You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी: लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय समजावा, मोदींचे राज्यांना आवाहन
लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांना केलं आहे. पंतप्रधान मोदींनी आज ( 20 एप्रिल) देशाला संबोधित केले.
कोरोनाविरोधात लढण्यासाठी आतापर्यंत काय काय योजना करण्यात आल्या तसेच पुढे काय करता येईल याबाबत त्यांनी जनतेला संबोधित केले.
देशातील राज्य सरकारांना ते म्हणाले, लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय समजावा, कारण लॉकडाऊनमुळे खूप मोठे आर्थिक नुकसान होते.
आज महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत सर्व मंत्र्यांनी एकमताने म्हटले की राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडायची असेल तर कडक लॉकडाऊन लावावाच लागेल. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी राज्यांना लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा असे आवाहन केले आहे.
आपल्या संबोधनात ते म्हणाले, "कोरोनाविरुद्ध देश मोठी लढाई लढत आहे. काही आठवड्यांपूर्वी परिस्थिती आटोक्यात होती. मात्र कोरोनाची दुसरी लाट वादळाप्रमाणे आली आहे. जो त्रास तुम्हाला होत आहे त्याची मला पूर्ण जाणीव आहे."
"ज्या लोकांनी आप्तस्वकीयांना गमावलं आहे, मी त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. कुटुंबातील एक सदस्य म्हणून, मी तुमच्या दु:खात सहभागी आहे. संकट मोठं आहे. आपल्याला निर्धार करावा लागेल. आपल्याला हे संकट पेलायचं आहे."
ऑक्सिजनच्या तुटवड्यावर काम सुरू आहे
देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. देश आणि राज्य सरकार ही गरज भागवण्यावर लक्ष ठेवत आहेत. देशात ऑक्सिजनची निर्मिती वाढवण्यावर लक्ष दिलं जात आहे, असं मोदींनी सांगितलं.
गेल्या काही दिवसात कोरोनामुळे ऑक्सिजनची कमतरता भासते आहे. यासंदर्भात संवेदनशीलतेनं काम केलं जात आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, खाजगी कंपन्या यांच्याद्वारे ऑक्सिजन पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एक लाख नवे ऑक्सिजन सिलिंडर, औद्योगिक वापरासाठीचा ऑक्सिजन रुग्णांसाठी तसंच ऑक्सिजन एक्स्प्रेस हे उपाय केले जात आहेत. फार्मा कंपन्यांनी औषधाचं उत्पादन वाढवलं आहे. जानेवारी-फेब्रुवारीच्या तुलनेत औषधांचं उत्पादन वाढवलं गेलं आहे. फार्मा कंपन्यांच्या प्रमुखांशी बैठक झाली.
जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम
आपल्या शास्त्रज्ञांनी अल्पावधीत परिणामकारक लस तयार केली. कोल्डचेन व्यवस्थेला अनुकूल लस आपल्याकडे आहे. खाजगी क्षेत्राने उद्यमशीलतेचं प्रदर्शन केलं आहे. लशीसाठी परवानगी देण्याची यंत्रणा फास्ट ट्रॅक पद्धतीने राबवण्यात आली. हे एका मोठ्या यंत्रणेचं यश आहे. दोन मेड इन इंडिया लशी आपल्याकडे आहे.
जगातील सगळ्यांत मोठी लसीकरण मोहीम आपण राबवत आहोत. सर्वाधिक लोकांना लस दिली जावी यासाठी प्रयत्न. दहा कोटी, बारा कोटी इतक्या लोकांना लस देण्यात आली. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वॉरियर्स, वरिष्ठ नागरिक यांना लस देण्यात आली आहे. लशीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला. 1 मे नंतर अठरा वर्षापेक्षा अधिक वयाच्या लोकांना लस देण्यात येईल. लस तयार होईल त्यापैकी अर्धा हिस्सा राज्यं आणि खाजगी क्षेत्राला मिळेल.
