या सुरू राहतील, असं सरकारने आधीच स्पष्ट केलं होतं.
ही स्थिती निर्माण होण्यामागचं कारण म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनमधून दिलेल्या पळवाटा असल्याचं मत सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारतीय नागरिक ग्राहक महासंघाचे माजी अध्यक्ष योगीन गुर्जर यांनी व्यक्त केलं.
गुर्जर यांच्या मते, "राज्यातील लॉकडाऊन सध्या चेष्टेचा विषय बनला आहे. लांबलचक नियमावली लोकांना देण्यात आली. तेव्हापासून काय चालू काय बंद हा पीएचडी संशोधनाचा विषय बनला आहे. लोक संभ्रमावस्थेत आहेत. सध्या महाराष्ट्राची स्थिती समोरून कुलूप आणि मागून चालू अशी आहे."
या परिस्थितीला नागरिकही तितकेच जबाबदार आहेत, असं गुर्जर यांना वाटतं. ते सांगतात, "आपण नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत गाफील राहिलो. त्याचा आपल्याला फटका बसलेला आहे. दुसरी लाट येणार हे आपल्याला आधीपासून माहीत होतं. तरीही मास्क, सॅनिटायझर न वापरणं, सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणं यामुळे कोरोना फोफावला."
लोक गर्दी करणं टाळत नाहीत. याबाबत रोज अनेक बातम्या टीव्हीवर पाहायला मिळतात. मास्क वापरल्याने संसर्गाची शक्यता 90 टक्क्यांनी कमी होते. पण तरीही अनेकजण मास्क वापरत नाहीत. किमान गर्दीत तरी मास्क वापरायला हवा, असं गुर्जर म्हणाले.
...तर कठोर लॉकडाऊन लावावा लागेल - अजित पवार
लोकांनी सहकार्य न केल्यास नाईलाजास्तव मागच्यावेळी लावला तसा कडक लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (16 एप्रिल) दिला.
पुण्यात जिल्हा प्रशासनासोबत आयोजित कोरोना स्थिती आढावा बैठकीत पवार बोलत होते.
नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करत नियमांचं पालनही करावं, असं आवाहन करताना अजित पवार म्हणाले, "पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अधिक लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. पुणेकरांनी मागच्यावेळी शनिवार रविवारच्या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला होता. तेव्हा मी पण त्यांचं कौतुक केलं. आता यावेळीही शनिवार रविवार दोन दिवस पुणेकर हीच गोष्ट दाखवतील. अन्यथा मागील वेळी होता तसा कडक लॉकडाऊन आणावा लागेल, तशी वेळ येऊ नये अशी विनंती आहे."
फक्त उपमुख्यमंत्री अजित पवारच नव्हे तर मंत्रिमंडळातील इतर नेत्यांनीही स्वरुपाचा इशारा दिल्याचं पाहायला मिळालं.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसंच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपण कठोर निर्बंध नव्हे तर संपूर्ण लॉकडाऊनबाबत आग्रही असल्याचं सांगितलं आहे.
"नाशिकमध्ये संपूर्ण लॉकडाऊन करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचीसुद्धा लॉकडाऊन करा, अशीच मागणी आहे. त्यानुसार मीसुद्धा लॉकडाऊनबाबत आग्रही असून शहर-जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन करा ही माझी मागणी आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेटून चर्चा करणार आहे," असं भुजबळ शनिवारी (16 एप्रिल) आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही संपूर्ण लॉकडाऊनची मागणी केली.
ANI वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाल्या, "बहुतांश नागरिक लॉकडाऊनचं पालन करताना दिसत आहे. 95 टक्के नागरिक लॉकडाऊनचे नियम पाळतात. पण 5 टक्के लोक विनाकारण बिनधास्त फिरतात. त्यांच्यामुळेच इतर लोकांना त्रास होत आहे. एखादा महिना भाजी खाल्ली नाही तर मरणार नाही, पण कोरोना झाला तर मरण्याची शक्यता जास्त आहे. एकाला लागण झाल्यास संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण होते. ही सगळी परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सर्वांशी बातचीत करून लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेऊ शकतात. लॉकडाऊन लागलाच पाहिजे, असं माझं म्हणणं आहे."
महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या
दुसरीकडे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही. शनिवारी (17 एप्रिल) रोजी राज्यात 67 हजार 123 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. तसंच गेल्या 48 तासांच 220 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात प्रतिदिन 60 हजारांच्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत.
