कोरोना: ज्या ठिकाणी अनेक डॉक्टर्स घडवले त्याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने हतबल होत सोडले प्राण

    • Author, समीरात्मज मिश्र
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

"अलाहाबाद शहरातील ज्या स्वरूपराणी हॉस्पिटलमध्ये पाच दशकांपर्यंत माझ्या पतीने लोकांवर उपचार केले, ज्या ठिकाणी अनेक डॉक्टर्स घडवले त्याच हॉस्पिटलमध्ये त्यांनी उपचाराअभावी हतबल होत प्राण सोडले. मी स्वतः डॉक्टर असूनही त्यांची काहीच मदत करू शकले नाही."

प्रयागराजच्या प्रसिद्ध डॉक्टर रमा मिश्रा यांना फोनवरून हे सर्व सांगताना अश्रू अनावर झाले आणि त्या रडू लागल्या. त्यांची हतबलता केवळ यासाठी नव्हती की, त्यांच्या डोळ्यांसमोर हॉस्पिटलचा हलगर्जीपणा, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून उपेक्षा आणि सुविधांच्या अभावी पतीचा मृत्यू झाला, तर यासाठीही होती की, त्या चार रात्रीत त्यांनी बऱ्याच लोकांचा याच पद्धतीनं जीव जाताना पाहिला.

80 वर्षीय डॉक्टर रमा मिश्रा प्रयागराजमधील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत आणि अलाहाबाद (आताचं प्रयागराज) च्या मोतीलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.

स्वरूपराणी नेहरू हॉस्पिटल याच मेडिकल कॉलेजशी संबंधित आहे. डॉ. रमा मिश्रा आणि त्यांचे पती डॉ. जे. के. मिश्रा हे गेल्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर ते दोघेही उपचारासाठी स्वरूपराणी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते.

डॉ. रमा मिश्रा सांगतात, "कोव्हिड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सुरुवातीला आम्ही क्वारंटाईन झालो. मात्र, त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी होती. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी सल्ला दिलाय की हॉस्पिटलमध्ये दाखल करा. खरंतर हॉस्पिटलमध्ये बेड्सची कमतरता होती. मात्र, आमच्या परिचयाच्या एका डॉक्टरने बेड्सची व्यवस्था केली. मात्र, त्यानंतर जी परिस्थिती होती, ती प्रचंड भीतीदायक होती."

डॉ. रमा मिश्रा आणि त्यांचे पती डॉ. जे. के. मिश्रा 13 एप्रिलला हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलच्या कोव्हिड वॉर्डात एकच बेड मिळू शकला. डॉ. रमा मिश्रा सांगतात की, "त्या रात्री फरशीवरच झोपावं लागलं. कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला बेड मिळाला."

त्या पुढे सांगतात, "मला बेड मिळाला नाही. मात्र, मला ऑक्सिजनचीही आवश्यकता नव्हती आणि माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह असूनही माझी तब्येत इतका वाईट नव्हती. त्या रात्री माझ्या पतीला कुठलं तरी इंजेक्शन देण्यात आलं. मात्र, आम्हाला सांगितलं नाही की नेमकं कुठलं इंजेक्शन दिलं.

"विचारल्यानंतरही सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा इंजेक्शन दिलं गेलं. त्या रात्री आम्ही तिथं जे पाहिलं, ते प्रचंड भयंकर होतं. रात्रभर रुग्ण ओरडत होते. त्यांच्याकडे पाहणारा कुणीच नव्हता. अधून-मधून नर्स येत होत्या, डॉक्टर येत होते. ते केवळ ओरडून रुग्णांना गप्प बसायला सांगत होते किंवा एखादा इंजेक्शन देत होते. त्यातले अनेक लोक पांढऱ्या कपड्यात गुंडाळून बाहेर नेले जात होते. म्हणजेच, त्यांचा मृत्यू झाला होता," डॉ. मिश्रा सांगतात.

हॉस्पिटलमध्ये काय झालं?

प्रयागराजच्या मम्फोर्डगंजमध्ये राहणारे डॉ. जे. के. मिश्रा आणि त्यांची पत्नी डॉ. रमा मिश्रा या दोघांनीही एक मार्च रोजीच बेली हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लशीचा पहिला डोस टोचून घेतला होता. सात एप्रिल रोजी दुसरा डोस लावण्यासाठी गेले. मात्र, लस घेतल्यानंतरही दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह आले.

13 एप्रिलला दोघांनाही स्वरूपराणी नेहरू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, तिथेच डॉ. जे. के. मिश्रा यांचा शुक्रवारी दुपारनंतर मृत्यू झाला. डॉ. रमा मिश्रा म्हणतात, "डॉ. जे. के. मिश्रा स्वरूपराणी नेहरू हॉस्पिटलचे सर्वांत आदी हाऊस सर्जन होते आणि नंतर सर्जरी विभागाचे प्रमुख बनले. डॉ. रमा मिश्रा स्वत:ही स्वरूपराणी नेहरू हॉस्पिटलमध्ये स्त्री आणि प्रसूती विभागात प्राध्यापक होत्या."

