You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र कोरोना : 'गेल्या 15 दिवसांपासून आमच्या गावात दररोज एका जणाचा मृत्यू होतो'
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
"गेल्या 15 दिवसांपासून आमच्या गावात कोरोनामुळे दररोज एका जणाचा मृत्यू होतोय. गावात सध्या कोरोनाचे 500च्या जवळपास रुग्ण आहेत." - सतीश उगले, दोडी बुद्रूक
नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या दोडी बुद्रूक गावात सध्या ही परिस्थिती आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं महाराष्ट्रात धुमाकूळ घातलाय. आधी शहरी भागात फोफावलेल्या कोरोना व्हायरसनं आता ग्रामीण भागावर कब्जा करायला सुरुवात केलीय. गावागावांत कोरोना रुग्णसंख्येचं वाढतं प्रमाण त्याचचं द्योतक आहे. मुंबई, पुणे, नागपूर इथल्या आरोग्य सेवांच्या तुटवड्याविषयी जोरात चर्चा सुरू असताना राज्याच्या ग्रामीण भागात नेमकी कशी परिस्थिती आहे, याचा घेतलेला हा आढावा.
दोडी बुद्रूकमध्ये गेल्या 15 दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. पण फक्त रुग्णच नाही तर मृत्यूंचं प्रमाणही वाढलंय.
याला आळा घालण्यासाठी दोडी बुद्रूकचे गावकरी गावातच कोव्हिड केअर सेंटर उभारण्याचा विचार करत आहेत.
"गावात कोरोनाची खूपच भयानक स्थिती निर्माण झाली आहे. आमच्या गावात कोरोनाचा डेथ रेट खूप जास्त आहे. त्यामुळे मग व्हॉट्सअप ग्रूपवर चर्चा केली आणि आता गावकरी लोकवर्गणी करून गावातच काही खाटांचं कोव्हिड केअर सेंटर उभारण्याचा विचार करत आहेत. पण, या सेंटरसाठी डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी कसे उपलब्ध करायचे, हा मोठा प्रश्न मात्र आमच्यासमोर आहे," सतीश सांगतात.
जवळपास 7 हजार लोकसंख्येच्या दोडी बुद्रूकमध्ये ग्रामीण रुग्णायल आहे. पण ते संपूर्ण तालुक्यासाठी असल्यानं पाहिजे तशा सोयी-सुविधा पुरवल्या जात नसल्याची तक्रार ग्रामस्थ करतात.
यामुळे मग कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना त्यांच्या स्वत:च्या घरीच क्वारंटाईन केलं जात आहे.
दवाखान्याची भीती
गावातल्या नागरिकांच्या मनात कोरोनाविषयी काय आहे, असं विचारल्यावर सतीश सांगतात, "कोरोनाची टेस्ट केली आणि पॉझिटिव्ह आलो तर बेड मिळत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मग टेस्ट करायची नाही आणि दुखणं अंगावर काढायचं अशी स्थिती सध्या आहे. खासगीमध्ये उपचार घ्यायचे म्हटलं तर दीड लाख-दोन लाख रुपये कुठून आणायचे, असाही प्रश्न लोकांना पडला आहे."
नाशिकचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल शेंदाणे जिल्ह्यातील याविषयी सांगतात, "कोरोना रुग्णांची संख्या इतकी वाढलीय की डॉक्टर कमी पडत आहेत. या परिस्थितीत सगळं प्रशासनावर ढकलून चालणार नाही. लोकांनी नियम पाळले पाहिजेत, जागरूक व्हायला पाहिजे. घरात आयसोलेशनची सोय असेल तर घरीच थांबायला पाहिजे. ज्याला खरंच गरज असेल त्यानेच बेडसाठी प्रयत्न करायला हवेत. कोरोनाची रुग्णसंख्या लाखात आहे, त्यामुळे सगळ्यांनाच बेड मिळणं शक्य नाही."
