You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लॉकडाऊन टाळा असं म्हणून मोदींनी उद्धव ठाकरेंची राजकीय कोंडी केली आहे का?
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार अशी चर्चा सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की राज्यांनी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवावा. पण तरीदेखील महाराष्ट्रात लॉकडाऊन लागला.
लॉकडाऊन लागल्यानंतर जनतेचा रोष आपल्या अंगावर येऊ नये म्हणून त्यांनी हे विधान केले आणि जर लॉकडाऊन लागला तर त्याची जबाबदारी राज्यांवर जाईल अशी सोय देखील त्यांनी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
उद्धव ठाकरेंनी जनतेला फारसा न रुचणारा निर्णय घेण्याचा धोका पत्करला आणि लॉकडाऊन जाहीर केला. या पार्श्वभूमीवर अशी चर्चा सुरू आहे की 'लॉकडाऊन टाळा' म्हणून मोदींनी उद्धव ठाकरेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला की त्यांनी हे विधान खरंच देशाचं अर्थचक्र सुरळीत राहावं म्हणून केलं. या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला आहे.
महाराष्ट्र राज्य पूर्ण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना पंतप्रधान मोदींच्या लॉकडाऊनबाबतच्या राज्यांना केलेल्या सूचना या राज्यांसाठी आश्चर्यकारक होत्या.
महाराष्ट्रात याचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारमधलं राजकारण काही थांबत नाहीये. कोरोनाचा काळही याला नाही.
लॉकडाऊन टाळा हा पंतप्रधानांचा सल्ला कोणत्या आधारावर?
महाराष्ट्रात सुरू असलेल्या लॉकडाऊनची चर्चा देशभर होतेय. यावेळी पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन टाळा हे विधान विशेष करून महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाविरोधात होतं.
यामुळे महाविकास आघाडीचे नेत्यांनी पंतप्रधानांच्या भाषणावर निशाणा साधला आहे. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत म्हणतात, "महाराष्ट्रात 24 तासांत 64 हजार रूग्ण येत आहेत. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाउन टाळा असा सल्ला कुठल्या आधारावर देतायेत?
"दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांची कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. पश्चिम बंगाल साठी भाजपने देशभरातून लोक गोळा केले. ते कोरोनाचा संसर्ग घेऊन विविध राज्यात परतले. हरिद्वारचा कुंभमेळा, पश्चिम बंगालमधील राजकीय मेळे यातून देशाला फक्त कोरोनाचा संसर्ग मिळाला आहे," असं सामनाने म्हटले आहे.
संजय राऊत पुढे म्हणतात, "एकत्रितपणे हे संकट परतवायचं आहे असं मोदी म्हणतात. या एकत्रितमध्ये विरोधी विचारांच्या लोकांना स्थान नाही".
कोरोना काळातही केंद्र सरकार विरूद्ध राज्य सरकार हे राजकारण सुरूच आहे. मागच्या अनेक दिवसांमधले दाखले देत राऊत यांनी लॉकडाऊनबाबत पंतप्रधान मोदींवर टीका केली.
तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही मोदींच्या भाषणावर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणतात, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असू शकतो. आम्ही कुठे विसरलोय, जेव्हा तुम्ही एक दिवस अचानक आलात. जेव्हा कुठल्याही मुख्यमंत्र्यांना कुठल्याही केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याला माहिती नव्हतं, त्यावेळी तुम्ही अचानक येऊन लॉकडाऊन जाहीर केलं. तुम्ही महाराष्ट्राला तुम्ही किती पाण्यात बघणार?
लॉकडाऊन करताना कुठल्याही मुख्यमंत्र्याला आनंद होत नसतो. पण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने कोरोनाच प्रसार होतोय, त्यासाठी लॉकडाऊन गरजेचं आहे. पंतप्रधान मोदीजी तुम्ही महाराष्ट्रांचं कौतुक केलं पाहीजे".
मोदींनी जबाबदारी राज्यांवर ढकलली?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या निवेदनात केंद्र सरकारने चांगल्या पद्धतीने केलेलं लसीकरण, कोरोनाच्या पहिल्या लाटेत दिलेल्या लढ्याबाबतचं कौतुक केलं.
सध्याच्या परिस्थितीतही केंद्र सरकार ऑक्सिजन रेमडेसीवीर इंजेक्शन्स हे सर्व उपलब्ध करून देण्यासाठी किती प्रयत्नशील आहे हे दाखवण्याचा प्रयत्नही केला. पण लॉकडाऊन टाळा हे बोलण्याच्या मागे काय राजकारण आहे?
बिझनेस स्टॅंडर्डच्या पत्रकार अदिती फडणवीस सांगतात, "पंतप्रधान मोदी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवा हे दुसर्यांदा बोलले आहेत. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीतही ते लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवा असं म्हणाले होते. या बैठकीनंतर काही वेळातच मध्यप्रदेशमध्ये निर्बंध लावण्यात आले. मध्यप्रदेशात तर भाजपचं सरकार आहे. मग त्यांनी पंतप्रधानांचं का नाही ऐकलं?"
"एकतर सध्याची ग्राऊंडवरची परिस्थिती मोदींना माहिती नाही किंवा त्याची जबाबदारी पंतप्रधानांना राज्यावर ढकलायची आहे असं असू शकेल. पण राज्य सरकारलाही ही हाताबाहेर गेलेली परिस्थिती नियंत्रणात आणणं कठीण जातंय," असं आदिती फडणवीस सांगतात.
"ज्या राज्यात भाजप सरकार नाही ती राज्य मोदींविरोधात बोलतायेत. पण ज्या राज्यात भाजप प्रणित सरकार आहे त्यांना बोलता येत नाहीये. आजच्या परिस्थितीत जर श्रमिक वर्गापैकी कोणाला जाऊन विचारलं की, या परिस्थितीला जबाबदार कोण आहे?
"तर कोणी क्वचित पंतप्रधान मोदींचं नावं घेतील. पण जास्तीतजास्त लोकं राज्य सरकारने काही केलं नाही हे जरूर बोलतील. जबाबदारी झटकण्याचं राजकारण सध्या सुरू आहे," असं आदिती फडणवीस यांना वाटतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)