डॉ. रमा मिश्रा म्हणतात, "हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे नोडल ऑफिसर डॉ. मोहित जैन हे आमचे ज्युनियर होते. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते तिथे आले. आम्हाला पाहून त्यांना धक्का बसला. आम्हाला पाहून त्यांनी विचारलं, तुम्ही इथं कसे आलात? काही वेळ राहिले, विचारपूस केली. मात्र, त्यांनीही सांगितलं नाही की, आम्हाला काय झालंय आणि नेमके कुठले उपचार केले जात आहेत. त्यानंतर ते एकदाही पाहण्यास आले नाहीत."

डॉ. रमा मिश्रा सांगतात की, "वॉर्डमध्ये रात्रीच्या वेळी कुणीच नसायचं. वॉर्डबॉय सुद्धा नसायचा. रात्री केवळ ज्युनियर डॉक्टर येत होते. तेही केवळ ऑक्सिजन लेव्हल पाहण्यासाठी. पहिल्या दिवशी एक डॉ. सचदेवा होते, ते डॉ. जे. के. मिश्रांचे ज्युनियर होते. ते तीन फूट अंतरावरून विचारपूस करून निघून गेले आणि पुन्हा आलेच नाहीत. थोड्या वेळानंतर आणखी एक डॉक्टर आले. त्यांनी आम्हाला मेदांता हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला."

डॉ. राम मिश्रा पुढे सांगतात, "हे असंच तीन दिवस सुरू राहिलं आणि 16 एप्रिलला डॉ. जे. के. मिश्रांची तब्येत आणखी ढासळली. ऑक्सिजन लेव्हल सातत्यानं घसरत होती. एक इन्स्ट्रूमेंट आणखी लावलं गेलं, तर त्यांचा श्वासच थांबू लागला. मग आम्ही ते हटवलं. मात्र, थुंकीतून रक्त येऊ लागलं.

"मग तिथे असलेल्या एका व्यक्तीला याबाबत सांगितलं, तर त्यानंही बेजबाबदारपणे उत्तर दिलं की, या आजारात तर हे होतंच. मी ओरडू लागले की, तुम्ही काहीतरी करा, व्हेंटिलेटरवर ठेवा, मात्र डॉक्टर म्हणाले की, इथं व्हेंटिलेटर नाही. डॉक्टर शक्ती जैन, ज्या आमच्या ज्युनियर डॉक्टर होत्या, त्या धावत वरच्या वॉर्डात गेल्या आणि त्यांनी बेडची व्यवस्थी केली. जोपर्यंत लिफ्टनं वर पोहोचल्या, तोपर्यंत त्यांना श्वास घेण्यास अडथळे येत होते. व्हेंटिलेटर आणण्यात आणि जोडण्यात इतका वेळ गेला की, तेवढ्या वेळात डॉ. जे. के. मिश्रांचा जीव गेला," डॉ. रमा मिश्रा सांगतात.

डॉ. रमा मिश्रा हॉस्पिटलचे कर्मचारी आणि डॉक्टर यांच्या बेजबाबदारपणामुळे आणि कथित वाईट वर्तनामुळेही व्यथित झाल्यात. त्या म्हणतात, "आमचे तर अनेक डॉक्टर ओळखीचे होते, तरीही ही परिस्थिती ओढवली. सर्वसामान्य माणसांचं तिथं कुणी ऐकत नाही. इतकंच काय, त्यांनी काय म्हटलं तरी त्यांच्यावर असं ओरडलं जातं की जसं त्यांनी काही चोरलंय. हॉस्पिटलमध्ये ना कसली सुविधा आहे, ना तिथं काही स्टाफ आहे. मी खरं सांगू, हे लोक हाच विचार करत होते की, हे इथे मरण्यासाठीच आले आहेत."

सुविधांची कमतरता असल्याचे आरोप फेटळले

स्वरूपराणी हॉस्पिटलमधील कोरोनाचे नोडल अधिकारी डॉ. मोहित जैन यांनी सुविधांच्या कमतरतेचा आरोप फेटाळतात. ते म्हणतात, "हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या इतकी वाढतेय की, त्यांना सांभाळणं कठीण होऊन बसलंय."

बीबीसीशी बोलताना डॉ. मोहित जैन यांनी सांगितलं, "सर्वांत मोठी अडचण अशी आहे की, इथं येणारा प्रत्येक रुग्ण गंभीर अवस्थेत आहे. या क्षणी हॉस्पिटलमध्ये 500 हून अधिक रुग्ण आहेत, यातील अनेकजण गंभीर स्थितीत आहेत. अशा स्थितीत येणाऱ्यांवर उपचार करण्यासाठी आमच्याकडे फार काही उरत नाही. रुग्ण जर वेळेवर हॉस्पिटलमध्ये आला, तर त्याच्यावर उपचारासाठी आम्ही सक्षम असतो."