सध्या राज्यात 6 लाख 47 हजार 933 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 25 हजार 623 जणांना संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आलेलं आहे.
इतकंच नव्हे तर विविध रुग्णांच्या संपर्कात आणि प्रवास करून आलेल, लक्षणं जाणवणारे, न जाणवणारे असे तब्बल 35 लाख 72 हजार 584 नागरिक सद्यस्थितीत होम क्वारंटाईनमध्ये आहेत, याकडेही लक्ष वेधणं गरजेचं आहे.
बेड, औषधं, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर यांची कमतरता
एकीकडे रुग्णसंख्येत वाढ होत असताना बेड, औषधं आणि ऑक्सिजन या गोष्टी उपलब्ध होत नसल्याची तक्रार आता नेहमीचीच बनली आहे.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्यसुविधांवर ताण येत असल्याचीही तक्रार येत आहेत. आरोग्य यंत्रणेवर ताण आल्यास लॉकडाऊनशिवाय पर्याय नसतो, अशी भूमिका आरोग्यमंत्री राजेश टोपे सातत्याने घेत आले आहेत.
10 एप्रिल रोजी पुणे, नागपूर, मुंबईत एकही व्हेंटीलेटर शिल्लक नव्हतं. राज्य शासनाने बेडची माहिती देण्यासाठी बनवलेल्या डॅशबोर्डवर याची माहिती देण्यात आली होती.
ताज्या माहितीनुसार, सद्यस्थितीत पुण्यात फक्त 9 व्हेंटीलेटर शिल्लक आहेत. रुग्णवाढीचं प्रमाण पाहिल्यास ही संख्या पुरेशी नाही. राज्यात इतरत्र हीच परिस्थिती आहे. तालुक्यांमधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन संपल्याच्या बातम्या वाचनात येत आहेत. बेडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव होताना दिसते.
सध्या नाशिकमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असल्याचे सांगितले आहे. सध्या ऑक्सीजनची 139 मेट्रिक टन एवढी मागणी आहे. मात्र हातात फक्त 87 टन ऑक्सीजन उपलब्ध आहे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
या पार्श्वभूमीवर राज्यात ज्या प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे त्याप्रमाणात बेडही वाढले पाहिजेत, बेड्स नाहीत अशी परिस्थिती होता कामा नये, अशी सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना दिली.
पण याचा अर्थ राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलडमडली असा होत नाही, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.
ते म्हणाले, "आरोग्य यंत्रणा मागील वर्षभरापेक्षा अधिक काळ जीवाचं रान करतेय. पोलीस राबतायेत, डॉक्टर्स राबतायेत. नव्याने पुण्यात 900 वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. त्यांना भरती करण्याचे अधिकार देण्यात आलेत. MBBS डॉक्टर पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. त्यावर लवकरच उपाययोजना करण्यात येईल."
दरम्यान, रेमडेसिवीर औषधांच्या टंचाईवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असून त्यावरून जुगलबंदी रंगल्याचंही पाहायला मिळतं.
स्थानिक पातळीवर निर्बंध घालण्यास सुरुवात, अत्यावश्यक सेवांनाच इंधन
वरील सर्व सगळ्या गोष्टींवर नजर टाकल्यास राज्यातील कोरोना स्थिती गंभीर असल्याचं आपल्या लक्षात येऊ शकतं.
रस्त्यांवरील वाढत्या गर्दीबाबत आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली होती.
रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच इंधन उपलब्ध होईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं होतं.
याशिवाय, स्थानिक पातळीवरही काही निर्बंध वाढवले जात आहेत. पुण्यात पूर्वी जाहीर केलेला वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय कायम ठेवण्यात आलेला आहे. म्हणजेच नव्याने लागू केलेले निर्बंध आणि वीकेंड लॉकडाऊनचे निर्बंध हे दोन्ही नियम पुण्यात लागू असतील.
त्याशिवाय, सोलापुरात अत्यावश्यक सेवेसाठी फिरण्याची वेळ घटवून फक्त सहा सातांवर आणण्यात आली आहे.
सोलापुरात भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांना फक्त सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेतच जाता येईल. त्यानंतर बाहेर पडणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिला आहे.
या सर्व घडामोडींचा विचार केल्यास राज्यातील निर्बंध आणखी कठोर होण्याची शक्यता आहे. प्रशासन याबाबत काय निर्णय घेतं, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)