नांदेड जिल्ह्यातल्या हरबळ येथील रहिवासी श्रीकांत वाघमारे यांच्या गावातही मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे.
ते सांगतात, "गावातील वातावरण खूपच खराब झालं आहे. घरोघरी किमान 2 तरी रुग्ण सापडतील. लोक भीतीने हॉस्पिटलमध्ये जात नाहीत. 3000 लोकसंख्येच्या आमच्या गावात विविध प्रकारच्या आजारांनी आतापर्यंत एका महिन्यात 20 मृत्यू झाले आहेत."
गावांमधील मृत्यूंचं प्रमाण वाढल्यामुळे लोक अधिक जागरूक झाल्याचं आदिनाथ गाढे यांचं निरीक्षण आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या गुहा गावचे आदिनाथ सांगतात, "आता वस्तीवस्तीवर कोरोनाचे पेशंट आहेत. त्यामुळे लोक आता शेतात घास कापायला जायचं म्हटलं तरी तोंडाला मास्क बांधत आहेत. गावात मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे, त्याचा हा परिणाम आहे."
'7 किलोमीटरसाठी 4000 रुपये'
औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातील खोपेश्वर बोलठाण गावच्या सुधीर काकडे यांचे आजी व मोठ्या काकांचं कोरोनामुळे निधन झालंय. आता त्यांचे लहाने काका औरंगाबादमधल्या शासकीय रुग्णालयात अडमिट आहेत.
बीबीसीला त्यांनी सांगितलं, "आमच्या गावात 30 ते 40 घरं आहेत, गाव लहान आहे. गटग्रामपंचायत आहे. गावात दवाखाना नाही. त्यामुळे गावापासून 4 किलोमीटर अंतरावरील वाडगाव इथं काकांची कोरोना टेस्ट केली. ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर काकांना गंगापूर इथल्या दवाखान्यात भरती केलं. पण श्वास घ्यायला त्रास व्हायला लागल्यामुळे त्यांना औरंगाबादला आणावं लागलं.
"एमजीएम ते घाटी (शासकीय रुग्णालय) अशा 7 किलोमीटर अंतरासाठी खासगी अॅम्बुलन्सनं 4 हजार रुपये घेतले. काकांना साध्या गाडीत न्यायची भीती वाटत होती, त्यामुळे मग आम्ही त्यांना अॅम्बुलन्सनं नेलं. मोठ्या काकांना अहमदनगरहून औरंगाबादला आणायचे अम्बुलन्सनं 17 हजार रुपये घेतले होते."
अहमदनगर ते औरंगाबाद हे 115 किलोमीटर इतकं अंतर आहे.
अॅम्बुलन्सचे अवाजवी दर ही औरंगाबादमधील मोठी समस्या असल्याचं स्थानिक पत्रकारांनीही बीबीसीला सांगितलं.
अॅम्बुलन्सच्या दराविषयी औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं, "औरंगाबादमध्ये स्मार्ट सिटीच्या बऱ्याचशा बसेस अॅम्बुलन्स म्हणून तैनात केल्या आहेत. याशिवाय दवाखान्यांच्या स्वत:च्या अॅम्बुलन्स अशाप्रकारचा दर आकारत नाहीत. पण, जर जिल्ह्यात काही ठिकाणी अशाप्रकारे दर आकारला जात असेल तर मी त्याची चौकशी करतो."
राज्य सरकार काय करतंय?
ग्रामीण भागातील बेड्सची कमतरता आणि खासगी रुग्णवाहिकेचे दर यांविषयी सरकार नेमकं काय करत आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही आरोग्य मंत्री आणि राज्य आरोग्यमंत्री यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण अद्याप संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान, रुग्णवाहिकेनं ठरलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारला तर लायसन्स रद्द करुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या वर्षी सांगितलं होतं.
तर राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय आरोग्य संस्थांमधील खाटांची संख्या वाढवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)