शहरांमध्ये जो आपला वर्कफोर्स आहे त्यांना लस मिळेल. श्रमिकांना लस मिळेल. राज्य प्रशासनाला आग्रह आहे की त्यांनी श्रमिकांचा विश्वास मिळवावा. तुम्ही आहात तिथेच राहा. राज्यांद्वारे असा विश्वास मिळाला तर श्रमिकांचा फायदा होईल. लस मिळेल आणि कामही बंद राहणार नाही.
गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक प्रभावी कामगिरी
गेल्या वर्षीची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा आपल्याकडे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पायाभूत यंत्रणा नव्हती. पीपीई किट, लॅब नव्हती. माहितीही नव्हती. मात्र कमी कालावधीत सुधारणा करण्यात आली. डॉक्टरांनी कोरोनावर इलाजात प्राविण्य मिळवलं आहे.
पीपीई किट मोठ्या प्रमाणावर आहेत. लॅबचं नेटवर्क आहे. चाचण्यांचं प्रमाण वाढवत आहोत. आपण मजबुतीने, धैर्याने कोरोनाविरुद्ध लढतो आहोत. याचं श्रेय तुम्हा सगळ्यांना आहे. शिस्त आणि धैर्य यांच्यासह आपण कोरोनाशी लढूया.
तरुणांनी पुढे यावे
जनभागीदारातून आपण कोरोनाला हरवूया. अनेक माणसं, सामाजिक संस्था लोकांना आवश्यक मदत करत आहेत. लोक झोकून देऊन काम करत आहोत. त्यांच्या सेवाभावाला मी वंदन करतो. देशवासीयांना अपील करतो की संकटाच्या काळात नागरिकांनी पुढे यावं आणि ज्यांना मदत हवी आहे त्यांना मदत करावी. आपण एकमेकांना मदत केली तरच कोरोनाविरुद्ध लढाई जिंकू शकतो.
चौक, सोसायटी, मोहल्ले, अपार्टमेंटमध्ये तरुणांनी गट तयार करावेत. कोरोना नियमावलीचं पालन करण्यासाठी काम करावं. लॉकडाऊनची गरज पडणार नाही.
तरुणांना आवाहन आहे, असं वातावरण तयार करा की विनाकारण कोणी बाहेरच पडणार नाही. तुमचे प्रयत्न बदल घडवून आणू शकतात. संकटाच्या काळात प्रसारमाध्यमांचं जे काम सुरू आहे त्यांनी भीतीचं वातावरण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत.
अफवा पसरू नये यासाठी काम करावं. लॉकडाऊनला रोखायचं आहे. शेवटचा पर्याय म्हणून राज्यांनी लॉकडाऊनचा विचार करावा. मायक्रो कंटेनमेंट झोन करावेत. मर्यादा पुरुषोत्तम राम यांचा सगळ्यांना संदेश हाच की मर्यादांचं पालन करावं. कोरोनाविरुद्द लढण्यासाठी नियमांचं शत प्रतिशत पालन करावं. दवाई भी, कडाई भी.
लशीनंतर कोरोना नियमावलीचं पालन करावं. रमझान धैर्य, शिस्त, संयम शिकवतो. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी याची आवश्यकता आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा.
'धैर्य सोडू नका'
देशातील डॉक्टर, पॅरामेडिकल, आरोग्य कर्मचारी, नर्स, अम्ब्युलन्स ड्रायव्हर, पोलीस, सुरक्षा, सफाई कर्मचारी यांना वंदन करतो. तुम्ही जीवावर उदार होऊन लोकांना वाचवत आहात. तुम्ही कुटुंब, सुखं सोडून दुसऱ्यांसाठी योगदान देत आहात.
कठीण काळात आपण धैर्य सोडायला नको. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रयत्न करूया. तेव्हाच आपण विजय मिळवू शकतो. हाच मंत्र समोर ठेऊन देश दिवसरात्र संघर्ष करतो आहे.
देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कालच केंद्राने घोषणा केली की देशातील 18 वर्षांपुढील व्यक्तींना लस देण्याची परवानगी देण्यात यावी.
गेल्या काही दिवसांत देशातील कोरोनाबाधितांचा आकडा लाखांच्या पार जात आहे. महाराष्ट्रात दररोज पन्नास हजारांहून नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)