कोरोना व्हायरस: ही ‘मेक द चेन’ कशी ‘ब्रेक’ होणार?

    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी

साधारण दुपारी एकची वेळ. कडकडीत उन्हात एक मारुती ओम्नी ऍम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या दारात येऊन थांबली. धाडधाड चारपाच तरुण त्यातून खाली उतरले आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा शोधाशोध करू लागले.

एक अत्यंत सिरिअस रुग्ण त्या गाडीत होता. त्याला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं दिसत होतं. क्षणात डॉक्टरांनी त्याला तपासलं आणि पुढच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. पुढच्या मिनिटाला ती सर्व मंडळी त्या गाडीत बसली आणि पुढे रवाना झाली.

कोव्हिड हॉस्पिटलच्या स्टाफसाठी हे रोजचंच आहे. त्यांना आता त्याचं काही वाटत नाही. त्यातील बहुतेकांनी दोन्ही लशी घेतल्यात त्यामुळेही असेल. पण माझ्यासारख्या माणसासाठी ते चित्र नवच होतं.

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचं अख्खं सरकार 'ब्रेक द चेन- ब्रेक द चेन' म्हणत आहेत. त्यासाठी दररोज नवनवे नियम जारी करत आहेत आणि दुसरीकडे मात्र त्याच्या विरुद्ध म्हणजेच 'मेक द चेन'चं चित्र निर्माण होताना दिसत आहे.

माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या उपचारांसाठी माझं रोजच कोव्हिड रुग्णालयात जाणं होत आहे. पण तिथलं चित्र पाहिलं की मनात भीती निर्माण होते. एका रुग्णाला दाखल करण्यासाठी किमान 3 तरी नातेवाईक त्यांच्या मागे येतच आहेत.

परवा एका आजोबांना रुग्णालयात दाखवण्यासाठी त्याचं संपूर्ण कुटुंब आलं होतं. बरं येणारे सर्वंच नातेवाईक कोव्हिडचे सर्व नियम पाळतातच असं नाही. कित्येकदा तणावात असलेल्या या नातेवाईकांना आपण एका कोव्हिड झालेल्या किंवा त्याची लक्षण असलेल्या रुग्णाबरोबर आहोत याचं भान नसतं.

बरं नातेवाईकांनी अजिबात येणं गरजेचं नाही का? असं विचारलं तर त्याचं उत्तरसुद्धा नाही असंच आहे. त्याचं कारण एक रुग्ण दाखल झाला आणि त्याची स्थिती गंभीर असेल तर त्याच्यामागे किमान 3 नातेवाईकांना धावपळ करावीच लागते. त्याला कारणंही तशीच आहेत.

1)रेमडिसिवीर शोधणे (थेट रुग्णालयांना त्याचा पुरवठा होत असला तरी तो अपुराच आहे.)

2) प्लाझ्माची सोय करणे ( त्यासाठी किमान २ डोनर शोधून ते प्लाझ्मा बँकमध्ये घेऊन जावे लागतात.)

3)रुग्णालयात चुकून ऑक्सिजन संपला तर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर शोधण्यासाठी धावपळ करणे.

4)दररोज लागणारी औषधं आणि इतर गरजेच्या छोट्यामोठ्या गोष्टींची खरेदी करणे.

ही अजिबात न टाळता येणारी कारणं आहेत. आणि यातील प्रत्येक गोष्ट मिळवणे म्हणजे रुग्णांच्या नातेवाईकांनी कसोटीच असते. या कसोटीत पास होण्यासाठी पैसे, वेळ आणि श्रम यांची अचूक मात्रा लागते. पण त्याहून मोठी कसोटी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स आणि इतर स्टाफची असते.

रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सांभाळता सांभाळता त्यांच्या नाकी नऊ आलेले असतात. हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. तणावात काम करत असलेल्या या मंडळीना कित्येकदा प्रत्येक रुग्णासोबत इतर तपासण्यांसाठी जाणं शक्य होत नाही.

अशावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांच्या रुग्णांना घेऊन जाणं भाग असतं. आपण एका कोव्हिड पेशंटबरोबर जात आहेत याची कल्पना असतानासुद्धा अनेकांचा नाईलाज असतो.

रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणारी, त्यांना मदत करणारी, कधीकधी डॉक्टरांची नजर चुकवून आयसीयूत रुग्णांना भेटून येणारी (हो हे खरं आहे) हीच नातेवाईक मंडळी पुढे बाजारात भाजी घ्यायला, किराणा घ्यायला, एटीएमध्ये पैसे काढायला इकडेतिकडे फिरतात.

तरुण नातेवाईक मंडळी तर आपल्याला काहीच होणार नाही या आविर्भावात कधी मास्क न लावताच इतर मित्रमंडळींना भेटतात. नाक्यावर जाऊन मित्रांशी गप्पाटप्पा करतात.

आपण खूप ठिकाणी कोरोनाला एक्सपोज झालो आहोत याचा विचार मनात नसतो किंवा असला तरी त्याचा सिरिअसनेस नसतो.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. तेव्हा पोलिसांच्या भीतीने का होईना लोक नियम पाळत होते. आता कडक लॉकडाऊनला वेगवेगळ्या स्तरांतून तीव्र विरोध होत आहे.

परिणामी सरकारनंसुद्धा कडक लॉकडाऊनला बगल दिली. पण ज्या कष्टकरी वर्गाचा किंवा हातावर पोट असलेल्या वर्गाचा आणि व्यापाऱ्यांचा या लॉकडाऊनला विरोध आहे त्यांच्याकडून सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं किती पालन होतंय?

अजूनही काही विक्रेते, व्यापारी किंवा कामगार वर्ग मास्कबाबत बेफिकीर आहेत. मास्क, सॅनिटायझर, योग्य अंतर याबाबत लोकांमध्येसुद्धा बेफिकिरी दिसते.

सरकारने ठाराविक वेळेपर्यंतच दुकानं सुरू ठेवण्याची परावनगी दिली आहे, पण जोपर्यंत पालिकेची गाडी दुकानं बंद करण्यासाठी येत नाही तोपर्यंत दुकानं सुरूच ठेवली जात आहेत. पालिकेची गाडी आली की मग फेरीवाल्यांची पळापळ सुरू होते.

एकीकडे राज्यात दररोज नव्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या 50 हजारांच्या पुढेच येत आहे. प्रत्येक छोट्यामोठ्या दवाखान्यात रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत.

मेडिकल शॉपमध्ये औषधं घेण्यासाठी गर्दी होत आहे. प्रत्येकाच्या ओळखीत किंवा नात्यात कुणाचा ना कुणाचातरी कोव्हिडमुळे मृत्यू झाला आहे किंवा कुणी ना कुणी अत्यंत गंभीर आहे. ( त्याची चर्चा मात्र प्रत्येकाच्या तोंडी आहे.) आणि दुसरीकडे हे असं चित्र आहे.

कोरोनाबाबतची भीती लोकांच्या मनात कमी होताना दिसत आहे. पहिल्या लाटेत कोरोनाचा रुग्ण सापडलेल्या इमारतींमधल्या लोकांच्या मनात प्रचंड धाकधूक असयाची.

आता मात्र कोरोनाचे रुग्ण सापडलेल्या इमारतींमध्ये नागरिक रोजच्या प्रमाणे वावरताना दिसतात. सोसायट्यांमध्ये रात्री राउंड मारण्यासाठी निघालेल्या महिला आणि पुरुषांमध्ये 50 टक्के लोकांनी मास्क लावलेला नसतो. ज्यांनी लावलेला असतो त्यांचा नाकाच्या खाली असतो.

बरं ही मंडळी रोज टीव्हीवर परिस्थिती किती गंभीर झाली आहे याचं वार्तांकन पाहणारी आहेत. ब्रेक द चेन, ब्रेक द चेन हे शब्द कुठल्यानं कुठल्या प्रकारे त्यांच्या कानावर पडत आहेत.

अशी अनेक उदाहरणं आणि निरीक्षणं मांडता येतील. पण गरज कोरोनाला घाबरण्याची नाही तर त्याला गांभीर्यानं घेण्याची आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)