You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रेमडेसिवीर : देवेंद्र फडणवीस म्हणतात, 'मी कारवाईच्या इशाऱ्यांना घाबरत नाही'
महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यावरून सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. इंजेक्शनवरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आमने सामने आले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री (17 एप्रिल) बीकेसी पोलीस स्टेशनला भेट दिली होती.
त्याची दखल घेत गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, "पोलिसांवर दबाव टाकणं योग्य नाही, या पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत."
वळसे पाटील यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी म्हटलं, "या प्रकरणी गृहमंत्र्यांना माझी चौकशी करायची असेल किंवा कारवाई करायची असेल तर त्यांनी खुशाल करावी. मी कारवाईच्या इशाऱ्यांना घाबरत नाही. राज्यातील जनतेच्या हितासाठी मी गेले 20 वर्षे विरोधी पक्षाच्या माध्यमातून आवाज उठवतोय. या राजकारणाच्या दरम्यान 36 केसेस माझ्या अंगावर घेतल्या आहेत. आणखी काही केसेस लागल्या तरी हरकत नाही."
पण, राज्याचे गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेते एकमेकांना इशारा देत आहेत, ते प्रकरण नेमकं काय आहे, हे आता पाहूया.
काय घडलं?
दमणच्या ब्रुक फार्मा (Bruck Pharma) या कंपनीकडे तब्बल 60 हजार रेमडेसिवीरचा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली.
त्यानुसार शनिवारी (17 एप्रिल) मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर हे बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात पोहोचले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी म्हटलं, "महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत असताना अचानक ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारने केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक आहे.
"एका मंत्र्यांचा ओएसडी दुपारी फोन करून धमकी देतो आणि विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून तुम्ही रेमडेसिवीर देऊच कसे शकता, असा जाब विचारतो आणि संध्याकाळी 10 पोलीस त्यांना ताब्यात घेतात, हे सारेच अनाकलनीय आहे."
फडणवीस यांनी पुढे म्हटलं, "महाराष्ट्र आणि दमणच्या परवानग्या घेतल्या असताना, अधिकाधिक रेमडेसिवीर महाराष्ट्राला द्या, असे स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी या कंपनीला सांगितले असताना इतक्या गलिच्छ पातळीवर राजकारण होत असेल, तर हे फारच गंभीर आहे."
'व्यावसायिकाला वाचवण्यासाठी विरोधी पक्षनेते का गेले?'
देवेंद्र फडणवीस यांच्या या आरोपानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, "रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर काही कंपन्या आमच्याकडे साठा उपलब्ध आहे, आम्हाला विक्रीसाठी परवानगी द्या, अशी विनंती घेऊन महाराष्ट्र सरकारकडे आल्या. ब्रुक फार्मा नावाची कंपनी आणि त्यांचे मालक राजेश डोकानिया हेसुद्धा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत भेटले. त्यांनी आपल्याकडे रेमडेसिवीरचा साठा असल्याची माहिती दिली आणि परवानगी दिली तर तो आपल्याला देऊ शकतो, अशी माहिती दिली."
"बीडीआर आणि ब्रुक फार्मा या दोन कंपन्यांकडून परवानगी मागण्यात आली, त्यांना शनिवारी रात्री ती देण्यात आली. त्याआधी या साठ्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर राजेश डोकानिया यांना पोलिसांनी बोलावलं. त्यांच्याकडून माहिती गोळा करण्याचं काम सुरू होतं.
"त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे सगळे पोलीस स्टेशनला रात्री सव्वा अकराला पोहोचले. जर एखाद्या पोलिसाला माहिती मिळाली पोलीस चौकशी करतात. मग डोकानियाला सोडवण्यासाठी राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते का गेले? अशा पद्धतीनं विरोधी पक्षनेत्यानं वकिलपत्र घेणं योग्य नाही. डोकानिया यांना भेटण्यासाठी भाजपचे नेते दीव-दमणला गेले होते. यांच्याकडे 50 हजारचा साठा आहे. आम्ही तो आणून राज्यात वाटप करू. महाराष्ट्रात भाजपचे लोक ज्यांच्याकडे साठा आहे तो घेऊन स्वत: विकायची भूमिका घेत आहेत," असं नवाब मलिक यांनी म्हटलं.
पोलिसांचं म्हणणं काय?
याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
"रेमडेसिवीरचा तुटवडा आहे आणि त्यामुळे काळाबाजार होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळे मग मिळालेली माहिती आम्ही पडताळून पाहिली. राजेश डोकानिया यांना फक्त चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यांना अटक करण्यात आलेली नाहीये," असं मुंबईचे डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनी सांगितलं.
मुंबई पोलिसांनी सद्भावनेने काम केलं, चौकशीसाठी संचालकांना बोलावण्यात आलं होतं. फार्मा कंपनीच्या संचालकांकडे चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं. पुढे चौकशीची गरज पडल्यास त्यांना हजर राहाण्यास सांगितले आहे, असंही पोलिसांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
दरम्यान, रेमडेसिवीरच्या वापराबाबत महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सने पत्र जारी केलं आहे. या पत्रात त्यांनी हे मुद्दे मांडले आहेत.
महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सने रेमडेसिवीरबद्दल जारी केलं पत्र
- रेमडेसिवीरला कोव्हिड-19 विरोधात वापराची आपात्कालीन परवानगी मिळाली आहे. पण हे ड्रग प्रायोगिक तत्वावर वापरण्यात येत आहे, रेमडेसिवीर जीव वाचवणारं औषध नाही.
- याच्या वापरामुळे मृत्यू कमी झाल्याचं संशोधनात आढळून आलेलं नाही. रेमडेसिवीरच्या वापरामुळे रुग्णालयातल दाखल होण्याने दिवस कमी होतात, असं अभ्यासात दिसून आलंय.
- रेमडेसिवीर फक्त आणि फक्त रुग्णालयात देण्यात यावं. रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी ज्यांना मध्यम स्वरूपाचा आजार आहे आणि ऑक्सिजनवर असलेल्यांना दिलं जावं. पाच दिवस देण्यात यावं.
- आजाराच्या पहिल्या 9-10 दिवसात द्यावं रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर करू नये.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)