डॉ. मोहित जैन म्हणतात, "लोक लक्षणं दिसल्यानंतरही कितीतरी दिवस घरीच राहतात आणि स्थिती गंभीर बनली की मग हॉस्पिटलमध्ये येतात. आधी बनवलेल्या नियमांनुसार आमच्याकडे सुविधा होत्या. मात्र, आताच्या स्थितीच्या हिशेबानं सुविधांचा विचारही केला नव्हता."

मात्र, वास्तव हे आहे की, लोकांना कोरोनाच्या चाचणीसाठीही वणवण करावी लागते. ज्यांची चाचणी होतेय, त्यांना रिपोर्ट मिळण्यासाठी तीन ते चार दिवस जातायेत. या दरम्यान रुग्णाची अवस्था आणखी वाईट होते. मात्र, रिपोर्ट नसल्यानं हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाही आणि दुसरीकडे, कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं तो अनेकांपर्यंत आजार पसरवत आहे.

डॉ. जे. के. मिश्रा यांच्या मृत्यूबाबत डॉ. मोहित जैन म्हणतात, "त्यांचा मृत्यू कार्डिअक अरेस्टने झाला. डॉ. रमा मिश्रा या माझ्याही सीनियर होत्या. त्यांच्या पतीचा मृत्यू झाल्यानं त्यांची तक्रार नक्कीच असेल. मात्र, आम्ही उपचारात कुठेही कमी ठेवली नाही. मी स्वत: अनेकदा त्यांच्याकडे जाऊन विचारपूस केली. पाच मिनिट आधीपर्यंत ठीक होतं. मात्र, अचानक त्यांची तब्येत खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्या स्थितीत त्यांना कुठल्याच हॉस्पिटलमध्ये वाचवणं शक्य नव्हतं."

प्रयागराजमध्ये काय स्थिती आहे?

आजच्या घडीला प्रयागराज लखनऊनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेला उत्तर प्रदेशातील जिल्हा बनला आहे. या दोन्ही शहरात सरासरी 10 हून अधिक लोक दरदिवशी कोरोनानं मृत्यमुखी पडत आहेत. कोरोनाची चाचणी करणारा इथला प्रत्येक पाचवा माणूस पॉझिटिव्ह आढळत आहे.

रविवारीही 1711 लोकांना इथं कोरोनाची लागण झाली. 15 लोकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये बेड आणि ऑक्सिजनची कमतरता, यामुळे अनेकांचा जीव जातोय.

कोरोना हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रयागराजमधील एका डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, "मृत्यूंचे आकडे येतायत, ते वास्तवातल्या आकड्यांच्या तुलनेत काहीच नाहीत."

स्थानिक लोकांच्या मते, शहराच्या वेगवेगळ्या स्मशाणभूमीत प्रत्येक दिवशी 100 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतायत आणि यातील अधिकाधिक मृत्यू कोरोनामुळे झालेत. मात्र, प्रशासन किंवा आरोग्य विभाग याला दुजोरा देत नाहीत.

डॉ. मोहित जैन भलेही सर्वकाही ठीकठाक असल्याचं म्हणत असतील, मात्र, डॉ. रमा मिश्रा यांच्या मते, इथे जी परिस्थिती आहे, त्यातून एकाही गंभीर रुग्णाला वाचवणं शक्य असल्याचं दिसत नाही.

त्या म्हणतात, "हॉस्पिटलमध्ये लोकांना जबरदस्तीने थांबवलं जातंय. बेजबाबदारपणा खूप आहे आणि सुविधा काहीच नाहीत. केवळ तीन व्हेंटिलेटर होते, तेही गरजेला काहीच काम करत नव्हते. औषधं वगैरे तर देत होते, पण त्यात खूप गोंधळ होता. या हॉस्पिटलमधल्या रुग्णांना वाचवायचं असल्यास किमान 15-20 डॉक्टरांची ड्युटी इथं लावावी लागेल. भले ते चार-चार तास काम करतील. गंभीर रुग्ण प्राण गमावतील, पण हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्याकडे पाहिलं तर जाईल. वेळेत उपचार तरी मिळतील."

डॉ. रमा मिश्रा यांचा दुसरा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे आणि रात्री त्या घरी परतल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, कोरोना वॉर्ड पूर्णपणे बंद करायला नको, तिथे काचा लावल्या पाहिजे, जेणेकरून आत काय होतंय, हे रुग्णांच्या नातेवाईकांनाही दिसेल आणि कळेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)